भर संसदेत सत्ताधारी खासदार हिंस्त्र शिवीगाळ करत असताना जबाबदार केंद्रीय मंत्री त्यात हस्तक्षेप न करता खदाखदा हसताना दिसत होते. बिधुरीला कोणतीच शिक्षा झालेली नाही, उलट शिवराळ विखारी भाषा बेधडक वापरण्याचा ‘गुण’ लक्षात घेऊन त्याला राजस्थान निवडणुकीसाठी महत्वाची जबाबदारी दिली गेली आहे. आता राजस्थानातली जनता या शिवराळ सडकछाप इसमाला जागा दाखवून देईल, अशी अपेक्षा आहे.
– – –
भारतीय जनता पक्षाने काहीही गरज नसताना, निव्वळ व्यक्तिस्तोमापायी मोठ्या अट्टहासाने हजारो कोटी रुपयांचा चुराडा करून संसदेची नवीन इमारत बनवली आणि त्यात बोलावलेल्या पहिल्याच विशेष अधिवेशनाला गालबोट लागले… म्हणजे गालबोट लागले अशी देशातल्या खर्या सुसंस्कृत माणसांचं मत आहे… भाजपच्या नेत्यांचे काय मत आहे, ते त्यांच्या वर्तनातून दिसून आलेलं आहे… नवीन संसदेत सगळे राजशिष्टाचार पायदळी तुडवून फक्त मोदीनामाचा गजर करण्यासाठी जनता बोलावलेली असताना ‘मोदी, मोदी’ अशा बेभान आरोळ्यांऐवजी सुसंस्कृतांची शिवीगाळ ऐकायची वेळ अभ्यागतांवर आली… भाजपचा एक खासदार रमेश बिधुरी याने त्याचा पक्ष आणि त्याच्या विचारधारेचं देशातील मुस्लिमांविषयी काय मत आहे, ते ‘र्भेवे, कर्टे, मुल्ले, मुल्ला, उग्रवादी’ अशा शिव्या देऊन सुस्पष्टपणे मांडलं आणि नव्या संसदेच्या पहिल्याच दिवशी संसदेचं कामकाज रसातळाच्या पातळीवर घसरलं… हा पहिला दिवस आता मोदींच्या थोर कामगिरीसाठी किंवा त्यांनी विशेष अधिवेशनाद्वारे पास करून घेतलेल्या ऐतिहासिक (उद्याच्या वायद्याच्या स्वरूपात असल्याने त्यादृष्टीनेही ऐतिहासिक) महिला आरक्षण विधेयकासाठी ओळखला जाणार नाही. बसपाचे दानिश अली यांना उद्देशून बिधुरीने उधळलेल्या मुक्ताफळांमुळे हा दिवस इतिहासात अजरामर होणार आहे, हे भाजपचे दुर्भाग्य! बिधुरीचे भाषण सुरू असताना दानिश अली मध्ये बोलून अडथळे आणत होते, त्याने बिधुरीचं पित्त खवळलं असणार. कारण ही भाजपेयींची मक्तेदारी. विरोधी पक्षातील कोणीही काही प्रभावी मांडणी करायला लागला की यांना भीती वाटू लागते आणि ते मध्ये मध्ये अचकट पाचकट बोलून व्यत्यय आणतात. विरोधी पक्षातल्या महिला खासदार बोलत असल्या की ‘दीदी, ओ दीदी’छाप नेत्यांच्या तालमीत तयार झालेले हे चिल्लेपिल्ले विशेष उत्साहाने अडथळे आणतात. त्यांच्या बोलण्यात कोणी अडथळा आणल्यावर काय होतं ते बिधुरीने निंदनीय, असंसदीय भाषेत गरळ ओकून दाखवून दिलं. जगाला सभ्यतेचे डोस पाजणार्या या पक्षाच्या आणि परिवाराच्या खर्या भेसूर चेहर्याचं दर्शन बिधुरी घडवत असताना मागे रविशंकर प्रसाद आणि डॉ. हर्षवर्धन हे मवाळ, सुसंस्कृत समजले जाणारे नेते, केंद्रीय मंत्री हर्षवायू झाल्यासारखे दात काढत होते, हेही सगळ्या जगाने पाहिले.
