• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

आत्मशांती भेळ

सुधीर साबळे (पुणे तिथे खाणे...)

marmik by marmik
April 2, 2026
in खानपान, विशेष लेख
0
आत्मशांती भेळ

भेळ म्हटली की ती मुंबईची, चौपाटीवरच्या भय्याच्या हातची, अशी अनेकांची समजूत आहे. पु.ल. देशपांडे यांनी ‘भय्याच्या कळकटपणाच्या प्रमाणात भेळेची चव असते’ असा भेळरससिद्धांतही मांडून ठेवलेला आहे. ‘हाताची चव’ हा रुचकर पदार्थांचा सर्वात मोठा घटक मानला जातो. त्यावरच पुलंनी प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. असो. विषयात विषयांतराची भेळ नको- मुद्दा आहे मुंबईची उत्तर भारतीय ढंगाची भेळ आणि इतर ठिकाणची भेळ यांच्यातल्या फरकाचा. पुण्यातली भेळ हा एक स्वतंत्र विषय आहे. ती अधिक दाट आणि आंबटगोड चटणीची असते, तरीही मुरमुर्‍यापासून शेवेपर्यंत कशाचाही कुरकुरीतपणा कमी होत नाही आणि कैरीचे छोटे तुकडे घासाला एक या प्रमाणात नसतील तर फाऊल मानला जातो… हे पुण्यातल्या चौपाटी भेळेला लागू होतं… अशी भेळ सारसबाग, संभाजी उद्यान, कमला नेहरू उद्यान वगैरे उद्यानांच्या परिसरात मिळते.

त्याचबरोबर पुण्यात अनेक वर्षांपासून मिळणारा पण हल्ली हेल्दी स्प्राऊट्समुळे नव्याने चर्चेत आलेला, लोकप्रिय झालेला भेळप्रकार म्हणजे मटकी भेळ. मोडाची वाफवलेली मसालेदार मटकी हा घटक या भेळेत येतो आणि बहुतेक ठिकाणी मटकीची चव सर्वाधिक ठेवण्यासाठी चटकदार चटणी हातचं राखून वापरली जाते. पुण्यात जवळपास प्रत्येक पेठेत कुठल्या ना कुठल्या चौकात, एखाद्या नाक्यावर एकतरी भेळवाला प्रसिद्ध असतो आणि एक तरी मटकी भेळवालाही प्रसिद्ध असतो. पुण्यात संध्याकाळच्या वेळी घरोघरी चुली पेटतच नसाव्यात, असं वाटावं इतक्या प्रमाणात लोक काही ना काही बाहेर खाताना दिसतात. संध्याकाळची चोरट्या भुकेची वेळ म्हणजे चविष्ट, तिखट, चवदार भेळ किंवा मटकी भेळ खाण्याची वेळ असं अधिकृतपणे गॅझेटमध्ये नोंदवलं गेलं आहे म्हणे! खरं खोटं देवाला माहिती!

भेळेमुळे रसनातृप्ती होतेच, पण भेळ खाल्ल्याने आत्मशांतीही मिळू शकते, हा कॉन्फिडन्स दाखवणारी एक भेळ म्हणजे नाना पेठेतल्या डोके मारुती मार्ग रस्त्यावरची ‘आत्मशांती भेळ.’ या रस्त्यावर एके ठिकाणी भरपूर गर्दी दिसते. गर्दीतून स्वच्छ, टापटीप अशी स्टीलची एक हातगाडी दिसते. गाडीपाशी एक हसतमुख चेहर्‍याचे काका दिसतात. एकीकडे हात अखंड चालत असतो आणि दुसरीकडे अतिशय आपलेपणाने ते प्रत्येकाला ‘एक मिनिट थांबा, हे झाले की आता तुमचाच नंबर…’ हे सांगत असतात. आणि पुण्यात एक दुकानदार गिर्‍हाईकाशी प्रेमाने बोलतो आहे या आक्रीतामुळे चक्रावलेले ग्राहकही विनातक्रार वाट पाहात उभे राहतात. इथे अनेकांना अर्ध्या तासापर्यंतही वाट पाहावी लागते आणि तेवढी वाट लोक आनंदाने पाहतात… गेल्या ६५ वर्षांपासून पुणेकरांना ‘वाट पाहीन पण आत्मशांतीचीच भेळ खाईन’ अशी सवय लागली आहे, ती उगाच नाही…

आता भेळेत खरंतर काय विशेष असणार? ताजी, चविष्ट भेळ खायची आणि पुढे जायचं. पण, इथली भेळ हा फक्त एक खाण्याचा पदार्थ नाही, तर एक अनुभव आहे. ‘पौष्टिक भेळ’ हा शब्द इथे खर्‍या अर्थाने साकार होतो. या मटकी भेळीत उकडलेली मटकी तर असतेच, पण उकडलेला हरभराही असतो. दुपारचे साडेचार वाजता गाडीवर वाट पाहायला लोक येतात, तिथपासून रात्री दहा वाजेपर्यंत ग्राहकांची गर्दी ओसरता ओसरत नाही.

