संतोषराव, आजकाल कोणत्याही गुन्ह्याची बातमी उजेडात आली की लोक आधी बळीची आणि गुन्हेगाराची जात बघतात आणि मग कुणाचं समर्थन करायचं हे ठरवतात. कुठे चाललो आहोत आपण?-भाग्यश्री वर्हाडकर, बुलढाणा
रामराज्याकडे… त्यासाठी रावण कुंभकर्ण वगैरे असायलाच हवेत ना… त्याशिवाय रामराज्य येईल कसं? पण आम्हाला माहिती आहे, आम्ही सांगून तुम्हाला पटणार नाही, रावण आणि कुंभकर्ण यांचे फायदे सांगायला तुम्हाला चॅनेलवालेच लागणार!
जे रोज १८-१८ तास देशासाठी काम करतात, असं त्यांचे भक्त सतत गुणगान गाऊन सांगत असतात, ते पंतप्रधान विधानसभा निवडणुकांच्या काळात एक महिनाभर पंतप्रधान कार्यालयात गेलेच नाहीत. हे देशाचे प्रधानमंत्री आहेत की त्यांच्या पक्षाचे प्रचारमंत्री-विलास बोंडे, गोंदिया
त्या एक महिन्याच्या काळात बंदरं, एअरपोर्टस, जंगलं विकली गेली असती तर? तरी तुम्ही बोलला असतात त्यांना… त्यापेक्षा बरं झालं म्हणा की ते एक महिना ऑफिसमध्ये गेले नाहीत हेच… तुमच्या प्रश्नावरून तुम्ही त्यांचे विरोधक दिसताय म्हणून तुम्हाला अभिप्रेत असलेलं उत्तर दिलं… नाहीतर आमची काय बिशाद…
माणूस मेला की आसपासचे लोक त्याचे गुण सांगायला लागतात. त्याचं कौतुक करतात. तो किती चांगला माणूस होता, म्हणून हळहळतात. माणूस जिवंत असताना का नाही त्याच्याबद्दल चांगलं बोलत लोक?-रहीम शेख, पंढरपूर
मग मेल्यावर काय शिव्या घालायच्या? जिवंत असताना एखाद्याचं कौतुक केलं आणि त्याला ते कौतुक सहन न होऊन अटॅक आला तर?? त्यापेक्षा चालू आहे ते चालू द्या… नका त्यात लुडबुड करू… कितीही काही केलं तरी लोक आपल्या जिवंतपणी आपलं कौतुक नाही करणार…
तुम्हाला कधी कोणत्या निवडणुकीत कोणा एक्झिट पोलवाल्याचा फोन आला आहे का हो? मला माझ्या आयुष्याच्या ७० वर्षांत एकदाही आलेला नाही असा फोन. माझ्या ओळखीतही कधी कुणाला सर्व्हेवाला भेटलेला नाही. मग हे एक्झिट पोल इतक्या छातीठोकपणे कसे काय सांगतात? कुणाकडून माहिती घेऊन ठोकतात हे अंदाज?-रत्नाकर पोखरे, बदलापूर
मिस्टर कोकरे…ओह सॉरी… मिस्टर पोखरे, तुम्हाला खरंच काही अंदाज नाही? की तुम्हाला अंदाज आहे याचा अंदाज कोणाला लागू द्यायचा नाही? तुम्ही निवडणुकीला अपक्ष उभे रहा, आणि या एक्झिट पोलवाल्यांना पैसे देऊन तुम्हाला जिंकवायला सांगा आणि बघा तुम्हालाही जिंकवतील ते. आता या उत्तरातील तुमच्या जागी, ज्यांना एक्झिट पोलवाले जिंकवतात त्यांचं नाव टाका आणि चमत्कार बघा… आयतं उत्तर मिळेल (पण आम्हाला असं वाटतं, हा असला अंदाज घेण्यापेक्षा आधी आपलं नाव मतदारयादीत आहे का याचा अंदाज घ्या…)
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास म्हणजे फक्त ठरावीक लढाया, ठरावीक प्रसंग, ठरावीक पद्धतीने दाखवायचे, महाराजांना आदर्श राजा बनवणार्या राजकारणाच्या, राज्यव्यवस्थेच्या गुणांवर प्रकाशही टाकायचा नाही, ही काय पद्धत बनून बसली आहे? महाराज महाराष्ट्राचं दैवत आहेत, पण ते हाडामांसाचा माणूस होते, हे का लपवायचं आहे या सिनेमावाल्यांना?-हेमंत महाजन, परळी
सिनेमावाले आहेत ते, ज्याची पोळी खातात, त्याचीच टाळी वाजवतात. आपण हाडामांसाचे असूनही आपल्याकडून काहीही घडत नाही म्हटल्यावर, आपल्या स्वतःलाच देवाचा अंश समजायच्या या युगात, एक हाडामांसाचा माणूस त्या युगात एवढा पराक्रम करतो, हे देवाचा अंश समजणार्या माणसांना कसं सहन होईल? त्यापेक्षा त्यालाही देवाचा अंश करून टाकणं सोपं नाही का?
भारत सरकारने एकाच वेळी सगळ्या देशाचे फोन अचानक वाजवून कसला तरी अलार्म घुसवला आहे मोबाइलमध्ये. आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये सरकार लोकांना सतर्क करणार म्हणे अलार्म वाजवून. पण मुळात एखाद्या ठिकाणी आणीबाणीची स्थिती उद्भवली आहे, आता तरी काहीतरी करा, हे सरकारला सांगण्यासाठी, त्यांना जागं करण्यासाठी कोणता अलार्म वाजवायचा?-महेश जोशी, जळगाव
कोणता अलार्म वाजवायचा हे आम्ही सांगितलं तर तो वाजवायला तुम्ही जाणार का? आणि तिथे जाऊन आमचं नाव सांगितलत तर? तर काय होऊ शकतं त्याचा अलार्म आमच्या कानात वाजतोय… आम्हाला पाकिस्तानात नाही जायचं बाबा…
जग दु:खाने भरलेलं आहे, मेल्यावर स्वर्गात मात्र सगळी मौजमजाच आहे, असं छातीठोकपणे सांगणारे धार्मिक गुरू त्या सुखांचा तात्काळ आस्वाद घेण्यासाठी स्वत: आत्महत्या का करत नाहीत?-बेला जाधव, बिबवेवाडी, पुणे
जगाला माहित नसली, तरी त्यांना त्यांची कर्म माहित असतात, त्यामुळे मेल्यावर आपल्याला स्वर्ग नक्कीच मिळणार नाही याची त्यांना गॅरंटी असते. मग इथे लोकांना वेडा बनवून, ज्या देवाला ते मानतात त्याला खुश करून, जे स्वर्गसुख ते वर्तमानात भोगतायत, मौजमजा करतायत, ते सोडून पोथ्यापुराणातला स्वर्ग बघायला ते कशाला मरायला आत्महत्या करतील?
विचारून टाका प्रश्न
तुम्हालाही अभिनेते संतोष पवार यांना प्रश्न विचारायचाय…? मग वाट कसली बघताय…? उचला पेन आणि टाका विचारून प्रश्न… हा प्रश्न थेट ‘मार्मिक’च्या [email protected] या ईमेल आयडीवर पाठवून द्या… किंवा आमच्या पत्त्यावर पाठवा. मार्मिक प्रश्नाला संतोष पवार उत्तर देतील…

