• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

गंध कर्पुराचा, मोकळ्या श्वासाचा…

वैभव भाल्डे (सु-गंध)

marmik by marmik
May 26, 2026
in विशेष लेख
0
गंध कर्पुराचा, मोकळ्या श्वासाचा…

हवाबदल आणी सर्दी हे तसं नेहमीचंच समीकरण. मध्यंतरी असाच एकदा चतुर्थीच्या सुमारास ओम सर्दीने बेजार होता. रोज विजेवरच्या यंत्रात कापूर जाळत असलो तरी चतुर्थीसारख्या विशेष दिवशी नेहमीची पेटवलेल्या कापराची कर्पुरार्ती ओवाळल्याखेरीज समाधान नाही वाटत. ती घेताना ओमने नकळत दीर्घ श्वास घेतला आणि त्यानंतर प्रसाद मटकावताना स्वारी खुललेली दिसली. बाबा, तुझ्या लाडक्या व्हिक्ससारखा वास होता आरतीचा आणि त्या उबेनीपण छान वाटलं म्हणे मला. अरे म्हटलं, कापुराला व्हिक्सचा नाही तर व्हिक्सला कापराचा वास असतो, तोही नेमका ह्याच कारणासाठी म्हणजे चोंदलेलं नाक मोकळं करतो म्हणून!
आपल्या पूर्वापार पूजासाहित्यात व आयुर्वेदिक औषधींमध्ये कापुराचं स्थान कायमच वरचढ राहिलंय नाही का? त्याचा तो अर्धपारदर्शक स्फटिकी पांढरा रंग, भिमसेनी असेल तर काहीसे अनियमीत आकार आणि साधा असेल तर छान रेखीव चौकोनी किंवा गोल वड्यांचा आकार- सगळंच अतिशय ओळखीचं. पण त्याही पलीकडे त्याची खरी ओळख असतो तो खास असा श्वास मोकळे करणारा गंध! शब्दातीतच खरंतर हा सुगंध… मांगल्य वा शुद्धी भारलेले वातावरण निर्मिणारा अन् तनाएवढाच मनालाही सुखावणारा!
मला आठवतंय, कापुराच्या वड्या बारमाही तर घरात असायच्याच, पण गणपती बाप्पाच्या आगमनाच्या वेळी आवर्जून सहसा पिवळ्या झाकणाची मोठी डबी घरी यायची. दीड दिवसाच्या त्या सुखसोहळ्यात प्रत्येक आरतीनंतर खास त्याचवेळी बाहेर निघणार्‍या चांदीच्या कापुरारतीत तो अर्पण केला जायचा. अलिबागच्या पावसाळी हवेत त्या कापुराच्या सुगंधाने किती प्रसन्नता भरायची म्हणून सांगू? अर्थात तो आनंद सगळीकडे सर्वांना लाभतोच! निरोपाच्या आरतीसाठी समुद्रावर कापुरारतीचे काम नारळाची करवंटी करायची आणि जरा जास्ती कापूर पेटवला जायचा, विझून जाऊ नये म्हणून! त्यावेळी तर जागोजागी अनेकांच्या आरत्या सुरू असायच्या आणि वातावरण त्या कापूरगंधाने दरवळून जायचं!
दातदुखी आणि इतर अनेक व्याधींवर उपचार म्हणून आयुर्वेदात कापुराचा वापर असला तरी त्याला जास्त उठाव आला आधीच्या स्वाईन फ्लु आणि नंतर करोनाच्या काळात, नाही का? जो तो कापूर हुंगून चोंदलेले श्वास मोकळे करताना दिसू लागला. त्या वासाने श्वास तर मोकळा होतोच पण जडावलेलं डोकंही निवळतं. मला हा गंध विशेष भावतो तो ह्याच गुणासाठी. समोरच्याला त्रासमुक्त करणारा… श्वासांना मोकळं करणारा हा गंध म्हणजे एक दैवी देणगीच की एकप्रकारे!
श्वासांचं कोंडण हे शारीरिक असतं तसं मानसिकही असतं, नाही का? एखाद्या व्यथावेदनेपायी उर भरून येतो नी श्वास आतल्या आत कोंडायला लागतो. ह्यावेळी एखाद्याच्या स्वभावातील असाच कापूरगंध सुखावतो नं मंडळी? संपूर्ण विश्वासाने मन रितं केलं जातं नी नकळत मोकळ्या श्वासामुळे पुन्हा आनंदाच झाड बहरतं जणू! हा कापुरगंधी स्वभाव कमवायला गरज असते कानांपलीकडच्या ऐकण्याची, समजून घेण्याची आणि समोरच्याचे दुःख आपले समजून हलकं करण्याची.
माताजी श्री सारदादेवींचा एक किस्सा पुन्हा आठवतोय. पुत्रशोकाने विव्हळ झालेली एक माता जेव्हा माताजींकडे आली आणि शोकप्रदर्शन करू लागली, माताजींनी तिला उपदेश नाही हो करायला सुरुवात केली. सर्वसामान्य स्त्रीसुलभ स्वभावाला धरून माताजी त्या महिलेबरोबर आसवं गाळू लागल्या, शोक करू लागल्या! दोघींचेही मन मोकळे होईपर्यंत हे रुदन सुरू होते. काही वेळानी तो दुःखाचा भर ओसरला आणि माताजींबरोबरच ती असहाय्य माताही जरा शांत झाली.
जगरहाटी थांबत नसली तरी प्रत्येकालाच कधीतरी व्यथावेदनांना सामोरं जावं लागतंच नं? काळ हेच औषध असतं हे मान्य केलं तरी त्याक्षणी हा स्वभावातील कर्पुरगंध परिस्थिती सुधारवतो हे निश्चित. कोणत्याही संवादातील बोलण्यापेक्षाही महत्वाचा भाग असतो ऐकणे. ह्या ऐकण्यालाही मागे सारतं समजून घेणे. शब्दांची उधळण आपापल्या कुवतीनुरूप प्रत्येकजण करीत असला तरी त्यामागचा मूळ हेतू आणि भावना एकदा का लक्षात घेतली की असे विनाकारण कोंडलेले श्वास नकळत सुटायला मदतच होते. खूपदा शब्द तोकडे पडतात मनातील खळबळ मांडायला आणि ती जाणवल्याची ग्वाही द्यायलाही; मग त्या कापूरगंधाबरोबरच त्याची उबही कामी येते जणू, मायेच्या स्पर्शाची! एकदा का मन मोकळे आणि आनंदी असले की आपोआपच शरीरही सुखावतेच. हे ऐकून-समजून घेणे जसे आपल्या बाबतीत इतरांनी करावे असे वाटते नं, तसेच, किंबहुना त्यापेक्षाही जास्त गरजेचे असते आपण समोरच्याची मनस्थिती, परिस्थिती ओळखणे आणि त्यास सुयोग्य प्रकारे मोकळे होण्यास मदत करणे. त्या शुद्ध कर्पुरगंधासारखेच!

Previous Post

राशीभविष्य (२३ ते २९ मे २००६)

Next Post

डुप्लिकेट की

Next Post
डुप्लिकेट की

डुप्लिकेट की

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.