
आमच्या तिघांचं पण मोकळं कालवण संपलेलं होतं आणि जे थोडंफार उरलंय, त्यावर आम्ही चपाती, भाकरी लावून लावून खात होतो. पाटलाच्या चंद्याने हळूच एक बारका डबा काढला आणि त्यात डबा भरून भात निघाला. भात लपवून ठेवला म्हणून पाटलाच्या चंद्याने आम्हा तिघांच्या शिव्या खाल्ल्या आणि आम्ही तो डबाभर भात एका परातीत ओतून त्यावर गोडेतेल आणि तांबडी चटणी टाकून ते कालवून सगळ्यांनी भाताचे दोन दोन घास खाल्ले. मी चटणीचा उल्लेख मुद्दाम तांबडी चटणी असा केला आहे, कारण काही वाचकांना ‘चटणी’ म्हणजे कोणती चटणी हा प्रश्न पडला असता. आमच्याकडे चटणी म्हणजे वाळलेल्या लाल मिरच्यांची भुकटी एवढाच अर्थ होतो. चटण्या म्हणजे उदाहरणार्थ असे त्याचे अनंत वगैरे प्रकार असतात आणि ते म्हणजे एक ‘व्यंजन’ आहे हे माहित व्हायला आम्हाला शहरात शिकायला यावे लागले. ते पण काही ब्राह्मण मित्र मिळाल्यावर माहित झाले. भातात चटणी जास्त टाकून आम्ही मज्जा आणल्याने आमची तोंडे पोळली होती, पण जेवल्याचे समाधान भेटले होते. एकाच मिनिटात परातीतला संपलेला भात, पण त्यामुळे पाटलाच्या चंद्याला आपण कुणीतरी थोर आहोत याची जाणीव होऊ लागली होती, असा आम्हाला भास होत होता. तेवढ्यात चंद्या तळहातावरील तंबाखूवर चपटी हाणत हाणत म्हणालाच, ‘च्यायला, आमच्या घरची सुधारलीत लेकानो, रोज भात करायला लागलीत.’
तर रोज भात खाणे म्हणजे सुधारल्याचे लक्षण समजले जाते असा समज पाटलाच्या चंद्याचा आणि एकूणच समाजाचा झालेला असावा आणि आमच्या मराठवाड्यातील ग्रामीण भागात तो अजूनही आहे. चंद्याच्या त्या वाक्यावर लगेच मी म्हणालो, ‘तुझ्या बापाने राजकारण करून रेशन दुकान चालवायला घेतलं आहे म्हणून तुझ्या घरी रोज भात बनतोय, नाहीतर तांदूळ इकत आणून तुझ्या बापाने तुला भात खाऊ घातला असता का? येवढंच सांग चंद्या.’
यावर चंद्या चिडला. कारण दोस्त असला तरी गावात त्याचा पक्ष वेगळा म्हणजे सत्ताधारी होता आणि आमचा पक्ष म्हणजे त्या पक्षाला तेव्हा कायम विरोधी पक्ष म्हणत असत तो होता. त्यामळे आमच्या पक्षातील कुणाला रेशन दुकान चालवायला भेटणे हे म्हणजे ‘एका रिक्षावाल्याचा मुलगा झाला कलेक्टर’ अशी बातमी टीव्हीवर दिवसभर चालण्यासारखे नवल झाले असते.
आता माझं आणि चंद्याचं गावातल्या राजकारणावर घुसळांग लागणार आणि आपली ही पण संध्याकाळ काय वाया जात नसती असं समजून दादू कुंभार तोंडात तंबाखू टाकून करमणूक करवून घ्यायला बसला. पण मी पुढे काही बोललो नाही. पण विकास आपल्या बापावर धडधडीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप करतोय हे सहन होत नसल्याने चंद्या चांगलाच पेटला होता.
मग मी चंद्याला शांतीत विचारले, ‘चंद्या एवढंच सांग, तुझ्या घरी रेशन दुकान चालवायला यायच्या अगोदर जेवणात भात कधी बनायचा?’
यावर मग बरंच घमासान झालं, पाटलाच्या चंद्या, ‘उद्याच्या उद्या मी खोली बदलत असतो’ असे पण म्हणाला. पण ते आम्हाला नेहमीचंच होतं. कारण सगळेच लोक मुद्द्यावर चर्चा करणारे नसतात हे आता सोशल मिडियामुळे लोकांना माहित झाले असले तरी मला त्याच वेळीच माहित झाले होते. लोकांना मुद्द्यावर बोलण्यापेक्षा त्यांच्या भावनांना हात घातला पाहिजे, मग तुम्ही त्यांना कळू न देता गुलाम बनवू शकता. त्याचे आपल्यासमोर अफाट मोठे उदाहरण असल्याने मी त्याच्या खोलात जात नाही. त्यामुळे मी चंद्यालाच काय, कुणालाच शहाणपणा शिकवण्याच्या भानगडीत पडत नाही.
