महाराष्ट्रातल्या बहुजन समाजापर्यंत शिक्षणाची गंगा घेऊन जाणारे कर्मवीर भाऊराव पाटील प्रबोधनकारांना गुरू मानत. कर्मवीरांशी असणारा ऋणानुबंध हा प्रबोधनकारांच्या चरित्रातला एक महत्त्वाचा भाग आहे. पण तो कायम दुर्लक्षित राहिलेला दिसतो.
– – –
प्रबोधन दादरहून सातार्याला जाताना त्याचे विचार आणि भूमिका बदलणार नाहीत, अशी स्पष्ट ग्वाही प्रबोधनकारांनी दिली आहे. प्रबोधनच्या दुसर्या वर्षाच्या शेवटच्या लेखात ते लिहितात, `प्रबोधनाचे स्थलांतर त्याच्या मतांतरास कारण होणार की काय? अशी शंका कदाचित कित्येंकांस येणे शक्य आहे. त्यांच्या दिलदिलाशासाठी थोडासा खुलासा करणे अप्रस्तुत होणार नाही. ज्यांनी प्रबोधनाच्या हातांत हात घालून नियमित स्वाध्यायशीलतेने गेली दोन वर्षं प्रवास केला आहे, त्यांना त्याच्या विवक्षित मताभिमानाची पकड किती दांडगी आहे, याची जाणीव करून देणे नलगे. स्थलांतराचा उद्देश शुद्ध व्यावहारिक आहे. त्याचा प्रबोधनाच्या मतस्वातंत्र्यावर किंवा ध्येयावर कसलाही परिणाम व्हावयाचा नाही, ही सर्वांनी खात्री ठेवावी.`
प्रबोधनने वाचकांना फक्त घडामोडी सांगण्याचं काम केलं नाही तर चिकित्सक सुधारणावादी विचार सांगण्याचं केलं. याची स्पष्टता प्रबोधनकारांकडे होती. तोच शिरस्ता पुढेही चालू ठेवण्याचा इरादा त्यांनी या लेखात स्पष्ट केलाय, `देशाच्या कानाकोपर्यांत जरा कोठे फट झाले की त्यावर चुटकीसारखे डझनवारी कालमांचे लेख खरडण्याचे काम प्रबोधनाचे नव्हे. ठिकठिकाणची बातमीपत्रे किंवा वर्तमानसार देण्यासाठी प्रबोधनाचा जन्म नव्हे. ते काम आमच्यापेक्षा आमची इतर भावंडे उत्कृष्टपणे पार पाडीत असतातच. देशाच्या परिस्थितीचे रंग आताशा इतके झपाझप बदलत आहेत, की कोणता रंग खरा आणि कोणता खोटा, हे निश्चयाने सांगणेसुद्धा धाडसाचे होऊन बसले आहे. अशा अवस्थेत प्रत्येक महत्त्वाच्या परिस्थितीकडे चिकित्सक दृष्टीने पाहून निश्चित विचारांची निष्पत्ति कशी करावी, याची दिशा दाखविण्याचे कार्यच आजपर्यंत प्रबोधन करीत आलेले आहे आणि हेच त्याचे धोरण पुढेही अबाधित राहील.`
प्रबोधनचं स्थलांतरामागे वैचारिक कारण नव्हतं, तर स्वतःचा छापखाना उभारण्याचं व्यावहारिक कारणच होतं. पण त्यासाठी मुंबईहून थेट सातार्याला जावंसं वाटलं, कारण तसा प्रस्ताव साक्षात कर्मवीर भाऊराव पाटील प्रबोधनकारांकडे घेऊन आले होते. दोघेही समवयस्क आणि समविचारी, शिवाय सारख्या स्वभावाचे देखील. दोघांची ओळख फक्त वर्षभराची होती, पण जिव्हाळा अनेक जन्मांचा असल्यासारखा. ‘शनिमाहात्म्य’ या पुस्तकात प्रबोधनकार लिहितात, `१९२२च्या एप्रिलात सातार्यास शिवजयंतीनिमित्त मी तीन व्याख्याने देण्यास गेलो होतो. त्यावेळपासून सुप्रसिद्ध कट्टे सत्यशोधक रा. भाऊराव पाटील यांचा माझा जो अकृत्रिम स्नेहसंबंध जडला, तो आजदिनपर्यंत अखंड आणि निर्मळ आहे.` प्रबोधनकारांच्या व्याख्यानांनी १९२२ साली सातार्यातला शिवजयंती उत्सव गाजला. त्याच्या आयोजनात कर्मवीर अण्णा आघाडीवर होते. त्यांनीच सातारा रोड रेल्वे स्टेशनवर प्रबोधनकारांचं स्वागत केलं. ते पुढचे तीन चार दिवस त्यांच्या दिमतीला हजर होते. कर्मवीर अण्णा तेव्हा सत्यशोधक समाजाचे खंदे कार्यकर्ते होते. केशवराव विचारे, रामचंद्र घाटगे, पांडुरंग पाटील, भाऊराव पाटोळे, तातोबा यादव अशा सहकार्यांच्या सोबत कर्मवीर अण्णा सातारा परिसरातला बहुजन समाज जागा करत होते. त्यात त्यांनी तमाशाच्या धर्तीवर सत्यशोधक जलसे उभे केले होते. त्यात ते पुरोहितशाही, अंधश्रद्धा, जातीभेद, अस्पृश्यता असे अनेक विषय आक्रमकपणे हाताळत. प्रबोधनकारांच्या याच दौर्यात अशाच एका जलशाने प्रभावित होऊन सातार्यातल्या न्हावी मंडळींनी विधवांचे केशवपन न करण्याची शपथ घेतली होती.
