• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

युनियन

ऋषिराज शेलार (अर्ध्या मुर्ध्या गोष्टी)

marmik by marmik
May 9, 2026
in भाष्य, विनोदी लेख, विशेष लेख
0
युनियन

अध्वर्यूचे दोन ज्युनिअर चार कलीग, एक सिनिअर असे सारे जण १ मे असूनही कंपनीच्या गेटवर जमलेत. प्रयोजन झेंडावंदनचं अर्थात नाहीच. तशी कल्पना कंपनी मॅनेजमेंटला कधी सुचली नाही वा एक सुट्टी बरबाद होईल ह्या भीतीने कामगारांनी देखील सुचवली नाही. किंवा त्यांच्यात राष्ट्रभक्ती इंचभर कमी असेल.

तर अर्थात आज सार्‍यांनी जमायचं कारण अर्थात एक मे म्हणजे कामगार दिनच असलं पाहिजे असंही नाहीये. ते कारण अर्थात धनराव कुसळेच्या मेंदूत पिकलेली आयडिया म्हणजे भिशी हेच आहे. बाजूच्या कंपनीतले कामगार दर महिन्याला भिशी लावून घरात चकचकीत वस्तू-बिस्तू घेऊन छानचौकीनं राहायला लागली होती. ते बघून धनराव कामगारांच्या मागं लागले. आपण लावू या भिशी म्हणून. पण ती कल्पना झटकन काही कुणाला रुचली नाही. ज्यांना रुचली त्यांना घरखर्चाचं गणित बसवता आलं नसावं वा इतर कारणं असतील. पण एक दिवस जोडेवारांना खटारा स्कुटर ढकलत येतांना बघून धनराव पुन्हा त्यांच्या कानी लागले. त्यातून हळद्यांच्या घरात आजारपणं उद्भवली. मग काय? एक एक जणाला अधिकच्या पैशाची निकड जाणवायला लागली तशी भिशीचा पर्याय सर्वांसमोर आला. आणि त्यातून एक तारीख निश्चित झाली. तसे सारेजण आज इथं जमले.

‘कंपनी पार गपगार वाटू राहिली ना?’ शिवणीकर त्याच्या फेमस नाकातून गुणगुणण्याच्या स्टाईलनं बोलला.
‘मग मग? सुट्टीच्या दिवशी कुठं काम चालत्या का? तवा गप्पच वाटंल ना?’ हळदेनं त्याला कंपनीच्या पायरीवर बसत उत्तर दिलं.
‘छ्या! येताना काही घेऊन यायला पाहिजे होतं आपण! म्हणजे भेळ-भत्ता! नाहीतर फरसाण. नाहीतर वडापाव. असलं काही. काय?’ कुसळेला कुठल्याही वेळी खाण्याचं पडतं. ते आताही पडलं.
‘कुसळे! पण कुणी वही-पेन आणलंय का? आपल्या सगळ्या व्यवहारांची आपण नोंदच ठेवायला हवी!’ धनराव लागलीच धनाची बात करू लागले.

‘हा! तुमच्या उश्याला स्टेशनरीचं दुकान नं मला विचारा वही-पेनाचं! बरंय राव तुमचं! खर्च म्हंटला का तुम्ही करा!’ कुसळेला मुद्द्याचं मुसळ गवसलं.
‘वही-पेन कश्याला पाहिज्जे पण?’ अर्ध्याचा मामुली सवाल!

‘आपण जे करू ते टिपण करायला नको? मागाहून हे व्यवहार तपासायचे ठरले तर लिहिलेले असले तर बरे ना?’ धनराव त्यांचं मत बोलले.
‘आपण जे करू ते टिपण करायला नको? मागाहून हे व्यवहार तपासायचे ठरले तर लिहिलेले असले तर बरे ना?’ धनराव त्यांचं मत बोलले. ‘हा मग करायचा ना खर्च! कश्याला याला त्याला विचारू राहिले? मारावा कधी कधी उष्ट्या हातानं कावळा! ‘ कुसळे ताण मारायला लागला. पण कुणी का असेना एकट्यानं का करायचा खर्च? सगळ्यांनी वर्गणी काढायला पाहिजे की नाही? शिवणीकर पुन्हा गुणगुणला.
‘मीही हेच सांगतोय…’ धनरावनं मुद्दा लावून धरला.