मला आठवते आमच्या घरी महाळ असावेत. महाळ म्हणजे पितृपंधरवड्यात आपल्या पूर्वजांना जेवू घालण्याचा दिवस. तर महाळ उन्हाळ्यात असतात किंवा असावेत. घरात पुरणाचा कुटाना चालू होता, आई पहाटेपासून हरभरा डाळ उकडून घेऊन पाटा वरवंटा, घरातल्या चुलीवर मोठ्या पातेल्यात येळवण्याची आमटी, अंगणातल्या चुलीवर मोठ्या भगुण्यात भात शिजू घातलेला, हे सगळं चालू असताना मधेच भजी, कुरवड्या तळण्याचा कार्यक्रम, डोक्यापासून घामाच्या सुटलेल्या धारांकडे दुर्लक्ष करून, पळापळ करत एकटीच सगळं करत होती. आमचे पूर्वज म्हंजे आईचे पूर्वज कसे काय असतील, ते मला कळत नव्हतं. पण आमच्या बापाच्या पूर्वजांसाठी तिची पळापळ, हे थोर चित्र होते. वडील कुठेतरी बोंबलत फिरत असल्याने माझ्या पूर्वजांची चिंता मला आणि आईलाच होती याची जाणीव मला वारंवार होत होती. मग आईने मला सांगितले, ‘जा अमुक, तमुक, धमुक आणि अमुकतमुक’ ह्या चार जणांना आज जेवायला सांगून ये.
मग दुपारी उनाच्या कारात अमुक तमुक धमुक आणि अमुकतमुक ही पितर मंडळी आणि आमचे वडील देखील आले. तसल्या उनाच्या कारात आमच्या, वरती लोखंडी पत्रे असलेल्या घरात घाम पुसीत सगळी मंडळी जेवायला बसली. माझे काम वाढायचे होते.
चारपैकी तीन पितरे पटका आणि धोतर घालणारे आणि एक पितर टोपी घालणारा होता. मांडीपर्यंत धोतर घेऊन आणि पटका मांडीवर ठेवून ते पन्नाशीत सत्तर वर्षाचे दिसणारे म्हातारे आता बाह्या मागे सारून पोळ्या, भात, आमटी, कुरवड्या भजे रेटून खाणार होते. पण माझ्या एक गोष्ट लक्षात आली की आईने त्यांची ताटे बनवताना, एका मोठ्या वाटीत आमटी भरून त्यात भाताचे गोळे टाकले होते. आणि ते खूपच सुंदर म्हणण्यापेक्षा टेम्पटिंग दिसत होतं. मस्त तर्री अालेल्या आमटीत पोहणारा भात. हे प्रकरण मी पहिल्यांदाच बघत होतो. ते जेवण करताना घाम्याघूम झालेली ती ग्रामीण मंडळी अतिशय समाधानी दिसत होती.
आणि मग उद्याचा तोच नेहमीचा दिवस त्यांच्यासमोर येणार होता. सकाळी उठून रानात जायच्या अगोदर गरमागरम भाकर आणि काय असेल त्याच्या आमटीत काला कुस्करून खावून रानात जायचा. गावातील अपवादात्मक कुटुंबे वगळता, सगळे शेतकरी, शेतमजूर, आणि गावगाड्यातील मंडळी, ह्या सगळ्या लोकांच्या ताटात दोन्ही वेळेला भाकरी आणि एकच कालवण असते. दुसरी भाजी सुद्धा ह्यांना शक्य नसते. परवडत असली तरी शक्य का नसते, तर ती बनवायचे संस्कार आणि त्यासाठी लागणारा रिकामा वेळ त्याना कधीच काढता आलेला नाही. सकाळी पोट भरून रानात जाणे आणि रात्री आल्यावर पोट भरण्यासाठी कालवण भाकरी खाणे हीच आमची म्हणजे ९५ टक्क्यांची खाद्यसंकृती होती. कालवणाला काय तर, तूर डाळ. ही प्रत्येकाच्या शेतात पिकत असल्याने, चांगल्या तुरी बाजारात घालून राहिलेल्या कडाकण्याची केलेली एक दोन पोती फुटकी डाळ घरात असायची, उन्हाळ्यात केलेलं सांडगे, भातुड्या, कुरवड्या ह्यांचा वापर कालवणासाठी केला जायचा, नंतर नव्वदीच्या दशकात बटाटे स्वस्त झाले, त्यामुळे बर्याच घरात बटाट्याची भाजी दिसू लागली. भाजी हा शब्द सुद्धा अलीकडे आलेला आहे. शुद्ध बोलण्याच्या नादात कालवणाला किंवा कोरड्यासाला भाजी करून टाकले. ह्याची तीव्र जाणीव केंव्हा व्हायची तर, लग्नाच्या पंगतीत घरी कालवण म्हणणारे लोक, ‘ओ जरा भाजी वाढा’ म्हणताना दिसायचे. तो सुरुवातीला हळू हळू पण नंतर एकदम झालेला बदल आता, मटणाच्या आमटीला सुद्धा भाजी म्हणण्यापर्यंत आला आहे.
