
कधीकधी निसर्ग आपल्यासमोर अशी काही चमत्कारिक दारे उघडतो की विज्ञान, तंत्रज्ञान आणि मानवी बुद्धिमत्तेचा गर्व क्षणभर थांबून जातो. आकाशाच्या अथांग निळाईतून एखादा छोटासा राखाडी पक्षी वेगाने झेपावत जातो आणि त्याच्या पंखांवर संपूर्ण पृथ्वीचा नकाशा कोरलेला असल्याची जाणीव होते. हा पक्षी म्हणजे अमूर फाल्कन, अर्थातच आपल्या भाषेतला अमूर बाज!
अवघ्या १०० ते १५० ग्रॅम वजनाचा हा छोटासा शिकारी पक्षी दरवर्षी तब्बल २२ हजार किलोमीटरचा प्रवास करतो. महासागर, वादळे, उष्ण वारे, पावसाळी ढग आणि मृत्युच्या सावल्या पार करत तो सायबेरियाहून दक्षिण आप्रिâकेपर्यंत झेप घेतो आणि पुन्हा त्याच अचूकतेने आपल्या जन्मभूमीकडे परततो. पृथ्वीवरील स्थलांतरित पक्ष्यांच्या विश्वात अमूर बाज म्हणजे निसर्गाने लिहिलेली जिवंत महाकाव्यगाथाच म्हणावी लागेल.
अमूर बाज आकाराने कबुतरापेक्षा थोडासा लहान असला, तरी त्याच्या धैर्याचा आणि सहनशक्तीचा विस्तार महासागराइतका विशाल आहे. राखाडी रंग, पोटाजवळ पांढुरका तांबूस छटा, नारिंगी पाय आणि टोकदार पंख ही त्याची ओळख. नर अधिक आकर्षक दिसतो, तर मादीच्या अंगावर काळ्या ठिपक्यांची नक्षी असते. लांबी साधारण २८ ते ३० सेंटीमीटर आणि पंखांची रुंदी ६५ ते ७० सेंटीमीटर. एवढ्याशा शरीरात एवढी अफाट ऊर्जा कशी सामावली असेल, हा प्रश्न नेहमीच पडतो.
या पक्ष्याचे वास्तव्य अमूरलँड, सायबेरिया, मंगोलिया आणि उत्तर चीन या थंड प्रदेशांत असते. उन्हाळ्यात हे पक्षी तेथे घरटी बांधतात. मादी साधारण तीन ते चार अंडी घालते. एका महिन्यानंतर पिल्ले जन्माला येतात आणि काही आठवड्यांत उडायलाही शिकतात. त्यांचे मुख्य खाद्य म्हणजे वाळवी, टोळ, किडे आणि इतर लहान कीटक. परंतु या साध्या आहारावर जगणारा हा पक्षी पुढे जगातील सर्वात कठीण स्थलांतर प्रवास पार करतो, हीच निसर्गाची खरी जादू आहे. अशातच अरबी समुद्रावरून आफ्रिकेकडे उडताना चतुर आणि टोळ यांच्यासारखे त्याच काळात निर्माण होणारे कीटक पूर्वेकडून पश्चिमेकडे उडत असतात. अमूर बाज त्यांना हवेतच भक्षण करतो. हे जणू निसर्गाने अमूरसाठी अन्नाची सोय केल्यासारखेच आहे.
ऑक्टोबर, नोव्हेंबर महिना सुरू झाला की उत्तर आशियातील थंडी तीव्र होऊ लागते. जंगलांवर बर्फाची चादर पसरू लागते. आणि त्याच वेळी अमूर बाजांच्या लाखो थवे दक्षिणेकडे वळतात. हे पक्षी सायबेरियातून उड्डाण घेत भारतातील नागालँडकडे येतात. हा त्यांच्या प्रवासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा. नागालँडमधील डोंगराळ जंगलांमध्ये अमूर बाज काही दिवस मुक्काम करतात. त्या काळात ते प्रचंड प्रमाणात वाळवी आणि इतर कीटक खातात. जणू पुढील महासागरी प्रवासासाठी ते स्वतःमध्ये ऊर्जा साठवून ठेवत असतात. निसर्गाने त्यांच्या प्रवासाचा प्रत्येक टप्पा किती अचूक आखला आहे, याचे हे अद्भूत उदाहरण आहे.
