
बटाटेवडा हा महाराष्ट्राचा ‘राष्ट्रीय’ पदार्थ… कुठे आलू बोंडा बनत असेल, कोल्हापुरात जाड पारीचा बनत असेल, आणखी कुठे लाल भुक्कीचा म्हणजे लाल मिरची पावडर टाकलेलाही बनत असेल, पण बटाटेवडा महाराष्ट्रात सगळीकडे बनतो. आता तो वडा-पाव या स्वरूपात देशभर आणि परदेशांतही पोहोचला असला तरी मूळ स्वरूप म्हणजे बटाटेवडा… सोबत पाव असण्याची गरज नाही. किंबहुना एखाद्या खास प्रसंगी घरगुती जेवणात जे वडे बनतात ते आकाराने छोटे आणि नुसते खाण्यासारखेच असतात… पावाविना.
वडापावाच्या आक्रमणात असा नुसता बटाटेवडा खायला देणार्या जागा कमी झाल्या आहेत सगळीकडेच. नाही म्हणायला, गिरगाव, दादरमध्ये आणि पुण्यात ‘प्रभा’सारख्या वड्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रेस्टॉरंटमध्ये नुसता वडा खायला जाणारे लोक आहेत बरेच. ‘प्रभा’मध्ये तर वड्याबरोबर चटणी मागणार्यांना ‘चटणी वड्याच्या आतच आहे’ असं खास पुणेरी वळणाचं उत्तर मिळतं.
नुसता बटाटेवडा खाण्याची एक हुकमी जागा म्हणजे नाट्यगृह. मुंबईत शिवाजी मंदिर असो, बोरिवलीचं प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह असो, पार्ल्याचं दीनानाथ असो, ठाण्यात काशीनाथ घाणेकर असो की गडकरी रंगायतन असो- कुठेही नाटक पाहायला गेलं की मध्यंतरात वडा खाणे हे एक रिच्युअल असतं. ती एक परंपरा आहे. वडा खाल्ल्याशिवाय नाटक पाहिल्याचा अनुभव पूर्ण होत नाही. तसे अलीकडे सामोसे, सँडविच वगैरे पदार्थही मिळतात नाट्यगृहांच्या वँâटीनमध्ये. पण ते खाणारा माणूस नाट्यप्रेमी नाही, हे समजून जायचं. वडा घेताना पाव नाही का, असं विचारणारा माणूसही नाट्यगृहात फारसा फटकणारा नाही, हे कळून जातं. नाटकाची सांगड असते नुसत्या बटाटेवड्याशीच.
मध्यंतरापर्यंतचा नाटकाचा जो काही परिणाम किंवा बोअर नाटकाच्या बाबतीतला वैताग झालेला असतो, त्यासह बाहेर पडलेल्या रसिकाला त्या सगळ्यातून बाहेर काढण्याची ताकद असते बटाटेवड्याच्या खमंग सुगंधात. तो दरवळ नकळतच आपल्याला वँâटीनपर्यंत खेचून नेतो. तिथल्या गर्दीतून नंबर लावून कागदाच्या द्रोणात किंवा पाकीटात दोन गरमागरम, ताजे तळलेले वडे घेऊन येणारा माणूस एखादं राज्य जिंकून येणार्या राजाइतकाच आनंदलेला असतो. पहिल्या अंकातील संवाद, कलाकारांची कामगिरी, कथानकातील वळणं, यावर चर्चा करताना हातातला वडा कधी संपतो, हे कळतच नाही. ‘आजचा वडा काही वेगळाच लागतोय’ किंवा ‘मिरची भारी आहे’ अशा प्रतिक्रिया कानावर पडतात आणि त्या वातावरणात एक अनोखी आपुलकी निर्माण होते. नाट्यप्रेमींसाठी बटाटेवडा हा नाटकाइतकाच महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे अनेक नाट्यरसिक एखाद्या नाट्यगृहात जाताना, आज इथला वडा खायला मिळणार, या कल्पनेनेही आनंदून जातात.

पुण्यातील ‘टिळक स्मारक मंदिरा’तील कॅन्टीनचा वडा हा अशाच उत्तम चवीचा आणि परंपरेचा मानबिंदू आहे. १९७८ साली सुरू झालेल्या या कॅन्टीनच्या बटाटेवड्याने अनेक दशके खास चव जपली आहे. माधव भागवत आणि प्रमोद भागवत यांच्या नेतृत्त्वात हा वडा बनतो. त्यांच्या वडिलांनी दत्तात्रय भागवत यांनी एस. पी. कॉलेजमध्ये मेस चालवत असताना केटरिंग व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली होती. त्या काळात लग्नसमारंभात बटाटेवडा हा खास पदार्थ मानला जात असे. त्याच परंपरेतून टिळक स्मारकातील वड्याची चव आकाराला आली.
