• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

राजा आईसेस

सुधीर साबळे (पुणे तिथे खाणे...)

marmik by marmik
May 9, 2026
in इतर
0
राजा आईसेस

पॉट आइस्क्रीम हा आज पन्नाशी-साठीत असलेल्या पिढीच्या आठवणीतली एक साठवण आहे. त्यावेळी वाड्यात, चाळीत एखाद्या हौशी कुटुंबात हे पॉट भाड्याने आणलं जायचं. लाकडाच्या त्या पॉटमध्ये मीठ आणि बर्फ टाकलं जायचं. मधल्या भांड्यात घट्ट दूध, साखर, फ्लेवर टाकून पॉट हाताने सतत फिरवलं जायचं. ही गंमत पाहायला सगळी पोरं, आयाबाया हजर व्हायच्या. पोरंही आळीपाळीने पॉटवर जोर लावायची. हे पॉट आईस्क्रीम तयार व्हायला किमान तासाभराचा वेळ लागायचा. त्यानंतर सगळ्यांच्या मेहनतीने तयार झालेलं आईस्क्रीम विशिष्ट पानांवर लाकडी चमच्यांसह सगळ्यांना थोडं थोडं खायला मिळायचं. सगळ्यांच्या मेहनतीने बनणार्‍या आणि एखाद्या जिवंत चमत्कारासारख्या समोर साकारणार्‍या त्या आईस्क्रीमची चवच वेगळी होती.

आता घरोघरी फ्रिज आलेले आहेत. घरच्या घरी आईस्क्रीम बनवणं सहज शक्य आहे. आईस्क्रीमचे सतराशे साठ स्वाद बाजारात उपलब्ध आहेत. कुठे जायचीही गरज नाही. ऑर्डर द्या, हवं ते आईस्क्रीम घरपोच. मात्र, अशा काळातही पॉट आईस्क्रीमची अस्सल चव चाखायची असेल, तर त्यासाठी काही ठरविक ठिकाणी आपण उठूनच जावं लागतं. हे आईस्क्रीम एकदा चाखलं की मग पुन्हा आईस्क्रीम खाण्याचा विचार आला की तिकडेच जावंसं वाटतं. कारण अलीकडे आईस्क्रीमच्या नावाखाली जे बिनदुधाचं ‘फ्रोजन डेझर्ट’ खपवलं जातं, त्यापेक्षा पॉट आईस्क्रीममध्ये जो दुधाचा घट्टपणा आणि मऊसर टेक्श्चर मिळतं, तो अनुभव सर्वस्वी वेगळा असतो.

पॉट आईस्क्रीमच्या या खास चवीची परंपरा जपणारे पुण्यातले एक जुने आणि प्रसिद्ध ठिकाण म्हणजे राजा आईसेस. १९४७ पासून कार्यरत असलेले हे दुकान आजही दर्जेदार आणि पारंपरिक चवीसाठी ओळखले जाते. मनोहर वामन लिमये यांनी सुरू केलेल्या या दुकानात पॉट आईस्क्रीम बनवण्याची पारंपरिक पद्धत आहे. उत्तम दर्जाचे दूध, आणि योग्य प्रमाणात साखर वापरून तयार केलेले हे आईस्क्रीम खूपच नैसर्गिक चव देते. कृत्रिम फ्लेवर्सपेक्षा इथे नैसर्गिक चवीला जास्त महत्त्व दिले जाते, त्यामुळे प्रत्येक घास अधिकच आनंददायी वाटतो.

पुण्यातील अनेक पिढ्या या आईस्क्रीमच्या चवीवर वाढल्या आहेत. लहानपणी आई-बाबांसोबत इथे येऊन आईस्क्रीम खाण्याच्या आठवणी अनेकांच्या मनात आजही ताज्या आहेत. त्यामुळे हे फक्त एक दुकान नाही, तर वेगळ्या चवीच्या शोधात असणार्‍या खाद्यप्रेमीच्या भावनांशी जोडलेले एक खास ठिकाण आहे.

