गर्दी म्हंटलं की अर्ध्याला कापरं सुटतं. मग ती नळावरची असो की रेशन दुकानापुढली असो की मुंबईच्या लोकलची असो! ती टाळण्याचाच अर्ध्याचा प्रयत्न असतो. त्यामुळं तो गावच्या जत्रेत बी दुपारचाच फिरतो. अंधार पडल्यावर गर्दी वाढते ना? ह्याच गर्दीच्या धाकानं मुंबईला जायचा चान्स अर्ध्यानं दोनदा हुकवलेला. कुठं खाटकाच्या काट्याला चार-पाच कोंबड्या उलट्या लटकवाव्या, तशी पब्लिक धक्के खात दाराला लोंबकळत असते. ना त्यातून बाहेर पडता यावं की बाहेर लटकून मध्येच पिकलेल्या पपईगत रेल्वे रुळावरच गळून वस्त्रगाळ व्हावं, ही भीती!
त्याच्यामुळंच अर्ध्या अगदी सुरुवातीच्या आधार काढायच्या लायनीत लागला नाही. आधार घेऊ, उभं राहून का लाईन लावायची? आता सात आठ वर्षांनी तर सहज आधार काढून मिळतंय ना? मग? तीच गत झिरो बजेटच्या खात्याची! लोकं ती खाती खोलायला अशी झुंबड करायला लागले का जसं तिथं बोर्ड लावेल होता, ‘सिर्फ पहले पाच भाग्यवान ग्राहको को मिळेगा इनाम!’ मागाहून झालं काय? ज्या पंधराच्या आशेनं लोकांनी लायनी लावल्या त्या पंधराच्या हव्यासापोटी लोकं मिनिमम बॅलन्सचं ‘धा’वतं घोडं घरात घेऊन आले… आणि सुखाची दुःखात घातली.
तशीच गत नोटबंदीच्या येळची! पोरायनी लायनी लावू लावू पैशे बदलून दिले. त्यात हजाराला ते तीनेकशेपर्यंत सुद्धा कमवत होते. पण त्या गर्दीला भिऊन पैशे कमवायचा गोल्डन चान्स अर्ध्यानं गमावला. नकोच ती कटकट!
मागं एक मॅट्रिमोनीवाल्यांनी वर-वधू मेळावा भरवलेला. जे म्हणून नवे वर-वधू असतील, त्यांना तो मेळावा फुकट अटेंड करता येणार होता. तिथं लग्न जुळलं तर तिथल्या तिथं
नॉमिनल फी भरून निघता येणार होतं. आणि बरंच काही! अर्ध्याला कळलं इतकंच का इच्छुकांना वधू मिळू शकते. अर्ध्या घाईघाईने निघाला, त्या मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचला. बघतो तर काय? तिथं यात्रा भरलेली. अर्ध्यानं तिथूनच यू-टर्न घेतला न् घर गाठलं.
सांगायचं कारण म्हणजे रात्रीच्याला
व्हॉटसअॅपवर मेसेज फिरायला लागले, युद्ध भडकलंय. उद्या पंप बंद पडतील. आता टेन्शनची वेळ अर्ध्यावर! ‘ऊठ अध्वर्यू! टाकी फुल कर!’ त्याचंच मन त्याला सांगू लागलं. तरी अर्ध्या गपगुमान रात्रभर अंथरुणात पडला, पण सकाळ व्हायची वाट पहात!
सकाळ झाली, तसं त्याचं अर्धं लक्ष मेसेजवर. दात घसता घसता अर्ध्यानं नेट चालू केलं, तशे ग्रुपात कुठकुठले व्हिडीओ पडायला लागले. कुठं कोणी उभ्या असतील नसतील त्या गाड्यांच्या टाक्या फुल करतंय, कुणी प्लास्टिकच्या कॅनी, कुणी ड्रम, कुणी घरातली भांडीकुंडी भरून ठेवतंय. असले नानातर्हाचे व्हिडिओ एकामागून एक पडायला लागले. तसा अर्ध्या आणखी काळजीत पडला! त्यानं अंघुळीच्या आधीच पाच-पाच लिटरच्या गोडेतेलाच्या दोन कॅनी शोधून ठेवल्या. ध्यानात र्हावं म्हणून बाहेरून खिडकीला सुतळीनं बांधून ठेवल्या. अन् कामं आवरायला बिलगला.
