• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

खिडकीबाहेरचे जग

निरंजन घाटे (ललीत लेख)

marmik by marmik
April 16, 2026
in विशेष लेख
0
खिडकीबाहेरचे जग

समाचाराला मित्र आला होता. मी नुकताच एका मोठ्या दुखण्यातून उठलो होतो. नमस्कार चमत्कार झाले. मग मित्राने विचारले,’ का रे टाईमपासला काय करतोस?’ ‘खिडकीबाहेर बघतो. कॉटसमोरच्या खिडकीतून जेवढं दिसतं, तेवढं बघतो. जास्त हालचाली करायच्या नाहीत असा डॉक्टरांनी दम दिलाय.’ मित्राने त्याच्याकडे जरा विचित्र नजरेने बघितले. ’इथून तुला टाईमपास होईल इतकं काय दिसतं? ’मित्राने विचारलं. ’बरंच दिसतं, त्याहीपेक्षा जास्त ऐकू येतं.’

मी त्याला सांगितलं. त्यावर त्याचा विश्वास बसला नाही, हे त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होते.

त्यावेळी सर्वात जास्त आवाज दोन पक्षी करीत असत. पारवे आणि बुलबुल.साधारणपणे उन्हाळ्याच्या थोडं आधी त्यांची गडबड सुरू होत असे. बुलबुल गवताच्या लांब काड्या आणि पानांच्या मधल्या शिरा एखाद्या, त्यांच्यादृष्टीने सुरक्षित जागी गच्च बांधत. माझे या बुलबुलांच्या बाबतीतले एक दोन अनुभव सांगतो. तेव्हा आम्ही दुसरीकडे राहात होतो. स्वयंपाकघरात खिडकीला सरकत्या काचा होत्या. दिवसा जेव्हा तिथे आमचा वावर असेल, तेव्हा काचा उघड्या असत. त्यावेळी एक बुलबुल घर त्याचंच आहे, अशा रुबाबात स्वयंपाकघरात येई. त्याच्या आवाजाला पुढे आम्ही सरावलो. त्या खिडक्यांवर सरकणारे पडदे होते. ते बंद असले की बुलबुल महाराज वैतागून कलकलाट करीत. त्या खिडकीतून बुलबुलांशिवाय पारवेही आत येत. ते खूप घाण करीत. त्यामुळे रात्री आम्ही त्या खिडक्या बंद करायचो. हे पारवे नुस्तीच घाण करीत असं नाही तर वेळीअवेळी घुमत. काही वेळा त्यांच्या मारामार्‍या व्हायच्या. पारव्यांबद्दल इथं लिहित नाही, ते इतरत्र लिहिलं आहे तरीही ज्या कुणी कबुतरांना शांततेचे प्रतीक ठरवले, त्याने त्याच्या आयुष्यात कधीही कबुतरं जवळून बघितलेली नाहीत हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो.

आमच्या खिडकीबाहेर बुलबुल येत.सध्याच्या जागेत आल्यावर जेव्हा माझ्यावर सक्तीची विश्रांती लादली गेली, तेव्हा बुलबुलांनी मला साथ दिली. आपण कसलीही हालचाल न करता शांतपणे बसून राहिलो की त्यांचे उद्योग आरामात पाहता येतात. आपल्याला दोन बुलबुलांमध्ये फरक करता येत नाही. त्यासाठी पुतळा बनून बसावं लागतं. तरच नर मादी यात फरक करता येतो.

