
आठवड्याच्या मध्ये म्हणजे बुधवारी कुठल्यातरी सणाच्या निमित्ताने अचानक सुट्टी मिळालेली. अशा मध्येच आलेल्या सुट्टीत आम्हा हॉस्टेल मधल्या मुलांची मात्र त्या दिवशी मेस बंद असल्या कारणाने गैरसोय व्हायची. शेजारच्या एकमेव हॉटेलमध्ये मग नाईलाजाने खावे लागायचे. त्या हॉटेलात एका टेबलवर शाकाहारी थाळीची ऑर्डर देऊन बसलो होतो तेवढ्यात तेथे मुकुलू आला. मुकुलू आमच्या कॉलेज मध्ये आप्रिâकेतील ‘टांझानिया’ मधून आलेला विद्यार्थी होता. आमच्याच हॉस्टेल मध्ये राहायचा. ‘मुकुलू कालागांडो’ हे त्याचे पूर्ण नाव. (आम्ही त्याला काळ्या-गांडोचा मुकुलू म्हणायचो !) माझ्या शाकाहारी थाळीला पाहून तो त्याच्या आप्रिâकन इंग्रजीत म्हणाला ‘आर यू अ व्हेजिटेरियन?’ (खरे तर त्या दिवशी बुधवार असूनही माझा मासे किंवा इतर काही मांसाहारी खाण्याचा मूड नव्हता.) आता ह्याच्या इंग्रजीत कुठे त्याला समजावत बसणार म्हणून मी आपले त्याला ‘यस, आय अॅम व्हेजिटेरियन’ असे खोटेच संगितले.
‘डू यू ड्रिंक मिल्क?’ मुकुलू काही मला सुखासुखी सोडायला तयार नव्हता.
त्याला काहीतरी थातुर-मातूर उत्तर देऊन मी गप्प केले, पण इकडे माझे विचारचक्र सुरू झाले. मुकुलू च्या प्रश्नाचा रोख ‘दूध सुद्धा मांसाहारी पदार्थाच्या यादीत येते’ असा होता. तसा विचार केला तर दूध हा ‘प्राणीजन्य पदार्थ’ असल्यामुळे त्याची गणना ‘मांसाहारी’ पदार्थात केली पाहिजे. पण भारतात तर शाकाहारी मंडळींचा दूध हा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. दुधाला नुसते शाकाहारीच नाही तर ‘सात्विक’ अन्नाचा दर्जा दिलेला आहे. ‘दुधाने देवाच्या मूर्तीला आंघोळ घालणे या सारखे पवित्र काम दुसरे नाही’ असे मानणारा एक वर्ग आहे तर, ‘अशा प्रकारे दूध वाया घालवण्या पेक्षा गरजू बालकांना ते प्यायला दिले पाहिजे’ असे ठासून सांगणारा एक वर्ग आहे. त्या वादात आपल्याला पडायचे नाही. दूध जर शाकाहारी असेल तर कोंबडीचे अंडे का मांसाहारी? ते सुद्धा प्राणीजन्य पदार्थचं आहे ना? ज्याने-त्याने आपल्या सोई नुसार प्रत्येक पदार्थाचे शाकाहारी-मांसाहारी असे वर्गीकरण केले आहे आणि त्या नुसार आपल्या ताटात समाविष्ट केले आहे! ज्या लोकांनी दुधाला मांसाहारात गणले आहे व त्यामुळे दूध वर्ज केले आहे त्यांना ‘वेगन्स’ म्हणतात. हे लोक दूध आणि दुग्ध-जन्य असे कोणतेच पदार्थ खात नाहीत. त्या बरोबरच मासे, अंडी येवढेच नव्हे तर ‘मध’ सुद्धा खात नाहीत ! ते फक्त वनस्पतीवर गुजराण करतात.
सर्व सस्तन प्राणी आपल्या बाळाला प्राथमिक वाढीसाठी दूध देतात हे तुम्हाला माहीतच असेल. मनुष्य देखील ह्याच प्रकारात मोडत असल्यामुळे साहजिकच आपण ही लहानपणी आईचे दूध पित मोठे झालो. जमिनीवर बरेच सस्तन प्राणी आढळतात. पण एक मासा असा आहे जो आपल्या पिल्लाला दूध पाजतो! नाही व्हेल मासा इतर माशांसारखा अंडी न घालता पिल्लं जन्माला घालतो, पण त्यांना दूध पाजू शकत नाही. त्या माशाचे नाव आहे ‘डिसकस मासा’. ह्याच्या शरीरावर एक प्रकारचा चिकट द्राव तयार होतो. ह्या माशाची पिल्ले काही दिवस ह्या दुधावर पोसले जातात.
