• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

जेवण बनवण्याचे प्रयोग!

विलास कुमार (खाणार्‍याने खात जावे)

marmik by marmik
June 2, 2026
in इतर, खानपान, विशेष लेख
0
जेवण बनवण्याचे प्रयोग!

कोकणात आमच्या कंपनीने नुकतेच एक ऑफिस थाटले होते. ऑफिस म्हणजे काय? तर खाली तळमजल्यावर दुकाने आणि वर पहिल्या मजल्यावर एका रांगेत पाच-सहा रिकाम्या खोल्या असलेली चाळवजा इमारत. त्यातल्या दोन खोल्या आमच्या कंपनीने भाड्याने घेतल्या होत्या. आम्ही तीन इंजीनियर आणि दोन हेल्पर असे पाच जण तेथे सुरुवातीला रहात होतो.

एका दमात पंधरा पायर्‍या चढून गेलो की समोरच (म्हणजे जेथे बाल्कनी असते तेथे) आंघोळीला मोरी केलेली होती! ‘तनशुद्धी’सारखं पवित्र कार्य लपून-छपून का करावे? असा मालकाचा रोकडा सवाल होता. आम्ही सर्वजण पुरुषलिंगी असलो तरी पहिल्या मजल्यावरच्या बाल्कनीत आंघोळ करण्याएवढे बेशरम नव्हतो! गावात एक पूर्वेला आणि एक पश्चिमेला अशा दोन नद्या होत्या. त्यातील पूर्वेकडील नदीवर आम्ही आंघोळीला जात असू.

त्या छोट्याशा गावात एकुलते एकच हॉटेल होते. आम्ही तिन्ही त्रिकाळ नाश्ता-चहा-जेवण तेथेच करत असू. त्या हॉटेलचे तेच तेच पदार्थ खाऊन काही दिवसांतच आम्ही कंटाळलो. एके दिवशी असेच आम्ही संध्याकाळी जेवायला बसलेलो असता माझा सहकारी रघुनाथ मला अचानक म्हणाला, ‘आपण बाई ठेऊया का?’
माझा आ वासलेला प्रश्नार्थक चेहरा पाहून घाईघाईने पुढे म्हणाला, ‘स्वयंपाकासाठी म्हणतोय मी!’
‘पण, ती पैसे घेईल!’ माझी निरागस शंका.
‘घेईना काय हजार-बाराशे! आपल्याला हवे ते बनवून देईल की!’ रघुला काहीही झाले तरी त्या हॉटेलात जेवायचे नव्हते!
‘अरे पण हजार-बाराशे काय कमी आहेत?’ दुसरा सत्यवान नावाचा सहकारी म्हणाला. ‘शिवाय वाण-सामानाचे अजून वेगळे पैसे खर्च होतील.’
‘बरोबर आहे. आपलाच पगार वट्ट आठशे रुपये आहे… बाई ठेवणे कसे परवडेल?’ विजय म्हणाला.
‘मग तुम्हीच उपाय सांगा. मला इथे परत पाऊल टाकायचे नाही!’ रघु टेबलवर मूठ आपटत म्हणाला.
‘त्यापेक्षा आपण सर्वांनी मिळून जेवण बनवले तर?’ मी चुटकी वाजवत विचारले.
ही आयडिया सर्वांना पसंत पडली. सत्यवान म्हणाला, त्याला भात बनवता येतो. विजय म्हणाला डाळ बनवणे त्याच्या डाव्या हाताचा मळ आहे! मी चपाती-भाजी जन्मात कधी बनवली नसली तरी थोड्याशा प्रयत्नाने जमेल, अशी खात्री होती. अशा तर्‍हेने मग आम्ही सर्वांनी स्वत:च जेवण बनवण्याचे ठरवले. डाळ-भात-भाजी-चपाती बनवणे हे काही फार कौशल्याचे काम नसावे अशी आमची सर्वांची ठाम समजूत होती!

आम्ही स्टोव्ह आणि डाळ-भात येवढे साहित्य जमवले. इकडून तिकडून काही भांडी आणि ताटे मागवली. वरण-भात काय कोणीही करेल असे समजून आम्ही ह्या उपक्रमाची धुरा दोन इंजिनीअरांवर सोपवली. त्यातील एक होता गोव्याचा आणि एक होता कर्नाटकचा. गोव्याच्या इंजिनीअरने चार वाट्या तांदूळ घेऊन त्यात तपेली काठोकाठ भरेल एवढे पाणी घातले. उकळी आल्यावर पाणी काढून टाकायला सांगून तो बाजारात डाळीसाठी हळद आणायला गेला. तिकडे किराणा मालाच्या दुकानावर मालकाऐवजी त्याची सुंदर मुलगी पाहून तेथेच बराच वेळ रेंगाळला. इकडे ह्या कर्नाटकवाल्याने भाताला तासभर उकडू दिले. ‘आमच्याकडे भाताचे पाणी काढून टाकत नाहीत, पूर्ण आटवतात’ असे म्हणत त्याने अजून एक तास पाणी पूर्ण आटेपर्यंत भात शिजवला. जो भात नावाचा प्रकार केला होता तो खीर आणि खिचडी ह्या मधल्या घनतेचा झाला होता. डाळीला खाली करपल्यामुळे वेगळीच चव आली होती. ती भातापेक्षा जास्त दाट असल्यामुळे आम्ही भातात डाळ कालवण्याऐवजी डाळीत भात ओतून घेतला आणि ते मिश्रण केवळ भूक अनावर झाल्यामुळे कसेबसे पोटात ढकलले. दोघेही ह्या फसलेल्या प्रयोगाचे खापर एकमेकांवर फोडत होते. आपलीच पद्धत योग्य आहे असे दोघेही आम्हा सर्वांना पटवून देऊ लागले होते आणि अशा तर्‍हेने तीव्र मतभेद झाल्यामुळे दोघांनी आमच्याशी असहकार पुकारला.