६५ वर्षांची भेळ आणि तिसरी पिढी
महेश चाळेकर हे या भेळीचे तिसर्‍या पिढीचे चालक. ते सांगतात, आम्ही मूळचे नसरपूरचे. माझे आजोबा विष्णू गेनू चाळेकर यांनी ६५ वर्षांपूर्वी भेळीचा हा व्यवसाय सुरू केला. तेव्हा नाना पेठ हे बाजारपेठेचे ठिकाण होते. आजोबा तेव्हा या भागात फिरून छोट्या स्वरूपात भेळ विकण्याचा व्यवसाय करत असत. आजोबांच्या हाताला चव होती, त्यामुळे बाजारपेठतील लोक त्यांची मटकी भेळ खाण्यासाठी कायम आतुरलेले असत. तेव्हा भेळ एक आणे, दोन आण्याला मिळत असे. पिझ्झा, बर्गरचे फॅड नसलेला काळ होता तो, त्यामुळे ओली भेळ, सुकी भेळ असे पदार्थ भरपूर चालायचे. आजोबांच्या हातच्या मटकी भेळीला तर खास मागणी होती. ती इतकी वाढली की आजोबांनी एका जागी स्थिरावण्यासाठी हातगाडी सुरू केली. पुढच्या पिढीत हा व्यवसाय माझे वडील बबन चाळेकर यांनी सांभाळला आणि आता त्याची धुरा आमची तिसरी पिढी पाहत आहे.

सतराशे साठ ठिकाणी मटकी भेळ मिळत असताना आत्मशांतीच्या भेळीत असं काय विशेष आहे, ज्यासाठी लोक रांगा लावून वाट पाहतात, या प्रश्नावर चाळेकर सांगतात, या भेळीतला चिवडा हा आम्ही घरी बनवतो. त्यात गुजरातचे शेंगदाणे आणि मध्य प्रदेशचे दगडी पोहे असतात. या घटकांमध्ये आजतागायत कोणताही बदल झालेला नाही त्यामुळे चवीतही काही बदल झालेला नाही. या स्पेशल चिवड्यात उकडलेली मटकी आणि हरभरा, शेव, सुक्या लाल मिरचीची चटणी, हिरव्या मिरचीची चटणी, कांदा-कोथिंबीर आणि त्यावर लिंबाचा रस याचे मिश्रण करून ही भेळ एकजीव केली जाते. त्यानंतर एका कागदावर कागदाच्या चमच्यासह ती सर्व्ह केली जाते. एकदा ही भेळ चाखली आणि नंतर कधीही पुण्यात असाल, मोकळा वेळ असेल तर वाट वाकडी करून वाहतूक कोंडीची पर्वा न करता आत्मशांतीच्या भेळीचा आस्वाद घेण्यासाठी तिथे जाताच. आठवड्यातून चार ते पाच वेळा येणार्‍या ग्राहकांची संख्या भरपूर असल्याचे महेश चाळेकर सांगतात.

पुण्यातल्या अनेक नामांकित घरगुती खाद्यान्न व्यवसायांप्रमाणे आत्मशांती भेळीतही चिवडा तयार करण्यापासून ते त्याची विक्री करण्याच्या प्रक्रियांमधे बाहेरचे कुणी नाही, सगळी कामे करणारी मंडळी अगदी घरातलीच. महेश यांची आई सुमन चाळेकर या चिवडा तयार करण्याचे काम करतात. पत्नी, मुलगा अन्य मंडळी बाकी कामे करतात. संध्याकाळी गाडी लागली की भेळ बनवून ग्राहकांना खिलवण्याचे काम महेश करतात. ते म्हणतात की, माझ्या आजोबांच्या हाताला जी चव होती, तीच माझ्या आईच्या हातामध्ये आहे, त्यामुळेच त्या भेळीच्या चवीची गंमत आजही टिकून आहे.