दूध हे अतिशय पौष्टिक आणि आरोग्यासाठी महत्त्वाचे अन्न आहे. दूध हे प्रामुख्याने गायी, म्हशी, शेळी यांसारख्या प्राण्यांकडून मिळणारे द्रव अन्न आहे. लहान बाळासाठी तर ते पूर्ण अन्न मानले जाते. मनुष्य सोडल्यास बाकी कुठल्याही प्राण्यांचे पिल्लू मोठे झाले की दूध पीत नाही. त्यामुळे पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यानेच दूध का प्यावे? असा प्रश्नही काहीजण उपस्थित करतात. गायीचे दूध हलके आणि पचायला सोपे असते. म्हशीचे दूध जाड आणि चरबी युक्त असते. टोन्ड दूध म्हणजे चरबी कमी केलेले तर स्किम्ड दूध म्हणजे जवळजवळ चरबी नसलेले असे आधुनिक दुधाचे प्रकार आहेत. दुधात अनेक महत्त्वाचे पोषक घटक असतात. दुधातील प्रथिने शरीराची वाढ आणि स्नायू मजबूत करतात. कॅल्शियम हाडे आणि दात मजबूत करतात. व्हिटॅमिन्स (A, ँ१२, D) – शरीर निरोगी ठेवतात. दुधात
लॅक्टोज नावाची नैसर्गिक साखर असते. ती आपल्याला ऊर्जा देते.
दुधाचे फायदेही पुष्कळ आहेत. दुधामुळे हाडे मजबूत होतात. शरीराला ऊर्जा मिळते. मुलांच्या वाढीस मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर आहे.
दुधाचे काही तोटेही आहेत. काही लोकांना ‘लॅक्टोज इन्टॉलरन्स’ असते. म्हणजे दूध पचतच नाही. दुधाची काहींना अॅलर्जी होऊ शकते.
दूध अगदी लवकर खराब होते. दुधाचे ‘शेल्फ लाईफ’ अगदी काही तासांचेच असते. पूर्वीच्या काळी म्हणूनच दूध आटवून बर्याच प्रकारच्या मिठाया तयार करण्यात येत. तसेच दुधापासून बनणारे इतर पदार्थ म्हणजे दही, ताक, पनीर, लोणी, तूप इत्यादी थोडे अधिक काळ टिकत असल्यामुळे बनवले जात. दुधापासून अनेक प्रकारच्या मिठाया बनवल्या जातात.पेढे, बर्फी, गुलाबजाम, रसगुल्ला, बासुंदी आणि उन्हाळ्यात आवर्जून खाण्यात येणारे सर्वांचे आवडते ‘आईस्क्रीम’ ही दूध वापरून बनवले जाते. सणासुदीला मात्र मिठाईची मागणी अचानक वाढल्यामुळे दुधाची साहजिकच कमतरता भासते त्यावेळेस नकली मावा वापरून मिठाई बनवली जाते.एरवीसुद्धा दुधाची मागणी खूपच असल्यामुळे वनस्पतीजन्य पदार्थ पासून दूध बनवले जाते. बदाम, सोया आणि ओट्स या
वनस्पती पासून दूध बनवले जाते. बदाम दुधात लॅक्टोज नसते. सोया दूध काही शाकाहारी मंडळी पसंद करतात. ह्याचे जास्त प्रमाणात सेवन केले तर हार्मोन्स वर परिणाम होऊ शकतो. चवीला पण हे काही खास लागत नाही.ओट्स पासून बनवलेले दूध हृदयासाठी चांगले असते.
दूध सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी पिणे चांगले. पैलवान लोकं दुधाचा रतीब लावतात. दिवसाला पाच पाच लिटर दूध रिचवतात.
मुलांना दिवसातून एक दोन ग्लास दूध पुरेसं होतं. प्रौढ लोकांनी रोज एक ग्लास प्याले तरी चालेल. ज्येष्ठ नागरिकानी दोन ग्लास
कॅल्शियमसाठी प्यायला हरकत नाही. जर तुम्ही इतर कॅल्शियमयुक्त पदार्थ (दही, पनीर) खात असाल, तर दूध कमी घेतलं तरी चालेल.