‘मिशन डाळ-भात’ असे अयशस्वी झाल्यामुळे आता अशा बिकट समयी तारणहार म्हणून माझ्याकडून भाजी-चपाती मिळेल अशा आशेने (की आशाळभूतपणे?) सर्व माझ्याकडे पाहू लागले. विदेशी राष्ट्रांनी आपले तंत्रज्ञान देण्याचे नाकारले की जसे भारतीय शास्त्रज्ञ संपूर्ण देशी बनावटीची विमाने तयार करण्याचे आव्हान स्वीकारतात, तसे मीही माझ्या डोळ्यासमोर एकच ध्येय ठेवले… संपूर्ण ‘विलासी’ बनावटीची चपाती बनवणे!

आता माझी नेमणूक ह्या प्रोजेक्ट मॅनेजर पदावर बिनविरोध झाली असल्यामुळे मी ताबडतोब सूत्रे हाती घेतली. लगोलग पाच किलो उत्तम प्रतीचे (म्हणजे सगळ्यात महाग!) गहू खरेदी करण्याचे आदेश दिले. दुकानावर मालकाची मुलगी असल्यामुळे तेथे जाण्यास सारेच उत्सुक असत. चक्कीत परस्पर तेथे बसलेल्या बायांकडून निवडून, पाखडून बारीक पीठ करून आणण्यात आले. चांगली भाजीवाली पाहून वांगी, बटाटे, कोबी अशा भाज्याही आयात करण्यात आल्या. (भाजी थोडी ताजी-शिळी चालेल, पण भाजीवाली चांगली हवी हा आपला बाणा!) एवढी सर्व पूर्वतयारी तर मनासारखी झाली. आता प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली.

एका मोठ्या परातीत चारपाच वाट्या पीठ काढून मी मांडी घालून पीठ मळायला चालू केले. गारुड्याचा खेळ चालू झाल्यासारखा सर्वजण माझ्याभोवती कोंडाळे करून बसले. अशाने माझी एकाग्रता भंग होईल आणि काही बिघडल्यास मी जबाबदार राहणार नाही, असा सावध पावित्रा मी घेतल्यामुळे मदतनीस म्हणून एकजण सोडून बाकी सर्वजण बाहेरच्या खोलीत जाऊन, दवाखान्यात पहिलटकरीणच्या डिलिव्हरीच्या वेळी भावी बाप मारतात तशा चिंताग्रस्त चेहर्‍याने येरझार्‍या मारू लागले! इकडे मी अंदाजे चार वाट्या पीठ मळायला घेतले. त्यात अंदाजे दोन ग्लास पाणी टाकले आणि हळूहळू ते मिश्रण मळू लागलो. आपले दोन्ही हात कोणत्याही महत्त्वाच्या कामात गुंतले की शरीराच्या कोणत्या तरी भागाला खाज सुटल्याची जाणीव होते. जेथे खाज सुटेल तेथे खाजवण्यास माझ्या मदतनीसाला मी सांगू लागलो. त्यानुसार तो कधी माझ्या मानेवर तर कधी पाठीला खाजवू लागला. इकडे माझे मिश्रण खूपच पातळ झाल्यासारखे वाटल्यामुळे मी अजून एक वाटी पीठ त्यात घातले. ते मग खूपच कडक झाले. म्हणून परत एक पेला पाणी ओतले. असे करता-करता शेवटी (म्हणजे माझ्या मदतनीसाने माझे नव्वद टक्के अंग खाजवून झाल्यावर) एकदाचा तो योग्य घनतेचा कणकेचा गोळा तयार झाला! मला अपेक्षित असलेल्या आकारापेक्षा फारच मोठा आकार त्याने धारण केला होता! आता चपात्या लाटून फक्त भाजायच्या होत्या.

