
वोल्केट हे पश्चिम टिग्रेमधलं एक गावशहर. लेमलेन अब्राहा ही त्या गावातली स्त्री. मुलं, आई वडील, नवरा असं मोठं कुटुंब. टिग्रे. बहुतांश वस्ती टिग्रे लोकांची. एके दिवशी गावात सैन्य घुसलं. सैनिकाना स्थानिकांमधे टिग्रे कोण होते ते माहित होतं. घरात घुसून गोळ्या घालत. प्रेत रस्त्यावर आणून टाकत. मग कधी तरी कुणी तरी येऊन ते प्रेत दफनत असे किंवा चर्चच्या आवारात नेऊन ठेवत असे. रस्त्यांवर फक्त सैनिक आणि चुकार जनावरं असत. हां, प्रेतंही असत.
लेमलेनचा नवरा पळून गेला, तिची मुलं पळून गेली. कुठं गेली ते लेमलेनला माहित नव्हतं. लेमलेन रात्रीच्या काळोखात गावाच्या सीमेवर पोचली. पोलिसांनी तिला मज्जाव केला. तिला मरेमरेस्तोवर झोडलं, तिच्यावर बलात्कार केला. त्याच वेळी आणखी एक स्त्री बाहेर जाण्याच्या प्रयत्नात गावाच्या शिवेवर गेली, तेव्हा चौकीवरच्या सैनिकांनी तिला पकडलं. तीन चार सैनिक होते. त्यांनी तिच्यावर आळीपाळीनं बलात्कार केला. बलात्कार इतका जबरी होता की स्त्री मेली. लेमलेन हे सारं पहात होती. बहुदा त्या स्त्रीवर बलात्कार करण्यात सैनिक गुंतल्यानं लेमलेनची सुटका झाली. लेमलेन घरी परतली. घरात शिरत असतानाच तिला दिसली तिच्या दारावरची नोटीस. नोटिशीत लिहिलं होतं की टिग्रे लोकांनी गाव-देश सोडून निघून जावं.
लेमलेन सटकली. सुदानमधे पोचली. तिथल्या निर्वासित छावणीत तिला नवरा आणि मुलं सापडली.
गावोगावातली हॉस्पिटलं इथियोपियन सैन्यानं नष्ट केली. गावात शिरलं की दुकानं, टेलेफोन व्यवस्था, आरोग्य व्यवस्था आधी नष्ट करत. गावाला पाणी पुरवठा करणारी व्यवस्था बाँब टाकून नष्ट केली गेली. टिग्रेमधली धरणं, कालवे, पाण्याचे साठे नष्ट केले गेले. टिग्रेतली माणसं मेली तरी किंवा जगणंच अशक्य झाल्यानं शेजारच्या सुदानमधे तरी गेली. टिग्रेमधे दुष्काळ पडला. मानव निर्मित दुष्काळाची ही दुसरा वेळ होती. मागं हेले सेलासींची सत्ता उलथवण्यासाठी बंडखोरांनी पिकं जाळली, कोठारातलं अन्न नष्ट केलं, बाजारातलं धान्य नाहीसं केलं. एक लिटर पाणी त्या काळातल्या २० डॉलरला विकलं जात होतं. दुष्काळ आणि लोकांच्या हालाच्या बातम्या बाहेर पसरू नयेत म्हणून सरकारनं कडक सेन्सॉरशिप सुरू केली होती. देशी वर्तमानपत्रांना बातम्या छापायची मनाई होती. परदेशी बातमीदारानं टिग्रेत जाऊ दिलं जात नसे. वीज नसल्यानं नेटवर्क बंद होतं.
दुष्काळ लपण्यासारखा नव्हता. युनायटेड नेशन्समधे बोंबाबोंब झाली. ह्युमन राइट्स संघटनांनी ओरडा केल्यावर अनेक संस्थांनी मदत पाठवली. पाणी, औषधं, अन्न पदार्थ टिग्रेच्या हद्दीपर्यंत पोचले. इथियोपियन सरकार परवानगी देताना खळखळ करू लागलं, हज्जार खुलासे विचारत मदत अडकवून ठेवली. युनो किंवा कोणी विचारणा केली तर उत्तर मिळे की आम्ही कोणालाही अडवत वगैरे नाही, प्रोसीजरनुसार परवानगी दिली जातेय. मुख्य कारण ती मंडळी आत गेली तर आतली परिस्थिती जगाला समजली असती. कित्येक आठवडे मदत बाहेर अडकून होती टिग्रेमधे माणसं उपासमार, आजारपाजार यामुळं मरत होते.
