
१९७२ साली शिवसेनेने मराठी तरुण-तरुणींना एअर इंडिया या विमान वाहतूक कंपनीत नोकरी मिळावी म्हणून नरिमन पॉइंटच्या एअर इंडिया बिल्डिंगवर मोर्चा नेला होता. या मोर्चाचे नेतृत्व स्वत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते. त्यात बेरोजगार मराठी तरुण-तरुणींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
त्या काळी एअर इंडियामध्ये पायलट, फ्लाइट पर्सर, एअर हॉस्टेस, क्रू स्टाफ, लोडर, कारकून अशी भरती सतत चालू असायची. त्यात मराठी टक्का जेमतेम १० ते १५ टक्के होता. स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी-व्यवसायात ८० टक्के प्राधान्य दिले पाहिजे, यासाठी शिवसेना लढत होती. शिवसेनेची स्थापना होऊन जेमतेम पाच वर्षेच झाली होती. अर्ज, विनंती, निवेदन देऊनही एअर इंडियाचे व्यवस्थापन शिवसेनेला प्रतिसाद देत नव्हते. मग मोर्चा काढून जाब विचारायचे ठरले. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेचा जन्म झाला होता म्हणूनच नोकरभरतीच्या वेळी जेथे जेथे मराठी माणसावर अन्याय होत असे त्या-त्या अन्यायाचा प्रतिकार शिवसेनेने केला. एअर इंडियाने हा अन्याय केला तेव्हा जाब विचारण्यासाठी आझाद मैदान ते नरिमन पॉइंट असा प्रचंड मोर्चा निघाला. शिवसेनाप्रमुखांसोबत दत्ताजी साळवी, सुधीर जोशी, वामनराव महाडिक, दत्ता प्रधान, प्रमोद नवलकर ही आज हयात नसलेली नेते मंडळी त्यात होती.
एअर इंडियाचे पर्सनल मॅनेजर एस. के. नंदा हे शिवसेनेच्या शिष्टमंडळाशी व्यवस्थित बोलत नव्हते. दिल्लीवरून नोकरभरती होते अशी उडवाउडवीची उत्तरे त्यांनी दिली. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या संतप्त शिवसैनिकाने नंदा यांच्या थोबाडीत मारली. त्यांना लाथा मारून खाली पाडले. महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतरचे महाराष्ट्रातील हे शिवसैनिकाचे पहिलं ‘खळ्ळऽऽ खट्याक’ होते. नंदा थरथर कापत होते. शिवसैनिकांचा रुद्रावतार पाहून कुणी सुरक्षा कर्मचारीही पुढे आला नाही. ‘महाराष्ट्र द्वेष्ट्या नंदा, बंद कर तुझा धंदा’, ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद’ अशा जोरदार घोषणांनी एअर इंडिया इमारत हादरली.
शिवसेनेच्या या ‘खळ्ळऽऽ खट्याक’ कृतीवर विरोधकांनी आगपाखड केली. तर काही मराठी वृत्तपत्रांनी इंग्रजी वृत्तपत्रांप्रमाणेच लिखाण करून शिवसेनाविरोधी कन्डू शमवून घेतला. पण शिवसेनेला त्याची पर्वा नव्हती. कारण हे त्यावेळी गरजेचे होते. त्यामुळेच मराठी तरुण-तरुणींना नोकरीसाठी एअर इंडियाचे दरवाजे उघडले. या ‘खळ्ळऽऽ खट्याक’मुळे नंतर एअर इंडियाच्या भरतीत मराठी टक्का वाढू लागला. फक्त लोडरच नाही तर हवाई सुंदरीसाठीही मराठी मुलींचा विचार होऊ लागला.

एअर इंडियाने सबब पुढे केली की मराठी मुलं शिक्षित व प्रशिक्षित नाहीत. त्यांना इंग्रजीही व्यवस्थित येत नाही. तेव्हा एअर इंडियासारख्या अनेक कंपन्या-कारखान्यांना प्रशिक्षित तरुण-तरुणीची गरज होती. ही गरज ओळखून शिवसेनाप्रणीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघातर्पेâ शिवसेना भवनात प्रशिक्षण वर्ग भरू लागले. बँका, विमान वाहतूक कंपन्या, विमा कंपन्यांमध्ये कारकून-अधिकारी वर्गासाठी भरतीपूर्व प्रशिक्षण वर्ग भरले गेले. ते आजही भरवले जात आहे. मराठी उमेदवार इंग्रजी भाषेत कमी पडतो त्यासाठी इंग्रजी शिकवण्याचे वर्गही सुरू केले. या वर्गाचा फायदा हजारो मराठी तरुण-तरुणींना झाला आहे. स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या आंदोलनामुळे व अथक पाठपुराव्यामुळे मुंबई-महाराष्ट्रातील विविध आस्थापनात लाखो भूमिपुत्रांना रोजगार मिळाला आहे.
मधल्या वीसेक वर्षांच्या काळात सरकारी-निम सरकारी आस्थापनांत तसेच बँका व तत्सम ठिकाणी भरती प्रक्रिया मंदावली होती. त्यामुळे प्रशिक्षण वर्गही कमी झाले. कंपन्या-कारखान्यातील उत्पादन कमी झाल्यामुळे भरती कमी कमी होत गेली. पण सेवा क्षेत्रात नोकरी-व्यवसायाला अनेक संधी उपलब्ध झाल्या. तिथे प्रशिक्षित उमेदवाराला प्राधान्य दिले जाते हे शिवसेनेने ओळखले.
