• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

मम्माज बॉय अश्विन!

- प्रशांत केणी (खेळियाड)

Nitin Phanse by Nitin Phanse
December 27, 2024
in खेळियाड
0

भारताचा अष्टपैलू फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या तडकाफडकी निवृत्तीचा निर्णय आणि त्यावरील उलटसुलट चर्चा क्रिकेटजगतात सध्या ताज्या आहेत. पण कारकीर्दीपुढे पूर्णविराम देणार्‍या अश्विनची कारकीर्द आई चित्रा यांच्यामुळे कशी घडली, हे दस्तुरखुद्द त्या मातेकडूनच जाणून घेण्याचं भाग्य मला लाभलं होतं. माबल्लममधील अश्विनच्या कुटुंबियांशी काही वर्षांपूर्वी झालेल्या भेटीतल्या या आठवणी..
– – –

ही शिदोरी काही वर्षांपूर्वीची. पण आजही जशीच्या तशी आठवतेय. चेन्नईच्या पश्चिमेकडे माबल्लममधील रामकृष्णापुरम भागात सकाळी आठ वाजता पोहोचलो. कारण साडेआठ वाजता निवासस्थानी पोहोचावं, अशी आदल्या दिवशी खूणगाठ बांधलेली. इतक्यात मोबाइल खणखणला, समोरून चित्रा अश्विन बोलू लागल्या, ‘‘तू कार किंवा रिक्षानं येत असशील, तर ड्रायव्हरकडे फोन दे. मी त्याला समजावून सांगते. आमच्या घरापर्यंत कसं पोहाचायचं!’’ आपण एका आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूच्या घरी मुलाखतीसाठी जातोय आणि त्याची आई आपल्याला घरी कसं पोहोचावं, याचं दिशादर्शन करतेय… आजच्या व्यावसायिक क्रीडाजगतातील या दुर्मीळ अनुभूतीनं मला प्रथमच धक्का बसला.
मी सावधपणे म्हटलं की, ‘‘मी तुमच्या इमारतीपासून काही अंतरावरच आहे. साडेआठ वाजता मी तुमच्या घरी असेन.’’ समोरून चित्रा यांनी आज्ञा दिली की, ‘‘मग अजिबात बाहेर कुठे थांबू नकोस. थेट घरी ये.’’ हा आदेश शिरसावंद्य मानून मी त्यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचलो. चित्रा आणि रविचंद्रन हे दांपत्य दरवाजावर स्वागतासाठी उभे. मग ते दोघंही मला बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर घेऊन गेले.
हँगरवर लटकणार्‍या असंख्य जर्सीज, चषक-करंडक आणि ऐतिहासिक छायाचित्रं रविचंद्रन अश्विनच्या पराक्रमाच्या गाथा मांडत होत्या. जर्सीजवरील त्याचा ९९ क्रमांक हा त्याचं कर्तृत्व ठळकपणा मांडणारा. इडली-मेदू वडा सांबारचा सुग्रास दाक्षिणात्य बेत आखला होता. त्याचा आस्वाद घेतल्यानंतर मुलाखतीला प्रारंभ करण्याचा पवित्रा घेतला. पण हिंदीतल्या पहिल्याच प्रश्नाला चित्रा यांनी सावधपणे रोखलं. ‘‘कृपया तमिळ किंवा इंग्रजीत बोलावं,’’ अशी विनंती केली. इंग्रजीच्याच पर्यायाची निवड करून मी पुन्हा बोलंदाजीला प्रारंभ केला. मी स्वत:ची ओळख करून दिली. त्यानंतर अश्विनची आई चित्रा यांनी आपण निप्पॉन पेंटस् कंपनीत मानव संसाधन (एचआर) विभागात व्यवस्थापकपदावर कार्यरत असल्याचं सांगितलं, तर वडील रविचंद्रन यांनी आपण रेल्वेत अधिकारी असल्याचं सांगितलं.
माझं लक्ष घराच्या भिंतींवर काही खुणांवर गेलं होतं. पहिला प्रश्न स्वाभाविकच तेच टिपणारा. ‘‘चित्रा मॅडम, तुम्ही पेंट्स कंपनीत व्यवस्थापक. पण तुमच्या घरच्या काही भिंती अशा कशा?’’
