• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

रीलस्टार समाजसेवक

ऋषिराज शेलार (अर्ध्यामुर्ध्या गोष्टी )

marmik by marmik
May 18, 2026
in भाष्य
0
रीलस्टार समाजसेवक

काय बोल असतील ह्या गाण्याचे? अर्ध्याला उमगत नाही. ‘बेहरा हुआ?’ हॅट्! काहीतरी काय? अर्ध्यानं पुन्हा मोबाईलच्या स्पीकरला कान लावला. तोच डोक्यात टपली पडली.
‘कारे सन्या? डोक्यात मारतो?’ अर्ध्यानं रागानं मागं पाहत तिथं विकृत हसत उभा असलेल्या सनील अर्थात त्याच्या मामाच्या मुलाला विचारलं. हा सनील दोन गाव सोडून वरच्या वाडीला राहतो. तसा चबडब्या! काहीतरी करत राहणार. नातेवाईकांत याचं फार नाव! तहसीलला जा वा कोर्टात जा नाहीतर झेडपीत! याला फोन केला का अधिकारी हललाच म्हणून समजा! कुणी एक काळ्या टोपीवालं म्हातारं याचा आदर्श! त्याला हा गांधी समजतो. आणि याला लोक…! असो! याचं इथं येण्याचं कारण अर्ध्यासाठी चाललेलं स्थळ संशोधन! आणि त्यासाठीच्या उटारेट्या! तसं याचंही लग्नं झालेलं नाही. पण त्यानं त्याच्या आदर्शागत नि दिल्लीपतीच्या प्रेरणेनं अविवाहित राहायचं ठरवलंय. फक्त तो सकल बंधू समाजाला बहुअपत्याचं महत्त्व पोटतिडकीने सांगत फिरतो. अर्ध्याच्या लग्नाचा खटाटोपसुद्धा त्याच उदात्त कार्याचा एक भाग आहे.
‘इथं मी समाजसेवक सनील तुझ्यासाठी धरणं, पत्रक आणि पदाधिकार्‍यांच्या भेटीगाठीचे कार्यक्रम सोडून वेळेतून वेळ काढून आलोय. अन् तू काय ऐकतोय? हिंदी गाणे? अरे सुधर रे!’ गंभीर होत सनील बोलला.
‘मी कुठं बिघडलोय? तू सुधारायला लावतोय मला?’ अर्ध्यानं लागलीच उलट प्रश्न केला!
‘अरे हे बघ! आढं! किती जाळं लागलंय? बापरे ह्या पत्र्याला भेगा पडल्याय! तुझं लक्ष नाही का?’ सन्याला नवा शोध लागला.’ते जुनं आहे. दर पावसाळ्यात तिथून पाणी टिपकतं. आता ह्या वर्षी एक प्लास्टिकचा कागद त्यावर टाकून देऊ. म्हणजे गळणार नाही.’ अर्ध्यानं निर्विकारपणे उत्तर दिलं.
‘अरे तुझ्या लग्नाचं बघायला आलोय ना मी? नवर्‍या मुलीच्या घरच्यांना गळकं घर दिसलं, नाहीतर असा वरून कागद टाकलेला दिसला, तर तिथंच मोडंल ना? निदान पत्रा तर बदलायचा?’ सन्या कळकळीने अर्ध्याला सांगू राहिला, पण अर्ध्याचं लक्ष बेहरा हुआ का घ्ययरा हुआ, यातच अडकलंय.
‘पत्रा बदलायला सगळेच पत्रे जुने आहे. एक बदलायला वर चढलं तर दुसरा फुटून माणूस खाली यायचा. आज्याच्या काळातले पत्रे आहेत ते! आणि नुसतं पत्रे पाहूनच लग्नं तुटत असंल तर पावसाळ्यात ह्या भिंतीला ओल येते. मग त्याला काय करणार? जाऊ दे! मरू दे!’ अर्ध्यानं हात झटकला.
‘अरे तू कर्ता ना ह्या घरचा? काही जबाबदार्‍या आहेत का नाही तुला? एखादा इथंच नवं घर बांधायला घेता.’ सन्या उपदेशाचे डोस देऊ लागला.
‘हा आता उद्या टिकाव पावडं घेऊन येतो. अन् खणतो परसभर पाया. तू ये चार पाच मेढी, आडगया, बांबू अन् पाचट घेऊन! एखादं कोकणातल्यासारखं सफर टाकू ! काय?’ अर्ध्या खोचकपणे बोलला.