आमच्या खिडकीबाहेर दोन बुलबुल येतात. मध्ये एकदाच एक तुरेवाला बुलबुल दिसला होता. एरवी लाल बुडाचे रेड व्हेंटेड बुलबुल असतात. आमच्या खिडकीसमोर दोन वायरी होत्या. कुणाच्या तरी टीव्ही अँटेनाच्या किंवा केबलवाल्याच्या असाव्यात. त्यांच्यावर बसून दोन बुलबुल झोके घेत द्वंद्वगीत गात.त्या वायरी गेल्यावर ही गंमत गेली. तेव्हा माझ्याकडे मोबाईल नव्हता. नंतर सुद्धा बरेच दिवस माझ्याकडे कॅमेरा असलेला फोन नव्हता.बरं घरात कुणाला हाक मारली तर त्यांच्या हालचालीमुळे ते बुलबुल उडून जात.
एकदा एक अगदी छोटं पिल्लू आमच्या संडासाच्या खिडकीतून आत आलं. बहुदा त्याचा उडायचा पहिला प्रयत्न असावा. दमून त्यानं मिळेल तो आधार घेतला असावा.सवितानं त्याला उचलून ओंजळीत ठेवून त्याच्याशी बोलत बोलत बाहेरच्या खोलीच्या खिडकीच्या जाळीत ठेवलं. त्यानंतर बहुतेक त्याचा किलबिलाट ऐकून त्या पिल्लाची आई आली असावी आणि तिनं त्याला उडायला शिकवलं असावं. हे म्हणतो याला कारण आहे. ते आमच्या शेजारच्या फ्लॅटच्या खिडकीत बसलं. तिथून ते समोरच्या सोसायटीच्या तारेवर एका मोठ्या बुलबुलाबरोबर दिसलं. बुलबुल मादीला काय म्हणतात ते ठाऊक नाही, पण पिल्लांची जोपासना करण्यात नर बुलबुल अत्यल्प भाग घेत असावा हा माझा अंदाज आहे. नर बुलबुलाचा गळा मोरपंखी रंगाचा दिसतो आणि तो गातो. पिल्लाबरोबर असलेल्या मोठ्या बुलबुलाचा गळा साधा आणि आवाज थोडा कर्कश वाटत होता, म्हणून ती मादी असावी असा अंदाज मी बांधला. बरोबर आहे असा माझा दावा नाही. त्यानंतर बराच काळ एक बुलबुल आमच्या खिडकीच्या जाळीवर येऊन बसत असे. बराच वेळ किलबिलाट करून घरातलं कुणी जाळीजवळ गेलं की शांत होत असे. सविता गेली तर जाळीच्या दोन तीन दांड्यांवर उडून बसायचा. नंतर जायचा. माझ्या दृष्टीने त्याला एक वाईट सवय लागली होती. मी एकदा जुन्नरला भाषणाला गेलो असताना तिथल्या आयोजकांनी आम्हाला- आम्ही तिघं जण गेलो होतो- खास मेजवानी दिली होती. एका धरणाच्या अडवलेल्या पाण्याच्या साठ्याकाठी मत्स्यभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. तिथे बाया पक्ष्यांची सोडून दिलेली खूप घरटी होती. त्यातले एक मी आणून आमच्या खिडकीवर बसविलेल्या जाळीत टांगले होते. या बुलबुलाला ते आवडले. घरटे बांधण्यासाठी तो त्या घरट्याच्या काड्या खूप धडपड करून सोडवून न्यायचा. त्याच्या या उद्योगाला पर्याय म्हणून त्याच जाळ्याबरोबर आणलेले दुसर्‍या अर्धवट बांधून सोडून दिलेल्या जाळ्याचे अवशेष तिथेच शेजारी टांगले. ते काढून न्यायला सोपे होते. का कोण जाणे, तिकडे हा बुलबुल दुर्लक्ष करत होता. त्या घरट्याशी झटापट केल्याखेरीज त्याचे समाधान होत नसे.

