आजकाल या व्हॉट्सअप वगैरेमुळे केवढा फायदा झालाय नं? अगदी सगळ्या ताज्या घडामोडींपासून संकष्ट्या एकदशांचे महत्व वगैरे बसल्या जागी समजते. मागच्याच आठवड्यात झालेल्या अक्षय तृतीयेबद्दल तर लेखांचा महापूर आलेला असं म्हटलं तरी वावगं ठरू नये! जलदानापासून, सुवर्णखरेदीसकट अगदी श्रीविष्णुंच्या उपासनेच्या महत्वापर्यंत अनेक माहिती उपलब्ध होती. अर्थात ज्याला जे शक्य असेल ते तो नक्कीच करतोच. लहानपणी मात्र आम्हाला अक्षय तृतीया म्हणजे दोन गोष्टीच माहिती असत. आमच्या ती. बाबांचा तिथीने वाढदिवस व वर्षातील आंबा खायचा पहिला दिवस!
वैशाखाच्या सुरुवातीलाच पाडाला पिकलेला म्हणजेच नैसर्गिकरित्या झाडावर पिकलेला आंबा बाजारात यायचा. अर्थात तोपर्यंत चैत्रगौरीच्या आगमनाबरोबरच घरोघरी आंबेडाळ नी पन्ह्याचे कौतुकसोहळे पार पडलेले असायचेच की. ताजं लोणचं, मेथ्यांबा वगैरे मंडळीपण वर्णी लावतच पानात. मात्र ही सगळी खरतंर नांदी असायची त्या आम्रराजाच्या आगमनाची! राज दरबार भरण्यापूर्वी जसे सगळे भालदार चोपदार आपापली हजेरी लावतात, तशी ही मंडळी अगदी पट्टराणी कैरीबाईसाहेबांसकट आपापली जागा घ्यायचे. मग जणू वाजत गाजत रंगसुगंधांची अमाप उधळण करीत यायचे महाराज आंबोजीराजे! काय वर्णावा तो थाट, अहाहा! आंबा मग तो प्रांताप्रांतात मिळणारा कोणताही असला तरी तिथल्या फळांचा सम्राटच असतो नाही का?
आम्ही कोकणातला हापूसही आवडीने खायचो नी नागपूरला बेगमपल्लीपण तेवढाच मनसोक्त हाणायचो. अर्थात अलिबागला केवळ हापूस नाही तर रसासाठी पायरी व हापूस असे मिश्रण असायचे, चिरून खायला हापूसच लागे, माचवून म्हणजेच चोळून खायला रायवळ असायचा! प्रत्येकाची आपापली मजा वेगळी! बाजारात गेलं की टोपल्या भरभरून वाहात असायच्या गावठी निरनिराळ्या आंब्यांनी. एखादवेळी शोपा म्हणजे शेपुच्या भाजीसारखा वास असलेला निघाला आंबा की हमखास वाया पण जायचा! अर्थात विश्वासू मंडळींकडून आंबे आणले की आढी लागायची मग आज किती पिकले व उद्या किती पिकणार असा हिशोब होत होत अक्षय तृतीयेला आमरसासाठी लागणारे आंबे आपोआप जमायचे.
सकाळी बादलीत आंबे पाण्यात पडले की आमचा जीवपण भांड्यात पडायचा जणू, एवढे दिवस हट्ट करून खावा लागणारा आंबा आता राजरोसपणे खाता येणार म्हणून!! बहुतेक वेळी रसाबरोबर बेत असायचा वेळलेल्या शेवयांचा, अर्थात हा प्रकार खास खानदेशी. मला रसाशी कशाला काय हवं हा प्रश्न तेव्हाही पडायचा व आजही पडतोच!!
