• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

नेपोलियन आणि शिवराय, रामदास आणि तुकोबा

सचिन परब प्रबोधन-१००

marmik by marmik
April 25, 2026
in प्रबोधन १००
0
गोव्यात सामाजिक क्रांतीचा एल्गार

देवळाचा धर्म, धर्माची देवळें लिहिणारे प्रबोधनकार शनिमाहात्म्याच्या शेवटी प्रयत्नवादाची मांडणी ईश्वरभक्तीच्या दिशेने नेतात, तेव्हा वर वर वाचणार्‍याला आश्चर्य वाटतं खरं. पण देवळं आणि देवळाची दुकानं मांडणार्‍या भटशाहीवर आसूड ओढणारे प्रबोधनकार आधीही ईश्वरी शक्तीसमोर नतमस्तक होतेच. त्यांच्या या मांडणीमुळे भक्ती ही देव आणि भक्तामधल्या दलालांची दुकानं बंद करणारी शक्ती बनते.

 

शनी हा साधा पोलिस शिपाई किंवा फौजदार, त्यामुळे थेट कमिशनरकडेच गेलो तर या फौजदाराचं काही चालणार नाही, हा अफलातून तर्क प्रबोधनकार शनिमाहात्म्या`च्या मांडणीला वेगळीच कलाटणी देतात. त्यांच्या दृष्टीने हा फौजदार म्हणजे आपल्या नियमांनी जगाचा पसारा चालवणारा विश्व्नियंता ईश्वर आहे. त्यामुळे ते दैववाद ़फेटाळून आणि प्रयत्नवादाच्या मर्यादा सांगून ‘देववादा’ची भलामण करतात, हे आपण आतापर्यंतच्या प्रकरणांमध्ये पाहिलं. आता त्या सगळ्याचं सार शेवटच्या दोन प्रकरणात येतं. अकराव्या प्रकरणाचं नावच `थेट खुद्दाच्या दरबारात असं आहे.

शनीसारख्या नोकरांना टाळून थेट राजाच्या म्हणजे देवाच्या दरबारात आपली फिर्याद नोंदवण्याची शिफारस प्रबोधनकार करतात, अंधार घालिवण्यासाठी दिवा लावलाच पाहिजे. ग्रहदशेचा अंधार पसरून बुद्धी बुळबावळी बनली तर अंतरिचा ज्ञानदिवाच ईश्वरभक्तीची कात सरसावून प्रदिप्त केला पाहिजे. ज्ञानदीप उजळला की अंतःकरणात उजेड पडून बुद्धी डोळस बनते, आणि ती अवघ्या जगाकडे उजळ दृष्टीने पाहू लागते. दृष्टी उजळ झाली की सारी सृष्टी निराळी दिसू लागते. साडेसातीच्या तुफानी तडाक्यात लंजूर झालेल्या विचारांना सकसपणा येऊन आचारांची गती विशेष तेखदार आणि दणदणीत होत जाते. जसा विचार तसा आचार म्हणून विचार यंत्राची विशेष काळजी घेणे जरूरी आहे.

असं ईश्वरभक्तीच्या ज्ञानदिव्याला विचारशुद्धीशी जोडून प्रबोधनकार भक्तीकडे बघण्याच्या रूढ दृष्टिकोनांना टाळून तिला कृतिप्रवण मानतात. त्यांनी ही मांडणी महत्त्वाची आहे, पुरुषार्थाची सिद्धी आचाराने होते आणि आचाराची सिद्धी विचारांनी साधावयाची असते. म्हणून शारीरिक स्वास्थ्यासाठी आपण जेवढी काळजी आणि फुफ्फुसाची (हार्ट व लीवर) काळजी घेतो, तेवढीच, किंबहुना विशेष आपल्या विचारांची घेतली पाहिजे. विचार लंजूर पडले, डळमळले, गंजले की सारा कारभार रद्दीत निघालाच. शुद्ध विचाराची एकाग्रता ही एक दिव्य प्रभावशाली शक्ती आहे. हिला कोणतीही परिस्थिती पादाक्रांत करू शकत नाही. शनीची साडेसाती येवो, नाहीतर तिच्या बापाचा बाप येवो, ही शक्ती काही काळ लोहाप्रमाणे वाकली तरी अखेर ताठ उभी राहिल्याशिवाय रहात नाही. दृढनिश्चय आत्मविश्वास वगैरे कल्पना याच शक्तीत सामावलेल्या असतात. एकाग्र विचारांच्या तीव्रतेने मृत्यूच्या पाशालाही अटकाव करून थांब म्हणणार्‍या वीरांची उदाहरणे पुष्कळ आहेत… केवळ विचार एकाग्र झाले म्हणजे पुरुषार्थी पराक्रमाचा मार्ग मोकळा होत नाही. विचारांची शुद्धी ठरवायला तसेच काहीतरी सर्वसमर्थ पाठबळ पाहिजे. किंबहुना त्याशिवाय विचारांची एकाग्रताच साधणे शक्य नाही. शुद्ध विचारांना लागणारे पाठबळ हे ‘देणे ईश्वराचे’ आहे. हे ईश्वरी देणे मिळविण्यासाठी नुसती विचारांची कमावणी किंवा आचारांची डुक्करमुसंडी फुकट आहे. त्यासाठी अंतरीचा ज्ञानदिवाच प्रदीप्त करून, त्याच्या प्रकाशात आपल्या विचारांची शुद्धाशुद्धता पारखून, शिवाय अवघ्या विश्वाचे नियंत्रण करणार्‍या ईश्वरी सूत्राची ओळख करून घेतली पाहिजे.

