‘शोले’ ही एक रसरसलेली सूडकथा आहे पण तिला छोटी बहूच्या कारुण्याची जी शोकमग्न झालर लागलेली आहे, तिच्यामुळे ‘शोले’च्या ज्वाला अधिक धगधगत्या होतात. छोटी बहूचं हवेलीमधलं स्मशानशांततेत वावरणं, तिचं अचेतन जगणं, तिच्या शुष्क हालचाली आणि डोळे गोठवणारी नजर यामुळे अंतःकरणात कालवते. दिग्दर्शकाने हे दुःख इतकं उत्तुंग चितारलं नसतं तर कदाचित ठाकूरचा सूड फिका झाला असता.
– – –
‘शोले’ हा भारतीय सिनेमाचा माईलस्टोन आहे, हे वाक्य घासून घासून जुने झालेले असले तरी त्यातले सत्य अजूनही झळाळत असल्याने ते वापरण्याचा मोह टाळता येत नाही. ‘शोले’ हे कुणाला महाकाव्य वाटते तर कुणाला अजरामर कथा वाटते! मुळात ही एक अत्यंत सशक्त कथा आणि गोळीबंद पटकथा आहे, जिच्यात स्टारकास्टने जीव ओतलाय नि अख्ख्या क्रूने त्यासाठी मेहनत घेतलीय! मग कुठे हा भव्य दिव्य, देदीप्यमान यश मिळवणारा सिनेमा जन्माला आलाय! यावर पुस्तके निघालीत, डॉक्युमेंट्रीज निघाल्यात, वेबसिरीज निघाल्यात, तरीही यातून नित्य काही न काही नवे हाती लागते. ‘शोले’मधली हरेक फ्रेम देखणी आहे, हरेक सीन सिक्वेन्स बोलका नि जिवंत आहे. पैकी कथेच्या दोन महत्वाच्या सीन्सविषयी लिहिलंच पाहिजे कारण यात जे पैलू दडले आहेत ते अन्यत्र कुठे आढळत नाहीत.
‘आओ ठाकूर, मैं जानता था की तुम जरूर आओगे!’
कानात सोन्याची बाळी अडकवलेला, दाढीचे खुंट वाढलेला, शर्टच्या वरच्या दोनचार गुंड्या तशाच मोकळ्या ठेवून मळक्या कपड्यातला गब्बरसिंग डाव्या हातावर रुमालात गोळ्यांचा पट्टा बांधून अन् उजव्या हाताच्या मनगटावर पाचसहा पदरी काळा धागा गुंडाळून, मुठीत धारदार तलवार सहज धरून किंचित वाकून ठाकूर बलदेवसिंगच्या दिशेने चालत जात पुटपुटतोय.
टेकड्यांसारख्या आकारांच्या भल्या मोठ्या शिळांच्या चहूबाजूंनी राशी लागलेल्या आहेत, त्याच्या मधोमध खंदकासारखा करड्या मातीचा सपाट पृष्ठभाग आहे. मचाणासारखे आडोसे तयार करून त्याखाली घोडे बांधून ठेवलेले आहेत, काही दोर्यांवर कपडे वाळत घातलेले आहेत अन् तिथल्या प्रत्येक दगडावर डाकू बंदुका तयारीत धरून बसलेले आहेत. काही दगडांना बाज टेकून ठेवलेल्या आहेत, तर काही ठिकाणी लाकडी तिवया उभ्या आहेत. कंबरेला भला मोठा पट्टा बांधून डोक्याला भडक रंगाचे फेटे गुंडाळलेले गब्बरच्या टोळीतले डाकू त्याच्यासारखेच अमानुष चेहर्याचे आहेत. रामगढपासून कोसो दूर असलेल्या गब्बरच्या या अड्ड्यावर आकाशी रंगाच्या सफारीच्या वेशातल्या ठाकूर बलदेवसिंहचे दोन्ही हात बेड्यांनी करकचून आवळलेले आहेत अन् त्याच्या दोन्ही बाजूंनी दंडाला धरून आणि त्याच्या मागेही बंदुका ताणून धरलेले डाकू उभे आहेत. काही वेळांपूर्वीच त्याला डाकूंनी जेरबंद करून इथे आणून गब्बरच्या समोर उभे केले आहे. त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी ठाकूरची पाण्याबाहेर असलेल्या माशासारखी तडफड सुरू आहे. हातात तलवार धरलेला गब्बर जवळ येताच ठाकूरची तडफड आणखी वाढते, बांधलेल्या अवस्थेतच तो त्याच्या अंगावर जाऊ पाहतो, पण त्याला आवळून धरणार्या डाकूंची पकड मगरमिठीसारखी आहे; तो नुसताच जिवाचा आकांत करतो आहे. त्याची ही तडफड पाहत सहकार्यांकडे मोठ्या खुशीने बघत कुत्सितपणे हसत गब्बर उद्गारतो, ‘हीही हा हाहा हा कैसा फडफडा रहा है साला!’