एकदोन कामं झाल्यावर अर्ध्यानं जेवायला घेतलं. कढई उतरवून घेतली, टोपलं घेतलं अन् भात शिजवलेला कुकर जवळ घेतला. काळ्या डुबुकवड्याच्या भाजीत उलथनीभर कुकरमधला भात घेतला. गरगुट करून घास घश्याखाली घालणार तर व्हिडिओचे दणादण नोटिफिकेशन पडायला लागले. कुठं न कळत्या वयाचं पोर पेट्रोलनं का डिझेलनं भरलेला कुकर घेऊन घराकडं जाताना बघून अर्ध्या गलबलून गेला. डुबुकवड्याच्या भाजीऐवजी त्याला कढई काळ्या ऑइलनं भरलेली दिसू लागली. समोर ठेवलेला कुकर तीन का पाच किलोचं अंगाचं माप दाखवू लागला. अर्ध्या घाबरून अर्ध्या जेवणातून हात धुवून पंपाकडं निघाला.
‘ओ, लायनीत या ना? माझ्या पुढं का बरं गाडी आडवी लावली? मला बी पेट्रोलच भरायचंय! मी काय मुक्कामाला आलोय का इथं?’ एक दुसर्यावर कावला.
‘तू मला लाईन शिकवतो का? अख्ख्या तालुक्यात मला लाईन शिकवणारा भेटला नाही. तू कोण तीनपाट? चाल फूट!!’ दुसरा डायरेक त्याच्यावर गुरकावला. त्याच्यानं पहिला संतापला.
‘तालुका? तुझ्या घरी येत असेल तालुका भांडे घासायला! तू तिकडंच शिलग! माझ्यापुढून हाल एकदा!’ बोलता बोलता ते दोघं हातघाईवर आले. शिवीगाळ, धराधरी, असा राड्याचा आलेख चढता झाला. एकमेकाचा उद्धार करत कॉलर धरत ‘तुला बघून घेतो!’ म्हणत दोघं दोन दिशांना निघून गेली.
अर्थात त्यामुळं टेन्शन अर्ध्याला आलेलं. पुन्हा ही माघारी गेलेली दोघं मॉब घेऊन येऊ नये, म्हणजे मिळवली. त्याच्यात पंपावर गर्दीची भरच पडू राहिली.
‘रात्री एकच टँकर आला होता म्हणे!’ एकजण अर्ध्याच्या कानाजवळ पुटपुटला.
‘काहीही! अफवा आहेत ह्या! पुरवठा सुरळीत असल्याचं स्वतः जिल्हाधिकारी सांगू राहिले,’ अर्ध्यानं तातडीने मेसेजमध्ये वाचलेलं झटपट समोरच्यावर फेकलं. हे असलं ज्ञान गेल्या दहाबारा वर्षांत इतकं स्वस्त झालंय की कुणीही त्या आधारे वादविवादात अट्टल पंडिताचा पराभव करेल. फक्त हाती मोबाईल पाहिजे. काय?
‘मग तुम्ही का रांगेत उभे?’ तो शेजारचा अर्ध्याचा काही पिच्छा सोडेना.
‘हे गोडेतेल घ्यायला चाललो होतो. दिवट्या आहेत ना? मग म्हंटलं सुट्टं दहा लिटर तेल घ्यावं! पण इथं गर्दी दिसली, म्हणून बघायला आलो,’ अर्ध्यानं गोडेतेलाचे दोन डबके दाखवले. त्याच्यानं शेजारचा काही मिनिटं शांत झाला खरा. पण त्याला काही सुचायच्या आत अर्ध्या पंपावर काम करणार्या आेळखीच्या पोराकडं उगाच हात हलवत सरकला.
‘मग आज लई गर्दी झाली ना?’ अर्ध्यानं विषय काढला.
‘पब्लिक येडी आहे. एक मेसेज पडला का बोंबाबोंब करतात,’ कामाच्या ताणामुळं त्यानं एका वाक्यात उरकलं.
