• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

सूचक मंडळी

ऋषिराज शेलार अर्ध्या मुर्ध्या गोष्टी

marmik by marmik
May 26, 2026
in भाष्य, विनोदी लेख, विशेष लेख
0
सूचक मंडळी

अर्ध्या भर उन्हाचा बाहेरून घरात घुसला, पहिले त्यानं करावं काय? माठातून एक तांब्या गार पाणी घेतलं आणि उभ्यानं घटाघटा पिऊन घेतलं. ऊन किती भयानक आहे बाहेर? मग? तहान तर लागणारच ना?
‘अरे अवधरू! असं उभ्यानं पाणी पिऊ नयी, काळजी लागतं.’ रमेशमामा अर्ध्याचा कुठल्यातरी नात्याने लागणारा मामा. बुटगा. गळ्यात तुळशीच्या पाचसहा वेगवेगळ्या माळा घालणारा. दिसात एक-दीड पुडी तंबाखू संपवणारा. पण मटण-दारू पिऊ नयी. त्यानं घर बरबाद होतं सांगणारा. याचा टाळकरी मित्र थ्रोट कॅन्सरने गेला. ते मात्र याच्या लेखी वैकुंठ प्राप्तीचा राजमार्ग! हा दरवेळी येतो. निदान महिन्यात दोनदा तरी. आल्यावर करतो काय? इकडच्या तिकडच्या गप्पा. चारदा रामकृष्ण हरीचा धावा आणि अर्ध्यासाठी मुख्य आणि इतर गावच्या अनेकांसाठी पुरवणी चर्चा. यापलीकडे फारतर घोटभर चहा कधी जमलाच बेत तर जेवण. एवढंच त्याला निमतं.
‘इथं तहान मोकार लागली माहित्ये का? घसा पार कोरडा पडला मंहा!’ अर्ध्या कुरकुरला.
‘अरे पण…’ रमेशमामाचं वाक्य अर्ध्या पुरं होऊन देतो होय?
‘जाऊ द्या हो! सोडा ते! तुम्ही माझं नाव तेवढं नीट घेत चला!’ अर्ध्या तणतणला.
‘बरं राहिलं. पण आता काय करतोय तू?’ रमेशमामानं विषय काढला.
‘हा तांब्या ठेवतो.’ अर्ध्या न कळल्यानं बावचळला!
‘अरे, म्हणजे काम रे!’ रमेशमामानं नकळता सवाल विचारला.
‘हां मग! तुम्हाला माहित नाही का? एमआयडीसीतल्या कंपनीत कॉन्ट्रॅक्ट बेसिस…’ अर्ध्यानं शंकामिश्रित नवलानं उत्तर दिलं.
‘अरे ते नाही विचारत रे! आता म्हणजे आता…’ अर्ध्याला प्रश्न म्हणजे अर्ध्याचं काम नाही हे रमेशमामाला आज कळलं.
‘हे लग्नातून आता आलो. तिथंच बर्फ्याचे तीन चार प्रकार होते, ते वरपले. अन् मागून चारेक गलास मठ्ठा पिलो. त्याच्यामुळं आता डोळे आटकू राहिले. मग पडतो जरा वर तंगड्या करून! तुम्हीही पडा जरा! उन्हाचं काय काम करताय!’ अर्ध्यानं फुकटचा सल्ला दिला.
‘अरे म्हणजे घरीदारी काही काम नसंल. तर चल माझ्याबरोबर.’ रमेशामामानं फर्मान काढलं. आता जावं लागणार! दुसरा पर्याय आहे काय अर्ध्याजवळ. जसा पोळ्याचा बैल गावभर यसन धरून फिरवून आणावा तसं हा रमेशमामा अर्ध्याला जिल्हाभर घेऊन फिरला आहे. का? कश्यासाठी म्हणजे? अर्ध्याचं वाजवायला नको? सख्खा मामा नसला म्हणून झालं काय? काही माणुसकीबिनुसकी आहे का नाही?
पण त्याच्यासोबत जायचं म्हणजे अर्ध्याच्या डोक्याला ताप! मागल्या वेळी अर्ध्याला रमेशमामा एक ठिकाणी आबगी घेऊन गेला. आणि पोरीनं पाटावर बसून नाव गाव सांगितलं कुठं नाहीतं ह्या बहाद्दरानं दे म्हणी १५०० हातात! म्हणून फर्मान सोडलं. खिश्यात मोजून १३५७ निघाले खाडूनखोडून. बरं ती पोर पण अवघड पुरे पंधराशे मिळेपर्यंत पाटावरून हलली नाही. येताना मग रस्त्यात पेट्रोल संपलं एकदीड किलोमीटर रमेशमामाला पायी तंगडलं अर्ध्यानं. असा नाही तर असा घेतला अर्ध्यानं बदला.