गब्बरचे विकृत हसणे अन् चेहर्यावरील निर्लज्ज अविर्भाव बघून ठाकूर रागाने लालबुंद होऊन जातो. धारदार आवाजात गब्बरला ‘कुत्ते, कमीने!’ म्हणणारा दात ओठ खात डोळ्यातून अंगार ओकणारा ठाकूर बलदेवसिंह आता पुरता त्वेषाने उफाळून निघालाय, त्याच्या तोंडून या शिव्या ऐकून अन् त्याचा असह्य चडफडाट बघून गब्बरला आणखी चेव येतोय. वर मान करून गब्बर आता जोरात हसू लागलाय. गब्बर हसताना त्याच्या गोर्यापान गळ्याला आवळून बांधलेला काळा कडदोरा अन् त्यात अडकवलेली चपटी झालेली छोटीशी मळकट पितळी पेटी गळ्याला आणखी घट्ट आवळताहेत, पण गब्बर आपल्याच विकृत आनंदात आहे… ‘दे जितनी गाली देनी है ठाकूर, जी भर के गाली दे!’
संतापाने बेभान झालेला ठाकूर गब्बरहून अधिक आवेशात ओरडतो, ‘हरामजादे!’
त्याच्या या शिव्यांनी आता गब्बरमधला सैतान जागा होतो अन् तो जरबयुक्त आवाजात त्याला सुनावतो, ‘चिल्लाओ और चिल्लाओ! याद है? उस दिन मै चिल्ला रहा था तुम तमासा देख रहे थे. आज तुम चिल्लाओ मै तमासा देखुंगा!’ डाव्या हाताने छातीवर हात बडवत ठाकूरला आणखी चिथावण्याचा प्रयत्न आता गब्बर करू लागलाय.
एवढे बोलून गब्बर झर्रकन मागे वळतो आणि इकडे तिकडे बघत सांभाला सांगतो, ‘है सांभा, उस रोज कचहरीमें ऐसा ताप मुझको! ऐसा ताप मुझको!’ आपल्याला ठाकूरने कैद केले होते तेव्हा फार मोठे अत्याचार केल्याच्या अविर्भावात गब्बर त्याच्या साथीदारांना त्या दिवशीच्या घटनेची माहिती देऊ लागलाय अन् इकडे ठाकूरची धडपड चालूच आहे.
