
देखोनि पुराणिकाची दाढी।
रडे फुंदे नाक ओढी ।।१ ।।
प्रेम खरे दिसे जना।
भिन्न अंतरी भावना ।।२ ।।
आवरिता नावरे।
खुर आठवी नेवरे ।।३ ।।
बोलो नये मुखावाटा।
म्हणे होता ब्याचा तोटा ।।४ ।।
दोन सिंगे चारी पाय।
खुणा दावी म्हणे होय ।।५ ।।
मना आणिता बोकड।
मेला त्याची चरफड ।।६ ।।
होता भाव पोटी।
मुखा आलासे शेवटी ।।७ ।।
तुका म्हणे कुडे।
कळो येते ते रोकडे ।।८ ।।
तुकाराम महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू आहेत. त्यातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ते कवी होते. त्यांचं काव्य प्रभावी होतं. समाजजीवनाची अत्यंत बारकाव्यानिशी केलेली पाहणी त्यांचं काव्य फुलवायला उपयुक्त ठरली. त्यांच्या काव्यात समाजजीवनातील बारीक सारीक गोष्टी नोंदवल्या गेल्या आहेत. त्यामुळेच तुकोबांची वाणी आम जनतेला जवळची वाटली. त्या वाणीचा गोडवा अपूर्व असाच आहे. तुकोबांच्या या लोकविलक्षण काव्यात अनेकदा विनोदी कथाही सापडतात. मुळात वारकरी संप्रदाय हा लोकसंग्रह आणि लोकप्रबोधनावर भर देणारा आहे. त्यामुळे संतांनी त्यांच्या रचना अधिकाधिक लोकाभिमुख केल्या. लोकांना कथाविनोदाची गरज असते. त्यामुळे लोकप्रबोधन करताना कथाविनोदांचा वापर करण्याची भूमिका संतांनी घेतलेली होती. यासंदर्भात एकनाथ महाराजांची एक ओवी फारच बोलकी आहे.
ज्ञानी निवति परमार्थबोधे।
पंडित निवति पदबंधे।
लोक निवति कथाविनोदे।
ग्रंथसंबंधे जग निवे ।।
ज्ञानी लोक परमार्थबोधाने तर पंडित लोक शब्दव्युत्पत्तीने शांत होतात. लोकांना मात्र कथाविनोदांची गरज असते. त्यामुळेच वारकरी संप्रदायातील संतांनी वारंवार दृष्टांतकथा सांगितल्या आहेत. एकेका सिद्धांतासाठी अधिकाधिक दृष्टांत देण्याची संतांची परंपरा आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीत तर दृष्टांताची रेलचेल केली आहे. वारकरी संतांनी दिलेल्या दृष्टांताचा अनेक अंगांनी अभ्यास करता येईल. महानुभाव पंथात तर स्वतंत्रपणे दृष्टांतपाठ रचला गेला आहे. दृष्टांताच्या आधारे सिद्धांतांची मांडणी केली तर एखादा अवघड सिद्धांतही सर्वसामान्य लोकांना सहजासहजी समजतो. त्यामुळेच संतांनी दृष्टांतकथांचा वापर मोठ्या प्रमाणात केला. जो सोपी गोष्ट अवघड करून सांगतो तो पंडित, तर जो अवघड गोष्ट सोपी करुन सांगतो तो संत असतो.
तुकोबारायांनीही त्यांच्या अभंगातून अनेक दृष्टांतकथा सांगितल्या आहेत. डॉ. दिलीप धोंडगे यांनी तुकाराम महाराजांच्या अशा काही कथांचा शैलीविज्ञानाच्या दृष्टिकोनातून अभ्यास केलेला आहे. थोर विचारवंत आणि समीक्षक दि. के. बेडेकर यांनी तुकोबाराय हे आद्य लघुकथाकार आहेत असं म्हटलं होतं. त्याचबरोबर श्रीनिवास एस. जोशी यांनी, तुकोबा हे केवळ अभंगकर्ते नव्हते, तर जुने आणि जाणते श्रेष्ठ लघुकथाकार होते, असा निष्कर्ष काढला होता. तुकोबारायांच्या या दृष्टांतपर लघुकथा विनोदी आणि मार्मिक आहेत.