या दौर्यानंतर प्रबोधनकार आणि कर्मवीर यांच्यात अतूट जिव्हाळा निर्माण झाला. कर्मवीर अण्णांना पुढच्या कार्याच्या दृष्टीने प्रबोधनकारांचा आधार वाटला असावा. ते पुढच्याच महिन्यापासून नियमित मुंबईला प्रबोधनच्या कचेरीत म्हणजे दादरच्या स्वाध्यायाश्रमात हजेरी लावू लागले. बहुजन समाजाच्या मुलांना शिकवण्यासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना त्यांनी तीन वर्षं आधीच केली होती. पण त्याचा विस्तार अजून व्हायचा होता. त्या कामासाठी ते मुंबईत येत असावेत, असं प्रबोधनकारांनी केलेल्या नोंदींवरून वाटतं.
प्रबोधनकार लिहितात, `एक दिवस पाहतो तो घोंगडेधारी पाटलाची स्वारी दत्त म्हणून स्वाध्यायाश्रमात हजर. मांजरपाटी जाडेभरडे धोतर, अंगात तसलाच एक घोळ सदरा, माथ्यावर कांबळ्याची टोपी, खांद्यावर भले मोठे घोंगडे. पठ्ठ्या जो आला तो लगेच आश्रमीय मंडळीत एकतान रंगला. सकाळी नळावर स्नान करून बाहेर जायचा तो रात्री मुक्कामाला यायचा. सकाळी फक्त चहा. जेवणाबिवणाची तोसीश नाही. भोजनोत्तर रात्री माझ्या चर्चा व्हायच्या. कशावर? मागास बहुजन समाजात आणि प्रामुख्याने अस्पृश्य समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी बोर्डिंगे स्थापण्याची योजना.`
या चर्चांमध्ये कर्मवीर अण्णांच्या कामाचा आराखडा उभा राहिला, असंही प्रबोधनकारांनी लिहून ठेवलं आहे, `भाऊराव पाटलांचा खाक्या तर औरच. त्यांचा मुक्काम बहुतेक महिना पंधरवड्याचा असे. भावी कार्याविषयीचे सारे प्राथमिक बातबेत त्यांनी आश्रमातच विचार विनिमयांचे भुसकट पाडून निश्चित केले होते. पण हे आता भाऊरावच्या शागीर्दांना कोण सांगणार?`
या भेटींमध्ये प्रबोधनकार आणि कर्मवीर यांच्यामध्ये भावाभावांसारखा प्रेमजिव्हाळा निर्माण झाला. प्रबोधनकार लिहितात, `मे १९२२ पासून तो १९२३चे मध्य उलटेपर्यंत भाऊराव किती वेळा सातारा ते मुंबई आला आणि स्वाध्यायाश्रमात बिर्हाडाला टेकला, याची गणती करता येणार नाही. लोकसेवेविषयी दोघांच्याही भावना नि कल्पना एकगोत्री. तशात `साहसे श्री: प्रतिवसति` हा दोघांचाही आत्मविश्वास. त्यामुळे हा हा म्हणता आम्ही दोघे जणू काय पाठचे भाऊ इतका परस्परांचा जिव्हाळा जमला.`
`सत्यशोधक प्रबोधनकार आणि कर्मवीर` या महत्त्वाच्या पुस्तकात विटा येथील प्रा. महावीर मुळे यांनी या दोन महापुरुषांमधला हा जिव्हाळा सविस्तर तपशीलाने मांडला आहे. या दोघांचीही चरित्र आणि अनेक अप्रकाशित संदर्भ या पुस्तकात आहेत. या पुस्तकाच्या प्रारंभी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी लिहिलेल्या टिपणात प्रबोधनकार आणि कर्मवीर यांच्यात निर्माण झालेल्या जिव्हाळ्याचं कारणच सांगितलं आहे. ते महत्वाचं आहे, `आमचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांचे सबंध आयुष्य म्हणजे अनेक लढायांचा एक प्रदीर्घ क्रम होता… त्यांच्या कठोर तत्त्वनिष्ठ स्वभावामुळे त्यांच्या वाट्याला स्थिर व संपन्न आयुष्य कधी आले नाही. पण परिस्थितीला ते कधी शरण गेले नाहीत. या संघर्षमय जीवनप्रवासात त्यांनी माणसे जोडली आणि तोडलीसुद्धा. जी जोडली ती त्यांच्यासारखीच तत्त्वनिष्ठ, ध्येयनिष्ठ आणि चळवळी होती. त्यामधले एक ठळक नाव म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. भाऊराव हे असे खंदे आणि कर्ते समाजसुधारक होते की दादांचा त्यांच्यावर पराकाष्ठेचा लोभ होता. दादा वेळोवेळी त्यांच्या पाठीशी उभे राहिले.`