आईस कॅन्डीचा व्यवसाय
सदानंद लिमये हे या दुकानाचे आजच्या पिढीतले मालक. त्यांचे वडील मनोहर लिमये हे खडकीच्या दारुगोळा कारखान्यामध्ये इंजिनियर म्हणून नोकरी करत असत. १९४७ च्या सुमाराला काही कारणामुळे त्यांची नोकरी खंडित झाली. उदरनिर्वाहाची भ्रांत पडल्यावर त्यांनी आईस कॅन्डी तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. बर्फ आणि मीठ टाकून बनवलेल्या या आईस कॅन्डीमध्ये व्हॅनिला, मँगो आणि पायनॅपल हे फ्लेवर प्रसिद्ध होते. इथे दोन प्रकारच्या आईस कॅन्डी मिळत, त्यामध्ये एका प्रकार होता तो पाण्यापासून तयार केलेला आणि दुसरा प्रकार होता तो आटवलेल्या दुधापासून केलेला कुल्फीच्या प्रकारातला… तेव्हा त्यांची किंमत पाच ते दहा पैसे होती, असे सदानंद लिमये सांगतात. सध्या ते आणि त्यांचा मुलगा रोहित हा व्यवसाय चालवत आहेत. त्या काळात आईस्क्रीम हा प्रकार आजच्या इतका प्रसिद्ध आणि सर्वसामान्यांना परवडणारा नव्हता. त्यामुळे उन्हाच्या तडाख्यात जिवाला थंडावा देणारा स्वस्त आणि मस्त पदार्थ म्हणून आईस कॅन्डीकडे पहिले जायचे.

मनोहर लिमये यांनी हा व्यवसाय सुरू केल्यानंतर दोन वर्षांच्या खंडानंतर ते पुन्हा नोकरीमध्ये रुजू झाले. मात्र, त्यांनी सुरू केलेला आईस कॅन्डीचा व्यवसाय वाढत चालला होता. लोकांना त्याची चव आवडू लागली होती. मागणीपेक्षा पुरवठा कमी पडू लागला. त्यामुळे १९४९मध्ये मार्को या ब्रिटिश कंपनीचे आईस कॅन्डी तयार करणारे स्वयंचलित मशीन त्यांनी पाच ते सहा हजार रुपयांना खरेदी केले. त्या मशीनमध्ये दोन हजार आईस कॅन्डी तयार व्हायच्या. पंधरा मिनिटांत २०० आईस कॅन्डी तयार व्हायच्या. त्याला पुण्यात भरपूर मागणी असे. १९४९ मध्ये पुण्यामध्ये आईस कॅन्डीच्या गाड्या मोठ्या प्रमाणात होत्या. सदाशिव पेठेतल्या गद्रे वाड्यामध्ये २५० स्क्वेअर फूट जागेमध्ये लिमयेंनी दुकान सुरू केलं. तोपर्यंत आईस कँडी व्यवसायातले किंग असा मनोहर लिमये यांचा लौकिक प्रस्थापित झाला होता, म्हणून या दुकानाचं नाव ठेवलं गेलं ‘राजा आईसेस’!

आईस्क्रीमच्या व्यवसायाची सुरुवात
१९५५ मध्ये आईस्क्रीम हा पदार्थ श्रीमंतांनाच परवडणारा आणि अतिशय महाग होता. पुण्यामध्ये तेव्हा पाच-सहा ठिकाणेच आईस्क्रीमसाठी फेमस होती. तेव्हा मनोहर लिमये यांनी एक वेगळीच व्यवसाय पद्धती सुरू केली. ग्राहकांनी कच्चा माल आणून द्यायचा आणि ते आईस्क्रीम बनवून देणार, फक्त ते बनवून देण्याचाच खर्च घेणार. लोकं दूध, साखर असे कच्चे पदार्थ आणून देत आणि लिमये त्यांना पॉटमधून फ्लेवर आईसक्रीम तयार करून देत असत. महागड्या आईस्क्रीम दुकानांपेक्षा ते स्वस्त पडत असे. त्यामुळे लोकांना ते खूप आवडे. स्वतः कच्चा माल दिला म्हणजे त्यात भेसळ नसे. शुद्ध दर्जाचा उत्तम पदार्थ त्यामधून तयार होत असे. सदानंद लिमये सांगतात की गंमत म्हणजे आताच्या काळात तो ट्रेंड परत आला आहे. लोक आरोग्याविषयी जागरुक झाल्यामुळे आमच्याकडून पॉट आईस्क्रीम तयार करून घ्यायला प्राधान्य देत आहेत. पॉट आईस्क्रीममध्ये कोणत्याही प्रकारची केमिकल्स नसतात, त्यामुळे त्याची चव नैसर्गिक लागते. या आईस्क्रीमची चव दीर्घकाळ टिकते. आपल्याकडचा आंबा आईस्क्रीमचा फ्लेवर पहिल्यापासूनच अतिशय फेमस राहिला आहे, असं सदानंद लिमये सांगतात. राजा आईसेसमध्ये अनेक सेलिब्रिटी आईस्क्रीम खाण्यासाठी येत असत. अभिनेते रमेश भाटकर, अविनाश खर्शीकर, दीनानाथ टाकळकर, शरद तळवलकर ही कलाकार मंडळी त्यात प्रमुख होती.

