
‘तुंदीलतनु’ हा किती गोड शब्द आहे. ज्यांच्या कानांवरून हा संस्कृतप्रचुर शब्द पूर्वी गेलेला नाही त्यांच्यासाठी याचा अर्थ सांगतो. ‘तुंदीलतनु’ चा अर्थ आहे -ज्याचे मोठे पोट आहे असा. ‘ढेरपोट्या’ हा आपल्या नेहमीच्या वापरात असलेला शब्द! कुणा व्यक्तीला संबोधण्यासाठी चांगले विशेषण वापरले तर तो अस्सल मराठी माणूस कसला?! ‘हेकण्या’ ‘काण्या’ ‘लंगडा’ असे शारीरिक व्यंग किंवा वाईट गुण दाखवल्याशिवाय त्या व्यक्तीची ओळख आपल्याला पटवताच येत नाही. जे अवयव आपण वापरत नाही ते कालांतराने लोप पावतात- हा शरीरशास्त्रातला नियम इथेही लागू पडताना दिसतो. भाषेतील काव्यात्मक आणि आलंकारिक शब्द म्हणूनच लोप पावत चाललेत आणि बोचरे, वाईट शब्द चलनात यायला लागलेत. भाषाच का? तुम्ही साधे घरगुती फर्निचर घेतले तरी पूर्वीसारखी बारीक नक्षी असणारी कपाटे, खुर्च्या-टेबले तरी कुठे दिसतात? आजकाल सपाट, साध्या डिझाईनचे, तकलादू आणि विचित्र आकार-प्रकाराचे फर्निचर पाहावयास मिळते. असो.
मी स्वत: ‘तुंदीलतनु’ झाल्यावर मला हा शब्द अजूनच गोड वाटायला लागला होता. शब्द जरी गोड वाटला तरी ही शारीरिक अवस्था काही फारशी आकर्षक नसल्यामुळे मी लवकरात लवकर ह्या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी हालचाल सुरू केली. डॉक्टरांचा आणि काही ‘नीम-हकीम’ परिचितांच्या सल्ल्याला बळी पडून मी भात खाणे सोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
डॉक्टरांना तर मी भात सोडेन असे वचन दिले होते. त्यामुळे देणेकर्यासारखे डॉक्टरांचे तोंड चुकवत फिरत होतो. दुसरा कुणी मनुष्य असता तर ‘तब्येत बरी नव्हती’ असे भेट न होण्याचे एक जनरल कारण दिले की पुरते, डॉक्टरांवर हा मंत्र चालत नाही! आता त्यांना ‘तब्येत ठणठणीत होती; म्हणून तुमच्याकडे आलो नाही’ असे म्हणणेही चारचौघात बरे दिसत नाही! म्हणून डॉक्टरांना चुकवणे येवढा एकच मार्ग उरला होता आणि तो मी शिताफीने अंमलात आणत होतो.
पण एका गाफील क्षणी घात झालाच. एकदा हॉटेलमध्ये हैदराबादी बिर्याणी खाताना डॉक्टरांनी मला ‘रंगे दात’ पकडले! त्यांनी प्रत्यक्ष मला काही म्हटलं नाही, फक्त खाऊ की गिळू अशा नजरेने पाहात होते!
पण मुळात भात खाल्ल्यावर पोट सुटते हे गृहितक बरोबर आहे का, याची शंका यायला लागली. डॉक्टरांना काय जातंय सांगायला? बीपी वाढला की सांगतात मीठ सोडा. मधुमेह आहे? मग साखर सोडा! ते सोडल्यानंतर म्हणे तो आजार पेशंटच्या ‘कंट्रोल’मध्ये राहतो!
(की पेशंट डॉक्टरांच्या कंट्रोल मध्ये राहतो?) उद्या म्हणतील सर्दी होते? श्वासोच्छ्वास करणे सोडा!
तुम्हाला म्हणून सांगतो- जगात जेथे सागरा धरणी मिळते तेथे ‘राईस-प्लेट’ खाल्ल्या जाते! भारताच्या पूर्व-पश्चिम दोन्ही समुद्रकिनार्यांवर भाताची लागवड केली जाते. आणि मुख्य अन्न म्हणून भात खाल्ला जातो. पचायलाही हलका असतो. त्यामुळे लहान बालकापासून जख्ख म्हातार्यापर्यंत सर्वजण भात खाऊ शकतात. भात खाण्यासाठी तोंडात दात असलेच पाहिजेत अशी काही सक्ती नसते. भाताचा घास चावायची हौस असेल तर चावा नाहीतर अजगरासारखे गिळून टाका! असे ‘मल्टीपल-चॉइस’ पर्याय असल्यामुळे भात खाणे सर्वांनाच प्रिय असते.
