• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

मराठीचे वर्चस्व राहो महाराष्ट्र देशी!

योगेंद्र ठाकूर बेधडक

marmik by marmik
April 30, 2026
in बेधडक
0
मराठीचे वर्चस्व राहो महाराष्ट्र देशी!

संयुक्त महाराष्ट्राच्या संघर्षमय लढ्यानंतर १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्याला आज ६६ वर्षे पूर्ण झाली आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या काळात मराठी माणूस एका ध्येय्यासाठी, महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी एकवटला होता. तो आज काहीसा विखुरलेला दिसतो आहे. त्यामुळे महाराष्ट्रद्वेष्टे पक्ष, नेते आणि सरकार मराठी भाषा, अस्मिता आणि संस्कृती याचा मान-सन्मान पूर्णपणे राखत नाहीत. तो त्यांनी राखावा यासाठी ‘मराठी बाणा’ म्हणजे काय ते मराठी माणसाने दाखवायला हवा.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील संघर्षात डॉ. सी. डी. देशमुख यांनी मराठी बाणा काय असतो हे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंसह देशाला दाखवला. ‘मराठी जनतेचे वर्चस्व राहो, स्वतःच्या महाराष्ट्र देशी तरी’ हे कवी माधव ज्युलियन यांनी शतकापूर्वी (१९२५ साली) लिहिलेली ‘मराठी बाणा’ ही कविता आठवणे क्रमप्राप्त ठरते. तसेच ‘मराठाकार’ आचार्य अत्रे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मराठी बाणा-महाराष्ट्राभिमान आठवावा. कारण मराठी माणसाला त्याचा स्वाभिमान, अस्मिता, मराठी बाणा याची जाणीव करून देण्यासाठी अधून-मधून जागे करावे लागते. त्याचे स्फुल्लिंग चेतवावे लागते, मगच तो कृती करतो.

संयुक्त महाराष्ट्र लढा आणि चिंतामणराव देशमुखांचा राजीनामा यात मराठी बाणा ठासून भरला आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा म्हणजे महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या इतिहासातील एक देदीप्यमान पर्व आहे. या पर्वात लोकसभेतील डॉ. सी. डी. देशमुखांच्या भाषणांनी मराठी अस्मितेचा अंगार फुलवला. त्यांच्या मराठी स्वाभिमानी बाण्याचे दर्शन देशाला झाले.

तेव्हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याने १९५५च्या दरम्यान जोर पकडला होता. सेनापती बापट, एस. एम. जोशी, श्रीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे आणि प्रबोधनकार ठाकरे अशा दिग्गज नेत्यांच्या नेतृत्वाखाली लढ्याला धार आली होती. संप, बंद, मोर्चे या लोकशाही मार्गाने लढा सुरू होता. त्या दरम्यान २१ नोव्हेंबर १९५५ रोजी गृहमंत्री मोरारजी देसाईंच्या पोलिसांनी निदर्शकांवर गोळीबार केला, तेव्हा या बेछूट गोळीबारात १०५ माणसे ठार झाली. यानंतर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अधिकच पेटली. १९५६च्या सुरूवातीस पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मंत्रिमंडळातील मंत्र्यांशी साधक-बाधक चर्चा न करता मुंबई केंद्रशासित करण्याचा इरादा स्पष्ट केला. नेहरूंच्या वक्तव्याने आंदोलक अधिकच भडकले. या सर्व घटनांचे साक्षीदार अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख होते. ते केवळ बुद्धिवान नव्हते तर संवेदनशीलही होते. या घटनेनंतर त्यांचा स्वाभिमान, मराठी बाणा जागाला आणि केंद्रीय अर्थमंत्रीपदाच्या राजीनाम्याचा विचार सी. डीं.च्या डोक्यात घोळू लागला.त्यांनी अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला. हिंदुस्थान सरकारने न्यायमूर्ती फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली ‘राज्य पुनर्रचना आयोग’ स्थापन केला होता. महाराष्ट्रद्वेष्ट्या अमराठी लोकांचा, व्यापार्‍यांचा महाराष्ट्रात मुंबई ठेवण्यास तीव्र विरोध होता. त्याप्रमाणे केंद्रीय मंत्रिमंडळाने असा निर्णय घेतला की, महाराष्ट्र, गुजरात आणि मुंबई शहर अशा तीन राज्यांची निर्मिती करावी. हा निर्णय सी.डीं.ना पटला नाही. आर्थिकदृष्ट्या ही योजना योग्य नाही असा इशाराही त्यावेळी त्यांनी दिला. सी.डीं.ना हे न पटल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष देवगिरीकर यांना फोनवरून नाराजी कळवली. देवगिरीकरांना देखील हा निर्णय आवडला नाही.

