• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

तो सध्या काय करतोय?

प्रशांत केणी खेळियाड

Nitin Phanse by Nitin Phanse
April 30, 2026
in इतर
0
तो सध्या काय करतोय?

भारताच्या विश्वविजेतेपदात प्रमुख योगदान देणारा शिलेदार म्हणजे युवराज सिंग. कर्करोगावर मात करीत तो पुन्हा मैदानावर परतला, ही त्याची प्रेरणादायी यशोगाथा होती. निवृत्तीनंतर त्याने इतर क्रिकेटपटूंप्रमाणे भरघोस पैसे देणारी सोपी वाट निवडली नाही. त्यानं क्रिकेटचीच वाट धरली. तो सध्या काय करतोय, या प्रश्नाचं उत्तर देणारा हा लेखप्रपंच.

युवराज सिंग… भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एक विश्वविजेता योद्धा! २००७च्या विश्वचषकात याच पठ्ठ्यानं स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात सलग सहा चेंडूंवर सहा षटकार मारत जगभरात धुमाकूळ घातला. २००७च्या पहिल्यावहिल्या ट्वेंटी-२० विश्वविजेतेपदानंतर २०११च्या एकदिवसीय विश्वचषकात त्यानं अष्टपैलू खेळाची छाप पाडली. या विश्वविजेतेपदाचा तो खर्‍या अर्थानं शिल्पकार. म्हणूनच स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मानकरी. इथवर तर सारं स्वप्नवत होतं. त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि संघर्ष सुरू झाला, तो पुढे. या विश्वचषकानंतर त्याला कर्करोग झाला तेव्हा. या कठीण कालखंडावर त्यानं दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर मात केली आणि तो पुन्हा जिद्दीनं मैदानावर आला. २०१३मध्ये युवराजचं ‘दी टेस्ट ऑफ माय लाइफ : फ्रॉम क्रिकेट टू कॅन्सर अँड बॅक’ हे आत्मचरित्र प्रकाशित झालं. कालांतरानं त्याच्या कारकीर्दीचा आलेख खालावत गेला. जुन्यांची जागा अनेक नव्यांनी घेतली. त्यामुळे युवराजनं भारताचं अखेरचं प्रतिनिधित्व केलं, ते जून २०१७मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध. पुढे भारतीय क्रिकेटची दारं त्याच्यासाठी बंदच झाली. १० जून २०१९ या दिवशी त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला जाहीरपणे अलविदा केला. निवृत्तीनंतर कॅनडामधील ग्लोबल टी-२० कॅनडा आणि संयुक्त अरब अमिरातीमधील अबू धाबी टी-१० स्पर्धांमध्ये तो खेळला. इथेच त्याच्याकडून नियमाचा भंग झाला. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा आणि ‘आयपीएल’मध्ये खेळण्याची परवानगी देण्याची त्याची विनंती भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) फेटाळली. एकंदरीतच क्रिकेटपटू म्हणून कारकीर्दीपुढे पूर्णविराम लागला!

यानंतर तो क्रिकेट समालोचन नक्कीच करू शकला असता. स्वत:च्या कारकीर्दीत कधी फारसं मैदान न गाजवलेले क्रिकेटपटूही या व्यासपीठावर उत्तम पैसा कमावत आहेत. पण युवराजनं हा पर्याय खोडून काढला. तो म्हणतो, ‘मी मनातलं स्पष्ट बोलतो. व्यवहारचातुर्यानं बोलणं मला जमत नाही; त्यामुळे समालोचन कक्ष माझ्यासाठी योग्य नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी पूर्वी माझ्यावर टीका केली, त्यांच्यासोबत बसून क्रिकेटवर भाष्य करण्याची माझी अजिबात इच्छा नाही!’ त्याच्यासाठी हा पर्याय वजा झाला. मग राहतो, सामनाधिकारी बनण्याचा पर्याय किंवा क्रिकेट मंडळांची प्रशासकीय कारकीर्द किंवा व्यावसायिक भागीदार्‍या… मॉडेलिंग, चित्रपट, इत्यादी. अशा अनेक पर्यायांवर त्यानं काट मारलीय. मग प्रश्न पडतो की, तो सध्या काय करतो? तर हा गुणवान क्रिकेटपटू सध्या क्रिकेटपटू घडवण्याचं अस्सल मैदानी कार्य करतोय.

