`प्रबोधन’चा अधिक विस्तार करण्यासाठी प्रबोधनकारांनी दादरहून सातार्याला जायचं ठरवलं. त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी हा निर्णय तडकाफडकी अर्ध्या तासात घेतला, तरी त्यांच्यासाठी दादर सोडणं सोपं नव्हतं.
– – –
पहिली दोन वर्षं `प्रबोधन’चा संसार दादरमधेच फुलला. पण लवकरच `प्रबोधन`चं बिर्हाड मुंबईच्या बाहेर जाऊ शकेल, याची कुणकुण वाचकांना लागली ती `प्रबोधन’च्याच दुसर्या वर्षाच्या विसाव्या अंकात. या अंकात `हितगुजाचे बोल’ या शीर्षकाचं एक सविस्तर निवेदन प्रसिद्ध झालं. त्यात प्रबोधनकारांनी `प्रबोधन’चा नवा छापखाना सुरू होऊन त्याचा विस्तार करण्याची घोषणाच केली. शिवाय शेवटच्या अंकातला शेवटचा लेख `हे पुष्प देवा तुजला वहातों’ हा `प्रबोधना’च्या पुढच्या वाटचालीची दिशा दाखवतो.
दुसर्या वर्षाच्या कामगिरीमुळे `प्रबोधन’ वैभवाच्या शिखरावर होतं. प्रबोधनकारांनीही हे मान्य केलंय, `गेले दुसरे वर्ष प्रबोधनाला जसे अत्यंत आणिबाणींचे गेले, तसेच त्याच्या कार्याच्या व प्रसाराच्या बाबतीत ते अत्यंत आशाजनक उत्तेजनाचेही झाले.’ प्रबोधनकार सांगतात तसं लोकांच्या अभिरुचीला नेहमीपेक्षा वेगळं वळण देण्याचा `प्रबोधन’चा इरादा प्रत्यक्षात आणणं अवघड होतं. त्याला वाचकांचा प्रतिसाद मिळेल किंवा नाही, याविषयी त्यांना शंका होती. पण दोन्ही वर्षं वाचकांनी `प्रबोधन’च्या पाठीशी उभं राहून त्यांना बळ दिलं. जाणकार विद्वान आणि उत्साही तरुण प्रबोधनच्या कार्यात सहभागी झाले. खेड्यापाड्यांतूनही प्रतिसाद मिळाला.
पण या दुसर्या वर्षाचा प्रवास सोपा नव्हता. प्रबोधनकारांवर अनेक संकटं आली. त्याविषयी ते लिहितात, `गेले साली अधिभौतिक अनेक तापसहस्रांनी प्रबोधनकारावर हल्ला केला. स्वावलंबनाचे निर्दय तप आचरीत असताना, अनेक वेळा ब्रीदाचीही कसोटी लागली. दोन तीन वेळां प्राणान्तिक अवस्थेची गंडांतरे आली.
ऑगष्टच्या ९ तारखेला हा दुबळा सेवक प्रत्यक्ष मृत्यूच्या जबड्यातच तब्बल १२ तास धडपडत होता. अशी संकटपरंपरेची कहाणी कोठवर लांबवावी? या प्रसंगी, भगवंता, तुझ्या प्रेमळ कृपाकटाक्षाने वेळोवेळी कल्पनातीत घटनेने त्या नानाविध संकटांचा फडशा पाडला, आणि प्रबोधनाचा दुसर्या वर्षाचा प्रवास यशस्वी झाला.’
या संकटांचा सामना करताना प्रबोधनकारांना वाचकांच्या पाठिंब्याचा आधार होताच. पण त्यांनी त्यासाठी देवाचेही आभार मानले आहेत. `परमेश्वर आम्हाला सर्वतोपरी कसाला लाऊन पहात आहे आणि अगदी ऐन संकटाच्या क्षणाला या दुबळ्या प्रबोधनाला चटकन हात देऊन प्रगतीच्या मार्गावर धूम धांव ठोकण्याचे सामर्थ्य देत आहे. जग हे कौतुकाने भरले आहे. परंतु चोहों बाजूला निराशेचा गर्द अंधःकार दाटला आहे. संकटांचा अनन्वित दणदणाट सुरू आहे. मानसिक व्यग्रतेच्या वेदना कमी, म्हणून शारीरिक व्यथेची त्यात भर पडत आहे. अशा अवस्थेत चटकन लख्ख प्रकाश पडावा आणि नजरेला उत्साहपूर्ण परिस्थितांची चैतन्याची ज्योत दिसावी, हें ईश्वरी कृपेचे प्रत्यक्ष चिन्ह नव्हे तर काय? ईश्वरी लीलेच्या कौतुकाचा हा दुर्मिळ अनुभव भोगण्याचे भाग्य प्रबोधनाला लाभले आहे.’