देवगिरीकर, भाऊसाहेब पाटसकर आणि आळतेकर हे सी.डीं.ना भेटण्यासाठी दिल्लीला गेले. त्यावेळी या निर्णयाविरोधात सर्वांनी राजीनामे द्यायचे ठरले. पण नंतर देवगिरीकर काँग्रेसचे असल्यामुळे काँग्रेस हायकमांडला ते दुखवू शकले नाहीत आणि त्यांनी आम्हाला राजीनामे देता येणार नाहीत हे नम्रपणे सी.डीं.ना सांगून माफी मागितली. त्यावर सी.डीं.नी तात्काळ उत्तर दिले, ‘मी काँग्रेसचा एक पैशाचा लाचार नाही. तेव्हा माझा राजीनाम्याचा निर्णय कायम आहे.’ मुंबई केंद्रशासित करण्याचे विधेयक लोकसभेत मांडले तेव्हा पुन्हा एकदा राजीनामा स्वीकारण्याची विनंती पंतप्रधान नेहरूंना केली. त्यावेळी सी.डीं.ना ‘थोडं थांबा’ असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. पंतप्रधानांनी काँग्रेस विधिमंडळाच्या बैठकीत सी.डीं.ना आपली भूमिका मांडण्याची परवानगी दिली. सी.डीं.नी भूमिका मांडली. परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. कारण हायकमांडचा निर्णय आधीच झाला होता. या बैठकीतील राग-रंग पाहून सी.डी. बैठकीतून उठले आणि म्हणाले, ‘मी विरोध नोंदवून लोकसभेतील माझ्या सदस्यत्वाचा राजीनामा देईन. त्यावेळी पंतप्रधान नेहरूंसह ज्येष्ठ मंत्री गोविंद वल्लभ पंत यांनी त्यांना बैठक सोडून जाऊ नका असा सल्ला दिला. पण तो सी.डीं.नी मानला नाही. आपण राजीनामा का देत आहोत याची सर्व पार्श्वभूमी त्यांनी लोकसभेत सांगितली आणि अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देऊन सभागृह सोडले.

लोकसभेतील डॉ. सी. डी. देशमुखांच्या भाषणांनी मराठी अस्मितेचा अंगार फुलवला. त्यांच्या मराठी स्वाभिमानी बाण्याचे दर्शन देशाला झाले. या राजीनाम्याच्या भाषणानंतर संसदेतील वेगवेगळ्या पक्षांच्या खासदारांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली. कारण मराठी बाण्याचे तेज काय असते ते त्यांनी बघितले.

डॉ. सी. डी. देशमुखांनी आपल्या जाज्वल्य मराठी अस्मितेचे दर्शन सार्‍या जगाला घडवले. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यादरम्यान महाराष्ट्राची बाजू दमदारपणे मांडल्यामुळे महाराष्ट्राच्या सर्व स्थरांतून डॉ. सी. डी. देशमुखांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील एक अग्रणी ज्येष्ठ संपादक आचार्य अत्रे यांनी त्यांच्या ‘नवयुग’च्या ऑगस्ट १९५६च्या अंकात चिंतामणी देशाचा कंठमणी झाला’ अशी गौरवपर कविता लिहिली.

आता कवी माधव ज्युलियन यांचा मराठी बाणा पहा. त्यांचे मराठी भाषा विषयी असलेले विचार १९३८ साली प्रकाशित झालेल्या त्यांच्या ‘भाषाशुद्धीविवेक’ या पुस्तकात मांडले आहेत. त्याचे आजच्या पिढीने मनन-चिंतन करावे असेच आहे. ते लिहितात, ‘‘महाराष्ट्र देश नि मराठी भाषा ही आपल्या नव्या एकीकरणाची केंद्रे आहेत. तेव्हा सांस्कृतिक एकीकरण अबाधित चालू राहिले पाहिजे. स्वभाषेला स्वधर्म आणि स्वदेश यांच्या पंक्तीत स्थान आहे. महाराष्ट्राचा विचार करा, मराठीचा सांगोपांग अभ्यास आपुलकीने करा आणि प्रभावसंपन्न व्हा. परकी भाषेतील शब्दांचा बहिष्कार हे साधन आहे, साध्य नव्हे. मराठीला स्वभाषा मानून मराठी बोलणार्‍यांचा अभ्युदय हे साध्य आहे. मराठी भाषा व वाङ्मय यांची उन्नती होऊन त्यांचे वैभव वाढावे. जीवनकलह तीव्र आहे. तुम्ही टिकले पाहिजे. मागासता कामा नये. खर्डेघाशी व्हावे लागले तरी चिंता नाही. पण उत्कृष्ट आकडेमोड कारकून व्हा. तुम्ही तो धंदा करा, स्वकष्टाने भाकर मिळवा, धंद्यात तुमचा हात कुणी धरणार नाही अशी कीर्ती मिळवा.’’ यात त्यांची मराठी माणसाविषयीची तळमळ दिसते.