टिग्रे सेनेला बाहेरची मदत मिळू शकली नाही. इथियोपियाला मात्र जगभरातून शस्त्रं, दारूगोळा यांचा पुरवठा झाला. टिग्रेनं जवळपास शरणागती पत्करली, तहाची बोलणी सुरू केली. इथियोपियन सरकारच्या वतीनं एबी अहमद यांनी प्रस्ताव नाकारला. इथियोपियाला झालेला ‘कॅन्सर’ त्यांना समूळ नष्ट करायचा होता, इथियोपियात उगवलेले ‘तण’ त्यांना नष्ट करायचे होते. २ नोव्हेंबर २०२२ रोजी दक्षिण आप्रिâकेत प्रिटोरियामधे इथियोपिया आणि टीपीएलफ यांच्यात करार झाला. करारात संघर्ष संपवावा असं ठरलं. इथियोपियाची सार्वभौमता, भौगोलिक एकसंघता आणि राज्यघटना टिकवण्यासाठी केलेल्या या करारात नमूद करण्यात आलं की इथियोपिया या देशाची एकमेव सेना असेल, कोणतीही खाजगी सशस्त्रं दलं (मिलिशिया) नसतील.टिग्रेचं सैन्य बरखास्त करण्यात येईल, त्यांची शस्त्रं काढून घेण्यात येतील. टिग्रेमधलं सरकार बरखास्त केलं जाईल, त्या जागी एक नवं अस्थाई समावेशक प्रशासन स्थापन केलं जाईल.
एबी यांनी आपला आणि इथियोपियाचा विजय साजरा केला.
युद्ध संपलं.
*****
युद्ध आटोपलं. धरणं, वीज केंद्रं,
हॉस्पिटलं, शाळा, सरकारी कार्यालयं आणि अगणित घरं नष्ट झाली. ते सारं नव्यानं उभारणं आलं. उभारणीचा खर्च होता सुमारे २३ अब्ज डॉलर. इथियोपियाची अर्थव्यवस्थाच २०५ अब्ज डॉलरची. म्हणजे एका वर्षाच्या खर्चाच्या १० टक्के रक्कम दुरुस्तीवर. आधीच एकूण उत्पन्नाच्या ४३ टक्के एवढं कर्ज माथ्यावर. कसं जमायचं? २०२३ साली ३२ टक्के महागाई होती.
युद्ध आटोपल्या आटोपल्या एबी अहमद यांनी देश सुधारणांची पावलं उचलली. आदिस अबाबा या शहरात आठ पदरी रस्ते बांधायला सुरुवात केली. बहुमजली इमारती आणि मॉलच्या निर्मितीची कंत्राटं वाटली. मोठमोठी उद्यानं, रस्त्यांच्या मधोमधे चौकात गोलाकार उद्यानं, फ्लायओव्हर, नव्या रेलवे लायनींची सुरुवात केली. त्यांनी एक राजवाडा बांधायला घेतला. पुतीन यांच्या किंवा एर्डोगन यांच्या राजवाड्यांपेक्षा विशाल असा राजवाडा. त्या राजवाड्यात एबी रहाणार. त्यांच्या आईनं त्यांच्या जन्माच्या वेळी भाकित केलं होतं की त्यांचा हा मुलगा इथियोपियाचा सातवा सम्राट होणार आहे. सम्राटाला शोभेशा राजवाडा नको का? राजवाडा प्रकल्प सुमारे १० अब्ज
डॉलरचा.

टिग्रेची उभारणी मागं पडली. एबी अहमद सम्राट होऊ घातले आहेत. सम्राटाचं व्यक्तीचं एक वैशिष्ट्यं म्हणजे त्याच्याभोवती गूढतेचं वलय असतं, त्याच्याबद्दल आख्यायिका पसरलेल्या असतात. वलय आणि आख्यायिक सम्राट लोक प्रयत्नपूर्वक तयार करत असतात. हस्तक मंडळी ते काम पार पाडतात. एबी यांची आर्टिफिशल इंटेलिजन्स, कंप्यूटर, नेटवर्क, समाज माध्यमं यावर पकड आहे, त्यांची उत्तम समज एबींना आहे. संवादाची माध्यमं त्यांनी हातात ठेवली आहेत. इथियोपियातल्या सर्व महत्वाच्या माणसांची टेलेफोन संभाषणं आणि इमेल वगैरे एबींना कळत असतं. आपल्या विरोधात कोण आहेत, त्यांची कारस्थानं काय आहेत ते त्यांना कळत असतं. तंत्रज्ञान अमेरिकेतलं आणि लक्ष ठेवण्याचा मंत्र पुतीनचा अशी जोडणी त्यांना साध्य झालेली आहे.