भेळीसाठी प्रसिद्ध असलेल्या या गाडीवर एक वेगळा पदार्थ देखील मिळतो. त्यामध्ये फक्त शेव, शेंगदाणे, कांदा आणि लिंबू इतकेच काय ते जिन्नस असतात. काहीजण आवडीनुसार त्यात वरून वेगळी मटकी, हरभरा टाकण्यास सांगतात. या स्पेशल पदार्थाला ग्राहकांची चांगली मागणी असते. चाळेकर सांगतात, भेळीमध्ये जी लाल मिरची वापरतो ती आम्ही डंकावर तयार करतो. हिरवी चटणी तयार करताना त्यात हिरवी लवंगी मिरची, पुदिना लिंबू, आले, कोथिंबीर यांचे मिश्रण असते.

नामवंतांची आवडती जागा
शरद पवार यांचे मित्र खास ओळख असणारे विठ्ठल मणियार हे या भेळीचे चाहते. ते सांगतात, आत्मशांतीचा चिवड्याची तारीफ करावी तेवढी थोडी आहे. आमच्या घरी अगदी चवीने आणि आवर्जून खाल्ली जाणारी ही भेळ आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार गिरीश बापट यांची देखील ही खूप आवडती भेळ होती, अशी आठवण महेश चाळेकर यांनी सांगितली.
खास भेळ खाण्यासाठी हैद्राबादवरून आत्मशांतीच्या भेळीची गोष्ट न्यारी आहे.

वर्षातून दोन ते तीन वेळा एक ग्राहक खास हैद्राबादवरून भेळ खाण्यासाठी इथे येतात. गाडी साडेचार वाजता सुरू होते. हे गृहस्थ चार वाजता इथे येतात. पहिल्यांदा एक भेळ चवीचवीने आस्वाद घेत खातात. त्यानंतर तासाभराने दुसरी, काही वेळाने तिसरी, मग चौथी अशा किमान पाच ते सहा भेळी हे गृहस्थ खातात. त्यानंतर नऊ वाजण्याच्या सुमाराची त्यांची ट्रेन पकडण्यासाठी ते पुणे स्टेशनकडे रवाना होतात. भेळ पार्सल खाण्यामध्ये काही मजा नाही, हा त्यांचा सिद्धांत. त्यामुळे ती ताजी खाण्यासाठी ते येतात. असेच कोल्हापूरचे राजाभाऊ ओसवाल. यांना चहा पिताना त्याच्याबरोबर आत्मशांतीचा चिवडा सोबत असावा लागतोच. चाळेकर त्यांना चिवडा पाठवतात, कधी ते येऊन घेऊन जातात.

भेळ चमच्याने खाण्यात मजा नाही…
चाळेकर सांगतात, आमची भेळ अनेकजण इथून पार्सल घेऊन जातात. त्यानंतर एका भांड्यात काढून ते चमच्याने कालवतात. पण हाताने भेळ मिक्स करण्याला जी चव आहे, ती मजा चमच्यामध्ये नाही. पूर्वी आम्ही लग्नाच्या
ऑर्डर करायचो. आता त्या बंद केल्या आहेत. लग्नाची ऑर्डर करायची म्हटले की रोजच्या ग्राहकांची अडचण होते, ते टाळण्यासाठी आम्ही ते बंद केले. काही झाले तरी आपल्या रोजच्या ग्राहकांना तोडायचे नाही, हा महेश यांचा आग्रह आहे.

विदेशातून मागणी….
चाळेकरांकडचा चिवडा भेळेइतकाच प्रसिद्ध आहे. तो टिकाऊ असल्याने घरी, परगावी नेता येतो, कांदा, मिरची, कोथिंबीर, टोमॅटो वगैरे टाकून भेळ बनवता येते. त्यामुळे या स्पेशल चिवड्यालाही चांगली मागणी असते. इथे भेळ खाणारा परगावचा माणूस हमखास एकदोन पाकीटं घेऊनच जातो. या चिवड्यामध्ये शेव, शेंगदाणे याचे मिश्रण असते. चवीला थोडा तिखट असणार्‍या या चिवड्याला अमेरिका, दुबई, जर्मनी, जपान इथून चांगली मागणी आहे. अनेक घरगुती व्यवसाय चालवणार्‍या पुणेकरांप्रमाणे आत्मशांती भेळीच्या चाळेकर कुटुंबाचाही प्रâँचायजी देऊन नाव खराब करून घेण्यावर विश्वास नाही. ग्राहकांच्या समाधानातच ते आपलं समाधान मानतात.

Previous Post

परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन…

Next Post

दागिने चोराचा चकवा!

Next Post
दागिने चोराचा चकवा!

दागिने चोराचा चकवा!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.