कोरोनासंकटाच्या काळात सगळं जग थांबलं तेव्हा ६० वर्षं अविरत वाचकांचं रंजन आणि प्रबोधन करत असलेल्या ‘मार्मिक’लाही काही दिवसांची सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. या विश्रांतीतून ताजातवाना होऊन ‘मार्मिक’ हीरकमहोत्सव विशेषांकाच्या माध्यमातून पुन्हा वाचकांसमोर आला आणि वाचकांनी नेहमीप्रमाणेच प्रेमाचा वर्षाव केला. ‘मार्मिक’चे संस्थापक, संपादक आणि या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या माध्यमातून मराठीजनांच्या मनात अंगार फुलवण्याचा चमत्कार घडवणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अद्भुत व्यंगचित्रकलेला मानवंदना देणारा हा अंक होता. त्याला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल वाचकांचे मन:पूर्वक आभार.
या अंकापासून ‘मार्मिक’ नियमित साप्ताहिक स्वरूपात आपल्यासमोर येऊ लागणार आहे. नवे रूप, नवा रंग, नवा ढंग घेऊन आलेल्या ‘मार्मिक’च्या ‘पुन:श्च हरिओम’ करणार्या या अंकाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीचा मुहूर्त लाभावा, हा दुग्धशर्करा योग आहे.
गेल्या वर्षी अत्यंत नाट्यमय पद्धतीने, अनपेक्षितरित्या ही महाविकास आघाडी आकाराला आली आणि महाराष्ट्राच्या राजकारणाने एक ऐतिहासिक वळणं घेतलं. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या त्रिवेणी संगमातून साकार झालेल्या या सरकारच्या नेतृत्त्वाची धुरा अनपेक्षितपणे उद्धव ठाकरे यांच्याकडे येणे हाही या सरकारला भक्कम स्थिरता देणारा एक दैवी संकेतच ठरला. आघाडी सरकारने दमदार कामगिरी सुरू केली असताना सगळ्या जगावर कोरोनाची काळी छाया पडली आणि या संकटात महाराष्ट्राला ‘कुटुंबप्रमुख’ उद्धव ठाकरे यांचं धीरोदात्त दर्शन घडलं. त्यांनी सर्व संबंधित मंत्र्यांच्या साथीने कोरोना संकटाची देशात सर्वोत्कृष्ट ठरावी, अशी हाताळणी केली आणि वेळोवेळी दूरदर्शनवर येऊन अतिशय दिलासादायक पद्धतीने वडीलधार्या माणसाच्या भूमिकेतून महाराष्ट्रातल्या जनतेला धीर दिला, मार्गदर्शन केलं. त्यातून मुख्यमंत्र्यांची एक वेगळीच लोकाभिमुख प्रतिमा तयार झाली. सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने ‘मार्मिक’ने या सगळ्या घडामोडींचा आढावा घेणारी कव्हर स्टोरी सादर केली आहे.
‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ अशी गर्जना करून अस्तंगत झालेल्या विरोधकांनी महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्त्वात आल्यापासून हे सरकार पाडण्याचे, अस्थिर करण्याचे सर्व प्रयत्न केले. ते निष्फळ ठरताहेत, आघाडी सरकार भक्कम आहे, हे लक्षात आल्यावर कोरोनाकाळातही हिणकस राजकारण केलं गेलं. आधीची युती ‘नैसर्गिक’ होती आणि आताची आघाडी ‘अनैसर्गिक’ आहे, असाही प्रचार सुरू आहे. म्हणूनच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राचं, मुंबईचं हित लक्षात घेऊन त्या त्या काळातील राजकीय परिस्थितीनुसार वेगवेगळ्या पक्षांशी अनेक वेळा सहकार्य केलेलं आहे, याची आठवण करून देणारा लेख आम्ही या अंकात घेतला आहे. त्याने या वावदूक चर्चांना पूर्णविराम मिळावा. महाविकास आघाडीचे एक पडद्यामागचे शिल्पकार आणि काँग्रेसचे मुत्सद्दी नेते अहमद पटेल यांना काळाने हिरावून नेले. त्यांना ‘मार्मिक’ने आदरांजली वाहिली आहे.
‘मार्मिक’ हे मराठीतील एकमेव आणि देशातील अतिशय विरळा अशा प्रतिष्ठाप्राप्त व्यंगचित्र साप्ताहिकांपैकी एक आहे. हा लौकिक आणखी दृढ करण्यासाठी ‘मार्मिक’च्या मुखपृष्ठावर या अंकापासून व्यंगचित्राची पुनर्स्थापना करण्यात आली आहे. त्याचबरोबर अंकातही वेगवेगळ्या व्यंगचित्रकारांच्या कुंचल्यांतून उतरलेल्या नानाविध विषयांवरच्या व्यंगचित्रांची मौज अनुभवता येईल. ‘टपल्या आणि टिचक्या’सारख्या ‘मार्मिक’च्या पहिल्या अंकापासून सुरू असलेल्या सदराबरोबरच काही नवी सदरे, नवे विषय वाचकांसमोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.
स्व. बाळासाहेबांनी ‘मार्मिक’ची सुरुवात करताना संघर्षाने थकलेल्या मराठी मनांना थोडा विरंगुळा देण्याचा मनोदय जाहीर केला होता. विरंगुळा देतानाच त्यांनी मराठी मनांत असंतोषाची ठिणगीही पेरली. त्या काळात परप्रांतीयांना झुकतं माप देणार्या धोरणाविरोधात लढाई होती. आज दुर्दैवाने मराठी असूनही गुजराती बोळ्याने दूध पीत मुंबई आणि महाराष्ट्राविरोधात कारस्थानं करणार्या महाराष्ट्रद्रोह्यांशी लढाई सुरू झाली आहे. एकीकडे मराठीजनांना मनोरंजनाचा, हसवणुकीचा विरंगुळा देत असतानाच महाराष्ट्राच्या भवितव्याला दिशा देणार्या या लढाईतही ‘मार्मिक’ व्यंगचित्ररुपी अमोघ अस्त्रे घेऊन उतरेल आणि मराठीजनांच्या भावनांना वाचा फोडेल, हे निश्चित.