मुंबई आणि ठाणे ही एकेकाळी केवळ आर्थिक, औद्योगिक आणि नागरी विकासाची प्रतीकं नव्हती, तर ती एकेकाळी निसर्गाच्या सान्निध्यात फुललेली, विविधरंगी पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येणारी अशी टुमदार शहरंही होती. पण आज या महानगरांचे चित्र झपाट्याने पालटत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाने ४१ अंशांचा टप्पा ओलांडला असून, येत्या दिवसांत त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. वाढत्या उष्णतेचा हा कहर केवळ माणसांच्या अंगाची लाहीलाही करण्यापुरता मर्यादित नाही, तर तो आपल्या पर्यावरणातील अविभाज्य घटक असलेल्या पक्षी आणि प्राण्यांच्या अस्तित्वावरही घाला घालत आहे.
शहरांत सकाळी आठ वाजताच उन्हाची तीव्र धार अंगावर कोसळू लागते आणि दुपारपर्यंत रस्ते अक्षरशः धगधगू लागतात. प्रचंड प्रमाणातील काँक्रीटच्या इमारती, डांबरी रस्ते, वाहनांची वाढती संख्या आणि वातानुकूलित यंत्रणांमधून बाहेर पडणारी उष्ण हवा यामुळे मुंबई-ठाण्यासारख्या शहरांमध्ये ‘उष्णता बेट’ (अर्बन हीट आयलंड) प्रभाव निर्माण झाला आहे. विकासाच्या नावाखाली झाडांची संख्या रोडावत चालल्याने नैसर्गिक सावली नाहीशी झाली आहे, पाण्याचे पारंपरिक स्रोत आटले आहेत आणि थंडावा देणारे नैसर्गिक घटकही नामशेष होत आहेत. या सगळ्याचा सर्वाधिक आणि जीवघेणा फटका बसतोय तो आकाशात विहार करणार्या नाजूक, लहान जीवांना विशेषतः आपल्या लाडक्या पक्ष्यांना.

पक्षी हे मुळात उष्ण रक्ताचे प्राणी आहेत. त्यांच्या शरीरावर जरी पिसांचे आच्छादन असले, तरी ते अशा टोकाच्या उष्णतेपासून त्यांचे पूर्ण संरक्षण करू शकत नाही. जेव्हा पारा चाळिशी पार करतो, तेव्हा त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होऊ लागते. अन्नाच्या आणि पाण्याच्या शोधात सकाळी दूरवर उडणारे पक्षी अनेकदा उष्माघाताचा अंदाज लावू शकत नाहीत. उडता उडता त्यांची शारीरिक शक्ती क्षीण होते, पंखांमधली ताकद संपते आणि ते थेट जमिनीवर कोसळतात. आजकाल मुंबई-ठाण्याच्या रस्त्यांच्या कडेला, इमारतींच्या कोपर्यात किंवा झाडांच्या बुंध्याजवळ मूर्च्छित अवस्थेत पडलेले पक्षी दिसणे हे आता दुर्मिळ दृश्य राहिलेले नाही, तर ते एक वास्तव बनले आहे.
एकेकाळी आपल्या अंगणात आणि बाल्कनीत सहज दिसणारे दयाळ, सातभाई, बुलबुल, चिमण्या आणि सुतार पक्षी आता दुर्मिळ होत चालले आहेत. त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचा नाश हे यामागचे सर्वात मोठे कारण आहे. वाढत्या शहरीकरणाने जुनी डेरेदार झाडे तोडली गेली, मोकळी मैदाने सिमेंटच्या जंगलात रूपांतरित झाली आणि पक्ष्यांसाठी पिण्याचे स्वच्छ पाणी मिळवणे ही आता एक रोजची जीवघेणी लढाई बनली आहे. जेव्हा तापमान ४१-४२ अंशांच्या पुढे जाते, तेव्हा ही तहान त्यांची जीवनयात्रा संपवण्यास कारणीभूत ठरते.