असे काही अन्य कोणत्या पक्षाच्या खासदाराने केलं असतं, तर भाजपेयींनी त्याच्या पितरांना स्वर्गातून पाचारण केलं असतं, त्याचा उद्धार केला असता. भाजपच्या बोळ्याने दूध पिणार्या सभापतींनी ताबडतोब निलंबन वगैरे कारवाई केली असती. बिधुरीच्या बाबतीत यातलं काहीही होणार नव्हतं. टीकेचा भडिमार सुरू झाल्यावर पक्षाने या घटनेची तोंडदेखली निंदा केली, तरी त्यापलीकडे काहीही शासन झालेलं नाही. होण्याची शक्यताही नाही. प्रज्ञासिंहसारख्या दहशतवादी व्यक्तीला खासदारकी देणारा आणि गाडीखाली कुत्रे मेले तर वाईट वाटतेच, असे उद्गार काढणार्यांना पंतप्रधान बनवणारा हा पक्ष आहे. अशी भाषा मान्य होणार असेल, संसदीय सभ्यता रसातळात जाणार असेल, पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्ष त्या भाषेकडे कानाडोळा करणार असतील तर इमारत नवी, पण, दगड जुनेच अशी परिस्थिती आली आहे. पूजाअर्चा करून जो सेन्गोल तिथे ठेवला तो पहिल्याच दिवशी अपवित्र करायचा होता तर जिथून आला तिथेच परत ठेवलेला बरा. दिल्लीतील जनतेने सडकछाप अर्वाच्यपणा करण्यासाठी खासदार संसदेत पाठवला आहे का? सत्ताधारी पक्षाच्या खासदाराची कधीच कसलीच चूक कशी काय नसते? तो महिला कुस्तीपटूंना लैंगिक त्रास देणारा खासदार असला तरी निर्दोष कसा काय असतो? भाजपचा सत्तेचा माजच इतका वाढला आहे की त्यांनी स्वतःच्या खासदार आणि आमदारांसाठी अहोरात्र वॉशिंग मशीन उपलब्ध करून ठेवलं आहे. काहीही घाण करा, धुवून देऊ, किती वास मारत असला तरी स्वच्छ स्वच्छच म्हणू, अशी व्यवस्था असल्याने विरोधी पक्षांवर आणि खासदारांवर अत्यंत खालच्या पातळीवर, वैयक्तिक चिखलफेक करणार्याला प्रोत्साहन देणे सुरू आहे. गीदड की मौत आती है तो वो शहर की तरफ भागता है, असं म्हणतात, इथे तर तो गटर की तरफ भाग रहा है, असं म्हणायची वेळ आली आहे.
विरोधकांचा सन्मान राखणे भाजपाच्या लोकशाहीच्या व्याख्येत बसत नाही. जी २० परिषदेत देशाच्या विरोधी पक्षनेत्यांना आमंत्रितच न करण्याइतकी मोठी राजनैतिक चूक हा पक्ष सहज करून जातो. भर संसदेत सत्ताधारी खासदार हिंस्त्र शिवीगाळ करत असताना जबाबदार केंद्रीय मंत्री त्यात हस्तक्षेप न करता खदाखदा हसताना दिसत होते. बिधुरीला कोणतीच शिक्षा झालेली नाही, उलट शिवराळ विखारी भाषा बेधडक वापरण्याचा ‘गुण’ लक्षात घेऊन त्याला राजस्थान निवडणुकीसाठी महत्वाची जबाबदारी दिली गेली आहे. आता राजस्थानातली जनता या शिवराळ सडकछाप इसमाला जागा दाखवून देईल, अशी अपेक्षा आहे.