कणकेचे एकसमान बरेच गोळे करून पोळपाट-लाटणे, ढाल-तलवारी घेतो त्या आवेशात, घेऊन मी पुढील कार्यक्रम सुरू केला. गोळ्याला तेल लावून त्रिकोणी घडी घातली आणि वर पीठ लावून पोळपाटावर चपाती लाटू लागलो. चपाती कधी त्या लाटण्याला चिकटायची नाहीतर पोळपाटाला. मग अजून पीठ लावून दशावतारी नाटकातील पात्राच्या मेकअपसारखी पांढरीफटक करून लाटावी लागे! पण तरी तिचा आकार गोल काही होत नसे. कधी तो आप्रिâका खंडासारखा होई तर कधी ऑस्ट्रेलियाच्या खंडाशी साम्य दाखवे. कधी भूमितीच्या कुठल्यातरी आकृतीसोबत सलगी करे तर कधी मॉडर्न आर्टसारखा विचित्र आकार धारण करे. एका चपातीचा तर रामसे ब्रदरच्या सिनेमातल्या हिरोच्या चेहर्‍यासारखा आकार पाहिल्यावर आम्हा दोघांच्या काळजाचा ठोका चुकला होता!

एकाच चपातीचा, एकाच वेळी, एकाच तवा आणि एकाच स्टोव्हवर भाजलेला असला तरी काही भाग जळालेला तर काही भाग कच्चा कसा काय राहू शकतो, हा प्रश्न भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र, पाकशास्त्र की नागरिकशास्त्र ह्यापैकी कुठल्या शास्त्रात जाऊन शोधावा ह्या विषयावर गहन चर्चा करत आम्ही ताटे वाढून घेतली. भाजी बनवणार्‍या दुसर्‍या इंजिनिअरने बटाट्याची भाजी बनवून आपली कला पेश केली होती. बाकी काही जिन्नस घातले असतील-नसतील, पण त्या भाजीत त्याने मोकळ्या मनाने मीठ घातले होते ह्याची जाणीव जीभ प्रत्येक घासाला करून देत होती. मी तर चपातीत मीठ घालायला विसरलो होतो, पण म्हणून उलट मला शाबासकी मिळाली! नाही तर ती खारट भाजी घशाखाली उतरलीच नसती.

अशा रोमहर्षक पाककृती एक दोन वेळा सादर केल्यानंतर सर्वांनीच त्याचा मनोमन धसका घेतला. कुणी ह्याबद्दल चर्चा करणेही टाळत असले तरी प्रत्येकजण संभाव्य धोके जाणून होता. त्याचा एकूण चांगला परिणाम म्हणजे ‘बाई-शोध मोहीम’ तीव्र झाली. ‘आठशेपर्यंत चालेल’ असा हिशोबही लावून झाला आणि एक दिवस भल्या सकाळी आमच्या घरच्या पायर्‍यांवर एक बाई येऊन उभी राहिली.
‘किती घेणार?’ रघुनाथाने बाईकडे पाहून सरळ मुद्द्यावर हात ठेवला.
‘द्या की तुम्ही समजून,’ बाई म्हणाली.
‘तुम्ही सांगा ना, काय अपेक्षा आहे तुमची?’ इति रघू
‘आता पहा, म्हागाई किती वाढ्ल्हयान…’
‘हो ना…’
‘मला दोन धाकटी पोरं हायत…’
‘हो का?’
‘नवरा बेवडा होता, पुलावरून नदीत पडून मेला.’
‘किती द्यायचे सांगा.’
‘चारशे घेईन महिन्याचे!’
रघुने आणि मी एकमेकांच्या तोंडाकडे पाहिले. आम्ही जी रक्कम ठरवली होती त्याच्या बरोब्बर अर्ध्या किमतीत ही बाई तयार झाली होती.
‘मंजूर!’ रघू आणि मी एका सुरात म्हणालो.
दुसर्‍याच दिवशी बाईने पदभार सांभाळला. आता आम्हाला दोन्ही वेळ सुग्रास अन्न खायला मिळणार ह्या विचाराने पोटातले कावळे स्वप्नरंजन करू लागले. बाईंनी डाळीला लसणाची फोडणी देताच पूर्ण चाळभर सुगंध पसरला. पण प्रत्यक्ष डाळीत तो लसूण गरम तेलात जळून गेल्यामुळे काळाकुट्ट पडला होता, बाकीचा मसाला पण असाच जळून खाक झालेला होता. उन्हाळयात ऊन ‘मी’ म्हणते तसे भाजीत तेल ‘मी’ म्हणत होते. चपात्या आपल्यावर तव्याने केलेले जुलूम दर्शवत पानात निपचीत पडल्या होत्या. भातसुद्धा भीतीने पांढराफटक पडल्यासारखा दिसत होता. प्रोजेक्ट संपेपर्यंत आम्हाला हेही जेवण पचायला लागले होते…
…आम्ही सर्वांनी त्यानंतर कधीच घरच्या जेवणाला नावे ठेवली नाहीत!

Previous Post

सत्तेच्या चड्डीत झुरळ!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.