केंद्र सरकारने १९५४ सालापासून ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार देण्यास सुरुवात केली. गेल्या ७२ वर्षात विविध क्षेत्रांत अनन्यसाधारण कार्य करणारे, भरीव योगदान देणारे अशा अतिमहत्त्वाच्या ५० व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार दिला गेला आहे. त्यात रा. स्व. संघ आणि भारतीय जनता पक्षाशी संबंधित नानाजी देशमुख, अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांचा समावेश आहे. परंतु प्रखर हिंदुत्ववादी स्वातंत्र्यवीर बॅरिस्टर वि. दा. सावरकर यांना अजून ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित केले नाही. त्यांना ‘भारतरत्न’ मिळावे, म्हणून संघातील व भाजपाचे नेते मागणी करीत असतात; पण तिचा ते जोरदार पाठपुरावा करीत नाहीत. नाही तर आधी साडेसहा वर्ष आणि आताची २०१४ पासूनची १२ वर्षे भाजप केंद्रात सत्तेवर आहे. परंतु भाजपने प्रामाणिकपणे पाठपुरावा केल्याचे जाणवत नाही.
स्वा. सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी तशी खूप जुनी आहे. ती प्रथम स्व. अटल बिहारी वाजपेयी यांनी केली होती; पण ह्या मागणीला त्यांनी स्वतः पंतप्रधान झाल्यावर बासनात गुंडाळून ठेवले. वाजपेयी यांचा ‘भारतरत्न’ने सन्मान व्हावा अशी मागणी २००८ मध्ये लालकृष्ण अडवाणी यांनी केली. वाजपेयी यांना २०१५ मध्ये ‘भारतरत्न’ दिले गेले आणि २०२४ मध्ये खुद्द लालकृष्ण अडवाणी देखील ‘भारतरत्न’ झाले ! पण हिंदुत्वनिष्ठ स्वा. सावरकर मात्र भाजपच्या राज्यातच भारतरत्न पुरस्कारापासून वंचित राहिले.
तसा काँग्रेसचा स्वा. सावरकरांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यास विरोध आहे. ‘स्वा. सावरकरांनी भारताचा तिरंगा झेंडा नाकारला होता आणि तुरुंगातुन सुटण्यासाठी सावरकरांनी ब्रिटिशांना माफीनामा लिहून दिला होता. ते स्वातंत्र्यसेनानी नव्हते, तर पळपुटे होते,’ असा आरोप काँग्रेसचे नेते करतात. तेव्हा समस्त संघ व भाजपा नेते काँग्रेस आणि राहुल गांधींवर तुटून पडतात. राहुल गांधींवर अर्वाच्च्य भाषेत टीकाही केली जाते. राहुल यांनी या वक्तव्यावर जाहीर माफी मागावी अशी मागणी केली जाते. या प्रकरणी त्यांच्यावर खटलाही सुरू आहे. पण, काँग्रेस नेते त्यांच्या वक्तव्यावर ठाम असून त्यांनी माफी मागण्यास नकार दिला आहे. भाजपला हे प्रकरण चिघळत ठेवायचे आहे. स्वा. सावरकर हे महान राष्ट्रप्रेमी होते, दाखवायचे आहे. पण त्यांना ‘भारतरत्न’ मात्र द्यायचे नाही. हे भाजपाचे खोटे सावरकर प्रेम आहे. हिंदूंना खूश ठेवण्यासाठी रचलेले बेगडी सावरकर प्रेम आहे. काँग्रेसविरोधात सावरकर प्रेमींच्या मनात द्वेष निर्माण करण्यासाठी मधून-मधून ‘भारतरत्न’ देण्याची मागणी त्यांच्याकडून केली जाते.