बिधुरी महाराष्ट्रातल्याप्रमाणे हा कोणी बाहेरून आयात केलेला टिल्लू टॉम नाही, तो आणि त्याचं कुटुंब हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुन्या पिढीतील सक्रिय सदस्य आहेत. रमेश बिधुरी विद्यार्थीदशेपासूनच संघविचाराने प्रभावित आहे म्हणतात. १९९३ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रीय होऊन १९९३ साली हे गृहस्थ राजकारणात उतरले. २००३ ते २०१४ या काळात ते दिल्ली विधानसभेत आमदार होते आणि २०१४ व २०१९मध्ये भाजपच्या तिकिटावर दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. हा याचा राजकीय प्रवास सांगावा लागतो, कारण बिधुरीने वापरलेली भाषा ही त्याची वैयक्तिक आहे असे म्हणून संघ आणि भाजपा हात झटकत असले तरी सत्य हेच आहे की त्याच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द त्याचे असले तरी विचार संघाचेच आहेत. बिधुरीने संसदेत उधळलेली मुक्ताफळं हाच संघाचा घराघरातून चालणारा विखारी प्रचार आहे, सरसंघचालक बाहेर ‘आमचा डीएनए एक’ वगैरे प्रवचनं झोडत असले तरी त्यांची विचारधारा हेच सांगते. इतक्या अबोध वयापासून जी व्यक्ती संघाचे ‘संस्कार’ घेते आहे ती व्यक्ती संसदेत मर्यादा सोडून बरळली याचा दोष फक्त त्या व्यक्तीचा कसा असेल? तो दोष संघ संस्काराचा आणि बौद्धिकांचा देखील तितकाच नाही का? आज समाजमाध्यमावर खालच्या पातळीवर ट्रोलिंग करणारे सगळे वरकरणी सुसंस्कृत समाजाचे प्रतिनिधी आहेत, आत किती सडका मेंदू आहे, ते दिसतं तेव्हा हे कुसंस्कार दिसतात.
संघाने यापुढे संस्कारवर्गात सर्वात आधी चांगल्या भाषेचे संस्कार शिकवावेत कारण भाषेत सुसंस्कृतपणा नसेल तर आपले देखील परके होतात. भाषा हे एक लोकांना एकमेकांशी जोडण्याचे माध्यम आहे. भाषेतूनच त्या व्यक्तीची संस्कृती, व्यक्तिमत्त्व आणि शैक्षणिक पात्रता कळू शकते. मानवाने लाखो वर्षांपूर्वी भाषा वापरायला सुरुवात केली व सतत विकसित केली. एखादी व्यक्ती एखाद्या शब्दोच्चार करते तेव्हा ते उच्चार व्यक्तीच्या भावना व्यक्त करतात आणि त्या व्यक्तीचे विचार देखील व्यक्त करतात. भाषेवरून राज्य, वर्ग आणि वंश देखील चटकन समजू शकते. म्हणून तर तोंडाळ बिधुरीची भाषा ही गुर्जर समाजाची सरसकट भाषा नाही असे गुर्जर नेत्यांनी दानिश अली यांना फोन करून सांगितले. ज्या व्यक्तीच्या जीवनाचा उद्देश चुकीचा असेल, चुकीची मानसिकता असेल, त्या व्यक्तीची व संघटनांची भाषा त्याच खालच्या स्तराची असते. भारतीय संसदेत निरोगी आणि सुसंस्कृत भाषा अपेक्षित आहे, तिथे इतरांना दुखावणारे शब्द वापरण्याची परवानगी संविधान देत नाही. पण ज्यांनी संविधान शक्य तेवढे गुंडाळूनच ठेवले आहे ते सभ्य भाषा देखील गुंडाळून ठेवत असतील, तर त्यांना राजकीय अज्ञातवासात पाठवणे, हाच त्यावर उपाय आहे.