‘अवसर मिलता तो वही हरामजादेका टेटवा दबा देता, मगर करता क्या? चार चार पुलिसवाले पकडे हुये थे, हाथ में हथकडी, पैरों में बेडी!… याद हैं?’ ठाकूरकडे बघत मोठ्या जोशात गब्बर आता त्यालाच प्रतिप्रश्न करू लागलाय, जणू काही अन्याय ठाकूरवर झाला नसून गब्बरवरच झाला आहे. बुटांचा आवाज करत गब्बर ठाकूरच्या जवळ जाऊन उभा राहतो अन् तलवारीचे पाते ठाकूरच्या छातीवर हलकेच उलटे फिरवत त्याला विचारतो, ‘कोई आखरी ख्वाईस है, तुम्हारी ठाकूर?’ गब्बरची ही हरामखोरी पाहून क्रुद्ध झालेला ठाकूर त्याच्या तोंडावर जोरात थुंकतो अन् सगळा आवेश एकवटून बांधलेल्या हातानेच समोर उभ्या असलेल्या गब्बरला एक ठोसा लगावतो. सर्व ताकदीनिशी लगावलेल्या त्या ठोशाने गब्बर भेलकांडतो, तो थेट मागे असलेल्या दगडावर जाऊन पडतो. दगडावर पडल्या पडल्या ठाकूरकडे बघत तो आपला निर्णय बदलतो.
‘अभी तक बहूत जान बाकी है तेरे हाथो में,’ गब्बरच्या डोक्यात काय चालले आहे याचा अंदाज न आलेला ठाकूर अजूनही प्राणांतिक धडपड करतो आहे, त्याला धरून उभे असलेल्या सहकार्यांकडे बघत बघत गब्बर हुकुम सोडतो, ‘बांध दो साले को!’
ठाकूरला फरफटत ओढत दोन दगडी खांबांच्या मध्ये आणून उभे केले जातंय अन् समोर उभा असलेला गब्बर डाव्या हाताच्या मनगटावर आवळून बांधलेला गोळ्यांचा पट्टा हाताला झटका देऊन भिरकावून देतो अन् तलवार घेऊन शेजारी उभ्या असलेल्या सहकार्याला इशारा करतो. तो आपल्या हातातली तलवार गब्बरच्या हातात ठेवतो. आता गब्बरच्या दोन्ही हातांत धारदार नंग्या तलवारी आहेत, ठाकूरच्या हातातल्या बेड्या काढून दोन्ही हात वरच्या दिशेने ताणून दगडी खांबात ठोकलेल्या, खळखळा आवाज करणार्या साखळदंडाला बेड्यांनी बांधलेले आहेत.
‘अब मै तुझे जानसे नही मारुंगा, वो हाल करके छोडूंगा की, दुनिया थुकेगी तुझपर!’ असं म्हणत दोन्ही हातात तलवारी घेतलेला गब्बर ठाकूरच्या पाठीमागे येऊन उभा राहतो. गब्बरचे सगळे साथीदार गंभीर मुद्रेने त्याच्याकडे लक्ष देऊन आहेत, तिथेच उघड्यावर पेटवलेल्या चुलींमधला धूर हवेत पसरत जाऊ लागलाय आणि पार्श्वभूमीवर कानात गरम शिसे ओतावे तसे भोंगा वाजणारे पार्श्वसंगीत घुमते आहे, रोंरावणार्या वार्याचा आवाज देखील आता खूप मोठा वाटू लागला आहे.
‘बहुत जान है तेरे हाथोमें, ये हाथ लगाम पकडकर घोडेपे बिठा देते है, बहुत जान है तेरे हाथो में!’ हातातील तलवारी ठाकूरच्या खांद्यावरून अलगद फिरवत गब्बर छद्मी आवाजात, नाटकी ढंगात त्याला विचारतो, ‘याद है ठाकूर, क्या कहे थे तुम? ये हाथ नही, फांसी का फंदा हैं! देख, फंदा खुल गया! खुल गया फंदा!! बहुत जान हैं हांथोमे!’ गब्बरने आता तलवारींचे पाते ठाकूरच्या खांद्यावर टेकवलेले आहे.
