मार्मिकचा वर्धापनदिन आणि देशाचा स्वातंत्र्यदिन यांच्यात फक्त एका दिवसाचं अंतर आहे… या दोन्ही पवित्र दिवसांची सांगड घालून १९८० सालातील स्वातंत्र्यदिनी बाळासाहेबांनी अतिशय पोटतिडकीने रेखाटलेले हे मुखपृष्ठ आजही तेवढेच भेदक असावे, हा दैवदुर्विलास आहे. हे जळजळीत व्यंगचित्र रेखाटले तेव्हा निदान लोकप्रतिनिधी आणि साठेबाज व्यापारी, काळा बाजारवाले, भट्टीवाले, स्मगलर यांच्यात फरक होता. आज हे सगळे एकच बनून बसले आहेत. गुन्हेगार राजकारणी बनले आहेत आणि राजकारणी गुन्हेगारांचे काळ्या धंद्यांमधले साथीदार, सफेद धंद्यांमधील भागीदार बनले आहेत. स्वातंत्र्यसैनिकांनी जुलमी सत्तेशी लढून मिळवलेल्या स्वातंत्र्याचा तिरंगा ध्वज आता असल्या पुढार्यांच्या आणि या लढ्याशी सुतराम संबंध नसलेल्या विचारधारेच्या पापी स्पर्शाने कलंकित होतो आहे… अर्थात, लोटांगणबहाद्दर कुंपणावरच्या पत्रकारितेच्या युगात मार्मिक मात्र बाळासाहेबांनी रेखाटून ठेवलेले आपले कर्तव्य निभावत राहील, जनतेच्या मनात वन्ही चेतवत राहील.