प्रस्तुत अभंगातही तुकोबाराय अशीच एक विनोदी कथा सांगतात. एकदा एक पुराणिक देवळात कथा सांगत असतो. त्यावेळी श्रोत्यातला एकजण रडायला लागतो. स्फुंदून स्फुंदून रडताना तो वारंवार नाक पुसत असतो. त्याला काहीतरी बोलायचं असतं पण त्याला शब्द फुटत नाहीत. रडू आवरण्याचा प्रयत्न केला तरी रडूही आवरत नाही. लोकांना वाटतं हा त्याच्यावर झालेला पुराणाचा परिणाम असावा. पुराणात अनेकदा भावविभोर कथा असतात. त्या कथा ऐकताना माणसाच्या मनावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे कथेकरी कथा रंगवून सांगणारा असला तर श्रोते रडायला लागतात. तुकोबारायांच्या या कथेतला श्रोताही कथेशी एकरूप होऊन रडत असेल असा स्वाभाविकपणे लोकांचा समज असतो. पुढे मात्र या कथेत ट्विस्ट आहे. त्या श्रोत्याच्या रडण्याचं कारण वेगळंच असतं. त्याला पुराणिकाची अर्धवट पिकलेली काळसर पांढरी दाढी पाहून त्याला त्याच्या बोकडाच्या राखाडी रंगाच्या खुराची आठवण येते. तेवढ्यात पुराणात बीजाचा विषय निघतो. ही सृष्टी एकाच परमेश्वररूप बीजाचा विस्तार आहे हा त्यांच्या पुराणातला विषय असतो. बीज हा शब्द ऐकताच त्याला परत एकदा बोकडाची आठवण येते. तो बोकड त्याने ‘बियाणा’साठी ठेवलेला असतो. त्या बोकडापासूनच त्याच्या शेळ्यांच्या कळपातील सारी पिल्ली जन्माला आलेली असतात. त्याचा सारा कळप एका अर्थाने त्या बोकडाचा विस्तार असतो. त्यामुळे ही सृष्टी एकाच बीजरूप परमेश्वराचा विस्तार आहे हे ऐकल्यावर तो ब्याचा तोटा झाला म्हणून ओरडायला लागतो. लोकांना वाटतं हा श्रोता पुराणाशी फारच एकरूप झाला आहे. बीजरूप परमेश्वराच्या विवेचनाचा परिणाम झाला म्हणून तो ‘ब्याचा तोटा झाला आहे’ असं म्हणतोय, असा लोकांचा समज होतो. तेवढ्यात परत एकदा पुराणिक एक पुरुष आणि एक प्रकृती या दोघांपासून हे विश्व निर्माण झालं असं सांगताना हाताची दोन बोटे दाखवतो. पुढे चार वेदांत हेच सांगितलं आहे असं निरुपण करताना तो पुराणिक चार बोटे दाखवतो. पुराणिक एकदा दोन बोटे आणि एकदा चार बोटे दाखवतो, तेव्हा त्या श्रोत्याला बोकडाच्या दोन शिंगाची आणि चार पायाची आठवण येते. त्या आठवणीने तो ‘होय होय’ म्हणून खूण दाखवतो. आता मात्र त्याला राहवत नाही. ‘माझा बोकड मेला हो’ असं म्हणत तो टाहो फोडतो. त्याची ही बोकडासाठीची चरफड पाहून लोकांना त्याच्या रडण्यामागचा मूळ हेतू कळतो.
तुकोबाराय म्हणतात की जे त्या श्रोत्याच्या पोटी होतं ते शेवटी त्याच्या ओठी आलं. कोणताही खोटेपणा शेवटी उघडा पडतोच. वरकरणी केलेली ढोंगबाजी कधीतरी लोकांच्या लक्षात येते. तुकोबारायांचा हा अभंग प्रामुख्याने धर्माच्या क्षेत्रात चाललेल्या ढोंगबाजीच्या संदर्भात आहे. आज ही ढोंगबाजी मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रात पसरत चाललेली आहे. ‘ओठात एक आणि पोटात एक’ अशी गत असलेले अनेकजण आपल्याला आवतीभोवती दिसतात. धर्माच्या-आध्यात्माच्या क्षेत्रात आलेले लोक फक्त ईश्वराविषयीच्या प्रेमातून येतात असं नाही. त्यांचे हेतू निरनिराळे असतात. कोणाला पैसा कमवायचा असतो तर कोणाला प्रसिद्धी मिळवायची असते. ‘जगी कीर्ती व्हावी। म्हणोनी जालासी गोसावी ।।’ असं तुकोबाराय म्हणतात. केवळ कीर्ती मिळावी म्हणून गोसावी होणारे खूप लोक आहेत. वरकरणी हे लोक भक्तीचा आव आणत असले तरी त्यांचा हेतू साफ नसतो. ज्यांचा हेतू फक्त विठ्ठलच आहे अशा लोकांना संत म्हणतात. पैसा आणि प्रतिष्ठेचा हेतू असणार्या लोकांना संत म्हणता येत नाही. निळोबाराय म्हणतात ‘तेची संत तेची संत। ज्यांचा हेत विठ्ठली ।। नेणती काही टाणाटोणा। एका नामस्मरणावाचुनि ।।’ एका नामस्मरणाशिवाय इतर कोणताही टाणाटोणा करणारा संत नसतो. लोक मात्र वरकरणी ढोंगबाजी दाखवणार्या व्यक्तीलाच संत मानतात आणि फसतात. त्यामुळेच आपल्या महाराष्ट्रात अनेक भोंदू बाबा दररोज उघडे पडतायत. वारकरी संप्रदायातील संतांनी शिकवलेला शहाणपणा अजूनही आपल्या समाजात नीटपणे रुजलेला नाही.
