• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

खाण्यासाठी जन्म आपुला

विलास कुमार (खाणार्‍याने खात जावे )

marmik by marmik
April 18, 2026
in खानपान, विशेष लेख
0
खाण्यासाठी जन्म आपुला

‘मी कोण? माझे ह्या पृथ्वीतलावर येण्याचे प्रयोजन काय?’ असे प्रश्न पडले की मनुष्याचा आध्यात्मिक जीवन प्रवास सुरू होतो असे म्हणतात. ‘मी कुणी का असेना… माझा जन्म खाण्यासाठी झालेला आहे’ अशी ठाम समजूत झाली की मनुष्याचा ‘खाद्य-प्रवास’ सुरू होतो! ‘प्रवास’ ह्या शब्दात सुद्धा त्यांना ‘प्र-वास’ असा खाण्याचा खमंग ‘वास’ आलेला असतो. त्यामुळेच बहुदा ‘प्रवास करणे’ म्हणजे ‘प्रवासात खाणे’ हे समीकरण जुळवलेले असते. तुमचा प्रवास बस, ट्रेन, विमान किंवा जहाज अशा वाहतुकीच्या कुठल्याही साधनाने असो, सगळीकडे खाण्याची सोय ही केलेली असते. काही कामानिमित्तानं प्रवास केला जातो, अशी माझी समजूत होती. पण काही लोकांना पाहून फक्त खाण्यासाठीच हे प्रवास करतात की काय, अशी शंका यायला लागते.

परवा असंच पहाटे उठून सकाळची ट्रेन पकडली होती. चांगली विंडो सीट रिजर्वेशन करून मिळवली होती. तास दीड तास चांगली झोप घेऊन पहाटेच्या साखरझोपेची भरपाई करू असे मनात मांडे खाल्ले होते! शेजारी सह-प्रवासी चांगला भेटणं ह्याला भाग्य लागतं. अशा वेळी माझ्या नशिबात पूर्वजन्मीच्या पापांचा बॅक लॉग भरून काढायचा असे विधिलिखित असावे! उभ्या आयुष्यात (आणि उभ्याने केलेल्या प्रवासात सुद्धा) मला क्वचितच असं ‘सह-प्रवासी-सुख’ मिळालं असेल! मी अगदी एसी ट्रेनच्या ़कंपार्टमेंटमध्ये सुद्धा बाजूला किरटी-रडकी पोरं सहन केली आहेत. अख्खी बोगी शांतपणे निद्राधीन झालेली असताना बाजूच्या कंपार्टमेंटमध्ये सुद्धा नेमका माझ्या शेजारी मोठमोठ्याने घोरणारा मद्रासी अण्णा केवळ योगायोगाने येतो! त्याच्या घोरण्याच्या आवाजाने मला एका बाजूला साप फुत्कारत आहे आणि दुसर्‍या बाजूने कुत्रा गुरगुरत आहे, असे विचित्र स्वप्नही पडते! त्यामुळे ह्यावेळी मनातले मांडे सुद्धा मी डायटवर असलेल्या ‘हेल्दी-बेबी’ सारखे मोजकेच खाल्ले होते.