भक्तीशी संबंधित त्यांच्या या सिद्धांतासाठी त्यांनी आदर्श म्हणून छत्रपती शिवरायांचा दाखला दिला आहे. दगलबाज शिवाजी`च्या मांडणीत न आलेला हा आयाम आहे. त्याची त्यांनी सविस्तर मांडणी केली आहे. त्यातलं सार समजावून सांगणारे हे दोन परिच्छेद आहेत, `शिवाजी महाराज विद्वान नसतील, पण पट्टीचे ज्ञानी होते. त्यांनी ‘मुख्य देवास’ जाणिले होते. ‘सत्य स्वरूप’ ओळखून ‘नित्यानित्य विवेक’ त्यांनी पूर्ण कमाविला होता. त्यांच्या कर्मयोगी ईश्वरी ज्ञानाच्या पाठिंब्यावर पुढे पुढे रेटला जात होता, म्हणूनच तो निष्काम घडला आणि म्हणूनच तो यशस्वी झाला. शिवरायाच्या चरित्राचा सुक्याठाक राजकारणापुरताच विचार करणार्‍या मंडळींची दृष्टी एकाक्ष असते. अफझलखानासारख्या प्रचंड दैत्याला चुटकीसरसा चीत करणार्‍या आणि आगर्‍याच्या बादशाही दरबारात औरंगजेबाची बेफाम निर्भत्सना करणार्‍या शिवाजीची मनोवृत्ती ईश्वरभक्तीने किती चबचबीत भिजलेली असे, याची त्यांना कल्पना होत नाही… संसारिक व्यावहारिक आणि लौकिक आपत्तीचा क्षणमात्र विचार न करता, अमीराच्या पोटी जन्मून फकीरीने राहणार्‍या शिवाजीने जो एवढा मोठा लोकोत्तर पराक्रमांचा हिमालय उभा केला, तो केवळ एकाच सामर्थ्यावर. त्याने आकाशस्थ किंवा पृथ्वीस्थ छोट्यामोठ्या ग्रहोपग्रहांची पर्वा केली नाही. त्याने थेट खुद्दाच्या दरबारात धाव घेऊन, आदिमाया जगदंबेच्या पायी मिठी मारली. यशापयशाचे सुखदुःखाचे, लौकिकी अब्रू-बेअब्रूचे, लाजलज्जेचे सारे गाठोडे त्या तुळजामातेलाच अर्पण केले. मग काय विचारावे? ‘भावार्थबळे जेहि भगवंतासि बोभाइले’ त्याला तो श्रीहरी, ती जगदंबा, काय कधी अंतर देईल? नाही, नाही, शतशः नाही.
रामदास स्वामींच्या ‘सामर्थ्य आहे चळवळीचे। जो जो करील तयाचे।’ या इतक्याच ओळी सर्वत्र सांगितल्या जातात, पण त्याच्यापुढचं ‘परंतु तेथे भगवंताचे। अधिष्ठान पाहिजे।’ हे मात्र आपण विसरून जातो, असं सांगून प्रबोधनकार शिवरायांचा निष्काम कर्मयोग समजावून सांगतात, आता शिवाजी महाराजांच्या चारित्र्याकडे पाहा. हिंदवी स्वराज्य प्राप्तीसाठी प्रयत्नाचे पाऊल उचलण्यापूर्वीच त्यांनी प्रथम भगवंताचे अधिष्ठान शोधले. देवावर भार घातला. आदिमाया जगदंबेच्या चरणी सुखदुःख, यशापयश आणि लाभ हानीचे गाठोडे वाहिले, साधुसंताचे आशीर्वाद घेतले आणि केवळ निष्काम वृत्तीने पडेल त्या मुकाबल्याच्या छातीवर तो चालून गेला. शिवाजीने आपल्या प्रयत्नवादाला भक्तिपूर्ण ज्ञानयोगाची जोड देऊन गीतोक्त कर्मयोगाची तपश्चर्या निष्काम बुद्धीने आचारली. म्हणूनच शिवाजीचा प्रयत्नवाद यशवंत होऊन चिरंजीव झाला. ‘स्वराज्यप्राप्तीच्या दिशेने पडेल ते कार्य आणि भेटेल ते साहस कुशलतेने तडीला न्यायचे एवढेच माझे काम. यशापयशाची काळजी तुळजामातेला.’ इतक्या वृत्तीला गेलेल्या योग्याकडे काळसुद्धा वाकड्या नजरेने पाहू शकणार नाही. मग कोण कोठला अफझुलखान आणि कोणत्या झाडाचा पाला अवरंगझेब!