एकेकाळी नागालँडमध्ये या पक्ष्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार होत असे. हजारो अमूर बाज जाळ्यांत अडकून मारले जात होते. स्थलांतराच्या या महान यात्रेवर रक्ताचे डाग पडत होते. जगभरातून पर्यावरणप्रेमींनी चिंता व्यक्त केली. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक संस्था, सरकार आणि पर्यावरण कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मोठी जनजागृती सुरू केली. लोकांना समजावण्यात आले की हे पक्षी केवळ पाहुणे नाहीत, तर पृथ्वीच्या पर्यावरणीय संतुलनाचे दूत आहेत. त्यामुळे आज परिस्थिती बदलली आहे. ज्या गावांत पूर्वी शिकार होत होती, त्याच गावांत आता अमूर बाजांचे स्वागत केले जाते. स्थानिकांना पर्यटनातून रोजगारही मिळू लागला आहे. ‘फाल्कन फ्रेंडली व्हिलेज’ ही संकल्पना उभी राहिली. हा बदल केवळ पक्षीसंवर्धनाचा नाही, तर मानवाच्या पर्यावरण-जागृतीच्या उत्क्रांतीचाही आहे.
नागालँडनंतर अमूर बाज महाराष्ट्र, कर्नाटकमार्गे पुढे अरबी समुद्राच्या दिशेने झेप घेतो. आणि इथे सुरू होतो त्याच्या प्रवासातील सर्वात थरारक अध्याय! कल्पना करा… अवघा १०० ग्रॅम वजनाचा पक्षी हजारो किलोमीटर पसरलेल्या अथांग समुद्रावरून सलग चार पाच दिवस उडत राहतो! ना विश्रांती, ना पाणी, ना जमिनीचा आधार! केवळ वार्यांच्या दिशेवर, पृथ्वीच्या चुंबकीय संकेतांवर आणि आपल्या अद्भूत जैविक घड्याळावर विश्वास ठेवून हा पक्षी आफ्रिकेकडे झेपावतो, असे पक्षीमित्र माधव आठवले सांगतात. विशेष म्हणजे, या काळात साधारण तीन हजार फूट उंचीवरून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे वारे त्याला मदत करतात. निसर्ग जणू या छोट्या प्रवाशासाठी अदृश्य महामार्ग तयार करतो. याच काळात चतुर आणि इतर कीटक पश्चिमेकडे स्थलांतर करत असतात. त्यामुळे उड्डाणादरम्यान अमूर बाजाला हवेतच अन्न मिळते. हा संपूर्ण प्रवास म्हणजे पृथ्वीच्या पर्यावरणीय व्यवस्थेतील अद्भूत समन्वयाचे सर्वोच्च उदाहरण आहे.
पूर्व आफ्रिकेत पोहोचल्यानंतर हे पक्षी पुढे दक्षिण आफ्रिकेपर्यंत जातात. तेथे हिवाळा घालवल्यानंतर मार्च एप्रिलमध्ये त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो. या वेळी ते प्रथम सोमालियात येतात. योगायोगाने त्या काळात तेथे मोठ्या प्रमाणावर वाळवी उत्पन्न झालेली असते. पुन्हा एकदा निसर्ग त्यांच्यासाठी अन्नाची व्यवस्था करून ठेवतो. योग्य प्रमाणात वजन वाढवल्यानंतर अमूर बाज आफ्रिकेच्या किनार्याने पुढे आखाती देशांच्या दिशेने झेप घेतो आणि गुजरातमार्गे भारत्ाात प्रवेश करतो. या वेळी पश्चिमेकडून वाहणारे वारे त्यांना मदत करतात. पुन्हा एकदा ते अथांग अरबी समुद्र न थांबता पार करतात. गुजरातपासून पुढे म्यानमार, चीन, मंगोलिया आणि अखेरीस सायबेरियापर्यंतचा प्रवास टप्प्याटप्प्याने पूर्ण होतो.