‘ये हाथ हमको दे ठाकूर, ये हाथ हमको दे ठाकूर!’ असं पुटपुटणार्या गब्बरच्या डोक्यात काय चालले आहे याचा पत्ता लागलेला ठाकूर अजूनही घाबरलेला नाही, मात्र तो ‘नहीं नहीं’ असं मान हलवून खुणावतोय. गब्बरचा आवाज आता टिपेला पोहोचलाय, त्याने त्वेषाने हात आकाशाकडे उंचावले आहेत अन् तो वेगाने हात खाली घेऊन येतोय, काही घटिकाभरात आपले हात विलग होणार याचा अंदाज आलेला ठाकूर जोराने आरोळी मारतो आणि त्याच्या आरोळीत आवाज मिसळत गब्बर हातातल्या तलवारी खाली खेचतो!
तो दिवस जणू आजही ठाकूरच्या थिजलेल्या डोळ्यात जसाच्या तसा तरळत असल्यागत ठाकूरच्या अंगावरची शाल वार्याच्या हबक्याने उडून पडते अन् हताश चेहर्याच्या ठाकूर बलदेवसिंहच्या तोंडून एक सुस्कारा बाहेर पडतो. त्याचे दोन्ही हात खांद्यापासून कलम केलेले आहेत हे बघून समोर उभे असलेले जय आणि विरू अगदी हैराण होऊन गेले आहेत, हे दृश्य पाहणार्या बसंतीच्या चेहर्यावर वेदनेची एक रेष तरळून जाते. ठाकूरची छोटी बहू मात्र या सगळ्या प्रकाराने सद्गदित झालीय, तर बाजूलाच उभा असलेला रामलाल दिङ्मूढ झालाय! एका पडक्या कौलारू घराच्या पडवीत पांढर्या शुभ्र वस्त्रातला ठाकूर असहाय्य अवस्थेत उभा आहे. छोटी बहू जय आणि वीरूकडे रागाने एक कटाक्ष टाकते, त्यासरशी ते दोघे माना खाली करतात. मोकळ्या कपाळाची पांढर्या साडीतली छोटी बहू ठाकूरच्या मागे पडलेली त्याची राखाडी रंगाची शाल उचलून त्याच्या खांद्यावर घालते. ठाकूर घराच्या पडवीतून बाहेर पडतो, समोर खाली मान घालून उभ्या असलेल्या जय-वीरूकडे अन् आजूबाजूला उभ्या असणार्या गावकर्यांकडे एक खिन्न नजर टाकतो. दुपारची उन्हे कलली आहेत, अन् मस्जिदीकडच्या रस्त्याने ठाकूर खाली मान घालून एकटाच पाठमोरा जाताना दिसतो अन् सिनेमागृहात बसलेले प्रेक्षक देखील हताश होऊन ठाकूरच्या वेदनासंघर्षात सामील होऊन सुस्कारे सोडतात…
हा सीन काळजाचा ठाव घेऊन जातो कारण सूड, कर्तव्य आणि नैतिकता याच्या चक्रात आपल्यापैकी प्रत्येकजण कधी न कधी अडकलेला असतो. मात्र आपला संघर्ष या कॅनव्हासवरल्या दुष्मनीइतका गाढा नि रसिला नसतो. आपल्याला या सूडनाट्यातही एक आनंद मिळतो, तो मनातल्या सूडभावनेच्या पूर्ततेचाही असतो आणि हतबलतेचाही असतो. हा सीन ठाकूरविषयी आपल्याला सेंटीमेंटल करतो हे याचे यश होय.
