महाराष्ट्रात थलपती विजयसारखा मुख्यमंत्री बनू शकेल, असा सुपरस्टार कोण आहे तुमच्या मते?-राधिका शानभाग, पर्वती पायथा, पुणे
तुम्ही आम्हाला धर्मसंकटात टाकताय. आम्ही एखाद्या सुपरस्टारचं नाव सुचवायचो, तो वेगळ्या धर्माचा असायचा; म्हणजे मग तो आणि तुम्ही राहायचा बाजूला आणि आम्ही लागायचो कामाला… आम्हाला तसं म्हणायचं नव्हतं वगैरे स्पष्टीकरणं देत बसावं लागायचं! आणि तरीही एखाद्याचे नाव आम्ही सुचवलं तर आमची कलाकार मंडळी त्याला मुख्यमंत्री बनू देतील? (इथे पगारावर काम करणारे कलाकार गृहीत धरलेले आहेत, हे मानधनावर काम करणार्या कलाकारांनी समजून घ्यावं. पगार कोण देतं? असा साळसुद प्रश्न विचारू नये.)
शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, शहाण्याने पोलिस स्टेशनची पायरी चढू नये, असं सगळे सांगतात. मग शहाण्या माणसावर कोणी अन्याय केला, अत्याचार केला, तर त्याने कोणती पायरी चढावी?-नीरज पंडित, अक्कलकोट
कुठलीही पायरी चढण्यापेक्षा, कोर्ट किंवा पोलीस स्टेशनवाले किती पायर्या खाली उतरलेयत ते एकदा बघावं किंवा बेस्ट वे म्हणजे आपली पायरी बघून वागावं. उगाच पोलीस स्टेशनवाल्यांना तक्रार नोंदवून घेण्याचा आणि कोर्टाला न्याय देण्याचा त्रास देऊ नये.
दृष्टीआडची सृष्टी कशी दिसते?-संजय क्षीरसागर, पिंपळे गुरव, पुणे
‘एक वर्षभर सोनं खरेदी करू नका’ या वाक्याच्या मागची आणि पुढची गंमत तुम्हाला दिसत असेल तर दृष्टीआडची सृष्टी तुम्हाला दिसेल. नाही. नाही… त्यासाठी काही महाभारतातल्या संजयसारखी विशेष दृष्टी असावी लागत नाही, तर दृष्टी असूनही धृतराष्ट्र बनण्याचं कौशल्य असावं लागतं…
आमच्या वर्गातल्या गुंड्याने बंड्या आणि नमीचं लफडं मास्तरांना न सांगण्याच्या बदल्यात त्यांच्याकडून रोज एक वडापाव आणि पेप्सीकोलाची लाच घेतली. हे कळल्यावर मास्तरांनी त्याला छडीने मारण्याच्या ऐवजी ‘भावी मुख्यमंत्री, गरीबाकडे लक्ष ठेवा मोठे झाल्यावर’ असं म्हणून त्याला चक्क नमस्कार केला… हे असं कसं आक्रीत घडलं?-संग्राम भोंडसे, इंदापूर
तुमचे मास्तर अजून अमृतकाळाच्या खूप मागे आहेत. जर बंड्याने, गुंड्या आणि नमीचं लफडं नसतानाही, त्यांचं लफडं आहे अशी कुजबुज पसरवून बोंब मारली असती, किंवा ‘बंड्या हा सय्यद बंडा आहे आणि नमीला त्याने नादी लावला आहे,’ अशी (पूर्वी हूल उठवायचे तशी) ट्रोल उठवली असती, तर मास्तरांना आताच्या अमृतकाळातलं म्हटलं असतं… पण म्हणून मास्तरांनी बंड्याला काय म्हटलं याचे उत्तर देणार नाही. कारण नेहमी प्रश्न विचारणार्यावर येणारी ट्रोल धाड, उत्तर देणार्यावर यायची!
स्त्रियांना स्वेच्छेने जगण्याचा हक्क नसतो का?-अशोक परब, ठाणे
हक्क का काय म्हणतात तो कुठल्या स्त्रियांना द्यायचाय त्याच्यावर डिपेंड असतं. अजून सोप्या भाषेत उत्तर हवं असेल तर, तुम्हाला कुठल्या बाईला हक्क द्यायचाय याच्यावरती अवलंबून आहे.
तुम्हाला नेता बनण्याची ऑफर आली तर काय कराल?-प्रशांत सोनकांबळे, वसई
जमिनीचे रेट काय आहेत ते समजून घेईन आणि तो रेट न देता जमीन कशी ताब्यात घ्यायची ते शिकून घेईन… कारण उद्या कसल्या, असल्या-तसल्या व्यवहारात अडकलो, तर देवाने वाचवायला आम्ही पार्थ नाही.
बुवा तिथे बाया, असं का म्हणतात? त्याच न्यायाने अम्मा तिथे काय म्हणायचं?-विकास जोशी, घाटकोपर
अम्मा तिथे निकम्मा…. आणि न्यायाच म्हणाल तर तो कुठल्या देवाचं गुणगान गातो त्याच्यावर डिपेंड असतं… बाकी गंध, टिळा, दाढी, मिशा, आसन, खुर्ची, टेबल या गोष्टी त्यांना कशा सूट होतात त्याच्यावर डिपेंड असतात…
महापुरुषांचा अपमान कोण करतं, यावर त्याची प्रतिक्रिया कशी द्यायची, ते ठरवणार्या लोकांना त्या महापुरुषांबद्दल खरोखर प्रेम असतं का?- शैला पितळे, ठाणे
बांडगूळ नेहमी मोठ्या झाडांच्या जिवावरच जगतं, मोठ्या झाडांच्या जिवावर मोठं होतं. हे ज्यांना माहीत असतं ते बांडगुळांबद्दल बोलत नाहीत, डायरेक्ट बांडगूळ उपटून फेकून देतात. तुम्हाला बांडगुळांबद्दल विचारायचं असेल तर डायरेक्ट विचारा. असा महापुरुषांबद्दल प्रेम असणार्यांच्या आडून आडून प्रश्न विचारू नका. आम्हाला तुमचा प्रश्न कळला की नाही?आमचं उत्तरही तसंच समजून घ्या.
विचारून टाका प्रश्न
तुम्हालाही अभिनेते संतोष पवार यांना प्रश्न विचारायचाय…? मग वाट कसली बघताय…? उचला पेन आणि टाका विचारून प्रश्न… हा प्रश्न थेट ‘मार्मिक’च्या [email protected] या ईमेल आयडीवर पाठवून द्या… किंवा आमच्या पत्त्यावर पाठवा. मार्मिक प्रश्नाला संतोष पवार उत्तर देतील…

