मैत्रीच्या अॅपमध्ये आपण कुणाशीही मैत्री करताना खूप काळजी घ्यायला हवी. कारण अशा प्रकारच्या अॅप्समधून फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. उदा. उत्पल नावाच्या तरुणाला फटका बसला. आपण आता फार मोठ्या संकटात आपण फसलो आहोत, यामधून कसे बाहेर पडायचे, असा विचार तो करू लागला. विजयला बोललो तर संकट येणार होते, त्यामुळे त्याने गप्प बसून हे काम सुरूच ठेवले होते. कारण त्याला आपले ते व्हिडीओ व्हायरल होण्याची भीती होती.
– – –
उत्पल नुकताच बारावीची परीक्षा पास झाला होता. प्रथम वर्ष वाणिज्य शाखेचे प्रवेश प्रक्रिया सुरू व्हायची होती, त्यामुळे त्याच्याकडे भरपूर वेळ होता. या वेळेत व्यायाम करणे आणि ग्रंथालयात जाऊन वाचन करणे हे दोन उपक्रम राबवण्याचे त्याने निश्चित केले होते. त्यानुसार सकाळच्या वेळेत व्यायाम आणि संध्याकाळ वाचनासाठी असे नियोजन करून टाइम टेबलची आखणी केली होती. दुपारच्या फावल्या वेळात जवळच्या मित्रांसोबाबत फेसबुकवर गप्पा मारणे, व्हॉट्सअपवर चॅटिंग करणे, असे कार्यक्रम नित्यनेमाने सुरू झाले होते.
दरम्यान, त्याचा कॉलेजचा प्रवेशही झाला होता. पण त्याने आपल्या या सेट झालेल्या वेळापत्रकात खंड पाडायचा नाही, असे ठरवले होते, त्यामुळे सकाळची जिमची वेळा थोडी अॅडजेस्ट करण्याच्या व्यतिरिक्त त्याचे वेळापत्रक सेट झाले होते.
त्याच्याच शाळेत असणारा आणि त्याच्यापेक्षा वयाने एक वर्षे मोठा विशाल देखील त्याच्याच कॉलेजमध्ये शिकत होता. उत्पलची त्याची कॉलेजात भेट झाली, तेव्हा त्याला विशालने त्याला विचारले, तुला मुलींशी गप्पा मारायला आवडतात का? मस्त टाईमपास होतो. मजा येते. काही विषय त्यांच्या आवडीचे असतात. आपल्या आवडीच्या विषयावर देखील त्या अगदी चवीने चर्चा करतात. हे सगळे कुठल्या बागेत किंवा कट्ट्यावर होत नाही तर ते होते बंबल नावाच्या अॅपवर. विशालने दिलेली ही माहिती उत्पलला फारच रोचक वाटली, त्यामुळे त्याने क्षणाचाही विलंब न करता ते अॅप डाऊनलोड केले आणि त्यावर आपल्या आवडीच्या मुलीचा शोध घेता घेता, मुलींबरोबर गप्पा मारू लागला. या नव्या उपक्रमामुळे त्याचे पूर्वीचे सेट झालेले वेळापत्रक बिघडले होते. अभ्यासाकडे देखील त्याचे दुर्लक्ष होत होते, पण तो त्या बंबल अॅपच्या प्रेमात पडला होता.
त्या अॅपवर बोलताना त्याची गाठ पडली विभा नावाच्या एका मुलीशी. उत्पल ज्या ग्रंथालयात वाचन करण्यासाठी जायचा तिथे विभा देखील यायची. ती मूळची कोल्हापूरची होती, स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी ती पुण्यात आली होती. आता उत्पल आणि विभा यांची चांगली मैत्री झाली होती. दोन-चारवेळा त्यांची हॉटेलमध्ये गाठभेट झाली होती, त्यामुळे एका रविवारी सिंहगडाच्या जवळ असणार्या एका रिसॉर्टमध्ये संध्याकाळ घालवण्याचे दोघांनी ठरवले. दोघांनी संध्याकाळ तिथे घालवली, संध्याकाळची रात्र झाली. दुसर्या दिवशी सकाळी ते आपापल्या घरी गेले.