ही एक ‘वडिलोपार्जित’ परंपरा आहे… खुद्द युवराज क्रिकेटपटू म्हणून कसा घडला, हे माहिती असेलच ना! योगराज सिंग या क्रिकेटवेड्या बापाच्या अधुर्‍या राहिलेल्या स्वप्नांमधून मुलाच्या तळपत्या कारकीर्दीचा जन्म झाला. १९८१मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या वेलिंग्टन कसोटीत योगराज यांना गंभीर दुखापत झाली; तरीही मैदान न सोडता ते जिद्दीनं खेळले. हा सामना भारतानं गमावला. पण त्यानंतर त्यांना संघातून वगळण्यात आलं. योगराज त्यावेळी वडिलांसाठी न्यूझीलंडमधून छान सूट घेऊन आले होते. यानंतर आपण जेव्हा घरच्या मैदानावर खेळू, तेव्हा वडिलांनी हाच सूट घालून हजर राहावे, ही त्यांची हळवी इच्छा पूर्ण झाली नाही. निराशेनं खचलेल्या योगराज यांनी आपल्या सर्व क्रिकेट साहित्याला अग्नी दिला.

पण युवीचा जन्म झाल्यावर योगराज पुन्हा नव्या ध्येयानं पछाडले, त्याला मोठा क्रिकेटपटू म्हणून घडवण्याच्या इराद्याने त्यांनी घराच्या अंगणातच नेट्स बांधलं, खेळपट्टी तयार केली, इतकंच नव्हे, तर प्रकाशव्यवस्थाही केली. मग तासन्तास ते त्याला क्रिकेट शिकवायचे. पुढे योगराज यांचं स्वप्न पूर्ण झालं. युवराजनं अपेक्षेप्रमाणेच क्रिकेटमध्ये नाव कमावलं. पुढे आपल्या झळाळत्या कारकीर्दीचा अस्त झाल्यानंतर युवराज जसा कर्करोगग्रस्तांसाठी कार्य करतोय, तसाच तो याच खेळात नावलौकिक मिळवण्यासाठी धडपडणार्‍यांना तो त्याच्या कारकीर्दीत मिळालेलं क्रिकेटज्ञान देतोय.

तो सध्या काय करतोय, तर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय किंवा ‘आयपीएल’ स्तरावर खेळत असलेल्या क्रिकेटपटूंना त्यांच्या अडचणींवर मात करण्याचा कानमंत्र देतो, त्यांचा प्रेरक म्हणजे मेंटॉर होऊन. ही यादी आता विस्तारच जातेय! याची सुरुवात झाली संजू सॅमसनपासून. २०२४मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतानं विश्वविजेतेपदाला गवसणी घातली. त्यानंतर युवराज संजूला म्हणाला होता की, ‘तुला या विश्वचषकात खेळायची संधी मिळाली नाही, याबद्दल वाईट वाटून घेऊ नकोस. योग्य मेहनत घेतलीस, तर पुढचा विश्वचषक तुझ्या योगदानाचा असेल. पण त्यासाठी तू माझं मार्गदर्शन घे, जे तुला सहाय्यक ठरेल. २०२६च्या ट्वेंटी-२० विश्वचषकाआधी संजू युवराजकडे गेला. पदलालित्य आणि तंत्रशुद्ध सातत्य विकसित करण्यासाठी धडे गिरवले. पुढे जे घडलं, तो इतिहासच. संजूला यावेळीही प्रारंभी डावलण्यात आलेलं. पण संधी मिळताच त्यानं मैदानावर अधिराज्य गाजवलं. एकूण ३२१ धावा काढत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराला गवसणी घातली आणि म्हणूनच आपण विश्वविजेतेपद टिकवू शकलो.