असेच एक महत्वाचे पात्र आहे ते छोटी बहूचे आहे. ती पूर्वी फार बोलायची, अल्लड युवती असताना चेतनेचा उत्फुल्ल झरा होती ती! कालांतराने ती ठाकूरची धाकटी सून होते. तिचा नवरा घरातला थोडासा लाडका अन् खुशालचेंडू असावा. एके दिवशी त्यांच्या हवेलीवर गब्बरसिंगची दुःछाया पडते. त्यात तिच्या मोठ्या दिराची सहकुटुंब हत्या होते, तिच्या नणंदेची, पतीची अन् चिमुरड्या पुतण्याचीही हत्या होते. यानंतर गब्बरबरोबरच्या चढाईत सासरा दोन्ही हात गमावून बसतो. ठाकूर खचून जात नाही पण मनोमन तो सुडाच्या आगीत जळू लागतो. पुढे सुडाग्नीला मूर्त स्वरूप देण्यासाठी तो जय-विरू या चलाख ,धाडसी गुंडांना रामगढमध्ये पैसे देऊन आणतो. गब्बरला जिवंत पकडण्यासाठी आलेले हे दोघे पूर्णतः भिन्न स्वभावाचे पण एकदिलाचे मित्र असतात. यथावकाश ते मोहीम फत्ते करतात. शेवटी गब्बरला ठाकूर स्वतः चिरडून टाकतो, पण त्यात जयचाही बळी जातो. या संपूर्ण काळात छोटी बहू मौन राहते, अकाली खुडलेल्या कळीसारखे आयुष्य जगत राहते.
अंधार्या रात्री ती सज्जात उभी राहून हवेलीचे दिवे मालवते, तो सीन सदैव जिवंत वाटतो! जणू अजूनही रामगढमध्ये हे दृश्य तसेच घडत असावे असे वाटत राहते. आजही छोटी बहू हवेलीच्या सज्जामधले दिवे एकेक करून मालवत असेल अन् हवेलीसमोरील छोट्याशा बैठ्या घराच्या अंगणात कट्ट्यावर बसून जय चोरट्या नजरेने तिच्याकडे बघत माऊथ ऑर्गन वाजवीत असेल. दोघेही निशब्द असतील अन् तिथल्या वातावरणातला कण न कण आजही त्यांच्या अव्यक्त प्रेमातल्या अणुरेणूंनी भारला जात असेल असे वाटत राहते. ‘शोले’मधले हे दृश्य मनाला असा चटका लावून जाते की आपल्या जीवनातील वेदनादेखील त्यात विरघळल्या जाव्यात!
त्यामुळेच अधिकाधिक लोकांनी हा सिनेमा अनेकदा पाहिलाय. तरीही ‘शोले’ जेव्हा कधी पाहतो तेव्हा तेव्हा काही तरी नवीन गवसते. ‘शोले’च्या क्लायमॅक्सला गब्बरच्या गोळीबारात एकट्याने खिंड लढवत असलेला जय घायाळ होऊन पडतो तो सीन खूप काही शिकवतो. जखमांनी विद्ध झालेला जय रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत मोठ्या शिळेला टेकून बसलेला आहे. त्याचे श्वास वेगाने होताहेत, त्याला बोलण्यात प्राणांतिक कष्ट होताहेत, तो कासावीस होऊन गेलेला आहे जणू त्याचे प्राण कंठाशी आलेले आहेत. वीरू शेजारी बसून धीर देतोय, ‘तू मुझे छोड के नही जा सकता…’ असं सांगताना त्याचं उसनं अवसान स्पष्ट जाणवतं. आता काहीच क्षण उरलेले आहेत, हे त्याने ताडलेले आहे. पण जिवलग दोस्त आपल्याला सोडून जाणार ही कल्पना त्याला सहन होत नाहीये.