‘पण जायचं कुठंय?’ अर्ध्याला जायचं म्हंटलं का कापर भरतं
‘तुला काय करायचं? मी आहे ना?’ हे परवलीचं वाक्य बोलून रमेशमामानं पुन्हा मोहिमेचं नेतृत्व घेतलं.
आता? अर्ध्यानं पुन्हा नम्याची गाडी बोलावून घेतली. म्हणजे फोन लावला नम्याला. त्याला सांगितलं रमेशमामा आलाय. की तो समजणार काय समजायचं ते! त्यानं चावी दिली का अर्ध्याला पहिलं काम! गाडी हलवून अंदाज घ्यायचा. गाडीत काही आहे का नाही ते! मग पेट्रोलपंपावर जाऊन रांग लावून टाकी फुल करायची. घरी येऊन हे बुजगावणं गाडीवर बसवायचं आणि ते सांगेल तसं गाडी रेमटाळत निघायचं.
आजही अर्ध्यानं नेहमीचा शिरस्ता पाळला. गाडीत पेट्रोल भरलं आणि निघाले दोघं. वाट फुटल तिकडं. अर्थात तालुक्याला.
‘लै खरं नाही बोलायचं रे!’ रमेशमामानं टेप चालू केला.
‘आता तुमच्याशी खोटं कश्याला बोलायचं? मामा!’ अर्ध्याला पुन्हा काही टोटल लागली नाही.
‘माझा नाही रे विषय! ते मागल्या स्थळाचं…’ मामा काहीतरी आठवून सांगायला लागला. ‘…म्हणजे तिला सांगून मोकळे झाले कॉन्ट्रॅक्ट कामगार आहे म्हणून… मी एवढं बजबजून सांगितलंय तुम्हाला का खरं नाही बोलायचं. आता मी त्या पोरीच्या चुलत्याला सांगितलंय का बाबा पोरगं मल्टीनॅशनल कंपनीत कामाला आहे. पगार दांडगा आहे. सगळं जुळत आणलं आणि तुम्ही तोंड उघडलं. सगळं वाया जातं ना रे! त्याच्यात एक एक स्थळ शोधायचं, त्याला घोळून आणायचं. आणि नंतर असं झाल्यावर अख्ख्या कामावर पाणी फिरतं ना?’ मामा कानाजवळ भुंग्यासारखा भुणभुण करतोच आहे… तर अर्ध्या आणि त्याचा रमेश मामा पोहोचले तालुक्याला.
कोणता चौक, कुठली बिल्डिंग शोधत शोधत अर्ध्या आणि रमेशमामा एक बँकेपेक्षा चकचकीत ऑफिससमोर पोहोचले. गाठमारे सूचक मंडळ. इथं पक्क्या गाठी मारल्या जातात, अशी काही टॅगलाईन लावलेला बोर्ड.
‘हा आलं पहाय. इथंच वधुवर सूचक मेळावा आहे. अर्ध्या तासानं. वेळेत आलो आपण. चल आत चल.’ रमेशमामा अर्ध्याला घेऊन आत निघाला.
‘ओ, काय आहे?’ बाहेरच्या सिक्युरिटीनं बाहेरच हटकलं.
‘ते वधुवर मेळावा आहे ना..?’ रमेश मामा पुढं सरकला.
‘इकडं जा, त्या मॅडमला भेटा.’ त्यानं दुसर्‍या बाजूचं काचेचं दार उघडलं. तसे दोघे आत गेले.
काय सुंदर दिसते ही? क्षणभर अर्ध्याच्या मनात भाव तरळून गेले, पण क्षणभर!
‘जात?’ तिनं त्या कर्मचाराr मुलीनं दोघांना पूर्ण टेबलजवळ यायच्या आत विचारलं.
‘मी जात मानत नाही.’ अर्ध्या रमेश मामाकडं बघत बोलला खरा!
