• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

देशद्रोही!

डॉ.अंजली मुळके विशेष लेख

marmik by marmik
May 26, 2026
in विशेष लेख
0
देशद्रोही!

क्लिनिकला निघायला आधीच उशीर झाला होता… घाईघाईत हेल्मेट चढवून, मास्क बिस्क लावून, टू व्हीलरवर बसून स्टार्ट मारलं… अन् समोर स्कूटीच्या डोक्यावर असलेल्या डिजिटल डिस्प्लेमध्ये पेट्रोल बुडाला गेल्याचं साईन दिसलं… आमच्या नमो साहेबांनी तेल वाचवायला सांगून पण गाडी ऐकत नव्हती… प्यायचं तेवढं तेल पितच होती… आमच्या परमपित्याच्या देशभक्ती सिद्ध करण्याच्या आवाहनाची कदरच नाही हिला… ‘देशाला वाचवायचं आहे,’ हे हिला कळत कसं नाहीये, याचा मला राग आला! ‘देशद्रोही’ असा तिच्यावर ठपका लावून मी गाडी क्लिनिकच्या ऐवजी पेट्रोल पंपाच्या दिशेने पळवली…

तिथे पोचल्या पोचल्या, पेट्रोल पंपाच्या आतून बाहेरच्या रस्त्याला टेकणारी लांबलचक लाईन बघून, त्या लाईनमध्ये आपापल्या देशद्रोही तेलपिपासू गाड्या घेऊन थांबलेल्या प्रत्येक देशद्रोह्याकडे मी तुच्छतेने बघितलं… देश वाचवायचं सोडून हे पेट्रोल, डिझेल घ्यायला आलेत! जराही कर्तव्याची जाणीव नाही यांना? पण आधीच उशीर होत असल्याने मला यांना समजावण्यासाठी टाइम नव्हता… म्हणून मी ही लाईनमध्ये लागले… मुंगीच्या पावलांनी लाईन समोर सरकत होती अन् सशाच्या पावलांनी मागून वाढत होती… ‘मेरा नंबर कब आएगा..’ म्हणत हातातल्या घड्याळाकडे सतत बघत होते… त्यालाही माझ्या बघण्याचा वीट येत होता की काय कोण जाणे, एरवी घरी मोबाईल हातात असताना दोन सेकंदात दोन मिनिटं असं पळणारं घड्याळ, आता मात्र जणू दोन मिनिटाला दोन सेकंद इतकं हळू चालत होतं…
माझ्या समोरच्या गाडीवर एक जोडपं होतं… आज ‘वीकएंड’ला तो बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला बाईकवर बसवून फिरवायला नेत असावा… तिला त्याने पेट्रोल भरायचं म्हणून उतरायला सांगितलं, तशी ती उतरून गाड्यांच्या या लाईनच्या बाजूला समोर थोडी दूर जाऊन उभी राहिली… याचा नंबर आला… पेट्रोल भरणार्‍याने तोंडातला तोबरा सांभाळत, ‘कितना भरने का?’ म्हणून विचारलं… याने हळूच कोणाला ऐकू जाणार नाही अशा आवाजात पेट्रोलवाल्याला सांगितलं, ‘नब्बे का!’
तो पेट्रोल वाला परत मोठ्याने… ‘कितने का?’
तो हळूच साप सरपटल्यासारख्या आवाजात… ‘नब्बे…!’
मी त्याला मागच्या पंधरा मिनिटांपासून पाहत होते… गर्लफ्रेंड मागे बसली होती तेव्हा, एक एक गाडी पेट्रोल भरून पुढे जात असताना, पुढे पुढे जाताना हा नवाबी थाटात गाडीला चर्रर्र करत स्टार्ट मारायचा… दोनच पावलं पुढे जाऊन पुन्हा बंद करायचा… पुन्हा एक गाडी गेली, की, पुन्हा तसंच… तेवढ्यासाठी याला उतरून गाडी ढकलणं होत नव्हतं… पार्श्वभागावर रंग उडालेली मळकी जीन्स, टी शर्ट अन् पायात प्लास्टिकची चप्पल… गाडीही उसनीच असावी… एवढे फटे हाल नवाब… अन् पेट्रोल ‘नब्बे’चं भरायचं होतं त्याला… तो भले खुसखुसत हळूच आवाजात सांगत होता, पण अशा वेळी मात्र माझ्या कानांची श्रवणक्षमता आपोआपच दुपटीने वाढते… मला ते स्पष्ट ऐकू आलं…