आमच्या इमारतीत तेव्हा खूप पारवे होते.त्यातले एकदोन पारवे आमच्या घराच्या खिडकीतून नेहमी घरात डोकावून बघत.खिडकीजवळ कुणी नसेल तर घरात येत माणसांची चाहूल लागली की घाईघाईने बाहेर पडायचा प्रयत्न करीत. काही वेळा खिडकीच्या गजावर आपटून खाली पडत मग धडपड करून बाहेर जमेल तसे बाहेर जात. एकदा एक पारवा पकडून मी हिरण्मयीला दाखवला. मग त्याला बाहेर सोडून दिला. त्यानंतर त्यांचं घरात डोकावून बघणं कमी झालं. मध्यंतरी पारवे दिसेनासे झाले होते. अलिकडे परत दिसायला लागले आहेत.
खिडकीबाहेरच्या जाळीत एका कुंडीत ब्रह्मकमळाची पानं खोचून ठेवली होती. ती रुजली. त्यांना दोन तीन वर्षे खूप फुले आली.नंतर त्यांच्या पानांच्या कडांमधून मुळं फुटायला लागली. आता ती दुसरीकडे लावणं आणि कुंडीतील माती बदलणं या दोन गोष्टी करायला हव्या होत्या. दरम्यान माझं आणखी एक आजारपण उद्भवलं. पंधरा दिवस रुग्णालयात होतो. त्यामुळे कुंडीतील झाडांकडे दुर्लक्ष झालं. एक दिवस घरातल्या खिडकीतून बर्‍याच माशा घोंघावू लागल्या. हातातल्या वृत्तपत्राने एक माशी मारेपर्यंत त्यातल्या एका माशीने डंख केला. चांगलीच आग झाली. पेपरवरच्या मेलेल्या माशीमुळं ती कुंभार माशी असल्याचे स्पष्ट झाले. ताबडतोब घरातील सर्व विजेची सॉकेट्स त्यात प्लग बसवून किंवा चिकटपट्ट्या लावून बंद केली.
अलिकडे कुंभार माशा बघायला मिळत नाहीत. सर्वत्र गृह निर्माण संस्थांमध्ये फरसबंद जमिनी झाल्या आहेत. कुंभार माशांना त्यांची घरटी बांधण्यासाठी थोडा ओलावा लागतो.त्या सुरक्षित जागी माती लिंपून त्यांचे घरटे बनवतात. आमच्या ब्रह्मकमळाच्या पानाखाली यावेळी कुंभार माशांनी घर केलं होतं. त्या वजनाने ते पान वाकलं होतं. पाणी घातल्यावर इतर पानांनी उभारी घेतली पण हे पान वाकलेलंच राहिलं. मी ते तोडून केरात टाकलं आणि केर नेणार्‍या मुलीला दिलं. दोन दिवस कुंभार माशा घरटं शोधत फिरत होत्या. मग नाहीशा झाल्या. त्यानंतर काही काळातच डॉक्टरांनी मला पूर्णवेळ अंथरुणाधिपती केलं.आता खिडकीवर बसणारे बुलबुल, समोरच्या इमारतीत इकडे तिकडे फिरणारे पारवे, मधूनच येणार्‍या फुलपाखरांची आणि पतंगांची घरात आल्यावर परत बाहेर जाण्यासाठीची धडपड ही एक करमणूक आहे.

पक्ष्यांचे आवाज ऐकून बरंच काही कळायला लागलंय. अगदी पहाटे ते उन्हं वर येईपर्यंत खारी ओरडून धिंगाणा घालतात.पाऊस येणार असेल तर वटवट्यांचे ओरडणे ऐकू येते. रात्री कधीतरी घुबड बहुदा कावळ्याच्या पिल्लाची शिकार करते. तो कर्कश आवाज येतो आणि संपतो. कधीकधी घुत्कार ऐकू येतो. हा श्रृंगी घुबडाचा- पूर्वी दांडेकर वाड्यात ते येत असे. मुंबई, माधव नगर यामुळे तो आवाज मला ओळखता येतो. पिंगळ्याचा आवाज लहान मुलासारखा वाटतो.आमच्या इमारतीत उंदीर होते तेव्हा पिंगळा (छोटे घुबड) दिसायचे. अलिकडे त्यांची चाहूल लागत नाही.

आणखी काही आवाज हुकमी झाले.पूर्वी रोज रात्री कुत्र्यांच्या टोळ्या हिंडायच्या. रात्री रिक्षावाले आमच्या भागात यायला नकार द्यायचे. रात्रपाळीचे लोक कसेबसे घरी पोचले की सुटकेचा नि:श्वास टाकायचे. बरं कुत्र्यांना मारणं हा गुन्हा आहे. माणूस मेला तरी चालेल.एकाएकी काय झाले माहित नाही पण ही कुत्र्यांची कटकट अचानक टळली. रात्री शांत झोपणं शक्य होऊ लागलं. आता सटीसहामाशी त्यांचा दुरून आवाज येतो. तेवढंच. त्याऐवजी कोणी करंटा रात्री बेरात्री जोरात आवाज करत फटफटीवरून एक दोन वेळा चक्कर मारतो. हा मानवी कुत्रा कुणी आवरला तर बरं होईल.

