ठाणे जिल्हा आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर हा केवळ नकाशावरचा एक भूभाग नाही. हे एक जिवंत, श्वास घेणारं फुफ्फुस आहे, ज्याने मुंबई आणि ठाण्यासारख्या सिमेंटच्या जंगलांना आजही ऑक्सिजनचा पुरवठा सुरू ठेवला आहे. एकेकाळी जैवविविधतेने नटलेला, निसर्गाच्या समृद्ध वारशाने ओसंडून वाहणारा हा पट्टा आज एका ऐतिहासिक वळणावर उभा आहे. आज इथली झाडं पूर्वीसारखीच डोलतात, पक्षी आजही किलबिलाट करतात, पण या शांततेच्या आड एक अस्वस्थता दडलेली आहे. ती आहे मानवी हव्यास आणि निसर्गाचं अस्तित्व यांच्यातील वाढत्या संघर्षाची. जंगल आजही आहे, त्यात वावरणारे प्राणी आजही आहेत, पण त्यांच्या मुक्त संचारावर मानवी हस्तक्षेपाचा जो फास आवळला जात आहे, तो आता असह्य होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाने घेतलेला आक्रमक, सजग आणि तितकाच संवेदनशील पवित्रा हा केवळ प्रशासकीय निर्णय ठरत नाही, तर तो निसर्ग वाचवण्यासाठी पुकारलेला एक निर्णायक एल्गार ठरतो आहे.
काही दिवसांपूर्वी बिबट्याची निर्दयीपणे शिकार करून त्याची कातडी विक्रीसाठी आणणार्या तस्कराला वन विभागाने बेड्या ठोकल्या. ही बातमी समोर आली, तेव्हा मनात अनेक प्रश्नांनी गर्दी केली. बिबट्या हा आपल्या जंगलातील अन्वयार्थ आहे. तो ‘अपेक्स प्रिडेटर’ (खाद्यसाखळीतला सर्वोच्च स्थानावरचा शिकारी) आहे. एखाद्या जंगलातून बिबट्या नष्ट होतो, तेव्हा केवळ एक प्राणी मरत नाही, तर त्या संपूर्ण परिसंस्थेचा डोलारा कोसळतो. त्याची शिकार होते म्हणजे जंगलातील कायद्याचा धाक चोरट्या शिकार्यांच्या मनात उरलेला नाही, असा अर्थ होतो. ही शिकार म्हणजे निसर्गाच्या काळजावर झालेला वार होता. अशा क्रूर घटनांमुळे जंगलातील समतोल ढासळतो.
परंतु क्रूरता इथेच थांबली नाही. त्याच काळात काही समाजकंटकांनी माकडांवर बाण मारून त्यांना गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला. ही घटना तर क्रौर्याचा कळस गाठणारी होती. माकडं ही आपल्या संस्कृतीचा आणि सहजीवनाचा अविभाज्य भाग आहेत. ग्रामीण भागात असो वा शहराच्या वेशीवर, माणसांच्या सान्निध्यात राहणारी ही प्रजाती. त्यांच्यावर आधुनिक शस्त्र वापरून हल्ला होणे, हे मानवी वृत्ती किती विकृत होऊ शकते, याचंच जिवंत उदाहरण आहे. अशा सलग घटना घडतात, तेव्हा व्यवस्थेला जाग येणे अनिवार्य असते आणि इथेच वन विभागाची भूमिका महत्त्वाची ठरते. आता केवळ कागदी घोडे नाचवण्याची वेळ निघून गेली आहे, हे ओळखून वन विभागाने जे पाऊल उचलले, ते कौतुकास्पद आहे.