बरे, ज्यांना सात्विक आहार करण्यात मोठेपणा वाटतो ते लोक वरण-भात, दूध-भात, साखर-भात, दही-भात असे भाताचे विविध प्रकार तयार करून खाऊ शकतात. तामसी प्रवृत्तीचे लोक भातापासून मटन-बिर्याणी, चिकन बिर्याणी, अंडा बिर्याणी,
हैद्राबादी बिर्याणी असे मांसाहारी पदार्थ खाऊ शकतात. भात वापरून शाकाहारी पदार्थांमध्ये अनेक प्रकारचे चमचमीत पुलाव आणि मसालेदार बिर्याण्या तयार करायची सोय आहे. त्यामुळे भातखाऊ लोकांची संख्या जास्त आहे. पण भात खातात म्हणून त्यांचे सर्वांचे पोट काही मोठे वाढलेले दिसत नाही. नाहीतर पूर्ण किनारपट्टी जाडजूड लोकांनीच भरली असती आणि ‘अंदरुनी इलाख्यात’ सगळी पाप्याची पितरे दिसली असती.
त्या डॉक्टरांना आता मी ‘मुंह दिखाने लायक’ राहिलो नसल्याने मी तो होमिओपॅथीचा डॉक्टरच बदलला. आता अॅलोपॅथीच्या डॉक्टरकडे गेलो. हे नवे डॉक्टर काहीतरी स्ट्राँग गोळ्या नाहीतर इंजेक्शन देतील आणि माझं पोट सुई लावलेल्या फुग्यासारखं पटकन सपाट होईल अशी वेडी आशा पोटी धरून त्यांच्या दवाखान्याची लिफ्ट चढलो!
‘तुम्ही गहू सोडा!’ डॉक्टर म्हणाले. ह्या वेळी मात्र मी वचन देण्याऐवजी ‘प्रयत्न करतो’ असा सावध पवित्रा घेतला. मी तर म्हणतो तुमच्या खाण्याचा आणि पोट सुटण्याचा तसा काहीच संबंध नाही! बारीक लोक काय जेवत नाहीत का? आमच्या ऑफिसमधला एक सहकारी- ‘पक्या’ त्याचे नाव. (मस्टरवर ‘प्रकाश’ असे आपले नाव लिहीत असला तरी पक्याच तो!) जेमतेम पाच फूट ऊंची आणि अगदी सडपातळ बांधा. घरून चार भांड्यांचा तीन लोक आरामात जेवतील एवढा मोठा टिफीन बाहुबली मधला हीरो शिवलिंग उचलून आणतो तसा घेऊन येतो! अगदी चाटून-पुसून रिकामा करून घरी घेऊन जातो. अध्ये-मध्ये कुणी समोसा आणला, केक आणला तरी आवडीने खातो. तरी त्याची प्रकृती अगदी ‘तोळा-मासा’ म्हणतात तशी आहे आणि आम्ही नुसता श्वास घेतला तरी वजन वाढते! (…आणि श्वास सोडला तर कमी पण होत नाही!) कुणी हितचिंतक बर्याच दिवसांनी भेटल्यावर ‘आता जरा बारीक दिस्ाताय’ असे म्हणाला तरी आमच्या अंगावर मूठभर मांस चढते!
आता अजून कुठला साधा, सोपा आणि व्यावहारिक उपाय करावा बरे? ह्या शोधात असता ‘डायटेशियन’ नावाची डॉक्टर लोकांची एक प्रजाती असते हे समजले. नावातच ‘एशियन’ असल्यामुळे आपल्या समस्त एशिया खंडात त्यांचं भरपूर पीक आले नसते तरच नवल! अशाच एका नामांकित आणि फेसबुकवर बरेच फॉलोवर असलेल्या डॉक्टरला गाठले.
‘तुम्ही दिवसातून सहा वेळा थोडे-थोडे खा!’ डॉक्टर म्हणाले.
‘त्याने पोट कमी होईल?’ मी जरा साशंकतेनेच विचारले.
