३१ ऑक्टोबर १९८१ रोजी तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी सरदार पटेल व्याख्यानात केंद्र सरकारची तळी न उचलता चक्क राज्यांना अधिक आर्थिक आणि प्रशासकीय स्वायत्तता देण्याचा आग्रह धरल्याने हे व्याख्यान ऐतिहासिक ठरले. ज्या सरदार पटेलांनी संस्थानांच्या विलीनीकरणात प्रमुख भूमिका बजावली होती, त्यांच्या स्मरणार्थ दिलेल्या व्याख्यानात नीलम संजीव रेड्डी देशात स्वायत्त राज्यांच्या रूपाने नवी संस्थाने निर्माण करण्याची भाषा बोलणारे भाषण ठोकताहेत, याबद्दलच्या संतापातून रेड्डींच्या हातात तलवार दिली आहे, बाळासाहेबांनी या व्यंगचित्रात. त्यात सरदार पटेलही रेड्डी यांची कानउघाडणी करताना दिसतात… आज ४५ वर्षांनंतर मात्र बाळासाहेब सोडा, खुद्द सरदार पटेल यांनीही विद्यमान केंद्र सरकारच्या एकचालकानुवर्ती हुकूमशाहीच्या दिशेने पडत चाललेल्या पावलांना पाहून हाच विचार केला असता की, राज्यांना संस्थानं लेखून तुच्छतेने वागवणारे सम्राट तयार करण्यासाठी आपण देश स्वतंत्र केला नव्हता. विविधतेने नटलेल्या या देशातल्या वैविध्यालाच नख लावणारी एकसुरी समरसता कोणाला हवी होती? मतदारसंघांच्या फेररचनेचा बुलडोझर दक्षिण भारताचं सपाटीकरण करण्यासाठी वापरला जाणार आहे, हे लक्षात आल्यावर बाळासाहेबही आता नीलम संजीव रेड्डी यांना द्रष्टेच म्हटले असते…