आणखी दोन आवाज अधूनमधून ऐकू येतात. साधारणपणे वर्षातून दोन वेळा ते कानी पडतात. आधी मांजरांचं प्रणयगान, मग फिस्कारणं. दोन महिन्यांत दोन वेगळ्या पद्धतीने निघणारे आवाज. एक म्हणजे पिल्लांना भाटी जवळ बोलावते तो. दुसरा भाटी हरवलेल्या पिल्लाला शोधते तेव्हाचा आर्त स्वर.दोन तीन दिवसांत तो बंद झाला की समजायचं, पिल्लू बोक्यानं खाल्लं किंवा कुत्र्यानं मारलं. काही वेळा अगदी छोटं पिल्लू घार उचलून न्यायची. तेव्हा पिल्लाची आई फिस्कारायची. कुत्रं असेल तर मग त्या खवळलेल्या आईच्या आक्रमक फिस्कारण्यानं अख्खी सोसायटी जागी होत असे. जेव्हां आई आणि पिल्लाची भेट व्हायची तेव्हां तो जल्लोष बघणं किंवा ऐकणं ही और मजा असते.

पूर्वी कु कू चकू ही पहाट झाल्याची निशाणी होती. आता कोंबडा चित्रातूनच बघायला मिळतो. केसाचा कोंबडा मागे सारत म्हणजे काय, हे समजून सांगायला गेलो तर कोंबडा म्हणजे चिकनचा हसबंड असं सांगावं लागतं. चिकन हे मात्र बरोबर कळतं. चिकन म्हणजे पक्षी म्हटलं की म्हणजे कावळ्यासारखा कां, अशी विचारणा होते. आता सकाळी उठवायची जबाबदारी कोंबड्याकडून कावळ्याकडे गेली आहे. त्यामुळे ते मान्य करावं लागतं. कावळा उडू शकतो कोंबड्याला उडता येत नाही, हे सांगायचं धाडस होत नाही कारण त्यात अनेक उपप्रश्न संभवतात. पहाटे चारपासून कावळ्याची कावकाव सुरू होते. कावळे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढतात. क आणि क्र वेगवेगळ्या प्रकारे तोंड वेंगाडून म्हटले की आपण थोडे फार त्यांच्या आसपास पोहोचतो.
पहाटे आवाज सौम्य असतो. नंतर दिवसभरात तो बदलत जातो. कावळे कधी एकटे खात नाहीत. सर्व गोतावळ्याला बोलावून घेतात. मग त्यांचा कल्ला सुरू होतो.

कधीकधी सकाळी नऊ वाजता आणि दुपारी चार वाजता- पाच दहा मिनिटं इकडेतिकडे- एक घार ओरडते. तिची साद बहुदा आता काम सुरू आणि काम संपलं, घरी परत, ही सूचना ती देत असावी.

कोकिळ कूजन हा एक चुकीचा शब्द आहे.शांततेचा दूत म्हणजे कबुतर हे जितकं चुकीचं आहे, तितकच कोकीळ मधुर आवाज करतो हे म्हणणंही मला चुकीचं वाटतं. आजकाल रात्री बेरात्री कोकीळ बोंबलत असतात. वैताग येतो.

आणखी एक आवाज पालीचा. रात्री चुकचुक असा आवाज ऐकू आला की समजावे घरात पाल आली. टाईल्स असल्या की पांढरी धोप. काळ्या फरशीवर मलीन रंग. अशी पाल आली की झुरळं गायब. एकदा मी अचानक स्वयंपाकघरात गेलो. पालीची गडबड झाली. ती भिंतीवरून पडली ती सिंकमधे असलेल्या भांड्यातल्या पाण्यात पडली. मी तिला मदत करायची म्हणून एक लांब दांड्याचं उलथनं त्या भांड्यात ठेवलं. ती पाल ,नर की मादी ते माहीत नाही, घाईघाईत त्या उलथन्यावर चढून बाहेर यायचा प्रयत्न करू लागली. दोन तीन प्रयत्नांनंतर भांड्याच्या कडेवरून नळावरून उडी मारून खिडकीतून बाहेर गेली.
हे आहे माझं खिडकीबाहेरचं जग. मला हळूहळू चालायची परवानगी दिली आहे.वयोमानपरत्वे वेळ लागेल पण एक ना एक दिवस मी खिडकीपाशी जाऊ शकेन. बाहेर डोकावून पाहू शकेन. काही नवीन अनुभव घेऊ शकेन असं मला वाटतं. बघूया काय होतं ते.

Previous Post

गोष्ट एका नदीची आणि दोन देशांची!

Next Post

अजबाच्या देशात

Next Post
अजबाच्या देशात

अजबाच्या देशात

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.