‘एवढं आडवं काय बोलतो?’ सन्यानं बोलणं ओळखलं.
‘मग? इथं पैशे आहे का घर बांधायला? काय बोलतो तू?’ अर्ध्यानं आता मोबाईल खिश्यात ठेवून दिला.
‘चल माझ्याबरोबर! पैशेच मिळवून देतो तुला लगेच! तुझं खातं कोणत्या बँकेत आहे?’ सन्याला लगेच काही आयडिया सुचली बहुतेक.
‘घ्याना बँक! रस्त्याच्या वरची!’ अर्ध्यानं शांतपणे सांगितलं.
समाजसेवक सनील लागलीच पायात चप्पल सरकवून तयार झाले. अर्ध्याला उठण्याची खूण केली. आता तर जावंच लागंल याच्याबरोबर! अर्ध्या चरफडत उठला. आणि त्याच्यामागून निघाला.
बरोबर बँकेसमोरच्या जागेत मोटारसायकल उभी करून दोघं आत गेले. बँकेत तुरळक गर्दी! बाकी स्टाफ कागदावरचे ढेकणं शोधून ते टोच्यावर चिरडत त्यांचं काम उरकताय.
‘नमस्कार सर!’ सन्या जाऊन समोरच्या टेबलवर बसलेल्या एक जणाला भिडला
‘अँ?’ त्यानं फक्त चमकून वर पाहिलं.
‘हा माझा आतेभाऊ.’ सन्या त्याला ओळख करून देऊ लागला. ‘अध्वर्यू नाव आहे याचं.’
‘मग?’ कुणालाही पडणारा सहज प्रश्न त्या व्यक्तीला पडला. त्यानं लॅपटॉपचा माउस फिरवणं थांबवलं!
‘ह्याचं लग्न जमत नाही.’ सन्यानं पुढलं वाक्य घेतलं.
‘मग मी काय करू? मुंडावळ्या बांधून नवरी बनू?’ काहीश्या रागानं तो व्यक्ती उत्तरला. तसं अर्ध्याला हसू फुटतं. तो रुमाल तोंडावर धरत आवरतो.
‘हे बघा, तुम्ही बँकेचे कर्मचारी आहात! असं चिडणं बरोबर नाही. मी काही चुकीचं बोललो का तुम्हाला?’ सन्या समंजसपणे त्याला सांगू लागला.
‘तुम्ही पण बँकेत आलात, असं समजून बोला! उगाच वधूवर सूचक केंद्रात आल्यासारखं बोलू नका.’ तो व्यक्तीही उलट सल्ला देऊ लागला.
‘हो ते मला माहित आहे, पण तुम्हीही माझं पूर्ण ऐका.’ सन्यानं त्या व्यक्तीला सौजन्यपूर्वक विनंती केली.
‘बोला!’ कपाळावर आठ्या आणत त्या व्यक्तीनं संमती दिली. लागलीच सन्यानं मोबाईलचा कॅमेरा चालू करून व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. तसा अर्ध्या सावध होऊन फूटभर मागं सरकला.
‘मी काळ्या टोपीवाल्या नानाचा शिष्य समाजसेवक सनील रीलस्टार. माझ्या आतेभावाबरोबर इथं आलो आहे. घ्याना बँकेत! इथं सर बसलेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. मागील निवडणुकीच्या आधी सरकारनं उपवर तरुणांना कौशल्यातून उत्कर्ष साधण्यासाठी लाडका भाऊ योजना चालू केली होती. तुमच्या बँकेत आहे का ती योजना चालू?’ सन्यानं त्या लॅपटॉपवाल्याला कोडं घातलं.
‘मला नाही सांगता येणार भौ!’
लॅपटॉपवाला बुचकळ्यात पडलेला. तो काय उत्तर देणार? ‘बघा! सरकारची महत्त्वाकांक्षी योजना. ज्यातून उपवर मुलांना गृहनिर्माणसाठी मासिक दहा हजार भत्ता आणि खातं असलेल्या बँकेतून अल्प व्याजदरावर कर्ज मिळतं. ती तुम्हाला माहित नाही. बघा! ह्या बँकेच्या कर्मचार्‍यांना लोकप्रिय योजनासुद्धा माहीत नाहीत.’ सन्या कॅमेर्‍यात बघून बडबड करू लागला.
‘तुम्ही झोपु योजना की चाळी पुनर्विकास योजना? नेमक्या कुठल्या योजनेबद्दल विचारताय? त्या मुंबईत वगैरे असतात. पण त्याचा उपवर तरुणांशी काय संबंध?’ त्या
