चंद्रपूर जिल्ह्यातील कन्हाळगाव अभयारण्य घोषित करण्यासह राज्यातील दहा नवीन संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय आज राज्य वन्य जीव मंडळाच्या 16 व्या बैठकीत घेण्यात आला.
राज्यात घोषित करण्यात आलेली नवीन दहा संवर्धन राखीव पुढीप्रमाणे आहेत. आंबोली-दोडामार्ग संवर्धन राखीव- सिंधुदुर्ग, चंदगड संवर्धन राखीव- कोल्हापूर, आजरा-भुदरगड संवर्धन राखीव-कोल्हापूर, गगनबावडा संवर्धन राखीव- कोल्हापूर, पन्हाळगड संवर्धन राखीव- कोल्हापूर, विशाळगड संवर्धन राखीव- कोल्हापूर, जोर जांभळी संवर्धन राखीव-सातारा, मायनी क्लस्टर संवर्धन राखीव- सातारा अशा पश्चिम घाटातील आठ संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता दिली आहे. तसेच विदर्भातील महेंद्री व मुनिया या क्षेत्रासही संवर्धन राखीवचा दर्जा देण्यास या बैठकीत मान्यता दिली.
झोनल मास्टर प्लॅन तीन महिन्यांत
पर्यावरण संवेदनशील क्षेत्र अंतिमतः घोषित झाल्यानंतर झोनल मास्टर प्लॅन जिल्हाधिकाऱयांनी तीन महिन्यांत तयार करावा असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.
वन वैभवावर फिल्म
चांदा ते बांदापर्यंत जे महाराष्ट्राचे वन वैभव आहे त्याचे विविध ऋतूतील वैशिष्टय़ टिपण्यास वन रक्षकांना सांगावे. यावरून राज्यासाठी आपण एक चांगली फिल्म तयार करू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महाराष्ट्र पहिलेच राज्य
एकाच वेळी अभयारण्य व दहा संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याचे असून कन्हाळगाव हे राज्यातील 50 वे अभयारण्य झाले आहे असे वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
अवनीचे पिल्लू जंगलात
अवनी वाघिणीच्या पिलाची पूर्ण वाढ झाली असून या पिलाला पेंचमधील जंगलात सोडण्यास एनटीसीएची मान्यता मिळाली आहे.
लोणार सरोवर निधी
लोणार सरोवराला नुकतेच रामसर साइट म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याच्या संवर्धन व संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून मिळणाऱया निधीसाठी प्रस्ताव सादर करा असे आदेश पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले.
सौजन्य- सामना