खूप पूर्वी, लहानपणी इंग्रजी चित्रपटांमध्ये किंवा मालिकांमध्ये जेवणाच्या टेबलावर काचेच्या भांड्यात वरून चीज घातलेला बेक केलेला एखादा पदार्थ ठेवलेला दिसायचा तर कधी स्वयंपाकाची तयारी करताना अशा मालिकांमधले लोक ओव्हनमध्ये मोठं भांडं भरून काहीतरी बेक करताना किंवा ओव्हनमधून बेक केलेला पदार्थ असलेलं भांडं बाहेर काढताना दिसायचे. अशा पदार्थांना ‘कॅसेरॉल’ म्हणतात असं त्यावेळी कळलं होतं. चित्रपट किंवा मालिका बघून पाश्चात्य जेवण म्हणजे असला कॅसेरॉल किंवा भाजलेला मांसाहारी पदार्थ आणि ब्रेड हेच असतं, असा एक गैरसमज झाला होता. नंतर जरा मोठं झाल्यावर सुरुवातीला बाहेर जे पाश्चात्य पदार्थ खायला मिळाले त्यात असला बेक केलेला कॅसेरॉल कधी खायला मिळाला नाही. घरी ओव्हन आल्यावर सुद्धा बेक करायचे म्हटल्यावर केक, बिस्किटं हेच पदार्थ आधी आठवतात.
कॅसेरॉल हा तसा बर्याच देशांमध्ये केला जाणारा पदार्थ आहे. मुळात कॅसेरॉल म्हणजे थोडी खोलगट आणि मोठ्या आकाराची बेकिंग डिश. हे भांडं आपल्या परिचयाचं आहे. हे भांडं काचेचे किंवा सिरॅमिकचे असते. या बेकिंग डिशमध्ये मांसाचे तुकडे, फेटलेली अंडी, डाळी, कडधान्ये, वेगवेगळ्या भाज्या, बटाटे, पास्ता, भात, चीज आणि एखादा सॉस अशा वेगवेगळ्या पदार्थांपैकी हव्या त्या पदार्थांचे एकावर एक थर रचून कमी आंचेवर जास्त वेळ बेक करून वेगवेगळ्या चवींची कॅसेरॉल बनवले जातात. वेगवेगळ्या देशांमध्ये, प्रांतांमध्ये आणि खाद्यसंस्कृतींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅसेरॉल केले जातात. सगळे घटक एकत्र करून ओव्हनमध्ये बेक केलेल्या साध्या सोप्प्या कॅसेरॉलपासून भरपूर वेळ आणि कौशल्य लागणार्या किचकट कॅसेरॉलपर्यंत अनेक वेगवेगळे कॅसेरॉल केले जातात.
प्रथिने, भाज्या, स्निग्ध पदार्थ आणि कर्बोदके असे सगळेच घटक बहुतांशी कॅसेरॉलमध्ये असल्याने या पदार्थाचा वन डिश मिल म्हणून जेवणात समावेश करता येऊ शकतो. बर्याच वेळा कॅसेरॉलमध्ये क्रीम, मैदा, लोणी आणि भरपूर चीज वापरून केलेले सॉस वापरले जातात. शिवाय बेक करताना वरून चीज घातलं जातं. यामुळे अशा कॅसेरॉलमध्ये जास्त उष्मांक म्हणजे कॅलरीज असतात. पारंपारिक कॅसेरॉलमध्ये बनवताना थोडे बदल केल्यास उष्मांक कमी होऊन कॅसेरॉल आरोग्यदायी बनू शकतात. वेगवेगळ्या भाज्या, प्रथिने, थोडे कर्बोदके आणि घरी केलेला थोडा सॉस वापरून कॅसेरॉल करणं खूप सोप्पं आहे. हा पदार्थ कमी आंचेवर बेक करायचा असल्याने पदार्थ शिजण्यास अर्धा तास ते तास-दोन तास इतका वेळसुद्धा लागू शकतो. तयारीचा वेळ मात्र फार कमी लागतो. आणि एकदा ओव्हनमध्ये बेक करायला ठेवल्यानंतर पदार्थ तयार होईपर्यंत आपण दुसरं काहीही करायला रिकामे होऊ शकतो. त्यामुळेच घरात ओव्हन असल्यास कॅसेरॉलसारखा फॅन्सी पदार्थ करणं खूप सोयीचे असतं.