शनीच्या साडेसातीसारख्या ग्रहदशेच्या हल्ल्यांचे दुष्परिणाम टाळण्याचे दोन मार्ग आहेत असं प्रबोधनकार सांगतात. त्यांच्या मते त्यासाठीचा पहिला पॅटर्न नेपोलियन बोनापार्टचा आहे. त्याच्याविषयी ते सांगतात, नेपोलियन बोनापार्ट स्वत: उत्तम खगोलज्ञ असल्यामुळे, ग्रहांच्या अनुकूल हालचालीप्रमाणे तो आपल्या सर्व राजकारणाची आणि मोहिमांची सूत्रे हालवून हातखंड यशवंत होऊ असे. पण अतिआत्मविश्वामुळे त्याचं गणित चुकलं आणि त्याचा घात झाला. त्यामुळे त्यांनी दुसरा मार्ग रामदास स्वामींचा सांगितला आहे, याच्या उलट रामदास स्वामींचे उदाहरण पहा. त्यांनी नवग्रहांशी मैत्री न जोडता, जवळजवळ त्यांचा धि:कारच केला. शनि खवळला आणि राहू चवताळला, तर काय होणार? संसाराचा चिवडाच ना? आम्हाला हा असला फुटका तुटका संसारच नको.

मात्र रामदास स्वामींचा संसार सोडण्याचा मार्ग सर्वसामान्यांना शक्य नसल्याने त्यांनी संत तुकारामांचा मार्ग अनुसरावा असं प्रबोधनकार सांगतात, `साधूश्रेष्ठ तुकाराम बुवानी संसार केला. कसा केला ते सर्वश्रुतच आहे, पण केला, सोडला नाही. त्याच्या सर्व आपत्ती शांतपणाने भोगल्या. झाला तो छळ समाधानी वृत्तीने सहन केला. का? तर त्यांनीहि थेट खुद्दाच्या दरबारातून आपल्या जीवनाची चैतन्यशक्ती मिळविलेली होती. तिच्या जोरावर ते म्हणतात,
प्रारब्ध क्रियमाण।
भक्तां संचित नाही जाण।।
अवघा देवचि झाला पाहीं।
भरोनिया अंतर्बाही।।
सत्य रज तम बाधा।
नव्हे हरीभक्तांसी कदा।
देवभक्तपण।
तुका म्हणे नाही भिन्न ।।

तात्पर्य, ग्रहांशी मैत्री जोडण्याचा उपसार किंवा विरोधाचा नसता संताप म्हणजे मुख्य राजा वगळून, त्याच्या मालदार, चोपदार हुजर्‍यांशी निष्कारण सलगी किंवा हुज्जत करण्याइतकेच वायफळ होय, त्यापेक्षा त्या सर्वांनी गुंडाळून ठेऊन एकदम थेट खुद्दाच्या दरबारात धाव घेतली, तर हरिचिया भक्ता नाही भय चिंता। दुःख निवारिता नारायण।। हा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही.`