माधव ज्युलियन स्वतःला हिंदू मराठा म्हणत तर त्यांची भावी मराठ्याची अपेक्षा कशी आहे ते त्यांच्या एका कवितेतून त्यांनी मांडली आहे.
‘हवा चतुर्भुज मराठा गडी,
अवश्य नांगर एक्या हातीं
दुज्या करीं तलवार पहा ती
श्रुतिपोत हवा काळ्या राती
आणिक चौथ्या करीं तागडी।’
त्यांच्या १०० वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘मराठबाणा’ या कवितेत शेवटच्या चार ओळी आजही प्रत्येक माणसाने मंत्रासारख्या पाठ आठवाव्यात अशा आहेत.
‘मराठीस अन्याय कोठेहि
झाला प्रदेशी विदेशी गुणी गांजिले
मराठी कसा मी न संताप
माझा घडावे जरी तीव्र दुःखानिले?
मराठी सजनांचेच वर्चस्व राहो
स्वतःच्या महाराष्ट्रदेशी तरी
प्रसादे तुझ्या कोणती व्यक्त
अशा अन्य हे वंद्य वागीश्वरी.’’

तर मराठाकार आचार्य अत्रे काय लिहितात ते पाहा. ‘‘मराठी माणसाच्या अंगी स्वाभिमान आणि बाणेदारपणा तुडुंब भरलेला आहे. तत्वासाठी आणि ध्येयासाठी तो वाटेल ते मोल द्यावयाला तयार होईल. देशासाठी आणि स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करण्याचा जणू काही त्याने विडाच उचललेला आहे. सिंहाच्या गुहेत जाऊन त्याच्या दाढेत हात घालण्याची त्याला विलक्षण हौस. शत्रूला नि मृत्यूला भिणे म्हणजे काय हे त्याला मुळी माहीतच नाही. ह्यालाच आम्ही ‘महाराष्ट्राची अस्मिता’ किंवा ‘मराठीपण’ म्हणतो.’’

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘मराठी बाणा’ काय असतो आणि कसा असावा ते वेळोवेळी आपल्या लिखाणातून आणि वाणीतून दाखवले आहे. हा मराठी बाणा टिकवण्यासाठी ‘‘ब्राह्मण-ब्राह्मणेतर, मराठा-मराठेतर, श्याणव कुळी-ब्याणव कुळी, घाटी-कोकणी, स्पृश्य-अस्पृश्य हे सारे भेदाभेद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट बांधा,’’ असे आवाहन त्यांनी केले होते. आज त्याची पुन्हा गरज आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसाला ‘मराठी बाणा’ दावण्याची गरज आहे.

मराठी माणूस हा एकवटला तरच संयुक्त महाराष्ट्र टिकेल, मराठी भाषा-अस्मिता-संस्कृती टिकेल. बंगालमध्ये बंगाली एकवटले आहेत. तामिळनाडूत तामिळ एकवटले आहेत. तसाच महाराष्ट्रातसुद्धा मराठी माणूस मराठी म्हणून एकवटल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच व्यक्त केला. त्यांचा हा विश्वास महाराष्ट्र सार्थ ठरवेल. महाराष्ट्रदिनाच्या मंगलसमयी पुन्हा मराठी बाण्याचे दर्शन सार्‍या जगाला दाखवू अशी शपथ घेऊ या!

Previous Post

पाहुणे हे का असंख्य पोसते मराठी?

Next Post

‘ती’ नुसती लाभार्थी की निर्णयकर्ती!

Next Post
‘ती’ नुसती लाभार्थी की निर्णयकर्ती!

‘ती’ नुसती लाभार्थी की निर्णयकर्ती!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.