चांगल्या आरोग्यासाठी सर्वसमावेशक आणि परिपूर्ण आहारासोबतच योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचे असते. आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टर चांगल्या आरोग्यासाठी आहार सुचवताना आवश्यक प्रमाणात प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्वे असलेल्या आहारासोबतच भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. दिवसभरात अडीच ते साडे तीन लिटर पाणी प्यावे असं म्हटलं जाते. बर्याचदा नुसते पाणी जास्त प्यायले जात नाही. अशावेळी वेगवेगळ्या पदार्थांच्या माध्यमातून एवढे पाणी किंवा द्रवपदार्थ शरीरात जातील असे बघितले जाते. दूध, दही, ताक, सरबतं आणि पाणी अशा वेगवेगळ्या पदार्थांमधून पुरेसे पाणी शरीराला मिळू शकते.
हिवाळ्यात थंडीमुळे नुसते पाणी जास्त प्यायले जात नाही. या दिवसांमध्ये फारशी तहानही लागत नाही. अशावेळी आवर्जून लक्षपूर्वक जास्त पाणी पिणे गरजेचे आहे. नुसते पाणी प्यायले जात नसेल तर हिवाळ्यात काढे किंवा गरम डिटॉक्स वॉटर, ग्रीन टी, हर्बल टी, सूप अशा वेगवेगळ्या पदार्थांमधून पाण्याची गरज पूर्ण करता येते. यातल्या डिटॉक्स वॉटर, हर्बल टी, ग्रीन टीबद्दल हल्ली सगळीकडे ऐकायला आणि वाचायला मिळते. डिटॉक्स वॉटर शरीरातील हानीकारक घटक बाहेर काढण्यास मदत करते असे म्हटले जाते. याशिवाय ग्रीन टी, हर्बल टी किंवा डिटॉक्स वॉटर चयापचयाला मदत करते असंही म्हणतात. साधे पाणीसुद्धा पुरेशा प्रमाणात प्यायल्यास शरीरातील हानीकारक घटक बाहेर पडण्यास नक्कीच मदत होऊ शकते. तेच काम डिटॉक्स वॉटरही करते.
साध्या पाण्यापेक्षा याचे वेगळेपण म्हणजे चव. डिटॉक्स वॉटर सहसा वेगवेगळी फळं, भाज्या, मसाले किंवा हर्ब्ज पाण्यात घालून बनवले जाते. या पदार्थांमुळे त्या पाण्याला वेगळी चव मिळते. यातले बरेच घटक आपण पूर्वापार आरोग्यासाठी चांगले असल्याने वेगवेगळ्या प्रकारच्या काढ्यांमध्ये वापरत आलो आहोत. तेच काम डिटॉक्स वॉटर पण करते. आपला आलं आणि तुळशीचा काढा किंवा आलं आणि हळद घातलेला काढा एक प्रकारचे डिटॉक्स वॉटरच आहे. हिवाळ्यासाठी अद्रक + तुळशीची पाने, बडीसोप + दालचिनी, बडीसोप + आलं, दालचिनी + पुदिना, ओवा + बडीसोप + पुदिना, मिरे + अद्रक + बडीसोप, गवती चहा + पुदिना अशा वेगवेगळ्या घटकांना पाण्यात उकळून गरम डिटॉक्स वॉटर करता येतं. यात कधीतरी चिमूटभर सैंधव तर कधी थोडे लिंबू पिळून किंवा गोड चालत असल्यात अगदी थोडासा मध घालून चवीत बदल करता येतो.
याच प्रकारे वेगवेगळी फुलं वापरून हर्बल टीसुद्धा बनवता येतात. जास्वंद, गुलाब, गोकर्ण, मोगरा, प्राजक्त, जाई, शेवग्याची फुलं ही आपल्याकडे सहजपणे मिळणारी ताजी फुले किंवा त्यांच्या वाळलेल्या पाकळ्या वापरून हर्बल टी किंवा फ्लॉवर टी बनवता येतो. असा चहा बनवताना गरम पाण्यामध्ये ही फुले किंवा यांच्या पाकळ्या घालून पाच मिनिटे हे पाणी झाकून ठेवावे आणि मग गाळून हा चहा प्यायला घ्यावा. हा चहा म्हणजे खरे तर त्या फुलांचा हलकासा सुगंध असलेले आणि काही वेळा रंग असलेले पाणीच असते. यातल्या बहुतांशी फुलांना स्वत:ची जाणवू शकेल अशी चव नसते. चवीसाठी यामध्ये नंतर थोडे लिंबू पिळून घेतलं जाते. गोडी हवीच असल्यास यातही थोडा मध घालता येतो. याशिवाय ही फुलं पांढर्या किंवा हिरव्या ग्रीन टी सोबतही वापरून वेगवेगळे ग्रीन टी बनवता येतात. बाजारातून साधा ग्रीन टी आणून त्यात अशी फुलं/ पाकळ्या, तुळशीची पानं, आल्याचा तुकडा, पुदिना, गवती चहा, दालचिनी असे हव्या त्या चवीचे पदार्थ वापरून आपण घरीच वेगवेगळ्या चवींचे आणि सुवासांचे ग्रीन टी बनवू शकतो. या ग्रीन टी, हर्बल टी, काडे किंवा डिटॉक्स वॉटर याचा अजून एक फायदा म्हणजे यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अनेक वेगवेगळी मायक्रोन्युट्रिएंट्स असतात जे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असतात.