जयच्या गंभीर जखमी होण्याची खबर ठाकूरच्या हवेलीपर्यंत गेलेली असते. तो सारा लवाजमा घेऊन गब्बरच्या अड्ड्याकडे जाणार्या लाकडी पुलाच्या रस्त्याजवळ येतो. वीरूने मित्राचा लहूलुहान देह कुशीत घेतलेला आहे, त्याच्यासमोरच ठाकूर दाखल होतो. ठाकूरसोबत आलेली पांढर्याशुभ्र वेशातली छोटी बहू राधा न राहवून सर्वांच्या पुढे धावत येते, नकळत अगदी आपल्या सासर्याच्याही पुढे. जखमी जयच्या पुढ्यात येऊन ती थबकते आणि त्याच्या क्षतिग्रस्त देहाला पाहून तिचा शोक अनावर होतो. ती एकाग्रचित्ताने त्याला शक्य तितकं स्वतःच्या डोळ्यात साठवत राहते. या मोमेंटला जयने वाजवलेल्या माऊथ ऑर्गनचा अप्रतिम म्युझिक पीस बॅकग्राउंडला वाजतो. काळजाचे पाणी पाणी होते. तिचा धपापणारा ऊर स्पष्ट जाणवतो. तिला पाहून श्वास जड झालेला जय मोठ्या कष्टाने म्हणतो, ‘देख वीरू … देख.. ये कहानी भी अधुरी रह गयी… क्या सोचा था और क्या हो गया…’ त्याच्याही डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागतात, त्याचे अश्रू रक्तात मिसळतात. तो शेवटचे आचके देऊ लागतो आणि वीरूची त्याला थांबवण्याची तडफड सुरू होते, राधाच्या मनाची प्रचंड घालमेल होते, जयची अखेरची अगतिक तगमग ती थिजल्यागत पाहत उभी राहते. तिच्यापासून काही अंतरावर तिचा सासरा ठाकूर नियतीसमोर हतबुद्ध होऊन उभा असतो.
जयची तडफड वाढत जाते आणि काही क्षणात त्याचा देह शांत होतो. वीरू मोठ्याने हंबरडा फोडून शोकाचे बांध मोकळे करतो. पण राधा? तिचे काय? तिच्या म्लान चेहर्यावरती शोकाची झळाळी चढते. डोळ्यातून हळुवारपणे अश्रू वाहू लागतात. एक क्षण सगळेच जण गोठून जातात. पडदा देखील निशब्द होतो, फक्त वीरूच्या हमसून रडण्याचा बारीक आवाज येत राहतो. निमिषार्धात ठाकूर पुढे सरसावतो. लाडक्या छोट्या बहूकडे जातो. सासरा जवळ येताच तिचा दुःखाचा बांध फुटतो, पण तोही विलक्षण संयत पद्धतीने! ती त्याच्या छातीवर डोकं टेकवून रडू लागते. तिला कवेत घेऊन तिचं दुःख हलकं करणंदेखील ठाकूरला शक्य नाही, कारण त्याचे हात गब्बरने पूर्वीच छाटलेले आहेत. ती त्याच्या डोळ्यात पाहत मुसमुसून रडू लागते आणि ठाकूरला तर तेही शक्य नसते. अश्रूंचे कढ पीत तो तिला रितं होऊ देतो. बॅकग्राउंडला अगदी हळुवारपणे ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे…’चे सूर व्हायोलीनवर वाजू लागतात.