टेक होम सर्व्हिस
१९७५ मध्ये सदानंद यांनी हा व्यवसाय पाहण्यास सुरुवात केली. वडिलांचे लवकर निधन झाले. त्यामुळे व्यवसायाची जबाबदारी फार लवकर माझ्यावर आली. व्यवसायात काही माहिती नसताना आत्मविश्वासाच्या जोरावर आणि अनुभवातून तो पुढे नेत टिकवून ठेवण्यात आपल्याला यश मिळाल्याचे लिमये सांगतात. ग्राहकांना घरच्या घरी आईस्क्रीम पुरवण्याची सुविधा त्यांनी टेक होमच्या माध्यमातून सुरू केली. ते सांगतात, त्या काळात डिस्पोझेबल कपमधून आईस्क्रीम घरपोच पार्सल केले जायचे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असे. त्यामुळे आमचा ब्रँड देखील लोकांपर्यंत पोहचत होता. वॅनिला, मँगो, चॉकलेट, गुलाब अशा आईस्क्रीमच्या फ्लेवरबरोबर आम्ही हळूहळू नैसर्गिक फळांचे म्हणजे चिकू, अंजीर, सीताफळ, सुकामेवा, काळ्या मनुका, बदाम याचा वापर करून आईस्क्रीम तयार करण्यास सुरुवात केली. दरवर्षी नवीन फ्लेवर आम्ही अ‍ॅड करत गेलो. नवीन फ्लेवरचे आईस्क्रीम तयार केल्यानंतर आम्ही घरातली मंडळी त्याची टेस्ट घेतो. नियमित येणार्‍या ग्राहकांना त्याची चव देतो. त्यांच्याकडून सूचना घेतो. त्यात काही बदल आवश्यक असतील तर ते करतो. त्यामुळेच आज आमच्याकडे असलेले १७ फ्लेवर ग्राहकांच्या पसंतीला उतरलेले आहेत. १९७४- ७५ च्या दरम्यान आमच्याकडे मँगो आणि गुलाब अशा दोनच मस्तानी होत्या. आता २० प्रकारच्या मस्तानीही आम्ही ग्राहकांना देतो.

ग्राहकांना काहीतरी नवीन द्यायला हवे असा विचार लिमये पितापुत्र कायमच करत असतात. त्यामधूनच २०१८च्या सुमारास त्यांनी गवती चहाचे आईस्क्रीम आणि मस्तानी तयार केले. सदानंद सांगतात, सुरुवातीला चहाचे किंवा कॉफीचे आईस्क्रीम तयार करण्याचा विचार डोक्यात आला होता. पण ते कितपत चालेल, या शंकेमुळे तो विचार मागे पडला. चहाऐवजी गवती चहाचे आईस्क्रीम तयार केले तर असा विचार करून सुरुवातीला गवती चहाची पावडर आणि नंतर अर्क याचा वापर करून ते तयार केले. अर्क वापरून तयार केलेल्या आईस्क्रीमची चव लोकांना आवडली आणि विशेष म्हणजे गवती चहा आरोग्यवर्धक असल्याने हा प्रयोग यशस्वी झाला. गेल्यावर्षी आम्ही गडबड आईस्क्रीमची सुरुवात केली. दक्षिणेकडे हा प्रकार खूपच फेमस आहे. आमच्याकडे वॅनिला आईस्क्रीम, फ्रुट जेली, ऑरेन्ज आईस्क्रीम, टूटी फ्रुटी, द्राक्ष, सफरचंद, आंबा, काजू, बदाम, पिस्ता टाकल्यामुळे हे आईस्क्रीम खाताना प्रत्येक घासाला वेगळी चव लागते. अशा चवीचा ट्रेंड अलीकडच्या काळात वाढला असल्याने या आईस्क्रीमला चांगली डिमांड असल्याचे लिमये सांगतात.
पॉट आईस्क्रीमची चव मेन्टेन करणे ही खूपच कठीण गोष्ट आहे. वडिलांपासूनची चव आजही आम्ही कायम ठेवलेली आहे. त्याच विश्वासामुळे तीन पिढ्यांचे ग्राहक आमच्याकडे आवर्जून येतात. अनेकजण दूरवरून इथे येतात आणि आईस्क्रीमवर मनसोक्त ताव मारतात. त्यांच्या चेहर्‍यावरचं समाधान हीच आमच्या कष्टांची पोचपावती आहे.

Previous Post

जंगल सुरक्षिततेसाठी वाढती सतर्कता

Next Post

द फीस्ट ऑफ द गोट– व्यक्त होण्याला किंमत आहे!

Next Post
द फीस्ट ऑफ द गोट– व्यक्त होण्याला किंमत आहे!

द फीस्ट ऑफ द गोट– व्यक्त होण्याला किंमत आहे!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.