अन् हाय रे दैवा, ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ सारखी ‘स्वप्नी दिसे ते प्रत्यक्षात भेटे’ अशी म्हण तयार करावी असे झाले. मी सीटवर स्थानापन्न होतोय न होतोय तेवढ्यात वीस पंचवीस गुजराती बायकांची टोळी ट्रेनमध्ये चढली. त्यांनी सोबत प्रत्येकी तीन नग सामान सुद्धा आणलं होतं. वरच्या रॅकवर, सीटखाली जिथे जागा मिळेल तेथे ते कोंबण्यात आलं. तरीही उरलेलं आणि लटकावण्यायोग्य असलेलं माझ्या तोंडापुढे खिडकीच्या हुकांना लावून झालं. कुठेही अगदी छोटीशी फटही रिकामी राहणार नाही याची दक्षता घेण्यात आली. हे सर्व चालू असताना कुक्कुटपालन केंद्रातील कोंबड्यांच्या कलकलाटाला स्पर्धा करेल असा सर्वजणींचा आवाज सुरूच होता. एकमेकींना ओरडत पूर्ण बोगीमध्ये घुमणार्‍या आवाजात सर्वजणी आल्यात की नाही याची दोन-तीनदा हजेरी घेण्यात आली. अशा तर्‍हेने सर्व जवानांनी पोझिशन घेतल्यावर आपला मुख्य शत्रू म्हणजे ‘खान-सामान’ हुडकायला त्यांनी सुरुवात केली! नुकत्याच व्यवस्थित ठेवलेल्या पिशव्या परत अस्ताव्यस्त करण्यात आल्या. शेवटी मनाजोगी भांडी मिळाली. ‘पाणी कुठे गेलं?’ असं गुजराती भाषेत बडबडत एक ‘बेन’ पाणी शोधत होती. अगदी समोर पाण्याची बाटली असूनही तिच्या दृष्टीस ती पडत नव्हती. (मीही तिला ती बाटली न दाखवता मज्जा पाहात होतो!) तिने एक कडी असलेला स्टीलचा डबा उघडला आणि ‘मिळालं’ या अर्थी समाधानाने मान डोलावली. डब्यात कसं काय पाणी आणले म्हणून मी जरा निरखून पाहिले तर गढूळ मातकट पाणी दिसलं. दुसरी ‘बेन’ ‘हे तर गोड पाणी आहे’ असं म्हणून तिखट पाणी शोधू लागली! आता अजून समुद्राचं खारट पाणीसुद्धा काढतील की काय? अशा विचारात असतानाच एकीने पाणीपुरीच्या पुर्‍या बाहेर काढल्या! म्हणजे त्यांचा पाणीपुरीचा बेत होता तर! सभ्य लोक काहीही खात असताना आजूबाजूला कोणीही असलं तरी त्याला ‘खाणार का?’ असं शिष्टाचाराचा भाग म्हणून विचारतात आणि तितकेच सुसंस्कृत शेजारी ‘नको’ म्हणतात. असे काही शिष्टाचार पाळायचे असतात हे त्या बहिणींच्या लक्षात सुद्धा आले नसावे. नपेक्षा तोंडातले पाणी गिळत असलेल्या भावाकडे (म्हणजे माझ्याकडे) त्यांचे लक्ष गेले असते. गुजराती लोकांत पुरुष सगळे एकजात ‘भाऊ’ आणि स्त्रिया एकजात ‘बहिणी’ असे एकमेकांना संबोधित करत असतात. लग्ने जुळवताना कसं बरं करत असतील त्यांनाच माहिती.

एकदा नाशिकला एका किराणा मालाच्या दुकानात गेलो होतो. तेथे दुकानदारासोबत एक बाई कडेवर लहान मुलाला घेऊन आणि दुसर्‍याला दुकानातच अभ्यासाला बसवून उभी होती.

‘एक टूथ ब्रश द्या,’ मी मालकांना माझी अडचण सांगितली.

मालक तांदळाची गोणी उघडण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी त्या बाईला हाक मारून सांगितले, ‘ताई, ह्यांना टूथब्रश दे ‘

‘तुमची बहीण आहेत का?’ खात्री असली तरी काही काही वेळा आपण उगाचच प्रश्न विचारतो, तसे मी विचारले.

‘ नाही, मिसेस आहे ती माझी!’ दुकानदाराने शांतपणे सांगितले.

‘ पण आताच तर तुम्ही तिला ‘ताई’ म्हणालात!’ मी माझे कान बरोबर काम करत असल्याच्या आत्मविश्वासाने म्हटले.

‘ तिचे माहेरचे नावच ‘ताई’ आहे!’ दुकानदाराने स्पष्टीकरण दिले.