काही दिवसांपूर्वी मुंबईत ‘रा. स्व. संघा’च्या शताब्दी वर्ष कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले, ‘‘वीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा, ह्यासाठी संबंधित यंत्रणेतील व्यक्तीशी मी बोलेन!’’ यावर ‘‘इतके दिवस तुम्ही का बोलला नाहीत? देशात गेली १२ वर्षे भाजपचे हिंदुत्ववादी सरकार असताना सावरकरांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्काराने का सन्मानित करण्यात आले नाही?’’ असे प्रश्न कुणी विचारू नये. कारण, सरसंघचालकांना प्रतिप्रश्न विचारण्याची पद्धत संघात नाही. उलट सावरकरांना त्यांच्या ऐतिहासिक उडी आणि माफीसह कायम चर्चेत ठेवून त्यांची बदनामी कशी होईल, ह्याची काळजी संघ परिवार घेत असतो आणि डॉ. हेगडेवार आणि गोळवलकर गुरुजी यांचे वादग्रस्त संघकार्य चर्चेत येऊ नये यासाठी सावरकरांचा वापर करण्यात येतो, अशी शंका वाटते.
स्वा. सावरकर स्मृतिदिनी २६ फेब्रुवारी २०२६ रोजी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी ‘‘स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्यासाठी विधान परिषदेत ठराव आणावा आणि तो मंजूर करावा’’ अशी मागणी केली. पण कुठल्याही भाजप नेत्याने ती मागणी उचलून धरली नाही. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सावरकरांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देण्याबाबत राज्य सरकारने केंद्राला शिफारस करावी असा भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मांडलेला अशासकीय ठराव त्यांना मागे घ्यावा लागला. ‘भारतरत्न देण्याची केंद्र सरकारची एक प्रक्रिया आहे. राज्य सरकार केंद्राला भारतरत्न पुरस्काराबाबत शिफारस करू शकत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न मिळाला पाहिजे, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. मात्र अशासकीय ठरावाची शिफारस केंद्राकडे करणे नियमबाह्य होईल असे सांगून’ पणनमंत्री जयकुमार रावल यांनी ठराव मागे घेण्याची विनंती केली. महात्मा जोतिबा फुले यांना भारतरत्न देण्याबाबत शासकीय ठराव यापूर्वी विधानसभेने केला असून केंद्राला शिफारस केली होती, याची आठवण मुनगंटीवार यांनी करून दिली. तसेच आपला अशासकीय ठराव शासकीय ठरावामध्ये रूपांतरित करावा, असा आग्रह त्यांनी धरला. मात्र त्याचीसुद्धा एक प्रक्रिया आहे. मंत्रिमंडळ बैठकीसमोर त्यासाठी जावे लागते असे मंत्री रावळ यांनी सांगितले. अखेर मुनगंटीवार यांनी अशासकीय ठराव मागे घेतला.
ठराव मागे घेण्याची ही नामुष्की भाजपावर का आली? असा प्रश्न हिंदूंनी विचारू नये. कारण भाजपचे हिंदुत्व सोयीनुसार बदलत असते तसे शिवसेनेचे नाही. २००४ साली स्वा. सावरकर अपमान प्रकरणी शिवसेनेने मणिशंकर अय्यरविरुद्ध आंदोलन केले होते. तत्कालीन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री राम नाईक अंदमानला २००४ साली गेले होते. त्यांनी क्रांतिकारकांना अभिवादन करण्यासाठी अंदमानमध्ये स्वातंत्र्यज्योत निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या कारकीर्दीत ही ज्योत तयार होऊ शकली नाही. नवे पेट्रोलियम मंत्री मणिशंकर अय्यर यांच्या हस्ते ९ ऑगस्ट रोजी या ज्योतीचे उद्घाटन झाले. परंतु त्यावेळी त्या ज्योतिखालच्या चबुतर्यावरचे सावरकरांचे गीत गाळण्यात आले.