फटे नवाबने पेट्रोल भरून घेतलं… अन् थाटात पुन्हा गाडीला रेस मारत गर्लफ्रेंडला बसवून धूम स्टाईलने गेला… इकडे आमचे पंप्र घसा खरडून काटकसर करायला सांगत आहेत…अन् याला गर्लफ्रेंडवर खर्च करायचाय! कदर नाही आमच्या परमपित्याचा प्रामाणिक भावनेची लोकांना! परवाच हातात त्रिशूळ, डमरू आणि गळ्यात माळा घालून परमपिता सगळ्या रस्त्याने गाड्या घेऊन फिरू फिरू सांगत होते… अन् यांना अशी नवाबी सुचावी?

मनात राग उफाळत होता… तेवढ्यात इकडे माझ्या मागच्या देशद्रोह्यांनी हॉर्न वाजवायला सुरू केल्याने मी देखील पटपट बुडाला लागलेला टँक भरायला सांगितलं… अर्धा तास इथेच गेला…पेट्रोल भरून रस्त्याला लागले, तसं आख्खा रस्ता देशद्रोह्यांनी भरगच्च भरलेला दिसला… पाय ठेवायला जागा नव्हती, इतके लोक घरात बसून काम अर्थात वर्क फ्रॉम होम करायचं सोडून, इतक्या गाड्या घेऊन कोण जाणे, कुठे जात होते… कशाला यांना इतक्या पेट्रोल डिझेल गाड्या पाहिजेत..? मोठमोठ्या एक्सयूव्ही… बीएमडब्ल्यू… अधून मधून मर्सिडीज… काही देशप्रेमी जन, आमच्या देवा भौंचा आदर्श घेत, बुलेट चालवत होते खरे… दोन तीन लाखांची बुलेट घेतली की झालं… ‘देशभक्त’ प्रवर्गात तुमचा समावेश होतो! इतकंही लोकांना जमू नये? दरिद्री लोक! ‘चटणी भाकर मिळत नसली, तर हलवा पुरी खा!’ असं म्हणणार्‍या राजाचा आदर्श घेतलेल्या आमच्या परमपित्याचा आदेश पाळायला हवा की नाही? दोन तीन लाखांची बुलेट मिळत नसेल, तर २० लाखांची महिंद्रा एसईव्ही घ्यायला हवी की नाही?

आमच्या चार आमदार मंत्री लोकांनी, स्वतःकडे आधीच कोट्यवधींच्या गाड्या असूनही, परम आदेश निघाला रे निघाला की इकडे पडत्या फळाची आज्ञा म्हणत, २०-२५ लाखांच्या इलेक्ट्रिक गाड्या घेऊन पण टाकल्या… भले त्या गाड्यांच्या चार्जिंगसाठी लागणारं वीज उत्पादन देशात नसलं, तरी भक्तांच्या नाकात आम्ही वायर टाकून चार्जिंग करू… त्यांच्या गोबर मेंदूतून तेवढी ऊर्जा नक्कीच उत्पन्न होते, याची प्रचिती या देशाला मागच्या बारा वर्षांत आली आहेच! शेवटी देश वाचवण्यासाठी १०० रुपयांचे पेट्रोल वाचवणे, याहून मोठा त्याग कोणता असू शकेल?

पण नाही… या देशात देशद्रोह्यांनी उच्छाद मांडलाय… टकमक टोकावर नेऊन एकेकाला ढकलून द्यायला पाहिजे ह्यांना… मनोमन नमो नमो करत मी सुमारे ताशी पाच किमी या प्रचंड वेगाने गर्दीतून गाडी चालवत चालवत घाटकोपर श्रेयस सिग्नलवर आले… रेड सिग्नल असल्याने थांबले… समोर श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना कावड करून त्यात घेऊन जातोय, असा पुतळा दिसला… मी मनात म्हणलं, ‘ही खरी देशभक्ती!’