‘सापळे शोध मोहीम’ हा आज केवळ एक सरकारी उपक्रम राहिलेली नाही. ती जंगलातील अदृश्य मृत्यूशी दोन हात करण्याची लढाई आहे. चोरटे शिकारी प्राण्यांना पकडण्यासाठी जे फासे, वायर ट्रॅप्स आणि लोखंडी सापळे लावतात, ते इतके भयानक असतात की त्यात अडकलेला प्राणी तडफडून जीव सोडतो. हे सापळे लावणार्यांना ना प्राण्यांच्या वेदनेची चाड असते, ना निसर्गाच्या नुकसानाची. वन विभागाची विशेष पथके ते सापळेच शोधून काढण्यासाठी जंगलातील अतिदुर्गम भागात उतरली. हे काम कोणत्याही अर्थाने सोपे नाही. दाट झाडीझुडपे, चढउताराचा डोंगरदर्यांचा प्रदेश आणि पावलोपावली लपवून ठेवलेला धोका. अशा स्थितीत वन कर्मचार्यांनी सापळे नष्ट करण्यासाठी पुढाकार घेतला, त्यातून हरणाचा, सशाचा किंवा बिबट्याचा जीव वाचल्याचे समाधान होते. या मोहिमेने हे सिद्ध केले की प्रशासनाची इच्छाशक्ती असेल, तर आपण जंगलाला पुन्हा सुरक्षित करू शकतो.

ही कारवाई म्हणजे एक दूरगामी रणनीती आहे. संवेदनशील ठिकाणांचे ‘मॅपिंग’ करणे, तिथे गस्त वाढवणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संशयितांवर नजर ठेवणे, हे काम आता युद्धपातळीवर सुरू आहे. पश्चिम विभागाचे मुंबई स्थित मुख्य वनसंरक्षक (वन्य जीव) जितेंद्र रामगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही यंत्रणा अत्यंत सुसूत्रपणे कार्यरत आहे. त्यांच्या नेतृत्वाने स्थानिक वनअधिकारी आणि कर्मचार्यांमध्ये एक नवा उत्साह भरला आहे. तसेच, या कार्यात ‘वाईल्ड लाईफ वेलफेअर असोसिएशन’ आणि ‘रेस्क्यू असोसिएशन फॉर वाईल्ड लाईफ वेलफेअर’ यांसारख्या स्वयंसेवी संस्थांची जोड मिळणे, ही एक मोठी जमेची बाजू आहे. सरकारी यंत्रणा आणि नि:स्वार्थी भावनेने काम करणारे स्वयंसेवक एकत्र येतात, तेव्हा त्याचे परिणाम सकारात्मकच असतात. या स्वयंसेवकांकडे असणारे स्थानिक ज्ञान आणि अनुभव यामुळे वन विभागाला मोहीम राबवताना अचूकता साध्य करता आली.
आज आपण जिला ‘प्रगती’ किंवा ‘विकास’ म्हणतो, त्या प्रक्रियेत निसर्गाचा बळी दिला जात आहे का? हा प्रश्न आपल्याला स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. ठाणे आणि मुंबईचा परिसर आज वेगाने सिमेंट-काँक्रिटच्या जंगलात रूपांतरित होत आहे. उंचच उंच इमारती, उड्डाणपूल आणि रस्ते बांधताना आपण हे विसरतोय की इथला मूळ रहिवासी हा माणूस नसून हा निसर्ग आहे. सिमेंटच्या या जंगलात खर्या जंगलाची कोंडी होत आहे. जंगलाच्या सीमा आक्रसत चालल्या आहेत आणि अन्नाच्या शोधात प्राणी मानवी वस्तीकडे वळत आहेत. यातून ‘मानव-वन्यजीव संघर्ष’ सुरू होतो, त्यात दोष कोणाचा? जो नैसर्गिक अधिवासात राहतोय त्या प्राण्याचा की ज्याने त्या प्राण्याच्या घराचे तुकडे केले त्याचा? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपल्या जीवनशैलीत शोधावं लागेल.