चित्रा यांनी स्मित केलं आणि त्या कथन करू लागल्या. ‘‘तुमचा प्रश्न माझ्यासाठी नवा मुळीच नाही. अश्विन पाच वर्षांचा होता, तेव्हापासून त्याला क्रिकेटचा लळा लागला. माझं त्याच्या क्रिकेटवर बारकाईनं लक्ष होतं. वडिलांची क्लब क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाज म्हणून ओळख होती. म्हणून अश्विनला सुरुवातीचे मैदानी धडे द्यायला वडिलांनीच सुरुवात केली. मग नऊ वर्षांचा झाल्यावर त्याला क्रिकेटच्या तंत्रशुद्ध प्रशिक्षणासाठी दाखल केलं. अश्विनच्या गोलंदाजीच्या खुणा बालपणीपासूनच आमच्या घराच्या भिंतींवर उमटायच्या. भिंतीवरील चेंडूंच्या निशाणांमुळे अनेक पाहुण्यांना आश्चर्य वाटायचं. आई रंग तयार करणार्‍या नामांकित कंपनीत उच्च पदावर असतानाही घरात मात्र रंग उडालेले कसे? असे प्रश्न मला थेट विचारायचे. सुरुवातीला आम्ही वारंवार रंगकाम करायचोही. पण कालांतरानं त्याची सवय झाली आणि कौतुक वाटू लागलं.’’
अश्विनच्या निवृत्तीच्या निमित्तानं हा प्रसंग ताजा झाला. तशी ही आठवण या वर्षीच फेब्रुवारीतसुद्धा झालेली, जेव्हा राजकोट येथे इंग्लंडविरुद्ध चालू असलेला कसोटी सामना मध्यावर सोडून अश्विन तातडीनं चेन्नईत परतला होता. त्यावेळी चित्रा यांची प्रकृती अतिशय गंभीर होती, म्हणूनच भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) त्याला ही विशेष परवानगी दिली होती. सुदैवानं चित्रा यांची प्रकृती सावरली. पुढे अश्विन माघारी परतून ती मालिका खेळलाही. गेल्या काही वर्षांत मुलांच्या जन्मासाठी पालकत्वाची रजा (पॅटर्नल लिव्ह) घेऊन सामने न खेळू शकलेल्या विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यापेक्षा हे वेगळं कारण होतं. अश्विनची कारकीर्द घडवण्यात त्याच्या आईचा सिंहाचा वाटा. मातृत्वाचा हा जिव्हाळा अश्विनच्या आयुष्यासाठीच प्रेरणादायी कसा ठरला, हे जाणलं होतं. कर्णधार रोहित तिसर्‍या कसोटीनंतरच्या पत्रकार परिषदेत अश्विनच्या निवृत्तीविषयी म्हणाला होता की, शालेय दिवसांत तो सलामीवीर म्हणून ठाऊक होता. पण नंतर तो मोठा फिरकी गोलंदाज झाला, हे आश्चर्यकारक आहे.
मी चित्रा यांना नेमकं तेच विचारलं, ‘‘अश्विन फिरकी गोलंदाजीकडे कसा वळला?’’
चित्रा अश्विनची गोष्ट सांगू लागल्या. ‘‘अश्विनचा हा आमचा एकुलता एक मुलगा. प्रतिस्पर्धी संघाच्या दिग्गज फलंदाजांना जेरबंद करणारी ऑफ-स्पिन गोलंदाजी आणि संघ अडचणीत असताना सावरणारी फलंदाजी ही अश्विनची सध्याची खासियत. परंतु बालपणी अश्विन वेगवान गोलंदाज आणि सलामीवीर फलंदाज अशी वेगळी ओळख जपायचा. दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॅक कॅलिसप्रमाणे फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हींमधील आघाडीचं स्थान त्याचं असायचं. ११ वर्षांचा असताना स्पोर्ट्सस्टार करंडक क्रिकेट स्पर्धेत त्यानं शतकही झळकावलं होतं. शालेय जीवनापासून त्याची कारकीर्द बहरत होती. परंतु अश्विन १४-१५ वर्षांचा असताना त्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे सुमारे सहा महिने विश्रांती घेऊन त्याला क्रिकेटपासून दूर राहावं लागलं. त्यातून सावरल्यावर तो पुन्हा मैदानावर परतण्याच्या बेतात होता. परंतु वेगवान गोलंदाजी करू नये, हा वैद्यकीय सल्ला त्याच्या घडू पाहणार्‍या कारकीर्दीच्या आड येत होता. त्यामुळे मीच त्याला फिरकी गोलंदाजी टाकण्याचा सल्ला दिला. दरम्यानच्या काळात सलामीचा फलंदाज आणि वेगवान गोलंदाजाचं संघातलं स्थानसुद्धा रिक्त राहिलं नव्हतं. पण फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून पुन्हा भरारी घेत त्यानं आपल्या संघात स्थान मिळवलं आणि कालांतरानं भारतीय क्रिकेटला एक चांगला फिरकी गोलंदाज मिळाला. प्रशिक्षक विजय कुमार यांनी अश्विनला ऑफ-स्पिन गोलंदाजीचे धडे दिले. त्यानंतर सुनील सुब्रमण्यम आणि डब्ल्यू. व्ही. रामन यांनी त्याच्या गोलंदाजीला पैलू पाडले.’’