हा संपूर्ण प्रवास म्हणजे केवळ स्थलांतर नाही; ती पृथ्वीच्या निसर्गचक्राची जिवंत साखळी आहे. अमूर बाज हे हवामान, वारे, कीटक, जंगल आणि महासागर यांना जोडणारे पर्यावरणीय दूत आहेत. त्यांच्या प्रवासात पृथ्वीवरील जैवविविधतेची परस्परावलंबित्वाची अनोखी कहाणी दडलेली आहे. आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने या पक्ष्यांचा अभ्यास
केला जात आहे. ‘अमूर वॉच इंडिया’ सारख्या संस्था जीपीएस ट्रॅकरद्वारे त्यांच्या प्रवासाचा मागोवा घेतात. त्यांच्या उड्डाणाचा वेग, थांबे, मार्ग आणि हवामानाशी असलेले नाते याचा अभ्यास केला जातो. हा अभ्यास केवळ पक्ष्यांसाठी नाही, तर पृथ्वीच्या बदलत्या हवामानाचा आरसाही आहे. कारण स्थलांतरित पक्षी हे निसर्गाचे जिवंत संकेतक असतात. हवामान बदल, जंगलतोड, कीटकांची घट, प्रदूषण किंवा समुद्री वार्यांतील बदल यांचा परिणाम सर्वप्रथम त्यांच्या प्रवासावर दिसून येतो. म्हणूनच अमूर बाजाचे संरक्षण म्हणजे केवळ एका पक्ष्याचे संवर्धन नाही, तर पृथ्वीच्या पर्यावरणीय संतुलनाचे रक्षण आहे.
आज जग वेगाने काँक्रीटच्या जंगलात बदलत आहे. आकाश धुराने भरत आहे. कीटकांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. जंगलांचे तुकडे पडत आहेत. अशा वेळी अमूर बाजासारख्या स्थलांतरित पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात येणे ही केवळ पक्षीप्रेमींसाठीची चिंता नाही, तर संपूर्ण मानवजातीसाठीचा इशारा आहे. कारण हे पक्षी आपल्याला शिकवतात की सीमा माणसांनी आखल्या आहेत; निसर्गाला त्या मान्य नाहीत. अप्रिâकेतील वाळवी, भारतातील जंगल, नागालँडचे डोंगर आणि सायबेरियाचे आकाश हे सर्व एकमेकांशी जोडलेले आहेत. पृथ्वी ही एकच सजीव व्यवस्था आहे आणि त्यातील प्रत्येक जीव हा त्या व्यवस्थेचा महत्त्वाचा दुवा आहे. अमूर बाज हा केवळ एक स्थलांतरित पक्षी नाही; तो पृथ्वीच्या पर्यावरणीय ऐक्याचा उडता संदेशवाहक आहे. त्याच्या पंखांमध्ये महासागरांचा इतिहास आहे, वार्यांचे विज्ञान आहे आणि निसर्गाच्या अचूक नियोजनाची दिव्य शक्ती आहे.
आज लाखो अमूर बाज पुन्हा आपल्या जन्मभूमीकडे झेपावत असताना त्यांच्या पंखांच्या सळसळीतून एकच संदेश ऐकू येतो ‘निसर्ग वाचवा… कारण पृथ्वीवरील प्रत्येक प्रवास अखेरीस निसर्गावरच अवलंबून आहे!’