साधी, पण अस्सल रेसिपी या वड्याची खासियत म्हणजे त्याची साधी, पण अस्सल रेसिपी. तळेगाव वाणाच्या बटाट्यांचा वापर, उकडलेल्या बटाट्यात आले, मिरची, लसूण, कोथिंबीर यांचा कच्चा मसाला, या सगळ्याची जुळवाजुळव इथे इतक्या नेमकेपणाने केली जाते की त्याच्या चवीमध्ये वर्षानुवर्षे कोणताही फरक पडत नाही. इथे बटाट्याची भाजी बनवून वडे केले जात नाहीत; त्यामुळे प्रत्येक घासात बटाट्याची मूळ चव जपली जाते. कदाचित म्हणूनच, या वड्याची चव दीर्घकाळ आपल्या जिभेवर रेंगाळते. इथले आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे वड्याबरोबर पाव किंवा चटणी मिळत नाही. मिळते ती फक्त तळलेली मिरची (तीही खरंतर अनेक नाट्यगृहांमध्ये मिळत नाही). नाट्यगृहांत वडा खाण्याची सवय नसलेल्यांना सुरुवातीला हे आश्चर्यकारक वाटतं, पण एकदा वडा चाखला की, त्या निर्णयामागचं तत्त्व समजतं. मध्यंतराच्या मर्यादित वेळेत ग्राहकाला वडा चटणी लावलेल्या पावात भरून देण्यात जाणारा वेळ हा व्यावहारिक मुद्दा आहेच; पण मुळात पावामुळे वड्याची मूळ चव झाकली जाते, असं भागवत कुटुंबाचं मत आहे. हा वडा पावाविना खाल्ला की त्याची खरी लज्जत अनुभवता येते.
मान्यवरांच्या पसंतीचा वडा
टिळक स्मारक मंदिराचा बटाटेवडा राज्यभर प्रसिद्ध आहे. नाटकाच्या प्रयोगासाठी येणारी कलाकार मंडळी या वड्याचा आस्वाद घेतातच. पण त्याखेरीज आम्हाला अनेकजण फोन करून विचारतात, सर, नाटकाचा प्रयोग कधी आहे? किती वाजता आहे? आम्हाला तुमचा वडा खाण्यासाठी यायचे आहे. अगदी सातारा, नगर, कोल्हापूर इथून त्यासाठी फोन करणारे अनेक ग्राहक असल्याचे माधव भागवत सांगतात. प्रसिद्ध संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्यापासून ते तरुण दमाचा अभिनेता सुव्रत जोशी यांच्यापर्यंत अनेकजण या वड्याच्या प्रेमात आहेत. माधव म्हणाले, प्रभाकर पणशीकर, श्रीकांत मोघे, यशवंत दत्त अशी अनेक मंडळी इथे आल्यावर बटाटावडा खाल्याखेरीज ब्ााहेर पडत नसत. श्रीकांत मोघे यांचे इथल्या वड्यावर विशेष प्रेम होते. इथे वडा सुरू झाला तेव्हा त्याची किंमत ३५ पैसे होती. आज त्याची किंमत २० रुपये झाली आहे. इथे नाटक असेल तेव्हाच वडा मिळतो. अन्य दिवशी हे कॅन्टीन बंद असते. दर आठवड्यातून आठ-दहा फोन तरी येतात की, तुमचे कॅन्टीन कधी उघडे असणार आहे, आम्हाला फक्त वडा खायला यायचे आहे. (बहुतेक नाट्यगृहांमध्ये वँâटीन वरच्या मजल्यावर असते, त्यामुळे तिथल्या खानपानाचा आनंद फक्त नाट्यगृहातल्या प्रेक्षकांनाच मिळतो. टिळक स्मारकातील वँâटीन मात्र तळमजल्याला आहे, त्यामुळे बाहेरचा माणूसही तिथला वडा खाऊ शकतो- अर्थातच नाटक असेल तेव्हाच.)