ठाकूरच्या लक्षात येतं की आपल्या पोरवयाच्या विधवा सुनेच्या मनाच्या बंदिस्त कप्प्यात कुठे तरी जयसाठी प्रेमाचा ओलावा तयार झाला होता. या मोमेंटला ठाकूरचे डबडबून गेलेले डोळे, त्याची अगतिकता आणि एकही शब्द न बोलता छोटी बहूचं जयसाठी मूक आक्रंदन या सर्व गोष्टी उरात खोल रुतून बसतात. छोटी बहूचं रडणं अनुभवत ठाकूर त्याच्या मस्तकातला सुडाचा लाव्हा आणखी दाहक करत राहतो… त्या क्षणाला राधाच्या मनातली भावना, तिचं नकळत जयवर बसलेलं प्रेम, तिचं त्याच्यासाठी शोकविव्हळ होणं या सर्व जाणीवांना ठाकूर समजून घेतो. तिच्या मनात साठलेलं मळभ रितं होऊ देतो. मात्र तिचा गहिवर काही केल्या शांत होत नाही. गब्बरला पोलिसांच्या हवाली केल्यानंतर जयच्या चितेला यथासांग अग्नी दिला जातो. त्या चितेच्या ज्वालांत ठाकूरला राधाबहूची स्वप्ने पुन्हा एकदा खाक झाल्याचं जाणवतं अन् तो मूक बनून राहतो. दूर हवेलीच्या खिडकीत उभी राहून चितेची धग डोळ्यात साठवणारी छोटी बहू विमनस्क चेहर्याने चितेकडे पाहत असते. आस्ते कदम ती मागे सरकते आणि खालच्या मानेने खिडकी लावून घेते. पडद्यावर ठाकूरच्या दारं खिडक्या बंद असलेल्या शोकमग्न हवेलीचं दृश्य दिसतं. हा सीन जीवाला चटका लावून जातो. कारण राधाला जगापुढे व्यक्तही होता येत नाही. सुखदुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्यात व्यक्त होण्याची संधी मिळताच अंतःकरणातले बोल उघड करण्यातही एक आगळे समाधान असते. राधासारख्या कोवळ्या तरुणीला एकच दुःख पुन्हा पुन्हा भोगावे लागते आणि मनातले कढ पिऊन टाकावे लागतात.
खिडकी बंद करून स्वतःला हवेलीत बंदिस्त करून घेण्याच्या राधाच्या कृत्यातून दिग्दर्शक सुचवतो की बाह्य जगाशी तिने आता संपर्क तोडलाय, वृद्ध सासर्यासोबत ती एकटीच त्या हवेलीत जगणार. संपूर्ण सिनेमात हवेलीची ही खिडकी एकदाही नीटपणे दाखवलेली नाही. पण या सीनमध्ये कॅमेरा खिडकीपासून झूम आऊट होत जातो आणि सिनेमास्कोप पडद्यावर ती हवेली भकास वाटू लागते आणि खिन्न मनाने राधाने मिटलेली ती खिडकी लहान होत जाते! आपणही राधाच्या दुःखात सामील होतो. तिच्या अव्यक्त भावनांना आपण अश्रूतून वाट करून देतो.
आपण आनंदाचे, हसण्याचे क्षण ज्यांच्या सोबत व्यक्त केलेले असतात त्यांना आपण सहजगत्या विसरून जातो पण ज्यांच्यासोबत आपण आपलं दुःख शेअर केलेलं असतं, जिथं आपलं काळीज हलकं केलेलं असतं ती माणसं आपण कधीच विसरू शकत नाही. दुःखात असणारी ही असामान्य ताकद आपल्या जगण्याचा संघर्ष बुलंद करत जाते. ‘शोले’ ही एक रसरसलेली सूडकथा आहे पण तिला छोटी बहूच्या कारुण्याची जी शोकमग्न झालर लागलेली आहे, तिच्यामुळे ‘शोले’च्या ज्वाला अधिक धगधगत्या होतात. छोटी बहूचं हवेलीमधलं स्मशानशांततेत वावरणं, तिचं अचेतन जगणं, तिच्या शुष्क हालचाली आणि डोळे गोठवणारी नजर यामुळे अंतःकरणात कालवते. दिग्दर्शकाने हे दुःख इतकं उत्तुंग चितारलं नसतं तर कदाचित ठाकूरचा सूड फिका झाला असता.
आयुष्यातून कारुण्य आणि दुःख वजा केलं तर सुखाला किंमत शून्य उरते. शोले देमार अॅक्शनपट असल्याचीच इतकी प्रसिद्धी झाली की यातले अन्य भावविशेष कधीच समोर आले नाहीत. तरीही अत्यंत आत्मीयतेने सांगावे लागते की यातलं कारुण्य सुडाग्निहून मोठे आहे. अशा ऑलटाइम हिट ब्लॉकबस्टरसाठी तरी बॉलिवुडवर प्रेम केले पाहिजे!