भाजपाचे एक खासदार तिकडे संसदेत गरळ ओकत असताना इथे थोर नेते, स्थानिक प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही आपले संस्कार पाजळते झाले. पत्रकारिता ही एक प्रकारची समाजसेवा आहे, असे जगभर मानले जाते आणि आपल्या देशात तर पत्रकारिता हा लोकशाहीचा मजबूत स्तंभ आहे, असेच मानले जाते. पण महाराष्ट्रात भाजपाने ज्यांना अध्यक्षाच्या खुर्चीत बसवले आहे, त्यांनी मात्र पत्रकारितेबद्दल काहीतरी वेगळाच समज करून घेतलेला दिसतो आहे. कदाचित ते ज्या मातृसंस्थेतून येतात, तिथे आपले मुखपत्र असणारे वृत्तपत्र म्हणजे पत्रकारिता असे शिकवले जाते. त्यामुळेच जे आपल्या बाजूने लिहितात तेच पत्रकार आणि इतर सगळा बिकाऊ माल असे ते समजत असावेत. सत्तेचा माज भाजपमध्ये गल्ली ते दिल्ली भिनलेला आहे आणि त्याचेच उदाहरण म्हणजे बावनकुळेंनी कार्यकर्त्यांना पत्रकारांना धाब्यावर न्यायची केलेली अनमोल सूचनावजा आदेश. बावनकुळे हे महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष आहेत आणि विदर्भातील एक जबाबदार नेते आहेत. महाराष्ट्रातील दोन राजकीय पक्षांवर घरफोडी करून राजकीय दरोडा टाकल्याच्या नंतर भाजपाच्या आमदार खरेदी संघाकडे काही काम नसल्याने आता त्यांनी आपला मोर्चा पत्रकारांकडे वळवला आहे. बावनकुळे कार्यकर्त्यांना म्हणतात, ‘पत्रकारांना धाब्यावर न्या, त्यांना खाऊपिऊ घाला आणि नीट चहापाणी देखील करा.’ यानंतर ते चतुराईने विचारतात, चहापाणी म्हणजे समजले ना? सध्याच्या पत्रकारितेचा स्तर हा वेगळा विषय आहे. पण, सरसकट सगळ्या पत्रकारांना ‘भाऊ धाब्यावर या’ असं म्हणून बावनकुळे यांनी आपल्या आकलनाचा स्तर दाखवला आहे. महाराष्ट्रातील काही निवडक पत्रकारांचा का होईना, पाठीचा कणा मजबूत आहे, गोपट्ट्यातल्या कलंकांप्रमाणे ते गोदी मीडिया बनून सत्तेच्या मांडीवर जाऊन बसलेले नाहीत. म्हणून तर महाराष्ट्राच्या सत्तेवर वाटमारी करून बसलेल्या बेकायदा सरकारवर थोडा तरी वचक आहे. धाब्यावर तंदुरी आणि चपटी वाटून महाराष्ट्र जिंकायची स्वप्ने भाजपाने पाहू नयेत. सत्तेने उपकृत केलेले भाट आज समाजातल्या विनोदाचा विषय ठरलेले आहेत. अंकित चॅनेल, मॅनेज केलेल्या न्यूजरूम, विचारधारेतून पुढे आणून बसवलेले संपादक यांच्या बळावर निवडणुका जिंकणं कठीण आहे. सरसकट सगळ्या पत्रकारांना तोडपाणीबहाद्दर बनवून बावनकुळे यांनी आपल्याच पायावर कुर्हाड मारून घेतली आहे. सत्तेच्या मदाने धुंद झालेले सत्ताधारी विरोधकांमुळे मातीत जात नाहीत, स्वत:च्या मस्तीने बरबाद होतात. भाजपची वाटचाल त्याच दिशेने सुरू आहे.