आता जगात मुलींची एवढी सुंदर सुंदर ‘विशेष नावे’ असताना तिच्या पालकांनी ‘ताई’ हे ‘सामान्य नाम’ का बरं दिलं असावं? बरं, नंतर लग्न झाल्यावर सासरी आल्यावर तरी नाव बदलायचं… तेव्हा तर छान यमक जुळवून नाव ठेवायचा चान्स असतो! उदा. ‘ सुरेश-समीरा’, ‘रमेश-

रिशा’. आमच्या एका ओळखीच्या गृहस्थाने, ज्याचे नाव ’विलास’ होते, आपल्या बायकोचे नाव ‘ विलासिनी’ ठेवले (आणि तो तिलाच लाडाने ‘विलास’ म्हणायला लागला!) त्यांच्या घरी एकदा मी काही कामानिमित्त गेलो असता त्याच्या वडिलांनी ‘विलास’ अशी हाक मारताच आम्ही तिघांनीही एकाच सुरात ‘ओ’ म्हणून हाकेला प्रत्युत्तर दिले होते! असो.

तर इकडे शीलाबेन, चंपाबेन यांचा कागदी द्रोण काढून आरडाओरडा करत पाणीपुरी खाण्याचा कार्यक्रम चालला होता. आता हे एकदाचं खाऊन झाले की शांतपणे प्रवास करतील असे वाटले होते. पण नाही, कुणीतरी जलेबी- फाफडा आणला होता त्याचा समाचार घेणे चालू झाले होते. जाऊदे, तिखट खाल्ल्यावर काहीतरी गोड खायची सवय बर्‍याच लोकांना असते असे म्हणून मी आपला जांभया आवरत डोळे मिटून बसलो होतो. त्यांचं जलेबी फाकडा खाऊन पाच मिनिटेच होत नाही तर इडली-डोसा अशी आरोळी ठोकत एक विक्रेता डब्यात आला. ‘आता उशीर झाला… सर्वांचा नाश्ता झाला’ असा मनात विचार आला होता. पण नाही, त्या बायांनी त्या इडलीवाल्याला घेराव घातला आणि त्याचा संपूर्ण माल रिकामा केला! मुंबईतल्याच एखाद्या ‘दुष्काळग्रस्त’ भागातून त्या आल्या असाव्यात! भारतातील उत्तरेची पाणीपुरी, मध्य भारताची फाफडा-जिलेबी आणि दक्षिणेकडची इडली असा पूर्ण भारत देश त्यांनी कव्हर केला होता. मी तर म्हणतो मुंबईला अशी रिंगरूटवाली लोकल रेल्वे मंत्रालयाने सुरू करावी, जेणेकरून चार सुखाचे घास अशा खाद्यप्रेमी प्रवाशांच्या मुखी पडतील!

राजस्थानमध्ये एका अशाच टुरिस्ट ट्रेनला ‘पॅलेस ऑन व्हील्स’ असे नाव आहे. ह्या ट्रेनला ‘हॉटेल ऑन व्हील्स’ म्हणायला कुणाची हरकत नसावी. संपूर्ण ट्रेन फक्त एसी बोगी असलेली आणि साहजिकच फक्त श्रीमंत लोकांना परवडणारी- तिचे नाव ‘गरीब रथ’ असे ठेवलेले आहे! (म्हणजे एवढ्या रेल्वेच्या खडखडाडात सुद्धा आपली विनोद बुद्धी रेल्वेवाले शाबूत ठेवून आहेत!) ह्या गरीब रथच्या धर्तीवर आपल्या ट्रेनला ‘उपास रथ’ असे नाव ठेवावे! आतमध्ये दोन सीटांच्या रांगेमध्ये एक डायनिंग टेबल ठेवावे. काटे चमचे मात्र टेबलाला बांधून ठेवावे लागतील! नाहीतर ‘मेडन वोयेज’लाच सर्व गायब होण्याची शक्यता नाकारता येत नाही!