साडेसातीच्या काळात संकटांमुळे येणार्‍या एकांतवासाच्या काळात काय करावं, हेही ते सांगतात, बेळाला दुष्काळ नसतो. त्या वेळी श्रीहरीचे नामस्मरण, भजन आणि चिंतन करावे. समर्थांच्या दासबोधाचे मननपूर्वक पारायण करावे. त्यांचे मनाचे श्लोक मनाच्या अणुरेणूत चांगले भिनू द्यावे. हे दोन ग्रंथ साध्या संसार्‍यापासून तो पट्टीच्या राजकारणी आणि परमहंस नरनारीपर्यंत सर्वांना कामधेनू किंवा कल्पतरूप्रमाणेच तेजदायी व फलदायी आहेत. त्यांची भक्तीपूर्वक पारायणे केली की विचारांना शांति येते, एकाग्रतेची उत्तम धार लागते आणि विशेषतः सुखदुःखाच्या लौकिकी फोलकट कल्पनांनी कोंदटलेल्या मनोमंदिरात नित्यानित्य विवेकाचा ज्ञानदीप तेजाळ प्रकाशतो…संशयाचे मूळ तुटून क्रियेत पालट कशी करावी, एवढा प्रश्न दासबोध आणि मनाचे श्लोक फार कुशलतेने सोडवितात. एकांतवासाच्या एकलकोंड्या काळात हा प्रश्न आपण सोडविला तरी तो काळ कृतार्थ झाला असे समजावे. व्यवहारात आपण का घसरलो, कसे घसरलो, त्याची कारणे काय, वगैरे तपशीलाची भवति न भवति करायला दासबोधासारखा वाटाड्या किंवा ज्ञानदीप दुसरा नाही.

संकटकाळात आत्मनिरीक्षण करून पुढच्या वाटचालीची तयारी करून नव्याने सुरुवात करावी, हे सांगताना प्रबोधनकार रुसो-जपानी युद्धातला जपानी जनरल टोगो याचं उदाहरण देतात. या काळात मनाचा मोठेपणा सोडता कामा नये, असा आग्रह ते धरतात. शेवटच्या दोन प्रकरणांत अशी ईश्वरभक्तीच्या अधिष्ठानच्या प्रामाणिक प्रयत्नवादाची मांडणी केल्यानंतर शेवटी मात्र प्रबोधनकार रामदास स्वामींनी दिलेल्या मारुती उपासनेचा मार्ग भारत देशाने अवलंबवावा असं आग्रही प्रतिपादन करतात. सात्विक आणि राजसिक प्रकृतिबद्दल हिंदुस्थानचा मोठा लौकिक आहे. या लौकिकाने हिंदूच्या हातात कसल्या मोक्षाने खापर पडले आहे, ते सांगणे नको. आता त्या लौकिकाची खातेवही कायमची बंद करून, हिंदू तरुणांनी तामसिक प्रकृतिचा विकास करण्याचे खाते उघडले पाहिजे. संसार, मग तो एका व्यक्तीचा असो, समाजाचा असो, वा राष्ट्राचा असो, त्यात तमाचा तापट तामसीपण सणाणल्याशिवाय लौकिकी अगर दैवी आपत्तींचा प्र्ातिकार करण्याची हिंमत, म्हणजे आत्मशक्ती, त्याला लाभणे अशक्य आहे ह्यासाठीच समर्थांनी मारुती उपासनेचा समर्थ संप्रदायाचा विजयी नकाशा अखिल हिंदु तरुणांपुढे मराठी स्वराज्याच्या रूपाने, पसरून ठेवला आहे. ‘वन्दे मातरम्’सारख्या सात्विक मुळमुळीत किंचाळणीपेक्षा, जेव्हा अखिल हिंदु भारत `बजरंग बली की जय  गर्जनेच्या तेलशेंदरात आपादमस्तक रंगून निघेल, तेव्हा त्याचा आत्माराम जागृत होऊन, तो ह्या पुराणपुरुष भारताच्या जीवनक्रांतीचा गडगडाट करून, नवमन्वंतराच्या इतिहासाची पाने क्रान्तीच्या देदीप्यमन सोनेरी शाईने लिहून काढील. ओम् क्रांति: क्रांति:

आज शनिमाहात्म्याचा हा शेवट वाचताना आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. वंदे मातरमचा ध्यास न घेता खरंच स्वातंत्र्यसैनिक बजरंगबलीच्या शेंदरी शक्तिउपासनेच्या मागे लागले असते, तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असतं का? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. प्रबोधनकारांनी सांगितलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम यांच्या आदर्शांचा या शेवटाशी कसा संबंध जोडायचा, असाही प्रश्न पडतो. पण म्हणून प्रबोधनकारांच्या शनिमाहात्म्यातल्या तर्काच्या कसोटीवर अंधश्रद्धेला सोलून काढणार्‍या मांडणीचं महत्त्व कमी होत नाही.

 

Previous Post

पुराणिकाची दाढी

Next Post

आंब्राई

Next Post
आंब्राई

आंब्राई

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.