या गंभीर परिस्थितीमध्ये आपण केवळ मूक प्रेक्षक राहून चालणार नाही. आपण माणूस म्हणून आपली नैतिक जबाबदारी ओळखणे आता अत्यावश्यक झाले आहे. निसर्ग संवर्धनासाठी नेहमीच खूप मोठे प्रकल्प राबवणे गरजेचे नसते; आपल्या छोट्याशा कृतीतूनही आपण मोठा बदल घडवू शकतो. पक्ष्यांसाठी पाण्याचे पाणवठे तयार करणे ही एक अत्यंत प्रभावी आणि सोपी कृती ठरू शकते. आपल्या घराच्या बाल्कनीत, खिडकीच्या कट्ट्यावर, गच्चीवर किंवा गृहनिर्माण संस्थेच्या मोकळ्या परिसरात एका छोट्या भांड्यात पाणी ठेवले, तर ते अनेक तहानलेल्या पक्ष्यांसाठी अमृत ठरू शकते. शक्य असल्यास मातीची भांडी किंवा इको- फ्रेंडली वाट्यांचा वापर करावा, कारण त्यात पाणी जास्त वेळ नैसर्गिकरित्या थंड राहते. रोज पाणी बदलणे, भांडे स्वच्छ ठेवणे आणि ते पक्ष्यांसाठी सुरक्षित ठिकाणी ठेवणे या साध्या गोष्टींची जरी आपण काळजी घेतली, तरी या मुक्या जीवांना मोठा आधार मिळू शकतो. काही पक्षीतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, उन्हाळ्यात पक्ष्यांच्या शरीरातील क्षार कमी होतात, अशा वेळी पाण्यात लिंबाचे चार-पाच थेंब आणि काळ्या मिठाचे दोन खडे टाकल्यास त्यांना आवश्यक ऊर्जा आणि क्षार मिळण्यास मदत होते. मात्र, हे करताना पाण्याचे प्रमाण आणि स्वच्छता याकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे.
परंतु केवळ काही घरांमध्ये पाणवठे ठेवून हे संकट टळणार नाही. ही आता एक व्यापक जनचळवळ बनली पाहिजे. प्रत्येक सोसायटी, प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक नागरिकाने यामध्ये हिरीरीने सहभागी होणे गरजेचे आहे. सोशल मीडिया माध्यमांचा वापर करून या उपक्रमाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे, त्यांना प्रत्यक्ष कृतीसाठी प्रेरित करणे ही काळाची गरज आहे. यासोबतच, दीर्घकालीन उपाय म्हणून जास्तीत जास्त झाडे लावणे आणि त्यांचे संवर्धन करणे याला पर्याय नाही. झाडे केवळ आपल्याला सावली देत नाहीत, तर ती वातावरणातील वाढते तापमान नियंत्रित करतात, हवेतील आर्द्रता टिकवून ठेवतात आणि पक्ष्यांसाठी सुरक्षित घरटी बांधण्यासाठी जागा निर्माण करतात. ‘एक झाड एक जीव’ ही जुनी संकल्पना आता ‘एक झाड अनेक जीवांचे जीवन’ अशी विस्तारित करण्याची हीच योग्य वेळ आहे. मुंबई-ठाण्यासारख्या महानगरांमध्ये आता ‘स्पंज सिटी’ आणि ‘कूल रूफ’ यांसारख्या आधुनिक नागरी नियोजनाच्या संकल्पना राबवणे अनिवार्य झाले आहे. पावसाचे पाणी जमिनीत साठवणे, उष्णता परावर्तित करणारी पांढरी छते तयार करणे आणि शहरांमधील ‘ग्रीन कव्हर’ वाढवणे या उपायांमुळे तापमानावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