‘म्हणजे म्हणजे? एक वही/पेनसाठी पण वर्गण्या काढायच्या का?’ हळदेला हळहळ काही एक रुपड्याची!
‘मोबाईलवर सगळा हिशेब ठेवला तर नाही चालायचं का?’ अर्ध्यानं मध्येच विचारलं.
‘मोबाईल राहू दे! सगळ्यांनी पैसे द्या! थोडे, थोडे! आपण वही-पेन आणि इतर अत्यावश्यक गोष्टी विकत आणू.’ शिवणीकर बोलता बोलता स्वतःचा खिसा चाचपू लागतो.

‘पैसे नाहीये राव! माझं पाकीटच घरी राहिलं. एक काम करा, तुम्ही माझ्या हिश्श्याचे टाका. मी तुम्हाला लगेच थोड्या वेळात वळते करून देतो.’ धनरावची कंजुषी जागी झाली.
‘तसं तसं तर मीबी विसरलो हां..!’ हळदेला पण कारण स्फुरलं.
‘नाही. माझे असतात पण फोन पे वगैरे अ‍ॅपवर! रोख मी ठेवत नाही आणि नेमका मोबाईल चार्जिंगला लावून आलोय. आणायचा विसरलो बघा,’ कुसळे चटकन कारण फेकतो.

‘धनराव, काय आहे हे? सगळेच एक सुरात नाहीच म्हणायला लागलेत. तुम्ही काय सुरुवात केलीत ही? आणि आता नाही म्हणता मग थोड्या वेळात कसे द्याल पैसे?’ शिवणीकरनं आरंभशुुर धनरावला सवाल ठोकला.
‘त्याला काय अर्ध्या-एक तासात इथल्या इथं देऊन टाकंल. थोड्या वेळाचीच तर बात आहे.’ धनराव अगदी सहज बोलला.
‘आता नाही? आणि अर्ध्या तासाने देणार? कुणी घरून घेऊन येतंय का?’ शिवणीकरनं आश्चर्यानं विचारलं.
‘हेच भिशी जिंकलो का लगेच जागच्या जागी वळते करतो बोललो ना?’ धनराव त्याच्याच गुर्मीत!
‘अरे हो, पण भिशीला सुद्धा पैशेच लागतील. ते कसे देताय? आणि तुम्हीच जिंकाल ही गॅरंटी दिली कुणी?’ शिवणीकरनं पिच्छाच पुरवला.
‘लक! आपलं लक भारिय. इथं तुम्ही फक्त चिठ्ठ्या टाका. नाही पहिल्या झटक्यात माझीच चिठ्ठी निघाली मग काय? बघा तुम्ही!’ धनरावचा आत्मविश्वास गगनाला भिडलेला.

‘माझ्या हातावर तर तीळ आहे, तीळ! झटपट लक्ष्मी मलाच मिळते. अनुभव आहे आपला,’ इतका वेळ मौनात असलेल्या जोडेवारला कंठ फुटला.
‘म्हणजे तुम्ही कुणीच पैसे लावणार नाही, पण भिशीच्या चिठ्ठ्या टाकायच्या. असंच ना?’ शिवणीकरनं थेट विचारलं.
‘हां आता जेवढ्या पटकन टाकल्या, तेवढ्या पटकन मी घरी जायला मोकळा! सुट्टीच्या दिवशी फार कामं असतात मला!’ धनराव घाईला आला.