वन विभागाने आता सापळे शोध मोहीम नियमित राबवण्याचा निर्णय घेतला आहे, ही सर्वात मोठी उपलब्धी आहे. गुन्हेगारांवर धाक बसवण्यासाठी सातत्यपूर्ण कारवाई गरजेची असते. एकदा कारवाई करून शांत बसलो, तर शिकारी पुन्हा सक्रिय होतात. पण आता वन विभागाने दिलेला संदेश स्पष्ट आहे. जंगलात घुसखोरी कराल आणि प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण कराल, तर तुम्हाला सोडलं जाणार नाही. कायद्याची भीतीच वन्यजीवांचे संरक्षण करण्यास मदत करेल. मात्र, केवळ कायदा पुरेसा नाही. लोकांच्या मानसिकतेतही बदल घडवून आणावा लागेल.

निसर्गसंवर्धन हे केवळ वन विभागाचे कर्तव्य नसून ते आपणा सर्वांचे नैतिक उत्तरदायित्व आहे. जो समाज निसर्गाचा आदर करत नाही, तो दीर्घकाळ टिकू शकत नाही. आपल्या पूर्वजांनी आपल्याला डोंगर, नद्या, जंगलं आणि प्राणी यांचा एक समृद्ध वारसा दिला आहे. तो पुढच्या पिढीकडे जसाच्या तसा सोपवणे, हे आपले कर्तव्य आहे. आज आपल्या आजूबाजूला असलेली जैवविविधता म्हणजे निसर्गाचे आपल्यावर असलेले कर्ज आहे. ते फेडण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे निसर्गाशी कृतज्ञ राहणे.
जंगलातील प्रत्येक झाड, प्रत्येक झुडूप आणि प्रत्येक जीव हा एका मोठ्या साखळीचा भाग आहे. ही साखळी तुटली की मानवाचे अस्तित्वही धोक्यात येईल. हवामान बदल, अतिवृष्टी किंवा वाढतं तापमान ही सर्व निसर्गाने दिलेली धोक्याची लक्षणे आहेत. आपण आजही सुधारलो नाही, तर भविष्यात आपल्याकडे पश्चात्तापाशिवाय काहीही उरणार नाही. वन विभागाने आज जो सजग पवित्रा घेतला आहे, त्याला पाठबळ देणे ही आपली जबाबदारी आहे. नागरिकांनीही आता डोळे उघडे ठेवून वागायला हवे. आपल्या परिसरात वन्यजीवांच्या बाबतीत काही संशयास्पद घडत असेल, तर तात्काळ प्रशासनाला कळवा. आपण माहिती देणे हे देखील एक मोठे देशकार्य आहे.
आज गरज आहे ती केवळ कायद्याच्या बडग्याची नाही, तर निसर्गाप्रती असलेल्या करुणेची आणि संवेदनशीलतेची. कारण जंगल हे केवळ लाकडाचा साठा नसून, ते लाखो जीवांचे घर आहे. त्या घराची राखण करणं ही केवळ खाकी वर्दीतल्या वन कर्मचार्यांची ड्युटी नाही, तर ती आपली ‘माणुसकी’ आहे. बिबट्याची ती कातडी, ते जखमी माकड आणि ते सापळे… ही सर्व दृश्यं आपल्याला अस्वस्थ करायला हवीत. जोपर्यंत आपण अस्वस्थ होत नाही, तोपर्यंत आपण बदलासाठी सज्ज होणार नाही. आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, निसर्ग आपल्याशिवाय जगू शकतो, पण आपण निसर्गाशिवाय एक क्षणही जगू शकत नाही. ‘जंगल वाचले तरच जीवन वाचेल’ हे केवळ घोषवाक्य राहू नये, तर तो आपल्या जगण्याचा मंत्र बनावा. उद्याच्या सुरक्षित भविष्यासाठी, आपल्या मुलांच्या निरोगी आयुष्यासाठी आणि या सुंदर पृथ्वीसाठी आपण निसर्गाचे रक्षक बनूया. निसर्ग वाचवण्याची ही लढाई ही खरं तर स्वतःला वाचवण्याची लढाई आहे, आणि ती आपल्याला कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीच आहे.
