
देवेंद्र फडणवीस
किती मासे हे किती मासोळ्या
सापडतील का आणखी जाळ्यात
त्याचीच वाट पाहतोय आता
प्राण माझे आणून डोळ्यात

महायुतीत तर सगळाच लोच्या
त्यांचेच पाय त्यांच्याच गळ्यात
दोन पक्षांची लफडीच भारी
पक्षही त्यांचे खोल खोल तळ्यात
मंत्रीपदेही भुषवून सगळी
महायुतीला लावला बट्टा
ढोंगी बुवाच्या नादी लागता
मिळेल शेवटी माझा रट्टा
रुपाली चाकणकर
सात्विक भोळी नार असे मी
रुपगर्विता म्हणती मजला
जे जे पवित्र उदात्त उन्नत
त्याच्यासाठी जीव हा झिजला

देवभक्ती नि गुरुश्रद्धाही
मानून तर मी केले सगळे
ऐकत नाही माझे कुणीही
चोच मारिती कावळे बगळे
ब्र ना काढणार त्यांच्याविषयी
गुरू माझे ते नसती लंपट
व्हिडिओ खोटे सगळे खोटे
बघणारे तुम्ही आहात चावट
एकनाथ शिंदे
भविष्य माझे जाणून घ्याया
उत्सुकतेने एकटाच गेलो
नंतर आले मंत्री आमदार
सगळे त्याच्या कृपेत न्हाले

तंत्र-मंत्र विधी उपाय त्याचे
कोण सांगतो मी ते केले?
काय पुरावा तुमच्यापाशी
गौहातीत त्या काय काय झाले?
ज्याच्या कृपेने पावन झालो
मोदी-शहाही दैवत माझे
फडणवीस हा दुवा त्यातला
एवढेच फक्त मलाही उमजे
जनता
कसले मंत्री कसले नेते
अंधश्रद्धेचा बाजार सारा
जनसागर हा झाला प्रदूषित
जनता गाठीला कसा किनारा?

भोंदू बुवाच्या नादी लागूनी
भविष्य म्हणती होते उज्ज्वल
गंडे दोरे ताईत लेवून
होते का हे मन हे निर्मल?
ज्यांनी द्यावा बोध जनांना
ते नेतेही झाले आंधळे
का ठेवावा आदर्श त्यांचा
त्यांनी केले जन हे दुबळे
अशोक खरात
इतका मार खाऊनसुद्धा
बोलायचे ते बोललोच नाही
कितीतरी गुपिते अजून कुलुपात
रहस्य त्यांचे खोललेच नाही
एकेकाची बिंगे फोडली तर
होतील सगळे उघडे वाघडे
तेवढी जाण आहे मजला
करणार नाही त्यांचे वाकडे

मी मेल्यावर माझ्या मागे
पुुरुन टाकतील त्यांचे गुन्हे
नामोनिशाणही नाही राहणार
बिनधास्त होतील त्यांची मने