पास्ता शीट्स, सॉस आणि चीजचे एकावर एक थर रचून बनवलेला लझानिया हा पास्त्याचा इटालियन पदार्थ, मॅक अँड चीजसारखा सोप्पा अमेरिकन किंवा ब्रिटिश पास्त्याचा प्रकार, भाजलेले किंवा तळलेले वांग्याचे काप, मरिनारा सॉस आणि चीजचे थर एकावर एक रचून बनवला जाणारा एगप्लांट पार्मेजान हा इटालियन पदार्थ, शिळा ब्रेड, भाज्या, अंडी आणि चीज घालून बनवलेला व्हेजिटेबल स्ट्राटा, फजिता सॉस, फजिता, भाजलेल्या चिक बीन्स, पालक आणि अजून हव्या त्या भाज्या, तॉर्तिया आणि चीज एकत्र करून बनवलेला मेक्सिकन चिकन फजिता कॅसेरॉल, बीन्स, कॅरमलाइज केलेला (काळा होईपर्यंत परतवलेला) कांदा आणि चीज घालून केला जाणारा ग्रीन बीन कॅसेरॉल, कॅनबंद ट्युना मासा आणि भाज्या आणि एखादं कॅनमधलं सूप वापरून बनवला जाणारा ट्युना कॅसेरॉल, नूडल्स किंवा बटाटे आणि अंडी घालून बनवला जाणारा कुगल हा ज्युईश पदार्थ ही काही पाश्चात्य कॅसेरॉलची उदाहरणे आहेत.
या आणि अशा अनेक पाश्चात्य कॅसेरॉल पाककृतींशिवाय ग्रीक किंवा टर्कीसारख्या मेडिटेरियन खाद्यसंस्कृतींमध्येही वेगवेगळे कॅसेरॉल बनवले जातात. आपल्याकडची एकावर एक थर देवून, ‘दम’ देवून बनवली जाणारी बिर्याणी हासुद्धा एक प्रकारचा कॅसेरॉलच आहे. बेचेमल सॉस किंवा व्हाइट सॉस, मरिनारा सॉस किंवा तुमच्या आवडीचा घरी बनवला जाणारा एखादा सॉस किंवा घट्ट ग्रेव्ही किंवा घट्ट सूप, आवडीच्या भाज्या, प्रथिनांचा एखादा पदार्थ आणि हवे असल्यास ब्रेड/ भात/ नुडल्स/ बटाटे/ पास्ता/ रताळे यापैकी कोणतेही एक कर्बोदक आणि हवे असल्यास थोडे चीज या घटकांना वापरून अनेक वेगवेगळे कॅसेरॉल करता येऊ शकतात.
व्हेजिटेबल स्ट्राटा
साहित्य : दीड कप दूध, ४ वाट्या चिरलेल्या वेगवेगळ्या भाज्या (रंगीत भोपळी मिरच्या, शिमला मिरची, झुकिनी, ब्रोकली, मशरूम, पालक, स्वीट कॉर्न, कांदा, बीन्स, गाजर, मटार दाणे यापैकी हव्या त्या भाज्या घ्याव्या), अर्धा चमचा चिरलेला लसूण (ऐच्छिक), ४ अंडी, बेडचे ८ स्लाईस, अर्धी वाटी किसलेलं चीज, चवीप्रमाणे मीठ, मिरेपूड, चिली फ्लेक्स आणि हवे असेल तर सिझनिंग, थोडं बटर किंवा तेल.
कृती : चार ब्रेडचे स्लाइस मावतील अशा चौकोनी काचेच्या किंवा सिरॅमिकच्या भांड्याला आतून तेल किंवा बटर लावून घ्यावे.
एका फ्रायपॅनमध्ये थाेडं तेल घेऊन वापरणार असाल तर लसूण आणि कांदा किंचित परतून घ्यावा. यानंतर यात चिरलेल्या भाज्या घालून परताव्या. बीन्स, गाजर, मटार दाणे, स्वीट कॉर्न या भाज्या आधी थोडा वेळ उकळत्या पाण्यातून काढून घेतल्यास लवकर शिजतात. या भाज्यांमध्ये चवीप्रमाणे मीठ, मिरे पूड आणि हवे असल्यास पिझ्झा सिझनिंग घालावे. ३-४ मिनिटात भाज्या शिजतात. भाज्या शिजत असतानाच एका भांड्यात अंडी फेटून घ्यावीत. त्यात दूध आणि चवीप्रमाणे मीठ व मिरे पूड घालावी.
तेल लावलेल्या भांड्यात आधी चार ब्रेडचे स्लाइस ठेवावेत. त्यावर शिजवलेल्या भाज्यांपैकी निम्म्या घालाव्या. यावर दूध आणि अंड्याच्या फेटलेल्या मिश्रणापैकी अर्धं मिश्रण पसरवावे. यावर आता थोड्या चीजचा थर पसरवावा. त्यावर उरलेले चार ब्रेडचे स्लाइस ठेवावेत. त्यावर परत भाज्या, अंडी-दूध मिश्रण आणि उरलेले चीज एकानंतर एक याच क्रमाने पसरवावे. एखाद्या चमचाने हे ब्रेडचे स्लाइस हल्क्या हाताने दाबावे आणि भांडे १५-२० मिनिटांसाठी बाजूला ठेवावे.