आमरस बनवणे हा पण एक सोहळा असतो बरं. तयार आंबे निदान एखाद तास पाण्यात पडायला हवेत, त्यातली उष्णता कमी होते. मग सगळे आंबे फुटणार नाहीत अशा बेतानी माचवायचे, अगदी निगुतीने, आतली कोयपण हाललेली समजली पाहिजे मात्र साल पण एकसंध राहायला हवी. मग एका मोठ्या पातेल्यात सगळे आंबे पिळले की अगदी साली उलट्या करूनही त्याला लागलेला रसही पातेल्यात पडायचा. मग जमेल व गरज असेल तर आमच्या बाबांसारखे सराईत लोक दोन्ही हातानी एकाच वेळी दोन दोन कोयी पिळायचे व पातेल्यातला रस वाढत जायचा. सालं व कोयी चोखण्याचा आनंद बच्चेकंपनीसाठी अवर्णनीयच! एकदा रस बनला की मोठ्या पळीने एकसारखा घोटला आणि गरजेप्रमाणे साखर मिसळली की झाले! खाताना मात्र पिठीसाखर व साजूक तूप तयार असे, वाटीत लागेल तसे घ्यायचे. मला स्वतःला मात्र तूप गरम पोळीवर व साखर रसात हे समीकरण जास्त रुचायचे! रस बाधू नये म्हणून त्यावर मिरपुड वगैरे टाकायची पण पद्धत असते.
सगळ्यांची जेवणं आटोपली की उरलेला रस ताटलीत पसरून वाळवून बनणारी पोळी हा पुढचा आवडीचा प्रकार असायचा! आजकाल आमरसाचा इतर पदार्थांमधला वापर किती वाढलाय नं? अगदी बारमाही मिळणार्या आम्रखंडापासून, नारळाच्या वडीत, शिरा तसेच आईस्क्रीममध्ये, एवढंच काय, अगदी केकपण बनतो आमरस घालून. इतरवेळी आपापल्या जागी छानच असलेले हे व असे अनेक पदार्थ आमरसामुळे जास्तीच खुलतात नाही का?
रंगसुगंधाची मनसोक्त उधळण करणारा आमरस मला एखाद्या परोपकारी व्यक्तीसारखा भासतो. स्वत:ची चव व गोडवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे ध्येय असेल तर नुसता स्वत:पुरताच विचार न करता ज्या पदार्थात आपण मिसळू त्याला आपले रंगस्वाद सहज देऊन टाकणारा व त्यांनाही उजळवणारा. आपल्यातले विशेष गुण दुसर्याला दिले, आपल्या क्षमतांचा वापर इतरांसाठी होऊ दिला तर ते वाढतच जातात की. `आत्मनो मोक्षार्थ जगद्हिताय च’ ह्या श्री रामकृष्ण मठाच्या ब्रीदवाक्याला जपण्याचे व अवलंबण्याचे ज्ञान आमरसही नकळत देतो बघा. आज त्या परमेश्वराच्या असीम कृपेनी मला जे लाभलंय, मग ती विशेष कला असो, एखादं कसब असो किंवा ज्ञान असो, ते जिथे व जसं गरजेचं असेल तिथे दिलं तर ते कमी तर कधीच होत नाही, तर एका नव्या रूपात सामोरं येतं नाही का? मूळच्या भारतीय तत्वज्ञानाला पाश्चिमात्य देशांमध्ये नेताना त्यातले कर्मकांडाचे संस्कार कमी करून व्यावहारिक वेदांताचा प्रसार करताना स्वामी विवेकानंदांनी पण हीच दूरदृष्टी वापरली असावी, नाही का? विश्वबंधुत्वाचा संदेश देतानाच तो अनुसरण्यासाठी माताजींचा `जिथे जसं तिथे तसं’ हा उपदेश लक्षात ठेवत स्वामीजींनी घालून दिलेला सर्वसमावेशकतेचा पाठ तुम्ही आम्ही पण जपला व जोपासला तर आयुष्याचं सोनं होईल हे निश्चित… आमरसासारखेच तेजाळलेले व गंधाळलेले!!