अशी संकटं आली तरी प्रबोधनकार अजिबात निराश झाले नाहीत. उलट `प्रबोधन’चा अधिकाधिक विस्तार करण्याच्या योजना ते आखत होते. त्यात त्यांना सर्वाधिक गरज भासत होती, ती पानांची संख्या वाढवण्याची आणि त्यासाठी स्वत:चा छापखाना उभा करण्याची. `प्रबोधन’चे पाठीराखे आत्माराम चित्रे यांनी प्रबोधनकारांना तसा छापखाना उभारूनही दिला होता. पण चित्रेंच्या अचानक मृत्यूने ते स्वप्नही अपुरं राहिलं. त्याआधी छत्रपती शाहू महाराजांच्या निधनानेही असंच घडलं होतं. तरीही छापखाना उभारण्याचा प्रबोधनकारांचा संकल्प कायम होता, `यंदा प्रबोधनचा प्रसार पुष्कळच झाला असून, त्याच्या ठरावीक आठ पानाचे क्षेत्र अपुरे पडू लागले आहे… बुद्धिविकास करणार्या अनेक विषयांचा प्रबोधनांत समावेश करून त्याची उपयुक्तता कशी वाढविता येईल, याच्या शेकडो सूचना रसिकांकडून आल्या. परंतु स्वतंत्र छापखान्याची सोय होईपर्यंत मनातले मांडे मनांत कुसकरण्याशिवाय आम्हालाही काही मार्ग दिसेना.’
पण फक्त इच्छा व्यक्त करून प्रबोधनकार थांबले नाहीत. त्यांनी दुसरं वर्षं संपायला दोन महिने असतानाच नव्या छापखान्याची घोषणा केली. ती अशी, `कळविण्यास आनंद व अभिमान वाटतो की प्रबोधनाच्या मार्गक्रमणात संकटांचे खांचखळगे जरी नानाविध आले, गेले व सध्या आहेत, तरी त्याच्या प्रगतीचा व लोकप्रियतेचा वेग अप्रतिहत वाढत्या प्रमाणावर आहे. प्रबोधनाकरिता स्वतंत्र छापखान्याची व्यवस्था बहुतेक जुळून आले आहे आणि तिसर्या वर्षाचा पहिला सोळा पानांचा अंक त्यांतच मुद्रित होऊन प्रिय वाचकांच्या चरणसेवेला रुजू होईल.’
ही घोषणा करत असताना प्रबोधनकार नव्या छापखान्याच्या उभारणीसाठी सातारा जिल्ह्यातल्या पाडळी गावात पोचलेही होते. तसं त्यांनी शेवटच्या अंकात सांगितलंही. `प्रबोधन’चं दादरहून सातार्याला स्थलांतर करण्याची घोषणाच त्यांनी या अंकात केली होती, `प्रबोधनाची प्रिय जन्मभूमि दादर. तेथून त्याचे सातारा रोडवर प्रयाण होणे, तेथे त्याच्या तिसर्या वर्षाचा कार्यक्रम वाढत्या प्रमाणांत इंग्रजी व मराठी या दोन भाषांत, स्वतंत्र छापखान्याच्याद्वारे सुरू होणे आणि महाराष्ट्राच्या नाजूक केंद्रस्थानी प्रबोधनाची मुख्य कचेरी स्थापन होणे, ही सर्व अक्षरश: अकल्पित घटना, अवघ्या ३० मिनिटांच्या आत जुळून आली, याचे आमच्याप्रमाणेच आमच्या आश्रयदात्यांनाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. हा परमेश्वरी योगायोग नव्हे काय? हा कसा घडून आला, हे आम्हाला एक कोडे पडले आहे. पण तो आज प्रत्यक्ष घडला आहे, ही गोष्ट मात्र खरी. आम्ही स्वत: सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात सातारा रोड (पाडळी व्हिलेज) येथे येऊन झालो व छापखान्याच्या मांडामांडीला लागलो. प्रबोधनाचा पुढचा (३ वर्षाचा १ला) अंक आमच्या सातारा प्रिंटिंग वर्क्समध्ये प्रसिद्ध होईल. आमच्या आश्रयदात्यांनी यापुढे पत्रव्यवहार करताना कृपा करून खाली दोन गोष्टींकडे अवश्य लक्ष द्यावे. १) फक्त प्रबोधन पाक्षिकाबद्दलचा सर्व प्रकारचा पत्रव्यवहार, लेख, वर्गण्या, वगैरे व्यवस्थापक प्रबोधन कचेरी, सातारा रोड, या पत्त्यावर पाठविणे, आणि २) आमच्या ग्रंथांच्या मागणीबद्दल किंवा तद्विषयक पत्रव्यवहार व्यवस्थापक, प्रबोधन (मुंबई शाखा) कचेरी, २० मिरिंडाची चाळ, दादर, मुंबई नं. १४ या पत्त्यावर पाठविणे.’
