• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

बैंगण-बत्तीसी

विलास कुमार (खाणार्‍याने खात जावे)

marmik by marmik
December 25, 2025
in खानपान, विशेष लेख
0
बैंगण-बत्तीसी

मनुष्यप्राण्याचे वर्गीकरण ‘वांगे अतिशय आवडणारे’ व ‘वांगे मुळीच न आवडणारे’ अशा दोन श्रेणींमध्ये केले तरी चालू शकेल. निदान मला भेटलेल्या अनेकांनी ‘वांगे आवडते का?’ ह्या प्रश्नावर नेहमीच अशा दोन विरुद्ध टोकाच्या आवडी सांगितलेल्या आहेत. बाकीच्या भाज्यांबद्दल मवाळ धोरण असलेले लोकही ‘वांगे’ म्हटले की एवढे कट्टर का होतात, हे काही समजत नाही. वांगी आवडणारे लोक वांग्याच्या अनेक रेसिपी आठवून अगदी ‘नॉस्तल्जिक’ होतात तर वांगी न आवडणारे ‘एकवेळ कारले चालेल पण वांगे नको’ असे निक्षून सांगत नाक मुरडतात. वांग्याचे स्वत:चे मात्र बर्‍याच भाज्यांसोबत गुण्या-गोविंदाने नांदण्याचे (की शिजण्याचे?) मोकळे-ढाकळे धोरण असावे! वांगी-बटाटा हा तर साताजन्माचा सोबती असल्यासारखा भाजीचा प्रकार झाला. ते दोघे जणू ‘कटेंगे साथ, अन् पकेंगे साथ’ म्हणत वांगे-बटाटे मिक्स भाजीची चव वाढवतात.

हॉटेलवाल्यांची तर अशी भाजी ही पहिली पसंती असते. बाकी कुठली नसली तरी ही भाजी प्रत्येक हॉटेल असो नाहीतर ढाब्यावर मिळतेच मिळते.वांगे तसे अस्सल भारतीय आहे. मिरची, बटाटा किंवा साबुदाण्यासारखे परदेशी नाही. ही मंडळी पण आता आपल्यातलीच झालेली आहेत म्हणा. वांग्याचा उल्लेख आयुर्वेदातही सापडतो. आयुर्वेदात वांगे हे मधुमेह, रक्तदाब आणि वजन कमी करण्यासाठी गुणकारी असल्याचे मानले जाते. भारतीय खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग झालेल्या वांग्याचा उल्लेख लोकसंगीतात, म्हणी, वाक्प्रचारातही आढळतो. ‘पुराणातली वांगी पुराणात’ अशी म्हण तुम्ही ऐकली असेलच. खरे म्हणजे ते ‘पुराणातली वानगी पुराणात’ म्हणजे पुराणात जे दाखले किंवा उदाहरणे दिलेली आहेत, त्याचा प्रत्यक्ष व्यवहारात काही उपयोग नाही, अशा अर्थाने म्हटले आहे. ‘वानगी’चा ‘वांगी’ असा अपभ्रंश झाल्यामुळे ही नवीन म्हण तयार झाली असावी.

चीननंतर भारत हा सर्वात मोठा वांगी उत्पादक देश आहे. भारतात सुमारे ५.५ लाख हेक्टर जमिनीत वांग्याचे पीक घेतले जाते. भारतात त्याला जरी ‘वांगे’ ‘बैंगन’ अशी हेटाळणीदर्शक नावे असली तरी इंग्रजी शास्त्रीय नाव ‘सोलॅनम मेलाँजेना’ हे कसे एकदम राजेशाही थाटाचे आहे! पण ख्रिस्ती लग्नात नवरीला घालायच्या पोषाखासारखे ते सहसा कुणी रोजच्या व्यवहारात वापरत नाही. भारतीय पाठ्यपुस्तकात त्याला ‘ब्रिंजल’ म्हणतात. अमेरिका, ऑस्ट्रेलियामध्ये ‘एग-प्लांट’ असे मजेशीर नाव वापरतात. पांढर्‍या रंगाचे वांगे अगदी कोंबडीच्या अंड्यासारखेच हुबेहूब दिसते. त्यामुळे हे नाव पडले असावे. बाकी त्याला युरोपमध्ये ‘आउबर्गिन’ असे तोंड मुरडायला लावणारे नाव आहे.
भारतीय आणि चिनी जेवणात फार पूर्वीपासून वापरात असणारे वांगे अरबी जेवणातही समाविष्ट झाले आणि त्या मार्गाने इतर देशांमध्येही त्याची ओळख झाली. पातळ सांबारापासून झणझणीत मसाला घालून केलेले ‘भरले-वांगे’ अशा भल्यामोठ्या रेंजमध्ये वांगे मिरवत असते. थाई-चिनी मांसाहारी पदार्थांतसुद्धा वांगे महत्त्त्वाचे स्थान पटकावून बसलेले आहे. वांगी प्रामुख्याने तीन प्रकारात आढळतात. गोल, लांब व सडपातळ आणि ठेंगण्या झाडाची.