ज्येष्ठ पशुवैद्य डॉ. युवराज कगिनकर यांच्या मते, उन्हाळ्यात पक्ष्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढण्यामागे केवळ तहान हे एकमेव कारण नसून ‘डिहायड्रेशन’मुळे त्यांच्या शरीरातील अंतर्गत अवयव निकामी होणे हे मोठे कारण आहे. पक्ष्यांना घाम येत नाही, त्यामुळे ते चोच उघडी ठेवून वेगाने श्वास घेतात, जेणेकरून शरीरातील उष्णता बाहेर पडेल. परंतु, जेव्हा बाहेरील तापमान ४० अंशांच्या पुढे जाते, तेव्हा ही प्रक्रिया पुरेशी ठरत नाही आणि पक्षी ‘हायपरथर्मिया’चे शिकार होतात. शहरांमधील सिमेंटच्या बांधकामामुळे निर्माण होणारी ‘रेडियंट हीट’ पक्ष्यांच्या नाजूक फुफ्फुसांना इजा पोहचवते. अशा वेळी केवळ पाणी ठेवून चालणार नाही, तर ते पाणी सावलीत असणे अत्यंत गरजेचे आहे. पाणी उन्हात असेल, तर ते गरम होऊन पक्ष्यांना अधिक त्रास देऊ शकते. तसेच, नागरिकांनी आपल्या बाल्कनीत शक्य असल्यास ‘कोरफडी’सारखी नैसर्गिक थंडावा देणारी झाडे लावावीत, ज्यामुळे पक्ष्यांना थोडा विसावा मिळेल. एखादा पक्षी उष्माघाताने पडलेला दिसला, तर त्याला लगेच पाणी पाजण्याची घाई करू नका. आधी त्याला थंड आणि हवेशीर जागी ठेवा. त्याच्या पंखांखाली आणि पायांवर ओल्या कापडाने हळूवार पुसा. तो शुद्धीवर आल्यावरच त्याला ‘ओआरएस’ किंवा साखरेचे पाणी थेंब-थेंब द्यावे. छोट्या पक्ष्यांसाठी अर्धा लिटर पाण्यात चिमूटभर मीठ आणि दोन चमचे साखर हे मिश्रण संजीवनी ठरू शकते.
आज आपण ज्या वेगाने भौतिक विकास करत आहोत, त्याच वेगाने आपण आपल्या नैसर्गिक संपत्तीचा र्हास करत आहोत. काँक्रीटच्या या अवाढव्य जंगलात आपण स्वतःलाच एका कोंदट वातावरणात अडकवून घेतले आहे, जिथे पक्षी आणि प्राण्यांसाठी आता उरलेली जागा नगण्य आहे. तरीही, अजून सर्व काही संपलेले नाही. आपली एक छोटीशी कृती उदाहरणादाखल एका भांड्यात ठेवलेले पाणी एखाद्या पक्ष्याचा जीव वाचवू शकते आणि त्याच्या चिवचिवाटातून पुन्हा एकदा आपल्या शहरात चैतन्याची चाहूल लागेल. त्या एका पाणवठ्यातून कदाचित आपण आपल्या हरवलेल्या माणुसकीचेही पुनरुज्जीवन करू शकू. उकळत्या उन्हात तहानलेल्या या आपल्या निसर्गमित्रांसाठी जर आपण आज संवेदनशीलतेने पुढे आलो, तरच आपली शहरे खर्या अर्थाने ‘जिवंत’ राहतील. अन्यथा, एक दिवस असा उजाडेल जेव्हा आकाशात पक्ष्यांचे थवे दिसणार नाहीत आणि त्यांचा आवाजही कायमचा नाहीसा होईल आणि ती भयानक शांतता आपल्या या तथाकथित विकासाची सर्वात मोठी आणि न भरून येणारी किंमत असेल. निसर्गाशी सुसंवाद साधणे हाच आता आपल्या जगण्याचा एकमेव मार्ग उरला आहे, हे आपण जितक्या लवकर उमजू तितके ते आपल्या सर्वांच्याच हिताचे ठरेल.