तर, भात हे प्रकरण आमच्यासाठी म्हणजे समस्त मराठवाडा आणि अगदी पश्चिम महाराष्ट्रासाठी सुद्धा अप्रूप होतं आणि डाळीची आमटी सोडून वरण असतं हे प्रकरण सुद्धा नव्वदीच्या दशकाच्या शेपटाला खानावळीमुळे आणि टीव्हीमुळे लोकांना माहित झालं होतं. कोणतीही गोष्ट विकत घेऊन खाणे ही गोष्ट शेतकरी कुटुंबात आजून स्वीकार झालेली नव्हती. स्वीकार झालेली नव्हती म्हणजे ते शक्यच नव्हते. कारण पैसा ही खूप दुर्मिळ गोष्ट होती. सामान्य शेतकरी, बलुतेदार यांच्या हातात वर्षातून दोनदा येऊन पटकन निघून जायची गोष्ट म्हणजे पैसा. त्यामुळे घरात साठवून ठेवलेल्या गोष्टीवरच भागवावं लागायचं. आणि पैसा असला तरी सामान्य शेतकर्यांच्या बायकांना स्वयंपाकघरात वेगवेगळी म्हणण्यापेक्षा दोन तीन व्यंजने करणे सुद्धा शक्य नसायचे. कारण घरचं करून रानात जाऊन, रानातील सगळी कामे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून करून अजून घरी येऊन कोणतीच बाई वेगवेगळी व्यंजने बनवू शकणार नाही.
तर वरण भात आमच्या मराठवड्यात बनत नव्हता, अशातली गोष्ट नाही, तो बनत होता आणि त्यावर तूप पण ओतले जात होते, पण ते दोनच वर्गामध्ये. ब्राह्मण आणि सरंजामदार मराठा. सरंजामदार, वतनदार मराठा म्हणजे ज्यांच्या घरातील बायका रानात फक्त हुरडा खायला जात असत. किंवा सहलीला. त्यांनी रानात काम करणे किंवा बाहेर पडणे हे कमीपणाचे समजले जाई. आणि त्याची गरज पण नसे. कारण त्यांच्या रानात काम करायला गडी असत. त्यामुळे ह्यांच्या घरातील बायकांना स्वयंपाकघरात वेळ देता येत असे. आपल्या रानात न पिकणारी गोष्ट परवडणे आणि त्यापासून वेगवेगळे व्यंजनं बनवायला वेळ असणे, हे फक्त ठराविक वर्गाला शक्य होतं.
त्यामुळे काही महिन्यापूर्वी कुणी हिंदी चित्रपट निर्माता ‘वरण भात’ हा हा मराठी प्रकार फारच नीरस प्रकार आहे, असं म्हणाला आणि त्यावर वरणभाताचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान झाल्याच्या प्रतिक्रिया आल्यावर मला आश्चर्याचा धक्का बसला. म्हणजे जो पदार्थ अजूनही जवळपास सत्तर टक्के मराठी घरांमध्ये रोजच्या जेवणामध्ये नसतो, तो पदार्थ महाराष्ट्राचा अस्मितादर्शक अन्नपदार्थ कसा काय होऊ शकतो? म्हणजे कुणाच्या अस्मितांसाठी कोण लढतंय हे जर ह्या लढणारांना समजले तर ते लढायचे थांबतील की तसेच स्वतःच्या मनाची समजूत काढून दुसर्यांच्या अस्मितांसाठी लढत राहतील. कायम?
कारण, वरण भाताला ग्लोरिफाय करणार्या ९५ टक्के मराठी तरुण-तरुणींना सांगितलं की फक्त तुमच्या आज्जी आजोबांना विचारा की त्यांच्या रोजच्या जेवणात वरण भात होता का? तर त्याचे उत्तर घरातच मिळेल. आणि त्याचे उत्तर हो असे आले तर तुम्ही खूपच संपन्न किंवा वरच्या स्तरावरच्या कुटुंबातून येता हे समजून घ्यावे.