ते गीत पुढीलप्रमाणे –
की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने ।
लब्धप्रकाश इतिहास निसर्ग माने ।
जे दिव्य दाहक म्हणूनि असावयाचे ।
बुद्ध्याचि वाण धरले करि हे सतीचे ।।
१५ ऑगस्ट २००४ रोजी राम नाईक यांनी हे गीत गाळल्याचे वृत्त पत्रकार परिषदेत सांगितले आणि सावरकरांविषयी काँग्रेसला तिरस्कार असल्याचे मत व्यक्त केले. तेव्हा उद्धव ठाकरे ताबडतोब कडाडले, ‘‘सावरकरांच्या स्मृती पुसणार्या पापी काँग्रेसविरुद्ध आंदोलन छेडणार.’’ शिवसेना खासदारांनी हा विषय लोकसभेत उपस्थित केला आणि मणिशंकर अय्यरविरोधी घोषणा दिल्या. अय्यर यांनी सावरकरांचा अपमान केल्यामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे संतापले, ‘‘स्वातंत्र्यासाठी आयुष्याचा होम केलेल्या स्वातंत्र्ययोद्ध्याचा अपमान करणारा फुटका मणिशंकर या गद्दार काँग्रेसच्या विरोधात यज्ञकुंड चेतवूया.’’ त्यांनी ‘त्याला जोडे मारा’ आंदोलनाची जबरदस्त घोषणा केली आणि हेही सांगितले की २७ ऑगस्टच्या आंदोलनात ते स्वतः भाग घेणार आहेत. हे आंदोलन २२ ऑगस्टला घेण्यात आले. ठाण्यातही त्यांची प्रतिकृती चाबकाने फोडून आणि चपलांनी फटकावून काढण्यात आली. त्यांची प्रतीकात्मक प्रेतयात्राही काढण्यात आली.
काँग्रेसचे एकेकाळचे मोठे नेते मोहन धारिया म्हणाले, ‘‘काँग्रेस पक्ष हा सध्या लाचारांची फौज झाली आहे. मणिशंकर अय्यर यांना देशाचा इतिहास माहीत नसावा असे वाटतं. मला त्यांची कीव करावीशी वाटते.’’ शिवसेनेचे खासदार मोहन रावले यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून सावरकरांची जाज्वल्य राष्ट्रभक्तीची वचने होती तेथे पुन्हा लावावीत असा आग्रह केला. २७ ऑगस्ट २००४ रोजी शिवसेनाप्रमुखांनी शिवाजी पार्कमध्ये मणिशंकर अय्यर यांच्या प्रतिमेला पहिला जोडा मारून त्यांचे थोबाड फोडले. शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांचा सावरकरांविषयीचा आदर, प्रेम हे त्यांनी दाखवून दिले.
सुप्रसिद्ध संगीतकार सुधीर फडके हे स्वा. सावरकरांवर चित्रपटनिर्मिती करीत होते. त्या दरम्यान ते बाळासाहेब ठाकरे यांच्याशी काही बाबतीत चर्चा-विनिमय करीत. बाबूजी आणि बाळासाहेब दोघेही स्वा. सावरकारांचे चाहते व भक्त. बाळासाहेब हे हाडाचे कलावंत होते. स्वा. सावरकरांच्या चित्रपटात काही उणीवा राहू नयेत, तो भव्य-दिव्य चित्रपट व्हावा म्हणून सुधीर फडके मनापासूनच प्रयत्न करीत होते, मेहनत घेत होते. पण त्यांना त्या काळात संघ किंवा भाजपाकडून हवी तशी साथ मिळाली नाही. प्रोत्साहनही हातचे राखून दिले गेले होते. तेव्हा अडचणीच्या वेळी बाळासाहेब बाबूजींच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी सहकार्य केले. दादर येथील स्वा. सावरकर स्मारक उभारणीत देखील शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांचा हातभार लाभला आहे.
शिवसेना नेते व खासदार संजय राऊतांसह अनेक खासदारांनी संसदेत व संसदेबाहेर स्वा. सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी केली आहे. कारण सावरकरांचे विज्ञाननिष्ठ हिंदुत्व शिवसेनेस मान्य आहे. पण बेरोजगार हिंदू तरुणांचे माथे भडकवण्यासाठी सावरकरांचा वापर भाजपकडून केला जातो. त्यामागे भाजपाचे सावरकरांवरील प्रेम वगैरे साफ झूट आहे. त्यामागे निव्वळ काँग्रेसला थोपवणे, राहुल गांधींना हिंदूविरोधी ठरवणे आणि मतांचे ध्रुवीकरण करून निवडणुकीत इप्सित साधणे हाच संघ-भाजपाचा छुपा अजेंडा आहे. त्यासाठी अधून मधून स्वा. सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी करणारे आणि ती शिताफीने मागे घेणारे संघ-भाजपाचे बेगडी सावरकर प्रेम आहे!