वांग्याच्या पारंपरिक जाती- गुलाबी, हिरवी, पांढरी, जांभळी आणि काळ्या रंगाची वांगी. ‘रवय’ आणि ‘कल्याणी’ अश्या दोन जातींची वांगी आणि घुडी, वेली, बाणवांगे, भोंगाफाईट अशा विविध जातींची व आकारांमधली वांगी वसई भागात पिकतात. पुसा पर्पल क्लस्टर, पुसा क्रांती, पुसा अनमोल, पुसा पर्पल राउंड, अर्का शील, अर्का शिरीष, अर्का कुसुमाकर, अर्का नवनीत, आझाद क्रांती, अशा विचित्र नावांच्या जातीची वांगी भारतात पिकवली जातात.

वांग्यात जीवनसत्व बी १ व बी ६ आढळून येतात. पोटॅशियम ची भरपूर मात्रा असलेल्या वांग्यात फायबरसुद्धा मिळते. अँटी ऑक्सिडेन्ट असल्यामुळे हृदयासाठी चांगले असणार्‍या या फळ भाजीत कॅलरी सुद्धा कमी असतात. त्यामुळे डायट करणारे सुद्धा बिनधास्त खाऊ शकतात. शिवाय वजन कमी करण्यास मदत होते.  वांग्याची पातळ भाजी, सुकी भाजी, भरली वांगी, वांग्याची उसळ, वांग्याची भजी, वांगी काप फ्राय आणि वांग्याचे भरीत अशी बर्‍याच प्रकारची भाजी तयार करण्यात येते.

धुळे-जळगाव येथील वांग्याचे भरीत प्रसिद्ध आहे. थंडीच्या दिवसात तेथे चक्क ‘भरीत पार्टी’ करतात. येथली भरताची वांगी ही वेगळीच असतात. ती पोपटी, पांढरट रंगाची असून इतर वांग्यांपेक्षा बरीच मोठी असतात. त्यात बियाही कमी असतात. ही वांगी भाजून घ्यायची पद्धतही निराळी असते. वांग्यांना तेल लावून, तूर किंवा कपाशीच्या काट्यांवर खरपूस भाजली जातात. निखार्‍यावर भाजलेली वांगी ठेचून घेतली जातात. हिरवी मिरची आणि शेंगदाणा, खोबरे यांचा कूट घालून बनवलेले भरीत, कळणाची भाकरी, पुरी, आमसुलाचे सार, कांद्याची पात असे सगळे साग्रसंगीत जेवण केळीच्या पानावर भारतीय बैठकीत आग्रहाने वाढले जाते.

