• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

मेरवान बंद झाले,एका काळाचा सुगंध हरवला…

सॅबी परेरा (विशेष लेख)

marmik by marmik
January 31, 2026
in खानपान, विशेष लेख
0
मेरवान बंद झाले,एका काळाचा सुगंध हरवला…

दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी ग्रॅन्ट रोडच्या बी मेरवान आणि कंपनी या ११२ वर्षे जुन्या इराणी रेस्टॉरंटच्या बंद दारावर हाताने लिहिलेली ‘We are closed. We thank you for your Patronage.’  अशी पाटी लागली. सोशल मीडियावर व्हायरल झालेला बंद दुकानावरील पाटीचा तो फोटो पाहून आपल्या खूप जवळचा आप्त गेल्यासारखं काळजात काहीतरी तुटल्यासारखं झालं. मेरवानच्या पदार्थांचा आणि नावाचा खाद्यप्रेमींमध्ये बोलबाला असला तरी मेरवानने मात्र हा तोरा कधी मिरवला नाही. ते ऐन भरात होते तेव्हाही नाही आणि आता रेस्टॉरंट बंद करतानाही नाही.

लहानपणी मी, आणि माझ्यासारख्या अनेक वसईकरांनी, मुंबईच्या लोकलमध्ये पाऊलही ठेवलं नव्हतं आणि मुंबई पाहिली नव्हती तेव्हापासून मेरवान हे नाव अक्षरशः आमच्या जिभेवर आहे.

वसईचा पासवाला (कावड घेऊन नियमितपणे मुंबईला दूध, भाजीपाला किंवा फुले विकायला मुंबईला जाणारा वसईकर) आठवड्यातून एकदाही मेरवानला न जाता घरी आला असे सहसा होत नसे. आमच्या या पासवाल्या वाडवडिलांनी आम्हाला बटरपेपरमध्ये बांधलेला मावा समोसा, नरम प्लास्टिकच्या सफेद पिशवीमधील मस्का बटर, लुसलुशीत ब्रेड पुडिंग आणि जगात भारी अशा मेरवानच्या मावा केकची चटक लावली. आमच्या मित्रांपैकी ज्याचे वडील नोकरी करणारे होते, त्यांना वडिलांच्या पगाराच्या दिवशी मेरवानचे मावा केक मिळत असत. वडिलांच्या पगाराच्या दिवशी अशा मुलांचे चेहरे सकाळपासून उजळलेले जाणवायचे. गेली कित्येक दशके मेरवान हे नाव सुखदुःखात आमच्या समाजाच्या सोबत होते. कुणा बाळंतिणीला भेटायला जायचे असो, आजारी व्यक्तीला भेटायचे असो वा मयताघरी सांत्वनासाठी जायचे असो; मेरवानचा मावा सामोसा आणि मावा केक हा खाऊ बाय डिफॉल्ट दिला-घेतला जात असे.
पुढे मुंबईला नोकरीसाठी जायला लागल्यावर सगळ्यात पहिला कुठल्या रेस्टॉरंटमध्ये गेलो असेन तर ते म्हणजे मेरवान. पुढे पुढे तर मेरवानला नाश्ता करून मगच ऑफिसला जाणे हाच आमच्या ट्रेनच्या ग्रुपचा रिवाज झाला. कधी ग्रुपमधील एखाद्याला जबरदस्तीने पार्टी द्यायला लावून तर कधी ऊऊश्श् (तुझं तू माझं मी) तत्त्वावर मेरवानच्या नियमित फेर्‍या होऊ लागल्या.

सकाळी-सकाळी रस्त्यावर पसरणारा बन-मस्क्याचा आणि वाफाळत्या चहाचा वास, लाकडी काऊंटरमागे घाईघाईत काम करणारे जुने वेटर्स, आणि कायम गर्दीने भरलेलं ते छोटंसं पण आपलंसं वाटणारं हॉटेल … मेरवान म्हणजे फक्त खाण्याची जागा नव्हे, तर आमच्या जगण्याचा एक अविभाज्य भाग होता. कॉलेजला जाणारे विद्यार्थी, ऑफिसला निघालेले आमच्यासारखे बाबूलोक, गिरणी कामगार, कधी एखादा लेखक किंवा मराठी नाटक सिनेमातील नट सगळेच तिथे एका टेबलाभोवती भेटायचे. स्पेशल इराणी चहासोबत खाल्लेला बन-मस्का, गरमागरम मावा समोसा, ब्रेड पुडिंग आणि मावा केक, तिथला आम्लेट-पाव, हाफ-फ्राय आणि कधीतरी खाल्ला जाणारा खिमा-पाव या सगळ्या चवीच्या, गंधांच्या आणि तिथे केलेल्या दंगामस्तीच्या आठवणी मेंदूतून पुसल्या जाणे शक्य नाही.