भांड्यामध्ये ब्रेड आणि भाज्यांचे थर रचत असतानाच एका बाजूला ओव्हन १६० सेलियसवर गरम करायला ठेवावे. ब्रेड, अंडी आणि भाज्यांचा कॅसेरॉल या गरम ओव्हनमध्ये ४० ते ५० मिनिटे बेक करावा. बाहेर काढल्यावर पाच मिनिटे बाजूला ठेवून मग तुकडे कापून खायला घ्यावे.
हा खरं तर नाश्त्याचा प्रकार आहे, पण वन डिश मिल म्हणून जेवणात खायला सुटसुटीत आणि पोटभरीचा होतो. यामध्ये भाज्यांबरोबर शिजलेले चिकनचे तुकडे, सॉसेजेस, पनीर किंवा टोफूचे तुकडे इत्यादी पदार्थही घालता येतात. चवीत बदल म्हणून मिरे पूड, चिलीफ्लेक्स आणि पाश्चात्य सिझनिंग न वापरता तिखट, हळद, धणे पूड, कोथिंबीर वापरून भारतीय चवीचा स्ट्राटा बनवता येईल. अंडी न वापरता असाच व्हेजिटेबल स्ट्राटा बेसन पीठ, दूध, थोडी जवसाची पूड वापरून बनवता येतो.
एगप्लांट कॅसेरॉल
साहित्य : २ मोठी भरताची वांगी, ताजा मरिनारा सॉस, चवीप्रमाणे मीठ आणि मिरे पूड, १ कप किसलेलं मिक्स पिझ्झा चीज, थोडा बारीक रवा किंवा ब्रेडक्रंब्स, तेल, थोडी बेसिलची पानं.
कृती : वांग्याचे पाव इंच जाडीचे गोल काप करून मिठाच्या पाण्यात ठेवावेत. वांग्याचे काप कोरडे करून त्यांना ब्रेडक्रंब्ज किंवा रव्यात घोळवावे. हे काप थोड्या तेलावर प्रâायपॅनमध्ये दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावेत. हेच काप ओव्हनमध्येही भाजता येतील. ओव्हनमध्ये काप भाजताना ओव्हन थोडावेळ आधी गरम करून १७० सेल्सियस तापमानावर तेल लावलेल्या बेकिंग डिशमध्ये रंग बदलेपर्यंत दोन्ही बाजूंनी भाजावे. साधारण अर्धा तास लागतो. मध्ये एकदा वांग्याचे काप उलटून घ्यावेत. या भाजलेल्या कापांवर थोडं मीठ आणि मिरे पूड भुरभुरावी.
आता एका तेल लावलेल्या पसरट बेकिंग डिश किंवा कॅसेरॉलमध्ये मरिनारा सॉसचा एक जाडसर थर द्यावा. त्यावर निम्मे वांग्याचे काप रचावेत. वांग्याच्या कापांवर परत एकदा मरिनारा सॉसचा थर द्यावा. यावर चीज पसरवावे. आता यावर उरलेले वांग्याचे काप, मरिनारा सॉस आणि उरलेले चीज असे थर रचावेत. गरम ओव्हनमध्ये हा कॅसेरॉल १७० सेल्सियस तापमानावर वरचे चीज सोनेरी रंगाचे होईपर्यंत बेक करावे. अंदाजे २०-३० मिनिटे लागतात. वरून थोडी चिरलेली बेसिलची पाने घालावीत.
एगप्लांट पार्मेजान या इटालियन पदार्थात असेच वांग्याचे काप फेटलेल्या अंड्यात घोळवून मग इटालियन सिझनिंग आणि पार्मेजान चीज मिक्स केलेल्या ब्रेडक्रंब्जमध्ये घोळवतात आणि बेक करतात किंवा तेलावर भाजतात. शिवाय कॅसेरॉलमध्ये थर रचताना पार्मेजान आणि मोझेरेला अशा दोन चीजचे मिश्रण वापरले जाते.
दुसर्या एका टर्किश पदार्थामध्ये लसूण, जिरे पूड, तिखट आणि कोथिंबीर घालून कांदा आणि टॉमॅटोचा सॉस बनवून असेच वांगी आणि सॉसचे थर रचून बेक केले जाते. यात चीजचा वापर केला जात नाही.
मरिनारा सॉसची रेसेपी या आधी इटालियन खाद्यपदार्थांसोबत एका लेखात दिली आहेच. हा सॉस म्हणजे पिझ्झा/ पास्ता सॉस. या सॉस कांदा, टॉमॅटो, चेरी टॉमॅटो, लसूण, चिली फ्लेक्स, इटालियन सिझनिंग भरपूर बेसिल वापरून करतात.
वांग्याच्या कापांऐवजी परतलेल्या इतर कोणत्याही भाज्या आणि पनीरचे तुकडे किंवा चिकन सलामी स्लाईस वापरून असाच भाज्यांचा कॅसेरॉल करता येईल.