‘अलबत! नक्कीच कमी होईल. दिवसाला पाऊण इंच कमी झाल्याच्या नोंदी आहेत आमच्या पेशंटच्या. तुम्ही एकदाच जास्त जेवलात की तुमच्या पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण पडतो. त्यामुळे होते काय– तर तुमचे स्वादुपिंड पाचकरसाचा जास्त स्त्राव तुमच्या जठरात सोडते. त्यामुळे काय होते…’ असे डॉक्टरांनी बराच वेळ मला पोटातील प्रक्रियेचे यथासांग वर्णन करून सांगितले आणि माझ्या डोक्यात ‘गोंधळ रस’ निर्माण केला. सरते शेवटी एवढ्या मंथनाचे सार म्हणजे दिवसा जागे असतानाच्या सोळा तासांत सहा वेळा जेवणं करावी लागतील एवढे डोक्यात पक्के करून मी ही नवी जीवनशैली (-की जेवण शैली?) आत्मसात करण्याच्या प्रयत्नास लागलो. एक वेळ सकाळी नाष्टा आणि दोन वेळ जेवण असे तीन वेळा तर मी आधीच खात होतो. आता अजून तीन वेळा म्हणजे साधारण दोन-दोन तासाने मला खाणे भाग होते. दिवसातून चार वेळा नाष्टा आणि दोन वेळ जेवण असे खायचे वेळापत्रक मी ठरवून घेतले आणि लगेच अंमलबजावणी सुरू केली.
महत्वाची मीटिंग सुरू असता मध्येच ‘वॉशरूम’चे निमित्त सांगून मी दोन-तीन पराठे तोंडात पटकन कोंबून येत असे. समोर कस्टमर बसलेला असला तरी त्याची नजर चुकवून मी माझा डबा उघडून तोंडात काहीतरी टाकून रवंथ करत बसे. वेलीवरील पाने कुरतडणार्या सुरवंटासारखा मी दिवसभर काही ना काही खात बसलेला असे. पण सहा महिने झाले तरी पोटाचा घेर काही कमी होईना. उलट पँट कमरेत अजूनच घट्ट व्हायला लागल्यावर मला ह्या प्रोजेक्टवर शंका यायला लागली. असेही दिवसभर खाण्याशिवाय दुसरे काही सुचत नव्हते आणि खाण्याच्या वेळा पाळणे ही कठीण जात होते.
‘दिवसातून फक्त दोन वेळा खावे!’ रीलमध्ये हे वाक्य ऐकून मी स्क्रोल करता करता थांबलो. एक डायटेशियन वजन कमी करण्याचे गुपित सांगत होता. त्यांच्याशी फोनवर संपर्क साधला. ‘होते काय…’ ते सांगू लागले. ‘दरवेळी आपण जेव्हा खातो, तेव्हा आपले लिव्हर ‘इन्शुलिन’ तयार करते. ह्या ‘इन्शुलिन’चे साखरेत रूपांतर होऊन त्या पासून शरीरात ऊर्जा निर्माण होते. ही अतिरिक्त ऊर्जा वापरली नाही तर तिचे चरबीत रूपांतर होते आणि अशी चरबी पोटावर ‘स्टोअर’ केली जाते…’ अशा प्रकारची बरीच बडबड त्यांनी केली. कुणा ‘आता ह्याला नाकामारू’ की अजून कोणी अशाच नावाच्या जपानी संशोधकाने म्हणे नवीनच संशोधन करून हा निष्कर्ष मांडला होता. (संशोधकांना दुसरे काय काम?) मला त्यांनी सांगितले ते काही समजले नाही, पण पटले!
फक्त एक शंका आली. दिवसातले सहा वेळा खात असता माझ्या लिव्हरने दिवसात निदान बादलीभर तरी ‘इन्शुलिन’ तयार केले असेल. आता येवढ्या इन्शुलिनची माझ्या लिव्हरने मला न कळवता परस्पर कशी विल्हेवाट लावली असेल बरे? बहुतेक स्वादुपिंडाला विकले असावे! किडनीने बोंबाबोंब करू नये म्हणून तिलाही कमिशन दिले असावे… कुणास ठाऊक!
तूर्तास, माझ्या, मोबाईल स्क्रीन पुसायला फारच सोयीच्या असणार्या, गोल गरगरीत ‘शेप’मधल्या पोटावर हात फिरवत मी ही नवीन ‘जेवण शैली’ सुरू करावी की नाही हा विचार करतो आहे.