‘त्या गावाबाहेरच्या दोन पंपावर बोर्ड लागलेत, पेट्रोल नाही म्हणून. त्याच्यामुळं इकडं यावं लागलं मला,’ पेट्रोलनं टाकी फुल करून घेणारा मोटरसायकलवाला मध्येच बोलला.
‘संपणार नाही तर होणार काय? एवढे लोकं सकाळपासून तुटून पडलेत पेट्रोल-डिझेल घ्यायला. मग होईल काय?’ पंपावरल्या पोरानं परिस्थिती सांगितली.
‘आजच्या दिवस! तिकडून जहाज निघालंय, बातम्यांत दाखवताय बघा! उद्या तेलच तेल राहील,’ मोटरसायकलवाल्याच्या मागच्यानं ज्ञान पाजळलं.
‘एक जहाजात अख्ख्या देशाचं काम होईल?’ मोटारसायकलवाल्याला आता प्रश्न पडला.
‘क्ष्ङ है तो मुमकीन है।’ अर्ध्यानं नकळत घोषणा दिली अन् काय आश्चर्य? अख्ख्या पंपावर त्या घोषणा घुमायला लागल्या.
‘अय अर्ध्या काय करतोय इथं?’ नम्या कुठून उगवला हेच अर्ध्याला कळेना!
‘हे पेट्रोल घ्यायला आलो होतो…’ अर्ध्या चाचरला!
‘मूर्खा, तुझी म्हातारी शोधतेय तुला! बस गाडीवर!’ नम्याच्या आदेशावर अर्ध्या झटकन मोटारसायकलवर बसला. पण हा नम्या आला कुठून याचा त्याला माग लागेना!
‘काय गर्दी झालीय ना इथं?’ अर्ध्यानं विषय घेतलाच!
‘काय आहे, सरकारला नियोजन जमत नाही, आणि विरोधकांना विरोध करवत नाही. मुकी प्रजा मीडिया आणि सोशल मीडियावरच्या प्रेमातून सावरत नाही. त्यामुळं हा तमाशा!’ नम्या मार्मिक शब्दांत बोलून गेला.
‘ते कुठलं जहाज येणारे त्यानं मिटेल ना रे टंचाई?’ अर्ध्याचा तरीही पोरकट प्रश्न आलाच!
‘इलेक्शन संपेपर्यंत खरी टंचाई कळायची नाही. आणि त्यानंतर भाववाढ पण टळायची नाही. पण तू कश्याला आला होता इथं?’ नम्यानं अर्ध्याला त्याचं यायचं कारण विचारलं.
‘हे पेट्रोल लागतं ना? मग भरून ठेवू म्हंटलं..!’ अर्ध्या दबकत बोलला.
‘तू रे कधी घेतली मोटारसायकल? एवढं पेट्रोल भरून ठेवायला निघाला ते?’ नम्यानं नस पकडली.
‘हे तुझीच वापरावी लागती ना?मग म्हंटलं भरून ठेवावा. बाकी नाही काही!’ अर्ध्या ओशाळल्या सुरात बोलला.
‘त्या लायनीत नाही काही! तुला आता दुसर्या लायनीत नेऊन उभा करायचं आहे,’ नम्या हसून बोलला, पण पुन्हा रांग म्हंटल्यावर अर्ध्याला घाम फुटला.
‘आता कोणत्या रांगेत उभं करणारे तू मला?’ अर्ध्या घाम पुसत विचारू लागला.
‘हे गॅस बुकिंग केलीय तुझ्या म्हातारीनं! तू आता नंबर येईपर्यंत लायनीत उभा रहाय! टाकीवर लक्ष ठेव नाहीतर चोरीला जाईल,’ नम्यानं एक दमात सांगून टाकलं.
‘त्या जहाजात गॅस असंल का रे?’ अर्ध्या भाबड्या आशेने विचारू लागला. पण त्याच्या डोळ्यापुढे एजन्सीबाहेरची लाईन फिरायला लागली…
पाण्यानं धुवू बघत होता… जमेल त्याला?

