आजकाल ‘आमच्या प्रतिनिधीकडून’, ‘विशेष प्रतिनिधीकडून’, ‘आमच्या बातमीदाराकडून’, ‘आमच्या वार्ताहराकडून’ याऐवजी ‘आत्ताच हाती आलेल्या पाकिटावरून’ असे छापायची वेळ आली आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. आणि हो, आता जीपेचा जमाना आहे म्हटल्यावर पाकिटाचाही प्रश्न मिटला. पण या संपूर्ण वातावरणात प्रलोभने लाथाडणारा एक अवलिया पत्रकार होता, हे केवढे आश्चर्य! शनिवारीच त्याने इहलोकीची यात्रा संपविली. या अवलियाचे नाव आहे पंढरीनाथ धोंडू सावंत. शनिवार, ८ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे-पहाटे झोपेतच सावंत यांनी अखेरचा श्वास घेतला असल्याचे त्यांच्या सुपुत्राने भ्रमणध्वनीवर सांगितले. अर्थात ही बातमी अपेक्षितच होती. कारण दोन महिन्यांपासून ते बिछान्यावरच होते. सूनबाई श्वेता (सरु) सावंत यांनी तशी कल्पना दिली होती. गेल्या वर्षी ७ जानेवारी २०२४ रोजी मी आणि विलास मुकादम हे आवर्जून सावंत यांना भेटायला त्यांच्या दिग्विजय मिल, पत्रा चाळ नंबर २, खोली नंबर १२, काळाचौकी या निवासस्थानी गेलो. नव्वदावे वर्ष पूर्ण करून ९१व्या वर्षात त्यांनी प्रवेश केला होता. त्याही परिस्थितीत त्यांनी ‘मुंबईची निर्मिती कशी झाली?’ हे पुस्तक लिहायला घेतले होते. सुमारे पाचशे पाने लिहून झाली असल्याचे सरुताईंनी (सूनबाई) सांगितले. त्या दिवशी अरविंद सावंत, अनिल कोकिळ आदींनी पंढरीनाथ सावंत यांचे अभीष्टचिंतन केले. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने त्यांना कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला. मला ते म्हणाले, पुरस्कार माझ्या हयातीत मिळेल ना? माझ्याकडे उत्तर नव्हते. २१ जानेवारी २०२५ रोजी मंत्रालयात परिषद सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला गेला. अर्थात ते गेल्या दोन महिन्यांपासून बिछान्यावरच असल्याने हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी सूनबाई श्वेता सावंत याच आल्या होत्या. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे आणि त्यांच्या कार्यकारिणीने प्रयत्न केले, परंतु सत्ताधार्यांची वेळ मिळण्यास विलंब झाला. मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुढारीकार ग. गो. जाधव पुरस्कार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालयाचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार, अशा अनेक पुरस्कारांचे ते धनी ठरले आहेत. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सन्मानपत्रावर नजर टाकली तर त्यांच्या जीवनाचा गोषवारा कळतो.
दिग्विजय मिल पत्राचाळ या जागेत सावंत यांचे वास्तव्य १९५६ सालापासून होते. दोन खोल्यांमध्ये पत्नी, चार अपत्ये अशा संसाराचा गाडा त्यांनी ओढला. बेस्ट बसचे ४५८५ नंबरचा बिल्ला परिधान केलेले कंडक्टर म्हणून मुंबईमध्ये त्यांनी काम सुरू केले. उत्तम चित्रकार, सर्वोत्तम पत्रकार, परखडपणे विचार मांडणारे अशी त्यांची ख्याती. शरद पवारांच्या निकटवर्तीयांनी सावंत यांना दोन-तीन वेळा गळ घातली की मुख्यमंत्री स्वेच्छाधिकारातून घर घ्या, अगदी घराची किल्लीसुद्धा आणून देण्याचा प्रयत्न झाला, परंतु स्वाभिमानी बाण्याच्या सावंत यांनी ते धुडकावून लावले. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा ‘मराठा’ बंद पडल्यानंतर मराठा समाजासाठी ‘मराठा’ नावाचे दैनिक सुरू करून संपादक व्हा, अशीही गळ घालण्यात आली, परंतु अत्रेंचा मराठा चालला ती परिस्थिती वेगळी होती, आता तो चालणार नाही, असे स्पष्ट सांगून तेही फेटाळून लावले. प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या सान्निध्यात आल्यानंतर आपल्या जीवनाचे सार्थक झाले, अशी कृतज्ञतेची भावना त्यांनी कैकवेळा आमच्याकडे बोलून दाखवली.
ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य हे सावंत यांच्याबरोबर बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘सांज मार्मिक’ या दैनिकात एकत्र होते. रात्री अंकाचे काम संपले की ते दोघेही कागदाच्या गठ्ठ्यांवरच झोपायचे. एकदा पहाटे पहाटे फोरमन आला, सावंत साहेब, छोटा फिलर हवाय, असे म्हणाला. सावंतांनी ए विज्या, बघ जरा छोटीशी बातमी दे लिहून. डोळे चोळत विजय वैद्य उठले आणि पटकन बातमी लिहून दिली की ‘उल्हासनगरमध्ये महाविद्यालय होणार!’ ना शेंडा ना बुडखा कुणास ठाऊक. सकाळी उठून सांज मार्मिक’ पाहिला आणि वैद्य म्हणाले, ही बातमी कुणी दिली? सावंत म्हणाले, अरे विज्या तूच दिलीस ना. अरे हो लक्षातच आले नाही असे मग वैद्य यांनी सांगितले. आश्चर्य म्हणजे सहा महिन्यांत उल्हासनगरमध्ये महाविद्यालय झालेसुद्धा.
९ डिसेंबर २०२१ रोजी विजय वैद्य यांच्या ‘आठवणीतले प्रबोधनकार’ या पुस्तकाच्या तिसर्या आवृत्तीच्या प्रकाशन समारंभात दस्तुरखुद्द सावंत यांनी हा किस्सा सांगून वैद्य हे भविष्यवेत्ते असल्याचे सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांना ‘मार्मिक’मध्ये कार्यकारी संपादक म्हणून अखेरपर्यंत काम करण्याचा शब्द सावंत यांनी दिला होता, पण शारीरिक परिस्थिती साथ देत नसल्याने त्यांनी ते काम सोडले.
टीव्हीएस-५० या आपल्या आवडत्या दुचाकीवरून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पालथा घातला होता. ‘पुढारी’मध्ये काम करताना एकदा ते गरमागरम भजी खात होते आणि संपादकांनी बोलावल्याचा निरोप आला. त्यांनी शिपायाला येतो म्हणून सांगितले, म्हणाले, आधी भजी गरम आहेत तोवर ती खाऊन घेतो, संपादक थांबतील थोडा वेळ. असे सावंत यांचे असंख्य किस्से आहेत. त्यांची ग्रंथसंपदा पण मोठी आहे. एका ए-फोर आकाराच्या कागदावर त्यांनी लिहिलेल्या मजकुरात वर्तमानपत्रांचे स्तंभ भरण्याची क्षमता होती. आपल्याला गप्पांमध्ये गुंतवून ते कधी आपले लिखाण पूर्ण करून येतील याची कुणालाही कल्पना नसे.
कुमार कदम, वसंत सोपारकर यांची त्यांची घनिष्ठ दोस्ती. सोपारकरांना त्यांनी आपल्याबरोबर ‘मार्मिक’च्या कामातही सहभागी करून घेतले होते. भाऊ तोरसेकर, विजय साखळकर यांनाही त्यांचा सहवास लाभला.
सावंत यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या वतीने लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असले तरी आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेसाठी त्यांच्याकडून कात्रणे मागविण्यात यावीत, यापेक्षा दुर्दैव ते कोणते? मी जिवंत आहे तोपर्यंत तरी मला याचा लाभ मिळेल का? असा सवाल जेव्हा ते बिछान्यावर पडण्यापूर्वी विचारायचे तेव्हा त्यांना आपण कोणत्या तोंडाने हो म्हणणार होतो? शासन हे खरोखरीच ‘शासन’ (शिक्षा) करणारे आहे का, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. असो.
‘पासष्टायन’ या माझ्या आयुष्यातील पहिल्या वहिल्या पुस्तकाला विजय वैद्य यांच्यामुळे सावंत यांनी प्रस्तावना दिली आणि असेच लिहित रहा, असा आशीर्वाद दिला, हे माझे खरोखरच अहोभाग्य! ‘मी पंढरी… गिरणगावचा!’ असे छातीठोकपणे सांगणार्या आणि प्रलोभने लाथाडणार्या या अवलिया पत्रकाराला मानाचा मुजरा!