दूध आपल्याला त्याच्या मूळ रूपापेक्षा वेगळ्या रूपात नेहमीच भेटत असते. दूध आंबवून दही बनवतात. हे पचनासाठी खूप चांगले असते. भारतभर सर्वत्र दही आपल्या जेवणातला भाग झालेला आहे. दह्या पासून बनवलेलं ताक उन्हाळ्यात जास्त उपयोगी पडते. दह्यापासून किंवा सायपासून लोणी बनवतात. चवीला मऊ आणि स्वादिष्ट असलेल्या लोण्यापासून तूप लोणी गरम करून बनवतात. तुपाचा भारतीय स्वयंपाकात खूप वापर केला जातो.
आरोग्यासाठी तुपाचे महत्व अनन्यसाधारण म्हणून गणले जाते. गरम दुधात लिंबू पिळले की त्याच्या गुठळ्या होतात. ह्यालाच दूध ‘फाडणे’ असे म्हणतात! दूध ‘फाडून’ पनीर बनवतात. प्रथिनांनी भरपूर असलेल्या हा पदार्थ वापरून बर्याच प्रकारच्या भाज्या तयार केल्या जातात. दूध,तांदूळ आणि साखर वापरून खीर बनवतात.
सणासुदीला खास मिठाई बासुंदी / रबडी दूध आटवून बनवतात.
‘चीज’ हा दुधापासून बनवलेला पाश्चिमात्य पदार्थ. पिझ्झा, सँडविचमध्ये ह्याचा भरपूर प्रमाणात वापर केलेला असतो.
भारत हा जगातील क्रमांक एकचा दूध उत्पादक देश आहे. भारतातील दूध उत्पादन २०२४–२५ मध्ये: सुमारे २४७ दशलक्ष टन दूध उत्पादन झाले. जगातील एकूण दुधाच्या उत्पादनात भारताचा वाटा सुमारे २५ टक्के आहे.
सुमारे ८–९ कोटी शेतकरी दुग्ध व्यवसायाशी जोडलेले आहेत. डेअरी उत्पादन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्त्वाचा व्यवसाय आहे.
मागणी भरपूर असल्यामुळे आणि अपुर्या पुरवठ्यामुळे दुधातील भेसळ करण्याचे प्रमाण वाढलेले आहे.
भेसळ म्हणजे दुधात जाणूनबुजून बाहेरील पदार्थ मिसळणे, ज्यामुळे त्याची गुणवत्ता कमी होते आणि आरोग्यास धोका निर्माण होतो.
दुधात पाणी, स्टार्च, डिटेर्जंट किंवा साबण एवढेच नव्हे तर युरिया सारखे पदार्थ वापरून भेसळ केली जाते. आता तर काही केमिकल्स वापरून बनवलेले ‘सिंथेटिक दूध’ सुद्धा बनवले जाते. असे भेसळयुक्त दूध प्यायल्यास पोटदुखी, उलटी, जुलाब असे आरोग्यावर ताबडतोब होणारे दुष्परिणाम दिसतात. दीर्घकाळ असे दूध प्यायलास किडनीवर परिणाम होतो लहान मुलांच्या वाढीवर सुद्धा वाईट परिणाम होऊ शकतो.
एवढे होऊन सुद्धा दुधाचे आपल्या ताटातील स्थान अढळ आहे. दूध हा शब्द वापरून अनेक म्हणी आणि वाक्प्रचार तयार झाले आहेत. हे प्रामुख्याने अनुभव, शहाणपण किंवा व्यवहारातील गोष्टी सांगण्यासाठी वापरले जातात. दुधाने तोंड पोळले की ताक फुंकून पितात म्हणजे एकदा वाईट अनुभव आला की पुढे खूप सावध राहतात. सत्य आणि असत्य तपासण्यासाठी ‘दूध का दूध, पाणी का पाणी’ करावे लागते!
सत्य बाहेर येऊन न्याय मिळाला तर दुधात साखर पडली! नाहीतर दुधात मीठ पडले! ‘दुधाची तहान ताकावर भागवणे’ हेच सामान्य मनुष्याचे जीवन असते. ‘दूध का धुला’ जर कुणी तुम्हाला भेटला तर मला कळवणे!