मेरवानशी आमचं नातं खाण्यापिण्या पलीकडे देखील होतं. मेरवानला लागणारे दूध आणि केळीची पाने वसईकरच पुरवत असत. आमच्याकडील कित्येक मुलामुलींची सोयरीक होण्याआधी किंवा झाल्यानंतरची एकमेकांशी पहिली भेट मेरवानमध्ये झालेली आहे.
मेरवानचं एक वेगळंच टाईमटेबल होतं …सकाळी लवकर उघडणं आणि दुपारपर्यंतच गजबजलेलं असणं. सकाळी दहाच्या सुमारास ‘केक खतम’, ‘समोसा खतम’ असा पुकारा ऐकून निराशेने परत जाणारं गिर्‍हाईक दिसायचं. दुपारनंतर जणू ते हॉटेल विश्रांती घेतंय असं वाटायचं. सकाळच्या गर्दीत उभं राहून पार्सलसाठी ऑर्डर देणं किंवा हॉटेलात बसून ‘एक बन-मस्का, एक चहा’ असा वेटरचा पुकारा इतक्या वेळा ऐकू येई की ते मेरवानचं पार्श्वसंगीत झालं होतं. चिनी मातीच्या (बर्‍याचदा कपाचा कडा तुटलेला) कपात चहावर हलकीशी साय, सोबत हात भाजणारा मावा केक… चहाचा एक घोट घेतला की क्षणभर काळ थांबल्यासारखा वाटायचा. लाकडी खुर्च्या, थोडी झिजलेली मार्बलटॉप टेबलं, भिंतींवर जुने फलक, आतील फॅमिली रूममधील टेबलवरील लाल चेकरचे टेबलक्लोथ आणि मागे शेल्फवर असणारे (पण मी कधीच न चाखलेले)एध्एभ्ध् नावाचे पेय हा मेरवानचा अँबियन्स. बाहेरून येणारा ग्रँट रोड स्टेशनवरील लोकल ट्रेनचा आवाज, रस्त्यावरील लोकांची गजबज. पण मेरवानच्या आत पाऊल टाकलं की एक वेगळीच शांत गडबड होती…ओळखीची, आपलीशी.
क्वचित कधी रविवारी सकाळी तिथे जाणं झालं तर वेगळंच दृश्य दिसे. पेपर वाचत बसलेले, शब्दकोडे सोडवणारे ज्येष्ठ लोक (त्यात जास्त पारशी), कॉलेजचे मित्रमंडळ आणि कोपर्‍यात शांतपणे चहा घोटत विचारात हरवलेला एखादा माणूस. कुणी कुणाला ओळखत नसलं तरी सगळ्यांमध्ये एक अदृश्य नातं होतं …त्या जागेचं. आज मुंबईत कॅफे खूप आहेत, पण मेरवानसारखी जागा कमीच. कारण मेरवानच्या पदार्थांइतकीच तिथल्या आठवणींची चव देखील अजून जिभेवर रेंगाळत आहे.

१९९२ पासून मी मेरवानमध्ये जायला सुरुवात केली आणि २००८ पर्यंत माझं तिथे आठवड्यातून एकवेळा तरी जाणे होत असे. नंतर माझं जाणं वर्षातून एक-दोन वेळा इतकं कमी झालं. मी वर्षभरापूर्वी तिथे गेलो तेव्हाही मी पूर्वी पाहिलेले वेटर्स तिथे काम करीत होते. तेथील वेटर्सच्या कामाची पद्धत थोडी वेगळी होती. साध्या कपड्यातील वेटर आपल्या टेबलजवळ येऊन खांद्यावरील ओल्या फडक्याने टेबल साफ करून आपल्याला ऑर्डर विचारतो. त्याच्या हातात कागद पेन काहीच नसते. आपण ऑर्डर देतो. तो वेटर तिथेच आपल्या बाजूला उभा राहून जोरात पुकारतो. ती ऑर्डर किचनमध्ये रजिस्टर होते आणि थोड्याच वेळात आपण ऑर्डर केलेले पदार्थ आपल्या टेबलवर येतात. खाऊन झाल्यावर तिथे आपल्याला कुणी बिल देत नाही. आपण उठून हॉटेलच्या दाराच्या दिशेने निघतो. आपल्यामागून वेटर पुकारा करतो, ‘नीला शर्ट, सत्तर.’ काउंटरवरील इसमाकडे आपण सत्तर रुपये देऊन बाहेर पडतो. वेटरला टिप-बीप देण्याचा प्रकार मेरवानमध्ये नसतो.

ग्रँट रोडच्या मेरवान हॉटेलच्या आठवणी म्हणजे मुंबईच्या एका खास काळाचा सुगंधच जणू. इराणी कॅफेची ती खास शांत गडद चव, साधेपणा आणि माणुसकी…आजही ‘ग्रँट रोड’ म्हटलं की मेरवान आपोआप आठवतं. काळ बदलला, मुंबई बदलली; पण त्या बन-मस्क्याच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत…कोडॅकच्या फिल्मरोलवर काढलेल्या जुन्या फोटोंसारख्या, किंचित फिकट झालेल्या, पण खूप आपल्याशा असलेल्या!

Previous Post

राशीभविष्य – ३१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२६

Next Post

पांडबा मिसळ

Next Post
पांडबा मिसळ

पांडबा मिसळ

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.