एबींना उपयोगी तेवढीच माहिती बाहेर येते, प्रेसमधे पेरली जाते. एरिट्रियाबरोबर शांततेचा करार केला ही फार मोठी कामगिरी पार पाडली म्हणून एबींना नोबेल पारितोषिक देण्यात आलं. करार करत असताना एरिट्रियाने टिग्रेवर हल्ला करायचा आहे, टिग्रेची जमीन लाटायची आहे याला त्यांनी खाजगीत मान्यता दिली होती हे माध्यमांत आलं नाही. त्यावर लिहिण्याचा प्रयत्न ज्या पत्रकारांनी केला त्यांची तोंडं तरी बंद करण्यात आली किंवा त्यांना एवढं बदनाम केलं की त्यांना विश्वासार्हता उरली नाही. एबी अहमद उत्तम कपडे घालतात. वावर सराईत आहे. भाषा पॉश आहे. दावोसच्या इकॉनॉमिक कॉन्फरन्समधे ते सफाईनं बोलले, तमाम जनता त्यांच्यावर भाळली. नोबेल दिलं जात असताना पेपर, अनेक संघटना बोंबलत होत्या, एबी हा माणूस क्रूर आहे, पारितोषिकाला लायक नाही. पण जगाला, नोबेलवाल्यांना भुरळ पडली होती.
नव्या प्रकल्प व बांधकामांसाठी जमीन हवी. शेतकर्यांची जमीन घेतली जातेय. कायद्याच्या भाषेत त्याला अधिग्रहण म्हणतात, व्यवहारात ते शेतकर्यांची जमीन लुबाडणं असतं. शेतकरी नाही म्हणू शकत नाहीत. शेतकरी आंदोलन करतात, एबी ते आंदोलन चिरडतात. ओरोमो लोक शेतकरी आहेत, त्यांच्या जमिनी जात आहेत. ते आंदोलन करतात. त्यांची सशस्त्र सेना दंगा करते. एबी हे स्वतः ओरोमो आहेत आणि खुद्द ओरोमो लोकांनाही ते पसंत नाहीयेत. पेपरात बातमी येत नाही. पोलिस आंदोलकांना तुरुंगात ढकलतात, सारं कसं शांत शांत होतं.
युद्ध आटोपल्यावर एबी अहमदना उसंत मिळाली, आत्मविश्वास दुणावला. त्यांनी इथियोपियन सैन्य अम्हारा सशस्त्र दलांच्या मागं लावलं. अम्हारा विभागात धाडी घालून त्यांनी अम्हारा सैनिकांना मारलं, तुरुंगात घातलं. दोनच वर्षांपूर्वी याच अम्हारा सशस्त्र दलांना एबी अहमद यांनी टिग्रेंच्या विरोधात वापरलं, त्यांना टिग्रे लोकांवर अत्याचार करायला परवानगी दिली आणि त्यांचं कांडात निघतंय. टिग्रेचे लोक आता अम्हारांकडं बघून हसत असतील.
टिग्रेला इथियोपियन सरकारनं नमवलं खरं, पण टिग्रेची भावना आहे की त्यांना ओरोमोनी नमवलंय, एबी अहमद ओरोमो आहेत. देशाच्या नावाखाली ओरोमोंनी टिग्रे या शत्रूचा काटा काढलाय, अशी टिग्रेची भावना आहे. पण खुद्द ओरोमोही नाराज आहेत.
म्हणजे मूळ पाढे पंचावन्न. प्रत्येक सांस्कृतिक गट सत्तेवर कबजा करण्याच्या प्रयत्नात आहे, जमल्यास स्वतंत्र होण्याच्या प्रयत्नात आहे आणि एक पंतप्रधान त्यांना एका इथियोपिया नावाच्या देशात कोंबण्याच्या प्रयत्नात आहे.
माणसांना सुख नाही. त्यांना वाटतंय की त्यांना सांस्कृतिक स्वायत्तता मिळाली की ते सुखी होतील. आर्थिक प्रश्न भले असतील. पण सांस्कृतिक पायावर देश स्थापन झाला तर आर्थिक प्रश्न सोडवता येतील असं त्यांना वाटत असावं. किंवा सांस्कृतिक विचार एवढा प्रबळ असावा की आर्थिक गोष्टींचा विचारही करण्याची त्यांची इच्छा नसावी.
अशीही शक्यता आहे की लोकांना सांस्कृतिक वगैरे गोष्टी महत्वाच्या वाटत नाहीत, राजकीय पक्ष धर्म-संस्कृतीचा उपयोग करून सतेचं राजकारण करत असतात.
इथियोपियात तेच चाललंय जे जगात चाललंय.