‘तू गंज जात मानू नको. जात धरू नको. पण जातीनं तर सोडायला पाहिजे ना तुला? इथं भलेभले गेले. आम्ही जातीच्या पट्ट्या लावून, त्यांच्या उंच्या फुटानं कमी केल्या. तिथं तुझी काय बात. अन् जातीतल्या जातीसाठी किलोभर ऑप्शन भेटले तर बिगरजातीवाल्यांना छटाक मिळत्या. तव्हा चल गप्प!’ रमेश मामानं हात धरून तिच्यापुढं उभं केलं.
‘जात-पोटजात!’ अर्ध्यानं आढेवेढे घेत तिच्या समोर स्वतःला उभं केलं.
‘जात मागील बाजूला तिथं, बाकीच्या पोटजाती मागं तिथं!’ तिनं बोट दाखवत एक टेबलकडे पाठवलं.
‘पोटजात?’ त्या टेबलावरच्या मुलीनं यांना जवळ येण्याच्या आत प्रश्न केला. अर्ध्यानं पोटजात सांगितली, ती चालली.
‘उत्पन्नगट?’ तिच्या पुढल्या प्रश्नावर मात्र अर्ध्या बुचकळ्यात पडला.
‘लोनच्या फाईलसाठी आणि लग्नाच्या बाबतीत सगळा व्होल इंडिया आयटीआर भरणारा श्रीमंत बनतो. फक्त श्रीमंती आटते ती सरकारी स्कीमा मिळवायच्या वेळेवर. तिथं लखपती भिकारपती बनत्या.’ मामानं अर्ध्याच्या कानात काही फुकलं तसं अर्ध्यानं उत्पन्न डबलनं सांगितलं.
त्या टेबलवरच्या मुलीनं मग घाईनं दुसर्‍या टेबलकडं बोट दाखवलं. तसे दोघे त्या टेबलकडे धावले. तिथल्या मध्यमवयीन बाईनं त्यांना बसायला खुर्च्या दाखवल्या.
‘हे बघा, आम्ही आमच्या कस्टमरसाठी ऑप्शन दिलेत, शिक्षण, रंग, आणि उत्पन्न त्यानुसार आम्ही बायोडेटा विभागला आहे. तुम्हाला उच्च उत्पन्न गट आणि सुंदर मुलींसाठी वेगळा ऑप्शन, त्याच प्रकारात रंग किंवा उत्पन्न जसं बदलेल तसा वेगळा ऑप्शन आम्ही देतो. बोला तुम्ही काय चुझ केलंय? तुमचा प्रीमियम, गोल्ड, किंवा डायमंड आयडी सांगा.’ त्या बाईनं माळवं विकायला ठेवावी तशे पोरींचे बायोडाटा घेऊन बाजार मांडलेला.
‘हे काय असतं?’ भोळा भाबडा रमेशमामा भंजाळून प्रश्न विचारायला लागला.
‘तुम्ही नोंदणी केली असेल ना? प्रीमियममध्ये तुम्ही मुलीच्या बापाचा फोटो बघू शकता. गोल्डमध्ये मुलीचा आणि डायमंडमध्ये मुलीला प्रत्यक्ष डिनर डेटवर नेऊ शकता. असे लक्झुरीअस ऑप्शन देतो आम्ही! तुम्ही कुठल्या प्लॅनचे मेंबर आहात?’ त्या बाईनं
पॉईंटशीर समजावत विचारलं.
‘मी? फक्त दीनदयाळ जयंती उत्सव समितीचा राखीव मेंबर आहे. त्याच्यात
प्लॅन नसतात बाई! इथं जाहिरात बघितली, वधूवरांचं काही आहे म्हणून. भाच्याला सोबत घेऊन आलो. हे असलं काही आम्ही केलेलंच नाही.’ रमेश मामा कधी नाही, तेव्हढ्या भाबडेपणानं भडाभडा बोलला. पण त्याचा परिणाम उलटा झाला.
‘भाङङङ एसीची फुकटची हवा खायला मध्ये घुसला का रे? तुला बाहेरचे भिंतीवरचे फ्लेक्स दिसले नाही का? फक्त डायमंड ओन्ली? सिक्युरिटी हाकला याला! असे फुकटे आत घेऊ नका. चला.’ तिनं टाळी वाजवताच सिक्युरिटी धावत आत आला आणि मामा भाच्याच्या गर्दन पकडून बाहेर घेऊन गेला.

Previous Post

आता कर्णधारांवर कुर्‍हाड?

Next Post

पर्यावरणाचा संदेशवाहक

Next Post
पर्यावरणाचा संदेशवाहक

पर्यावरणाचा संदेशवाहक

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.