अन् तेवढ्यात वरून विमान उडताना दिसलं… तसं तर इथे दर दोन मिनिटांना एक विमान उडत असतं… त्यात बसलेल्या देशद्रोह्यांना हा खालचा कावड घेऊन पायी जाणारा देशभक्त श्रावण बाळ दिसला नसेल? ‘खर्च करू नका, फिरू नका, परदेश वार्‍या करू नका.. ब्ला ब्ला ब्ला..’ असं कित्येकदा पंप्र, या विमानातून त्या गावात, त्या विमानातून या गावात जाऊ जाऊ सांगत असतानाही लोक असं विमानाने सर्रास फिरतात… म्हणजे, आदेश धुडकावून लावण्याला काही मर्यादा असाव्यात की नाही? पुढे गेल्यानंतर, समोरच्या सिग्नलवर थांबले असताना, डोक्यावरून मेट्रो गेली… वर बघून त्यात भरलेल्या राष्ट्रप्रेमी देशभक्त जनतेला बघून हृदय गदगद झालं… ‘मेट्रो का इस्तमाल करो..’ म्हणून आवाहन केल्यानंतर हिरीरीने मेट्रोत बसून देशभक्ती सिद्ध करून दाखवलेल्या चिमुटभर जनतेचा अभिमान वाटला!
शेवटी उशीर उशीर होत होत क्लिनिकला एक तास उशिरा पोहोचले… तिथे गेल्या गेल्या बाजूच्या ज्वेलरवाल्या दादांनी पोटात कळ आल्यागत स्माईल दिली… त्यांची ‘कळ’ समजू शकते मी… इतके दिवस भगवंताहून प्यार्‍या वाटणार्‍या पंतप्रधानांनी यांच्यापासून गिर्‍हाईकांना तोडलं असल्याने भगवंताचं ट्रान्सफॉर्मेशन अचानक एकाच दिवसात असुरांच्या पातळीला गेलं होतं… त्यांनी देशभक्तीवर फोकस करणं गरजेचं आहे, अशी काउन्सिलिंग त्यांना द्यायला हवी या विचारात मी क्लिनिकमध्ये गेले… हाडाला लागलेल्या एका पेशंटने, चक्कर येत असल्याचं सांगितलं… मी त्याला तपासलं… बीपी कमी आणि अशक्त झालेल्या माणसाला मी औषधं लिहून दिली… इतका अशक्त होईपर्यंत त्याने काही खाल्लं नव्हतं का विचारलं असता, त्याने ‘सकाळपासून जेवण केलं नव्हतं,’ असं सांगितलं… ‘तेल वाचवण्यासाठी त्याने असं केलं असावं’, असं वाटून त्याच्या देशभक्तीने कंठ दाटून आला… वाटलं, याच्याकडून फी घेऊ नये… परंतु, ‘शोले’ या आधुनिक पुराणात, श्रीमती श्री श्री श्री बसंती देवींनी सांगितल्याप्रमाणे, ‘घोडी घास से दोस्ती करेगी तो खाएगी क्या?’ हा श्लोक आठवला अन् मी आपल्या घरच्या तेलाच्या सोयीसाठी इच्छा नसताना त्या देशभक्ताकडून फी घेतली… असेच, कोणी देशद्रोही घ्या, कोणी देशभक्त घ्या, करत ओपीडी संपवून शेवटी त्याच ताशी पाच किलोमीटर या प्रचंड वेगाने पुन्हा देशद्रोह्यांच्या गर्दीत मिसळून मी घरी परतले अन् तेलाचा वापर न करता पाण्यात उकडलेल्या भातावर तूप टाकून खाऊन मी देखील आजची देशभक्ती सिद्ध करून टाकली!
(तेल खाऊ नका असं सांगताना तूप खायचं की नाही याचा आदेश अजून आला नसल्याने मी तूप खाल्लं… पुढच्या आदेशात तसं असल्यास हवा पाणी खाऊन जगू!) शेवटी राष्ट्र प्रथम!

Previous Post

बाळासाहेबांचे फटकारे

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.