अभिषेक शर्मा हा आजच्या घडीचा सर्वात आक्रमक फलंदाज. भारताच्या टी-२० संघाचा सलामीवीर. त्याच्या आक्रमकतेतही युवराजचं महत्त्वाचं योगदान मानलं जातं. मोठे फटके खेळताना संयम कसा राखायचा, योग्य चेंडूची निवड कशी करायची आणि मोठी खेळी कशी उभारायची, हे युवराजनं अभिषेकला शिकवलं. त्यामुळे अभिषेकच्या खेळात परिपक्वता दिसू लागली. भारताचा कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार शुभमन गिलसारख्या तंत्रशुद्ध फलंदाजालाही युवराजने अधिक सक्षम बनवलं. विशेषतः बॅकफूटवरील खेळ, वेगवान गोलंदाजांविरुद्ध आत्मविश्वास आणि दडपणाच्या परिस्थितीतच शांत राहण्याची कला त्यानं गिलला शिकवली. आज गिलच्या सातत्यपूर्ण कामगिरीत त्या सल्ल्याचा प्रभाव स्पष्ट जाणवतो.

प्रियांश आर्या हा खेळाडू सध्या ‘आयपीएल’ गाजवतोय. पंजाब किंग्जच्या यशात त्याचा सिंहाचा वाटा आहे. युवराजनं प्रियांशचंही मनोधैर्य उंचावलं. डावाची गती कधी वाढवायची, कधी संयम ठेवायचा आणि मोठ्या स्तरावर खेळताना आत्मविश्वास कसा टिकवायचा, हे धडे त्याला दिले. प्रियांशचा सलामीचा साथीदार म्हणजे प्रभसिमरन सिंग. तोही सध्या धावांचे इमले उभारतोय. फटक्यांची निवड करणं आणि डाव उभारणं म्हणजेच फक्त फटकेबाजी न करता परिस्थितीनुसार फलंदाजी कशी करायची, हे युवराजनं प्रभसिमरनला शिकवलं. त्यामुळे तो अधिक जबाबदारीनं फलंदाजी करू लागला. अनमोलप्रीत सिंगच्या फलंदाजीत अधिक धार आणण्यासाठी युवराजनं फटक्यांचा वेग आणि व्याप्ती तसंच सकारात्मक दृष्टिकोन यावर भर दिला. त्यामुळे त्याच्या खेळात अधिक आक्रमकता आणि स्पष्टता आली. रमणदीप सिंगच्या अष्टपैलू क्षमतेवरही युवराजच्या मार्गदर्शनाचा प्रभावी दिसून आला. युवीनं अनमोलप्रीतला कठीण परिस्थितीतच धैर्यानं खेळणं, जलद धावा करणं आणि सामन्यावर प्रभाव टाकणं याचं मार्गदर्शन केलं.

युवराजनं आपला घनिष्ठ मित्र सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन यालाही यंदाच्या ‘आयपीएल’ हंगामाआधी धडे दिले. त्याच्या तांत्रिक, मानसिक आणि शारीरिक विकासावर युवराजनं विशेष लक्ष केंद्रित केलं. युवराजनं अर्जुनच्या मेहनती वृत्तीचं कौतुक करत तो शिकवलेलं वेगानं आत्मसात करणारा खेळाडू असल्याचं म्हटलं होतं. ‘फलंदाजी करू शकणारा गोलंदाज’ असं युवी त्याचं वर्णन करतो. त्याच्या अष्टपैलू कौशल्यांना अधिक बळकट करण्यावर युवीनं भर दिला. तूर्तास ‘आयपीएल’ अर्ध्यावर येऊन ठेपलंय, पण तरी लखनौ सुपर जायंट्सनं त्याला अद्याप संधी दिलेली नाही.

युवराज फक्त क्रिकेट शिकवत नाही, तर खेळाडूंमध्ये जिद्द, आत्मविश्वास आणि सामना जिंकण्याची मानसिकता निर्माण करतो. त्यामुळेच मोठ्या व्यासपीठावर ते पूर्ण क्षमतेनं कामगिरी दाखवतात. म्हणूनच युवराज हा पुढच्या पिढीचा प्रेरणादायी गुरू आहे. त्याचं जसं पंजाबच्या क्रिकेटला महत्त्वाचं योगदान आहे, तसंच भारतीय क्रिकेटलाही. कारण त्याच्या प्रेरणेतूनच आणि अडचणींवर मात करण्याच्या जिगरबाज वृत्तीतून अनेक सामर्थ्यवान फटकेबाज, चतुरस्र फलंदाज आणि कुशल अष्टपैलू देशात नावारूपास येतायत. तो सध्या हेच क्रिकेटकार्य इमाने-इतबारे करतोय!

Previous Post

विहिरी बुजवू नका, सुरक्षित बनवा!

Next Post

रांग

Next Post
रांग

रांग

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.