मुंबईसारख्या आधुनिक शहरातून सातार्यातल्या पाडळी गावात जाताना `प्रबोधन’मध्ये घडवायचे बदल प्रबोधनकारांनी आधीच ठरवले होते. तिसर्या वर्षांत `प्रबोधन’ची पानं ८ वरून १६ करण्याचं त्यांनी नक्की केलं होतं. या १६ पानांत काय द्यायचं हेही नक्की होतं. अग्रलेख आणि स्फुट लेखांना ८ पानं. ही पानं `प्रबोधन’चा प्राण होती. कारण ती प्रबोधनकार संपादक म्हणून स्वत: लिहित होते. तोवर प्रबोधनकारांना कशीबशी दोन तीन पानं मिळत. त्यात त्यांना भरघोस वाढ करायची होती. इतर लेखकांच्या ताज्या लेखांसाठी त्यांनी दोन पानं राखून ठेवली होती. त्यात सुधारणावादी विचारांचे लेखक लिहित असत. त्यासाठी `कसलेल्या विद्वान लेखकांचा संपादकगणांत समावेश करण्यांत आलेला आहे’ असंही प्रबोधनकारांनी नोंदवलेलं आहे.
त्यांनी युरोपियन आणि अमेरिकन नियतकालिकांतल्या उत्तम लेखांचा विचार परिचय दोन पानं त्यांनी ठरवली होती. फक्त परदेशातीलच नाही, तर बंगाल, पंजाबातल्या नियतकालिकांमधले लेख `प्रबोधन’मध्ये पहिल्या अंकापासून अनुवाद करून छापले जात होते. त्यात रवींद्रनाथ टागोरांसारख्या मान्यवरांचेही लेख होते. शिवाय लोकहितवादी, राजारामशास्त्री भागवत यांचे जुने लेखही प्रबोधनमध्ये येत होते. त्यांना आता जास्त जागा मिळणार होती. शिवाय पुस्तकांचा परिचय करून देणारं `कलमबबहाद्दरांस शेलापागोटे’ हे लोकप्रिय सदर, कविता, पत्रव्यवहार यांच्यासाठी दोन पानं त्यांनी ठेवली होती. पुढे त्यात इंग्रजी मजकुरासाठीही काही पानं राखून ठेवण्याचं ठरलं. प्रबोधनकार स्वत: उत्तम इंग्रजी लिहित. त्यामुळे त्यांच्यासाठी हे कठीण नव्हतंच. ते सांगतात, `प्रबोधनामध्ये काही थोडा इंग्रजी मजकूर असल्यास विचारविनिमयाचे क्षेत्र बरेच विस्तृत होईल, अशा पुष्कळांच्या सूचना आल्यामुळे ती योजना पुढील अंकापासून अंमलात आणण्याचे योजिले आहे.’ या सगळ्यामुळे प्रबोधनची वार्षिक वर्गणी दोन रुपयांवरून तीन रुपये करण्यात आली.