लॅपटॉपवाल्याला काहीतरी आठवतं त्यावर तो उत्तर देऊ लागला.
‘म्हणजे ह्या बँकेत कर्मचार्‍यांना कुठल्याही सरकारी योजनेबद्दल माहीत नाही. निदान हे रोजचे पेपर वाचत नसतील का? मंत्री उद्घाटन करताना म्हणतात, आम्ही घरं बसवण्यासाठी तत्पर आहोत. त्याचा अर्थ काय? ते उपवर मुलांचे घर बसवून देणार. त्यांना घर बांधून देणार असाच होतो ना? निदान मराठीत घर बसवणे याचा अर्थ तरी तुमच्या बँकेला कळतो का? कसा कळेल? यांच्या बघा सर्व पाट्या हिंदीत दिसताय…’ सन्या पाट्या, बोर्ड दाखवायला धावला. तसा अर्ध्यानं त्याला मागं ओढला. एक हात
कॅमेर्‍यावर ठेवत त्याच्या कानात पुटपुटला.
‘नेमका तू आलाय कश्यासाठी?’
‘तुला होमलोन मिळवून द्यायला…’ सन्यानं निरागसपणे उत्तर दिलं.
‘मग तेवढं कर, आणि निघ! नाहीतर पुढल्या वेळी बुरखा घालून मला ह्या बँकेत यावं लागंल.’ अर्ध्याच्या सात्त्विक संतापानंतर सन्यानं गप्प मोबाईल खिश्यात टाकला.
‘ओ, साहेब तुम्हाला लाडका भाऊ योजना माहीत नसेल तर निदान होमलोन करून द्या भावाला.’ सन्या सुतासारखा सरळ झाला.
‘ते माझ्याकडं होत नाही…’
लॅपटॉपवाल्याचं बोलणं पूर्ण होतच नाही. ‘मग तुमच्या बँकेचा चेअरमन कोण आहे सांगा? त्याला भेटतो.’ सन्या पुन्हा तापला. ‘अहो, ही राष्ट्रीयीकृत बँक आहे, याला
मॅनेजर असतो.’ लॅपटॉपवाला समजावणीच्या सुरात बोलला. ‘माला वेड्यात काढतो का? आमची धनाजी मनकवडे बँक पण राष्ट्रीयीकृत आहे. पण त्याच्यावर चेअरमन गावचे पाटीलच आहेत.ते पण पदसिद्ध!पण तुम्ही खरं सांगणार आहे का टाकू माहिती अधिकाराचा अर्ज?’’ सन्यातला समाजसेवक पेटला.
पण त्याच्या मूर्खपणावर अर्ध्यानं कपाळावर हात मारला.
‘ओ, मी बँक कर्मचारी नाही. सीएस्सीवाला, बँक मित्र आहे. पैसे काढून देतो, भरणा करतो. अन् खाते खोलतो. बाकी ते बघा, लोन करून देणारे साहेब कोपर्‍यात बसलेले आहेत. त्यांच्याकडे जा.’
लॅपटॉपवालानं बोट दाखवलं. तशी समाजसेवक सनीलला परत हुक्की आली. त्यानं मोबाईल काढला. व्हिडीओ शूटिंग चालू केली. आणि कोपर्‍याकडे धाव घेतली. पण मध्येच सिक्युरिटी गार्डनं मागून गर्दन पकडत त्याला अडवलं.
‘ओ, सोडा ना!’ सन्या कळवळून बोलला.
‘लंच टाइम झाला. आता अर्ध्या तासानंतर ये. निघ.’ म्हणत त्यानं समाजसेवक सनीलला दाराकडे ढकललं.
‘हे बघा, हे सिक्युरिटीवाले साहेब, होमलोनसाठी चौकशी करणार्‍या एक सच्च्या गरजूला धक्के मारून हाकलत आहेत. बघा…’ सन्या मागं बघायला लागला तर अर्ध्या गायब. मोटारसायकलसह!
‘बाहेर बसून चांगले व्हिडीओ काढ. तोवर आम्ही जेवण करतो.’ बोलत बोलत सिक्युरिटी गार्डनं शटर खाली खेचलं.

Previous Post

कलथून चौथा खांबही गेला!

Next Post

चलाख हुकुमशहा : एबी अहमद

Next Post
चलाख हुकुमशहा : एबी अहमद

चलाख हुकुमशहा : एबी अहमद

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.