तुकोबारायांनी प्रस्तुत अभंगात जी कथा सांगितली आहे त्यामागचा विचार या अभंगातल्या तीन चरणात आलेला आहे.
१) प्रेम खरे दिसे जना।
भिन्न अंतरी भावना ।।
२) होता भाव पोटी।
मुखा आलासे शेवटी ।।
३) तुका म्हणे कुडे।
कळो येते ते रोकडे ।।
या तीन चरणात तुकोबाराय एकच मुद्दा सांगतात तो म्हणजे खोटेपणा कधीतरी उघडा पडतोच. खरी भावना आणि वरकरणी केलेलं ढोंग यातला फरक सहजपणे समजतो. ‘मोले घातल्या रडाया। नाही आसू नाही माया ।।’ असं तुकोबाराय म्हणतात. पैसे देऊन रडायला लावलं तर रडणार्या माणसाच्या डोळ्यात पाणीही येत नाही आणि मायाही दिसत नाही. ‘सासूसाठी रडे सून। भाव अंतरीचा भिन्न।।’ असं आणखी एका अभंगात तुकाराम महाराज म्हणतात. वास्तविक पाहता खोटेपणा उघड पडत असला तरी विवेकी माणसाने तो ओळखायलाही शिकलं पाहिजे. आजच्या काळात ज्या मोठ्या प्रमाणात भोंदूबाबांकडून फसवणूक होत आहे त्याचं मूळ आपल्या संतांविषयीच्या संकल्पना अस्पष्ट असण्यात आहे. तुकोबारायांनी त्यांच्या एका अभंगात कोण संत नाहीत, याची यादी दिली आहे.
नव्हती ते संत करिता कवित्व।
संताचे ते आप्त नव्हती संत ।।१ ।।
येथे नाही वेश आडनाव सरते।
निवडे घावडाव व्हावा अंगी ।।२ ।।
नव्हती ते संत धरिता भोपळा।
करिता वाकळा प्रावरण ।।३ ।।
नव्हती ते संत करिता कीर्तन।
सांगता पुराण नव्हती संत ।।४ ।।
नव्हती ते वेदाच्या पठणे।
कर्म आचरणे नव्हती संत ।।५ ।।
नव्हती संत करिता तप तीर्थाटणे।
सेविलिया वन नव्हती संत ।।६ ।।
नव्हती संत माळामुद्रांच्या भूषणे।
भस्म उधळणे नव्हती संत ।।७ ।।
तुका म्हणे नाही निरसला देहे।
तो अवघे हे संसारिक ।।८ ।।
या अभंगात तुकोबारायांनी कोण संत नाहीत हे विस्तारपूर्वक सांगितलं आहे. कवित्व, संतवंशातला जन्म, भोपळा धरणं, वाकळा पांघरणं, कीर्तन, पुराण सांगणं, वेदपठण, कर्मकांड, तप, तीर्थाटन, वनात राहणं, माळामुद्रा घालणं आणि भस्म लावणं ही संतांची लक्षणं नाहीत. देहभावाचं निरसन हेच संतत्वाचं लक्षण आहे. त्यामुळे संत ओळखताना आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. धर्माच्या नावाने फसवणूक करणार्या लोकांसाठी तुकोबारायांचा एक खास शब्द आहे तो म्हणजे धर्मठक. ‘माया ब्रह्म ऐसे म्हणती धर्मठक। आपणासरिसे लोक नागविले ।।’ असं तुकोबाराय म्हणतात. मायाब्रह्मावर प्रवचन करणारे पंडित वास्तवात मात्र धर्मठक आहेत. असे लोक जरी वरकरणी धर्मपंडित म्हणून मिरवत असले तरी त्यांच्या अंतरी मात्र पैसा आणि प्रतिष्ठेची ओढ असते. त्यासाठीच त्यांचा सारा खटाटोप चाललेला असतो.