शेवटच्या लेखात प्रबोधनकारांनी दादरचा निरोप घेतला आहे. दादर `प्रबोधन’ आणि प्रबोधनकारांच्या पाठीशी कायमच ठाम उभं राहिलं. इथेच त्यांचा संसार सुरू झाला आणि बहरलाही. त्यामुळे पक्के दादरकर बनलेल्या प्रबोधनकारांना दादरचा निरोप घेणं अवघड झालं. निरोप देतानाचा हा हृद्य भाग मुळातून वाचण्यासाठी त्यांच्याच शब्दात पुढे दिला आहे.
`दादर ही प्रबोधनाची जन्मभूमि. आमचीही दादरास १३ वर्षे वस्ती. त्यामुळे दादरविषयी निसर्गतःच आम्हांला एक प्रकारचे प्रेम व अभिमान वाटत आहे. व्यवहारपरत्वे आम्ही या पुढे कोठेही असलो तरी माझे दादर ही प्रेमाची भावना आमच्या मृत्यूपळापर्यंत रतिमात्र कमी होणार नाही. तेथील अनेक सार्वजनिक संस्थांशी व व्यक्तींशी आमचा अत्यंत जिव्हाळ्याचा ऋणानुबंध आहे. अनेक सर्वजातीय प्रियमित्र पाठच्या भावापेक्षाही ठाकरे व्यक्तीसाठी जिवास जीव देणारे आहेत. आम्हांवर व आमच्या कार्यावर काळजीपूर्वक नजर ठेवणारे आणि अडीअडचणीच्या प्रसंगी आत्मप्रेरणेने धावून येणारे कित्येक वजनदार लोकनेते आहेत. अशा अनेक रीतीच्या निष्कपट गोतावळ्यामुळे, दादर म्हणजे आमचे प्रिय माहेरघर, अशी आमची भावनाच बनली आहे. हे माहेरघर सोडताना आणि तेथल्या आबालवृद्ध भगिनीबांधवांचा निरोप घेताना, आम्ही लहान मुलाप्रमाणे अश्रू ढाळले!’
`सन १८९२ सालापासून आम्ही पुष्कळ देशाटन केले व व्यवहारपरत्वे स्थलांतरेही केली. आमची जन्मभूमि पनवेल सोडल्यालाही आज १५-१६ वर्षे झाली. परंतु वियोगजन्य दु:खाचा खरा अनुभव सर्व आयुष्यांत आम्हांला दादरने दिला. अवचित बेतामुळे निघण्याची घाई झाली व आमच्या प्रयाणाची बातमी पुष्कळांना कळली नाही, यामुळे त्यांचा हिरमोड झाला. तथापि बातमी मिळताच मुंबई, ठाणे, कुर्ला, माटुंगा वगैरे ठिकाणचे बांधव स्टेशनवर आम्हाला हस्तांदोलन करण्यासाठी धावत आले. त्यांचे आम्ही फार आभारी आहो. त्याचप्रमाणे वाग्विहार समिती, दादर मित्रमंडळ, स्वाध्यायाश्रम, बालमंडळ आणि हुंडाविध्वंसक संघ इत्यादि संस्थांनी पानसुपारीच्या द्वारे व रौप्यकरंडाच्या आहेराने व्यक्त केलेल्या प्रेमाबद्दल आम्ही त्यांचे सदैव ऋणी राहू इच्छितो.’
`मतभिन्नतेच्या आणि नवमतवादाच्या रंगभूमीवर प्रबोधन आणि ठाकरे यांच्या वाग्लेखनसमशेरीच्या फटक्यांनी घायाळ झालेल्या बांधवांजवळही आमची प्रेमाची याचना आहे. विहित कर्तव्यकर्माच्या क्षेत्रांत मनभिन्नतेमुळे, बांधवांनों, आमचे तुमचे विरोधाचे कितीही खटके उडाले, तरी आपले परस्पर ध्येय एकजिनसीच आहे, हे विसरू नको आणि आपणही प्रबोधनावर निर्व्याज प्रेमाची छत्री धरा, अशी प्रार्थना करून सर्वांचा प्रेमाने निरोप घेतो. जगदीश सर्वांना चिरायु राष्ट्रसेवक करो!’
हे निरोपाचं लिहित असताना प्रबोधनकार दादरमध्ये नव्हतेच. त्यांनी सातार्यात बस्तान बसवलंही होतं.