बालगंधर्व रंगमंदिरात एकेकाळी गोडसे यांचा बटाटेवडा मिळत असे. तो वडा संपूर्ण पुण्यात प्रसिद्ध होता. आमच्यानंतर पुण्यात प्रसिद्ध असणारा वडा कोणाचा असेल तर तो टिळक स्मारक मंदिराचा, असे खुद्द ते गोडसे तोंड भरून सांगत असत, अशी आठवण माधव भागवत सांगतात.
जागेची गंमत
एखादा पदार्थ तयार करताना त्यामध्ये जशी हाताची जादू असते तशीच जागेची देखील गंमत असते. आम्ही अनेक वर्षांपासून ज्या जागेत वडे तयार करतो, त्यामध्ये आजतागायत बदल झालेला नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी तो तयार होतो, तिथली गंमत त्यामध्ये उतरत असावी, म्हणून त्याच्या चवीमधला गोडवा आजही टिकून आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरू नये. इथे कधी वडे संपले आहेत असे कधीच होत नाही, असं भागवत सांगतात.
१९७८ साली टिळक स्मारक मंदिरमध्ये कॅन्टीनची सुरुवात झाली. त्या काळात नाटक म्हणजे केवळ मनोरंजन नव्हतं तर तो एक उत्सव असे. १९८० ते १९९५ या सुवर्णकाळात इथल्या बहुतांश नाटकांचे फलक हे हाऊसफुल्लने झळकत असत. पडदा उघडण्याआधी प्रेक्षकांची लगबग, कलाकारांची गडबड आणि त्या सगळ्यात मिसळलेली कॅन्टीनमधून दरवळणारा गरमागरम वड्याचा सुगंध हे सगळं वातावरणच काही वेगळं होतं. त्या काळात कलाकार मंडळी बसमधून येत असत. बसमधून उतरल्यावर त्यांच्या पावलांचा पहिला थांबा ठरलेला तो म्हणजे कॅन्टीन. गरमागरम बटाटेवडा, कटिंग चहा आणि रंगलेल्या गप्पा, या सगळ्यांनी
कॅन्टीनला एक वेगळीच ओळख मिळवून दिली. कलाकार आणि कॅन्टीन यांच्यात फक्त व्यवहार नव्हता, तर एक जिव्हाळ्याचं नातं होतं. त्या गप्पांमधून, त्या भेटींमधून अनेकांशी घट्ट मैत्री जुळत गेली.
मात्र, काळ बदलला… कोरोनानंतर नाट्यप्रयोगांची संख्या कमी झाली. रंगमंचावरची चहलपहल थोडी ओसरली आणि त्याचा परिणाम कॅन्टीनवरही झाला. एकेकाळी दर दोन-तीन दिवसांनी मिळणारा तो आवडीचा बटाटेवडा आता थोड्या प्रतीक्षेनंतर मिळू लागला. पण त्या प्रतीक्षेतही एक गोडी आहे, कारण त्याची चव अजूनही तशीच आहे.

एकाच ठिकाणी वाढण्यातली खरी मजा…
व्यवसाय वाढवणं जितकं महत्त्वाचं, तितकंच त्याची मूळ चव जपणं अधिक कठीण! विस्ताराच्या मागे धावताना अनेकदा चवीची ओळख हरवते. पण खरी किमया असते. एकाच ठिकाणी राहून, त्याच मातीशी नातं जोडून मोठं होण्यात. ‘ब्रँड उभा करायचा असेल, तर चवीशी तडजोड करता कामा नये,’ हा वडिलांनी दिलेला मंत्र आम्ही आजही जपतो. ग्राहकांच्या तोंडात पडणारा प्रत्येक घास हा तितकाच उत्कृष्ट असावा, हीच आमची ध्येयधारणा. चव टिकवून ठेवली, तर लौकिक आपोआप वाढतो, यावर आमचा ठाम विश्वास आहे. या प्रवासात अनेक हात जोडले गेले, अनेक माणसं सोबत उभी राहिली. स्वाती भागवत, जयाताई घाडगे, पूनम काशीद, लताताई लोंढे आणि चंद्रभागाताई वारोशे, यांच्या सहकार्यामुळे हा प्रवास अधिक समृद्ध झाला, असे प्रमोद भागवत नमूद करतात.
आजही कॅन्टीनमध्ये उभं राहिलं, की त्या जुन्या दिवसांची चाहूल लागते. नाटक, गप्पा आणि बटाटेवड्याची अवीट चव ही परंपरा आजही तिथे प्रेमाने जपली जाते.