मला खोबरे आणि शेंगदाणे टाकलेले आवडत नाहीत, त्यामुळे मी थोड्या वेगळ्या पद्धतीने भरीत बनवतो. मंडईत मिळणारी गडद जांभळ्या रंगाची मोठी वांगी भरतासाठी वापरतो. वांगे निवडताना ते आकाराने एकदम मोठे नसावे. हलके लागल्यास त्यात बिया जास्त असतात. वांगे चांगले धुऊन चाकूने त्यावर काही ठिकाणी बारीक छिद्रे पाडावी लागतात. नाहीतर भाजताना ते आतमध्ये वाफ कोंडून मध्येच वेडेवाकडे फुटण्याची शक्यता असते. मंद गॅसवर (गरिबाच्या घरी चूल कुठली?!) निळ्या ज्वालेमध्ये अधूनमधून फिरवत सर्व बाजूनी चांगले भाजून घेतो. वांग्याला चाकूने हलकेच खुपसून बघितले तर आरपार जायला हवे. मध्ये घट्ट भाग लागला तर अजून भाजावयास हवे हे समजते. भाजून काळे पडलेले साल हलक्या हाताने काढून घ्यावे. एका कढईमध्ये थोडे तेल गरम करून त्यावर बारीक चिरलेला कांदा अर्धा-कच्चा होईपर्यंतच गरम करावा. सिमला मिरची आणि कांद्याची हिरवी पातही थोडीशी परतून घ्यावी. दोन तीन हिरव्या मिरच्या टाकाव्या. शेवटी लसूण बारीक ठेचून आणि टोमॅटो बारीक चिरून टाकावा. साल काढलेले वांगे चांगले ठेचून टाकावे. हिरव्या मेथीच्या भाजीची काही कोवळी पाने टाकावीत आणि कोथिंबीर भुरभुरवून गरम गरम भाकरीसोबत खायला घ्यावे. एकदम फर्स्ट क्लास भरीत तयार! ह्यावर मास्टरस्ट्रोक द्यायचा असेल तर एक जळता निखारा भरतात टाकावा आणि दोन मिनिटे झाकून ठेवावे. अगदी चुलीवर बनवल्यासारखा स्मोकी फ्लेवर येतो.

‘भरले-वांगे’ खावे तर आमच्या आईच्या हातचे, असे तुमच्या एखाद्या तरी मित्राने, स्वत:ची बायको जवळ नसताना खासगीत तुम्हाला खात्रीने सांगितलेलेच असेल!

नवरा नामक शत्रूला गोंधळवून टाकण्यासाठी बायका वांग्याचा गनिमी काव्यासारखा वापर करतात. ‘मला बैंगणी रंगाची साडी पाहिजे’ अशी मागणी बायको करू लागली की नवर्‍याने सावध होण्याची गरज आहे. मुळात हा बैंगणी किंवा ‘वांगी-कलर’ नेमका कोणता असतो यावर दोन व्यक्तींचे एकमत होऊ शकत नाही. कारण वांगे हे पांढर्‍या रंगापासून ते गडद जांभळ्या रंगापर्यंत विविध रंगात बाजारात मिळत असते. वांग्याच्या रंगाची साडी त्यामुळे या रेंजमध्ये पांढर्‍या, हिरव्या, गुलाबी किंवा जांभळ्या यापैकी कुठल्याही रंगात टेक्निकली बसू शकते!


बायकांचा रंगांचा शब्दकोश वेगळाच असतो. ‘राणी कलर’ नावाचा एक रंग असतो हे तुम्हाला माहिती आहे का? अनेक रंग उधळण्याचा इतिहास भले राजे-महाराजे लोकांच्या नावावर असला तरी ‘राजा कलर’ नावाचा काही रंग नसतो. ‘कांदा कलर’ म्हणजे नेमका कुठला रंग असतो ते आपल्यासारख्या रंगांधळ्या पुरूषांना समजणे केवळ अशक्य! कांदा पांढरा, गुलाबी आणि त्यावर हिरवी पात असलेला असतो ना?
बॉर्डरवर सैनिक स्वत:जवळ हँड ग्रेनेड बाळगतात तसे नवरे खिशात कांदा घेऊन फिरतात. साडीच्या दुकानात सेल्समनला खिशातून कांदा काढून दाखवतात व ‘ह्या रंगाची साडी हवी आहे’ अशी मागणी करतात. उद्या तुम्हाला कोणी धांदरटासारखा दिसणारा पुरुष खिशात वांगे लपवून संशयास्पदरित्या भटकताना आढळला तर त्याच्या सौभाग्यवतीने त्याला बैंगणी रंगाची साडी खरेदी करायच्या मोहिमेवर पाठवले आहे हे समजून घ्यावे, ही विनंती. वांगीप्रेमी जनता आपल्या ह्या प्रिय ‘एक टांग की मुर्गी’ला सर्व फळभाज्यांमध्ये सर्वोच्च सन्मान देतात ह्यात नवल ते काय?

Previous Post

फटकारे बाळासाहेबांचे

Next Post

जावेद, मुफ्ती आणि आस्तिक-नास्तिक वाद!

Next Post
जावेद, मुफ्ती आणि आस्तिक-नास्तिक वाद!

जावेद, मुफ्ती आणि आस्तिक-नास्तिक वाद!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.