अश्विन हा ‘बीसीसीआय’च्या राजकारणातील धूर्त आणि वादग्रस्त प्रशासक एन. श्रीनिवासन यांच्या तमिळनाडू राज्यातील. त्यामुळे सुरुवातीच्या काळात भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचं कोणत्याही सामन्यातलं हुकुमाचं पान होता तो. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांप्रमाणेच चेन्नई सुपर किंग्जमध्येही तो माहीचा साथीदार. भारतीय कसोटी क्रिकेटला हमखास जिंकून देणार्‍या फिरकी परंपरेचा तो शिलेदार. त्यामुळे अनिल कुंबळेसारखा महान फिरकी गोलंदाज या खेळाडूमध्ये स्वत:ला पाहतो. २००८मध्ये फिरोझशाह कोटलावर कुंबळेच्या निवृत्तीनंतर जेमतेम दोन-तीन वर्षं हरभजन सिंगनं फिरकीची धुरा सांभाळली. पण अश्विनच्या विश्वासार्हतेमुळे हरभजनच्या वाट्याला पुन्हा ‘दूसरे’पण आलं. देशात असो, वा परदेशात अश्विन भारताचा क्रमांक एकचा फिरकी गोलंदाज झाला. हे वैशिष्ट्य त्यानं अखेरपर्यंत टिकवलं.
अश्विनची क्रिकेट कारकीर्द १५ वर्षांची. पण कसोटीत ११ वेळा मालिकावीर पुरस्कार मिळवल्याचा संयुक्त विक्रम त्याच्या नावावर आहे. अश्विनची कारकीर्द बहरायला प्रारंभ झाला, तेव्हा प्रीती नारायणनशी त्याचा प्रेमविवाह झाला. शाळेतली बालमैत्रीण ते जीवनाची साथीदार हा प्रवास तितकाच रम्य. या दाम्पत्याला अखिरा आणि अधया या दोन कन्या. सध्या प्रीती अश्विनची क्रिकेट अकादमी आणि कॅरम बॉल मीडिया या माध्यम कंपनीचा कारभार पाहते. अश्विनची आई चित्रा प्रीतीविषयी कौतुकानं सांगते.
न्यूझीलंडविरुद्धची मालिका ही जशी भारतासाठी दु:स्वप्न ठरली, तशीच अश्विनसाठीही. वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा आणि मालिकेवर ३-० असा वरचष्मा गाजवणार्‍या किवी फिरकी गोलंदाजांच्या खात्यावरही पुरेसे बळी होते. पण अश्विनला तीन सामन्यांत फक्त नऊ बळी मिळवता आले. हीच त्याच्यासाठी धोक्याची घंटा ठरली.
ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी त्याची निवड झाली. पण वेगवान गोलंदाजांना अनुकूल खेळपट्ट्यांवर भारतानं तीन सामन्यांत तीन फिरकी गोलंदाज आजमावले. आपली गरज आता संपत चाललीय, ही काळाची पावलं ओळखून अश्विननं मालिका चालू असताना तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली.
अश्विननं एसएसएन इंजिनीयरिंग महाविद्यालयातून माहिती-तंत्रज्ञान विषयातून बी टेकचं शिक्षण घेतलेलं आहे. निवृत्तीनंतरच्या दुसर्‍या डावात तो आणखी काय करेल, याविषयी औत्सुक्य आहेच. पण ‘मम्माज बॉय’ म्हणून लोकप्रिय असलेल्या अश्विनचं पुढील आयुष्यही लाडाकोडातच जावो, यासाठी शुभेच्छा!

[email protected]

Previous Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Next Post

किसीकी मुस्कुराहटों पे हो निसार…

Next Post

किसीकी मुस्कुराहटों पे हो निसार...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.