म्हणूनच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ आणि इंडियन इस्टिट्यूट ऑफ फेट फॉरवर्ड्स (एफेफेफेआयची शिक्षण शाखा) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक्सपोर्ट-इम्पोर्ट लॉजिस्टिक्स कोर्स’ सुरू करण्यात आला आहे. स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शिवसेनेतर्पेâ बेरोजगारांसाठी ‘लॉजिस्टिक अभ्यासक्रम’ वर्ग भरवले जात आहे. या ‘लॉजिस्टिक अभ्यासक्रमाचे’ नुकतेच उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवन येथे पार पडले. यावेळी एफेफेफेआयचे अध्यक्ष अमित कामत, माजी अध्यक्ष शंतनू भडकमकर, दुष्यंत मुलानी, समीर शहा, नाना हळदणकर आणि संस्थेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात शिवसेना नेते दिवाकर रावते, खा. अरविंद सावंत, खा. अनिल देसाई, आ. अनिल परब, शिवसेना नेते अंबादास दानवे, आ. सुनील शिंदे, आ. अजय चौधरी, आ. महेश सावंत, विलास पोतनीस, महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिहीर भडकमकर यांनी केले. अमित कामत यांनी या अभ्यासक्रमातून उपलब्ध होणार्या नोकरीच्या संधींची माहिती दिली. एफेफेफेआयचे माजी अध्यक्ष शंतनू भडकमकर यांनी लॉजिस्टिकमधून देश आणि विदेशात नोकरीच्या संधी कशा उपलब्ध होतात याची माहिती दिली.
शिवसेना भवनात हा अभ्यासक्रम २८ मार्चपासून सुरू झाला आहे. त्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागेल. पाच आठवडे दर शनिवारी सहा तासांचा वर्ग आहे. विद्यार्थ्यांना आयात-निर्यात, लॉजिस्टिक याच्यासह विमानतळ आणि बंदरातील मालवाहतुकीची माहिती देण्यासाठी भेटी आणि लॉजिस्टिक या विषयातील तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाईल. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र दिले जाईल, तसेच कंपन्यांमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून कामाचा अनुभवही दिला जाईल. अधिक माहितीसाठी शिवसेना भवनमधील स्थानीय लोकाधिकार समितीच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- अभ्यासक्रमाचे स्वरूप
- दोन महिन्यांचा विशेष प्रशिक्षण कोर्स
- ५ शनिवार – प्रत्येकी ६ तासांचे प्रशिक्षण
- २० दिवस ऑन-साइट प्रशिक्षण
- अनुभवी मार्गदर्शकांकडून प्रशिक्षण
- प्रशिक्षणानंतर नोकरीच्या संधी उपलब्ध
- लॉजिस्टिक्स-सप्लाय चेन मॅनेजमेंट, कस्टम क्लियरिंग, वेअरहाऊसिंग या क्षेत्रात विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
- पात्रता- वयोमर्यादा :१८ ते ३५ वर्ष
- किमान बारावी/पदवीधर/उच्चशिक्षित.
- स्थानिक भूमिपुत्र युवक-युवतींना प्राधान्य.
पोर्ट व संबंधित प्रकल्पात नोकरी रोजगारासाठी प्राधान्य दिले जाईल. याची नोंदणी व माहिती शिवसेना भवन, दादर (पश्चिम) येथे मराठी तरुण-तरुणींना मिळणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्या उमेदवाराला सर्टिफिकेट दिले जाईल आणि नोकरी-रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाईल. जवाहरलाल नेहरू पोर्ट, कांडला पोर्ट, अदानी पोर्ट व तत्सम होऊ घातलेल्या प्रकल्पात त्यांना नोकरी-व्यवसाय करण्याची संधी निश्चितच मिळणार आहे.
या अभ्यासक्रमामुळे मराठी तरुण-तरुणी खासगी कंपन्या व कॉर्पोरेट क्षेत्रात काम करण्यासाठी सक्षम असतील. आयात-निर्यात व्यवसायात मराठी व्यवसायिक फार कमी आहेत. सुशिक्षित तरुण-तरुणी हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर स्वतःचा आयात-निर्यात व्यवसायही सुरू करू शकतील.
‘‘नोकर्या मिळवण्यासाठी केवळ मोर्चे काढून चालणार नाही. आंदोलनाने कंपन्यांची दारे उघडतील. पण दाराच्या आत जाता येणार नाही. आता जायचे असेल तर आवश्यक कौशल्य पाहिजे. आता लॉजिस्टिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून नोकर्यांसाठी नवे क्षितिज निर्माण होत आहे. जगाचे दरवाजे उघडतील,’’ असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला. तो विश्वास सार्थ करण्यासाठी लोकाधिकार समिती महासंघाचे पदाधिकारी सज्ज आहेत. उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी स्थानीय लोकाधिकार समितीवर सोपवलेल्या जबाबदार्या यशस्वीपणे पार पाडल्या आहे. या अभ्यासक्रमासाठीची जबाबदारीही यशस्वीरित्या पार पाडली जाईल. त्यासाठी लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष खा. अनिल देसाई आणि सरचिटणीस प्रदीप मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकाधिकार समितीचे पदाधिकारी दिनेश बोभाटे, अनिल चव्हाण, शरद एक्के, उल्हास बिल्ले, उमेश नाईक, सुधाकर नर, श्रीराम विश्वासराव, विलास जाधव, हेमंत गुप्ते, गोपाळ शेलार आदी पदाधिकारी समन्वय साधत आहेत.