उन्हाळ्यात तर आपल्याला एरवीपेक्षाही जास्त पाण्याची गरज असते. उन्हाच्या तडाख्यामुळे डिहायड्रेशन होऊन आजारी पडू नये म्हणून खाण्यापेक्षा वेगवेगळी पेये पिण्यावर या दिवसांत भर दिला जातो. लिंबू सरबत, कोकम सरबत, पन्हं, ताक यासारख्या पारंपारिक पेयांव्यतिरिक्त बाजारातून वेगवेगळ्या प्रकारचे स्क्वॅश, सरबतं, कार्बोनेटेड ड्रिंक्स आणि इतर अनेक प्रकारची पेये आणली जातात. बाजारातून आणल्या जाणार्या बहुतांशी पेयांमध्ये भरपूर प्रमाणात साखर घातलेली असते. ही अशी भरपूर साखर, रंग आणि इसेन्स किंवा इतर रसायनं घालून बनवलेली पेयं उन्हाळ्यात जिवाला तात्पुरता थंडावा देत असली तरी आरोग्यासाठी मात्र नुकसानकारकच असतात. अशावेळी घरी बनवल्या जाणार्या पारंपारिक पेयांसोबतच थोड्या नवीन प्रकारची कमी साखर घातलेली पेये आपल्याला थंडावा देऊ शकतात.
हिवाळ्यात प्यायल्या जाणारा गरम हर्बल टी किंवा फ्लॉवर टी, ग्रीन टी उन्हाळ्यात थंड करून पिता येतो. जास्वंद, पुदिना, गुलाब, मोगरा, वाळा/ खस हे पदार्थ थंडावा देणारे पदार्थ मानले जातात. गरम पाण्यात या फुलांच्या पाकळ्या घालून पाच मिनिटाने ते पाणी गाळून थंड करायला ठेवून नंतर हा चहा पिता येतो. याशिवाय पाणी गरम न करता त्यात यातले हवे ते पदार्थ घालून हे पाणी फ्रीजमध्ये ठेवून १०-१२ तासांनी गाळून थंड चहा/ पेय बनवता येतं.
लिंबू, काकडी, संत्री, स्ट्रॉबेरी, सफरचंद, अननस, कलिंगड अशा फळांचे तुकडे/ चकत्या आणि त्यासोबत पुदिना, बेसिल, दालचिनी अशासारखे काही पदार्थ रात्रभर पाण्यात घालून इन्फ्युज्ड वॉटर किंवा या फळांच्या चवीचे पाणी बनवता येते. अशा पाण्यामध्ये या फळांमधले अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. लिंबू + काकडी + पुदिना, अननस + पुदिना, स्ट्रॉबेरी + लिंबू + पुदिना, सफरचंद + लिंबू + गाजर, लिंबू + संत्रं + पुदिना, स्ट्रॉबेरी + अननस, सफरचंद + दालचिनी, कलिंगड + स्ट्रॉबेरी, सफरचंद + संत्रं + लवंग + दालचिनी, लिंबू + आलं अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या फळांना एकत्र करून पाण्यात घालून इन्फ्युज वॉटर किंवा त्या फळांच्या चवीचे पाणी बनवता येते.
सत्तूचे सरबत
साहित्य : २ चमचे डाळव्याचे पीठ, अर्धे लिंबू, अर्धा चमचा जिरे पूड, काळं मीठ/ सैंधव किंवा रॉक सॉल्ट चवीनुसार, थोडी पुदिना पानं, थोडी कोथिंबीर, ग्लासभर थंड पाणी.
कृती : एका भांड्यात डाळीचे पीठ, लिंबाचा रस आणि पाणी मिक्स करावे. त्यात जिरे पूड आणि चवीनुसार मीठ घालावे. यात थोडी कोथिंबीर आणि पुदिना पाने ठेचून घालावी. हे सगळं व्यवस्थित एकत्र करून ग्लासमध्ये देताना त्यात थोडी पुदिना पाने आणि चिरलेली कोथिंबीर घालावी.
पाण्याऐवजी ताक वापरूनही सत्तूचे सरबत बनवता येतं. हेच सत्तूचे सरबत गोड करायचे असल्यास गूळ घालून करता येतं. गोड सरबत करताना पाण्याऐवजी दूध घालूनही सत्तू करतात.
लिची लेमोनेड
साहित्य : १०-१२ सोललेल्या लिची, लिंबू, थंड पाणी, पुदिना, साखर (गरज असल्यास चवीपुरती).
कृती : सोललेल्या लिची पुदिन्यासोबत मिक्सरमध्ये एकत्र वाटून घ्याव्यात. वाटताना गरजेप्रमाणे पाणी घालावे. गरज असल्यास यात चवीसाठी थोडी साखर घालावी. यात थंड पाणी आणि आंबुसपणासाठी थोडा लिंबाचा रस घालावा. ग्लासात घालून सर्व्ह करताना यात थोडे लिचीचे तुकडे आणि पुदिन्याची पाने घालावी.
स्ट्रॉबेरी-कलिंगड लेमोनेड
साहित्य : कलिंगडाची तुकडे, थोड्या स्ट्रॉबेरी, एका लिंबाचा रस, थंड पाणी.
कृती : मिक्सरमध्ये किंवा ब्लेंडरमध्ये सगळे साहित्य एकत्र करून वाटून घ्यावे. सर्व्ह करताना थोडे स्ट्रॉबेरीचे तुकडे आणि लिंबाच्या चकती घालून सर्व्ह करावे.