उत्पलचे कॉलेज, जिम, मैत्रिणीबरोबर गप्पा हा दिनक्रम नेहमीप्रमाणे सुरू होता. अचानक रविवारी त्याला मोबाईलवर एक फोन आला, समोरची व्यक्ती त्याला सांगत होती, तू गेल्या आठवड्यात एका रिसॉर्टवर मैत्रिणीबरोबर गेला होतास ना? तिथे तिच्याबरोबर केलेल्या मजेचे फोटो आणि व्हिडिओ माझ्याकडे आहेत, ते मी सोशल मीडियावर टाकणार आहे, याची कल्पना देण्यासाठी तुला फोन केला होता. ओके, म्हणून त्याने फोन ठेवून दिला. हा सगळा प्रकार ऐकल्यावर उत्पल पूर्णपणे घाबरून गेला होता, त्याने विभाला फोन करून त्याची कल्पना दिली. आपल्यामुळे विभाला त्रास होऊ शकतो, म्हणून उत्पलने तिला भेटायचे टाळण्यास सुरुवात केली.
काही काळातच उत्पलला फोन केलेल्या त्या अज्ञात व्यक्तीने पुन्हा त्याला फोन केला आणि ‘मला ५० हजार रुपयांची आवश्यकता आहे, ते तू कधी देणार मला, माझे नाव विजय आहे, हा माझा बँक अकाउंट नंबर आहे, पुढल्या एका तासात तू तिथे पैसे जमा कर, नाहीतर व्हिडीओ सोशल मीडियावर गेलाच म्हणून समज’ असे म्हटले. त्या विजयने दिलेल्या त्या धमकीने उत्पल हा पूर्णपणे गर्भगळीत झाला होता, त्याला काय करावे हे सुचत नव्हते. त्याने विजयला सांगितले, माझ्याकडे इतके पैसे नाहीत, मी तुमची गरज पूर्ण करू शकत नाही. हे ऐकल्यावर विजय त्याला म्हणाला, ठीक आहे, तुला यामधून बाहेर पडायचे असेल तर माझे एक काम करावे लागेल. तुझा पत्ता मला पाठव, त्यावर मी एक पार्सल पाठवतो, ते तू मी सांगीन त्या ठिकाणी नेऊन द्यायचे. त्याचा तुला आर्थिक मोबदला मिळेल, फक्त या विषयावर कोणाशी फार चर्चा करायची नाही. हे तुला मंजूर आहे का? त्यावर उत्पलने एका क्षणाचा विचार न करता त्याला होकार दिला. उत्पलच्या घरच्या पत्त्यावर विजयने ते पार्सल पाठवले, त्याला कुठे पाठवायचे ती जागा, त्याचा पत्ता दिला. उत्पल देखील पैसे मिळतात, म्हणून ते काम करू लागला.
हे सुरू असताना एक दिवस ज्या ठिकाणी उत्पल ते पार्सल देण्यासाठी गेला होता, तिथे चारजणांनी त्याला घेरले आणि विचारले, उत्पल तू काय काम करतोस, माहित आहे का? त्यावर तो म्हणाला, पार्सल देण्याचे काम आहे हे. त्यावर ते चौघेजण त्याला म्हणाले, यामध्ये कोणती औषधे असतात ते तुला माहित आहे का? ते तू पोहचवत असतोस. तुला समजावे म्हणून हे सांगितले. जर तू हे विजयला बोललास तर तुझे फोटो व्हायरल झालेच म्हणून समज. हे ऐकल्यावर उत्पलच्या पायखालची वाळूच सरकली.
आपण आता फार मोठ्या संकटात आपण फसलो आहोत, यामधून कसे बाहेर पडायचे, असा विचार तो करू लागला. विजयला बोललो तर संकट येणार होते, त्यामुळे त्याने गप्प बसून हे काम सुरूच ठेवले होते. कारण त्याला ते व्हिडीओ व्हायरल होण्याची भीती होती. हळूहळू उत्पलला अपेक्षेपेक्षा अधिक पैसे मिळू लागले. त्यामुळे कॉलेज सुरू असताना देखील त्याने हे काम सुरूच ठेवले होते.