बाकी तुम्हाला असा स्वादिष्ट प्रवास करायचा असेल तर मुंबईहून एकदा गोव्याला जा. अं हं, ते रात्री स्लीपरमध्ये झोपलं अन सकाळी पोहोचलं त्यात काहीच मजा नाही! कोकण रेल्वेची सकाळची ट्रेन पकडा. पावसाळा संपत आल्यावर किंवा श्रावणातला एखादा दिवस असेल तर उत्तम मुहूर्त समजावा! सकाळी अर्धा पाऊण तास मस्त डुलकी घेऊन झाली की वाफाळता चहा प्यावा. अर्ध्या तासाने नाश्त्याचा टाईम झाल्यावर गरम गरम आंबोळीची ऑर्डर द्यावी. बुधवार, शुक्रवार असेल तर ब्रेड-आम्लेट, टोमॅटो सॉस लावून खावं. पंधरा मिनिटांनी कडक कॉफी प्यावी. गाडी चढतानाच पॅन्ट्री कारचा डबा कुठे आहे हे पाहून घ्यावे. त्यामुळे पॅन्ट्री कारकडून येणारे जिन्नस (जे तेव्हा गरमागरम असतात ) खायला मिळतील. पोहे पत्रिकेत असलेल्या मंगळामुळे कुठेच लग्न न जुळलेल्या मुलासारखे स्वातंत्र्य अबाधित राखलेले असे मिळतील. शिरा-उपमा मात्र जोडीनेच एकत्र नांदताना दिसतील. साडेअकरा बाराच्या सुमारास बाहेर एखादी पावसाची सर भर्रकन पूर्ण ट्रेनला आंघोळ घालून जाईल, त्या वेळी अजून एका गरम चहाची तलफ भागवावी. बाहेरून येणारे थंडगार वारे थोपून धरण्यासाठी ही त्याचा उपयोग होईल. तेवढ्यात ‘ए गॅरम सूप’ अशी आरोळी ऐकू आली की समजायचं जेवणाची वेळ झाली! सूपवाल्याच्या मागूनच ‘लंच लंच’ करत दुसरा माणूस येतो. टोमॅटो सूप घेऊन लगेच आपली जेवणाची ऑर्डर देऊन टाकावी. आजकाल प्लास्टिकचं कप्प्याकप्प्यांचं आणि वरून पूर्ण झाकून पॅक केलेलं असं ताट दिलं जातं. पूर्वी स्टीलच्या ताटात दिलं जायचं. ह्या थाळीत दोन चपात्या, सुकी भाजी, पातळ भाजी, वरण-भात आणी लोणचं असं सात्विक अन्न मिळेल. व्हेज बिर्याणी किंवा चिकन बिर्याणीसुद्धा मिळतेच. त्यानंतर गरम गुलाब जामुन ही स्वीट डिश येते. तळहातात मावेल अशा छोट्या छोट्या मातीच्या मडक्यात केलेलं दही सुद्धा छान लागतं. चार वाजण्याच्या सुमारास कांदा भजी किंवा मेथी भजी तळली जाते! अशा प्रकारे दिवसभर खाण्यापिण्याच्या पदार्थांची रेलचेल असते! (रिकामटेकडे… सॉरी; जिज्ञासू आणि उत्साही वाचक असाल तर गृहपाठ समजून ‘रेलचेल’ ह्या शब्दाची उत्पत्ती शोधावी!) असे छान जिभेचे चोचले पुरवत असताना बाहेर दिसणारे हिरवेगार पाचूचे डोंगर, नागमोडी वळणे घालत शांत वाहणार्‍या नद्या आणि छोटे छोटे डोंगरावरून खळखळत उड्या मारत खाली येणारे धबधबे असे मनोहारी दृश्य पाहणं म्हणजे अगदी अविस्मरणीय असा अनुभव असतो.
उत्तम खाद्य-प्रवासाची जोड असेल तर आपला जीवनप्रवासही काहीसा असाच चालत असतो, नाही!

Previous Post

चौरंगी विहीणबाई योजना!

Next Post

खणखणीत बंदा रुपया!

Next Post
खणखणीत बंदा रुपया!

खणखणीत बंदा रुपया!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.