‘बिनपैश्याच्या कश्या लावायच्या भिश्या?’ अर्ध्यानं प्रश्न विचारला.
‘सगळे टाईमपाससाठी जमलेत. बाकी काही नाही. कुणी सिरीयस दिसतच नाही इथं! चला मग घरी!’ शिवणीकर वैतागला.
‘काय एक मेच्या निमित्तानं युनियन बिनीयन काढत्ााय का?’ शेजारच्या कंपनीतला कामगार आत डोकावत विचारू लागला.
‘हे दुसरं काम होतं. पण ते काही होत नाही. असं दिसतंय.’ उत्तर शिवणीकरनंच दिलं.
‘ह्या युनियन काढल्या तर पैशे-बिशे मिळत्या का?’ धनरावच विचारायला लागला.
‘खूप फायदे असतात युनियनचे. आमच्या ऑफिसात या एकदा.’ बोलता बोलता शेजारचा निघून जातो.
‘ए मग युनियन काढू आपण!’ धनरावचं ठरलं बी!
‘युनियन म्हणजे वेळच्या वेळी वर्गण्या द्यावा लागंल ना?’ हळदेला पैसे द्यायच्या केवळ कल्पनेनं कापरं भरलं.
‘मला सेक्रेटरी करा.’ जोडेवार मध्येच बोलला.
‘हा पण आपली युनियन कुठल्या पक्षाला जोडायची?’ अर्ध्या पुढं नवाच पेच उभा राहिला.
‘आधी नाव ठरवू! गाव प्रथम चालेल का?’ कुसळेची सगळ्यात पुढं मुसंडी.
‘मी म्हणतो, एकदा युनियन झाली ना तर शिवजयंती, गणपती अशे कारेक्रम धडाक्यात घेऊ. मुर्त्या बसवायला मॅनेजमेंटकडून एक टेबल आणि चांगला कोपर्‍याचा प्रस्ताव देऊ. चालंल ना? मी बघितलंय काही ़कंपन्यांत युनियन भारी कार्यक्रम भरवतात ते!’ अर्ध्याच्या डोक्यात वेगळ्याच कल्पना घोळायला लागल्या.
‘तुम्ही युनियन म्हणजे काय समजलात पण?’ शिवणीकर डोक्याला हात लावून विचारू लागला.
‘सार्वजनिक उत्सवांत सहभाग घेणारी, राजकीय पक्षांची उपसंघटना.’ जोडेवार थोडक्यात व्याख्या विशद करू लागला.
‘भिश्याबिश्या पण लावत असतील ना?’ हळदेला वेगळाच प्रश्न पडला.
‘मी तर काही युनियनच्या ऑफिसमध्ये कॅरमसारखे खेळ पण बघितलेत.’ धनराव वेगळीच माहिती देतो.
‘झालं का तुमचं?’ शिवणीकरनं अगदी राग आवरत विचारलं.
‘का?’ अर्ध्याचा काही न कळल्याने प्रश्न.
‘आपण कामगार दिनाला भिशीसाठी एकत्र जमलो. पण पैसे न देताच आपल्याला भिशी लावायची होती. आता कामगार कायदे माहीत नसताना आपल्याला युनियन बनवायची आहे. निदान चालू सरकारचं कामगार धोरण काय आहे? माहिती आहे का?’ शिवणीकरनं सगळ्यांची शाळा घ्यायचं ठरवलं.

‘मी वाचलं आहे. खूप चांगलं आहे,’ धनराव सगळ्यात आधी बेडकासारखी उडी घेतो.
‘हेच तर चुकतं ना आपल्या कामगारांचं! सगळी धोरणं आपल्याला चांगली वाटतात. पण आहेत का? हे कोणी तपासत नाही. कामाचे तास, मिळणारं वेतन, सुट्ट्या सरकारी धोरणांप्रमाणे आहे का? सरकारी धोरणं, कायदे कामगारांना पूरक आहेत का? कामाचे तास, त्यानुरूप मिळणारं वेतन, कामाच्या ठिकाणी झालेल्या अपघाताचा मोबदला देणारी यंत्रणा. असं सगळं तपशीलवार सांगणारी युनियन आसपास आहे का? असली तरी त्यांची वेळप्रसंगी कामगारांच्या पाठीशी उभे राहण्याची आंदोलन करण्याची तयारी आहे का? की नेत्याच्या तुंबड्या भरल्या की आंदोलनाची तलवार म्यान करून शासन, प्रशासनासमोर गुडघे टेकणारी युनियन आहे का? हे कोणी तपासतं का? काही युनियन गणपती मंडळासारखी दरसाल केवळ सभासद वर्गणी गोळा करण्यासाठीच जन्मली आहेत. त्यांना कामगार हित कसं जोपासायचं हे कुणी सांगेल की तेच शोधतील? इथं संघटित क्षेत्रातील उच्चशिक्षितच कामगार हिताबद्दल अनभिज्ञ आहेत. तेव्हा असंघटित क्षेत्राबद्दल बोलायला नको. आणि आपल्याला भिशी महत्त्वाची की युनियन? ह्यावर आपलं एकमत होत नाही, तिथं आपण बोलणार काय?’ शिवणीकर बोलण्यावर सर्व सहकारी गप्प झाले.

Previous Post

देश ‘लोकशाही’मुक्ततेच्या दिशेने…

Next Post

फटकारे बाळासाहेबांचे

Next Post
फटकारे बाळासाहेबांचे

फटकारे बाळासाहेबांचे

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.