उत्पल हे काम चांगल्या प्रकारे करतो आहे, हे हेरून त्याला काही औषधे घेऊन ते येमेनला पोहचवण्याचे काम देण्यात आले होते. उत्पलने आपण कॉलेजकडून एका प्रोजेक्टसाठी येमेनला जाणार असल्याचे घरच्या मंडळींना सांगितले. पासपोर्ट तयार करून तो विजयला व्हिसासाठी दिला होता. येमेनला जाण्याची सगळी तयारी पूर्ण झाली. विजयने दिलेले ते सामान इतके व्यवस्थित पॅक केले होते, कुठे कुणाला ते समजले देखील नाही, की त्याचा संशय देखील आला नाही, ते पार्सल घेऊन उत्पल सहीसलामत येमेनमध्ये पोहचला.
विमानतळाच्या बाहेर त्याला घेण्यासाठी दोन युवक गाडी घेऊन आले होते, त्याला घेऊन ते एका गावात आले. तिचे त्याची आणखी चार मुस्लिम युवकांबरोबर ओळख करून देण्यात आली. त्यांची मैत्री उत्पलबरोबर चांगली जमली. दिवसभर त्यांनी उत्पलबरोबर चांगल्या पद्धतीने घालवला. संध्याकाळ झाल्यावर त्यांनी आपले खरे रंग उत्पलला दाखवण्यास सुरुवात केली, दारू पिऊन ते त्या घरात उत्पलला मारहाण करू लागले, त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यापर्यंत त्यांची मजल पोहोचली. आपल्या बाबतीत हे काय चालले आहे, आपण भलत्याच संकटात सापडलो असल्याचे उत्पल याला समजले. पण त्या गावात आपले कोणीच नाही, आता काय करायचे, असा प्रश्न त्याच्यासमोर आ वासून उभा होता.
इतक्यात त्या टोळीचा म्होरक्या तिथे आला. तो उत्पलला म्हणाला, तुला इथून सीरियाला जायचे आहे, ते पण आमचा कार्यकर्ता म्हणून लढाई करण्यासाठी. हे जर तुला मान्य नसेल तर तुला आम्ही इथेच संपवून टाकू, तुला हे मान्यच करावे लागेल, विचार करायला तुझ्याकडे अजिबात वेळ नाही. हा प्रसंग पाहिल्यावर आपण अतिरेक्यांच्या तावडीत सापडल्याची त्याची खात्री झाली. इथून सुटका करून घेणे आपल्याला कठीण आहे, ते सांगतील ते मान्यच करावे लागले, असा विचार उत्पल करत असतानाच त्याची गाठ त्याच्यासारख्याच फसलेल्या अन्य एका भारतीय तरुणाबरोबर पडली. त्या दोघांचे दु:ख एकच होते. त्या दोघांनी तिथून पळून जाण्याची योजना आखली होती, दोघेही जण त्या प्रयत्नात असताना तिथे गस्त घालणार्या अतिरेक्यांनी त्यांना पहिले आणि दोघांना गोळी घातली.
त्या अॅपच्या नादात झालेल्या मैत्रीमधून उत्पल यामध्ये फसला आणि सायबर टेररिझमचा बळी झाला आणि जीव गमावून बसला.
हे लक्षात ठेवा
– कोणत्याही अॅपच्या प्रेमात पडू नका.
– मैत्री करण्यासाठी असणार्या अॅपच्या माध्यमातून फसवणूक होण्याची शक्यता असते, तिथे होणारी मैत्री ही फसवी असू शकते. हे लक्षात ठेवा.
– अशा प्रकरणात अडकल्यानंतर गुरफटत जाण्याऐवजी योग्य वेळी सायबर पोलिसांकडे तक्रार द्या. सुटकेचा मार्ग फक्त तोच आहे.