उक्ती आणि कृतीत फरक राहू नये या तत्त्वनिष्ठेच्या आग्रहापोटी प्रबोधनकारांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन पुन्हा गरिबीच्या दरीत उडी घेतली. मात्र त्यांनी केलेल्या या त्यागाची दखल महाराष्ट्राने घेतली नाही.
– – –
`मानसिक दास्याविरुद्ध बण्ड’ ही अग्रलेखमालिका लिहित असताना प्रबोधनकारांच्या आयुष्यातही एक बंड घडलं. प्रबोधनकारांनी सरकारी नोकरी सोडली. `शनिमाहात्म्य’ या पुस्तकात त्यांनी या लेखमालिकेचा आणि सरकारी नोकरी सोडण्याचा एकमेकांशी असलेला संबंध अधोरेखित केलाय. तो असा, `सरकारी नोकरीच्या घवघवीत सौभाग्याचा मळवट लागलेला असतानाच तारीख १६ ऑक्टोबर १९२१पासून प्रबोधन पाक्षिकाची सुरुवात केली. १६ डिसेंबर १९२१पासून ‘मानसिक दास्याविरुद्ध बण्ड’ ही लेखमाला सुरू झाली आणि तिचा ५वा अग्रलेखांक ता. १ मार्च १९२२ला प्रसिद्ध होण्यापूर्वीच १० फेब्रुवारी १९२२ रोजी दुपारी बरोबर १२ वाजता, राहू, शनि आणि मंगळ या त्रिकुटाचे मेतकूट जमताच, अपमानाच्या क्षुल्लक सबबीवर मी ताडकन सरकारी नोकरीच्या दास्याची जाडजूड रौप्यशृंखला तोडून, तज्जन्य मानसिक दास्याविरुद्ध प्रत्यक्ष बंड केले.’
प्रबोधनकार सरकारी नोकरीत स्थिरावले होते. जवळपास दहा वर्षं झाली होती. सरकारी नोकराला वर्तमानपत्र काढता येत नसे. पण प्रबोधनकारांनी इलेक्ट्रिकल इंजिनियरच्या ऑफिसात रेकॉर्ड सेक्शनची कठीण जबाबदारी पेलली होती. त्यामुळे त्यांना विशेष परवानगी देऊन सरकारी नोकरीत असतानाही प्रबोधन सुरू करण्याची परवानगी दिली होती. ही परवानगी मिळाल्यामुळे प्रबोधन सुरू ठेवण्यात कोणतीही अडचण नव्हतीच. नोकरीही त्यांच्या दृष्टीने आरामाची होती. ते त्यांच्या कामात पटाईत असल्याने त्यांना ऑफिसमध्येच वाचनासाठी भरपूर वेळही मिळायचा. या नोकरीने त्यांच्या दारिद्र्यातल्या संसाराला स्थैर्य मिळवून दिलं होतं. दादरमध्ये त्यांचं भक्कम बस्तान बसलं होतं. स्वाध्यायाश्रमाच्या चळवळींनी जोर पकडला होता. प्रबोधनची लोकप्रियता वाढत चालली होती. हुंडा विध्वंसक संघाला एक हजार रुपयांची देणगी देण्याइतपत प्रबोधनची आर्थिक परिस्थिती उत्तम होती. प्रबोधनकार स्वतःचा छापखाना उभारण्याचा विचार करत होते. पाक्षिकाचं साप्ताहिक करायचं आणि पानंही वाढवायची, अशा विस्तारासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. सरकारी नोकरीमुळे मिळालेलं आर्थिक आणि पर्यायाने मानसिक स्थैर्य नसतं, तर हे घडलं असतं का याविषयी शंका आहे.
प्रबोधनकारांचा तेव्हाचा मासिक पगार २०० ते २५० रुपये असावा असा अंदाज आहे. त्यांनी कुठे त्यांचा पगार २५० म्हटलंय तर कुठे २००. नोकरी सोडल्यानंतर काही महिन्यातच लिहिलेल्या `सातारच्या पापग्रहाचे प्रबोधनावर गंडांतर’ या विशेष लेखात त्यांनी हा आकडा २०० असल्याचं लिहिलंय, `खरे पाहिले तर आम्ही कोणी मोठे पुढारी नाही. काही रुटूखुटू अभ्यास झालेला, त्यावरून जितके काहीं आपणांस ठावें तितके लोकगंगेला अर्पण करून आनंद मानावा, हे आमचे व्यसन. या व्यसनाच्या पायी उदरनिर्वाहाला साधन असलेली सोन्यासारखी दोनशेंची सरकारी चांदीची नोकरीसुद्धा सोडली.’ दरमहा दोनशे रुपये ही त्या काळात खरंच सोन्याचांदीची नोकरी होती. दादरमधल्या मिरांडाच्या चाळीतल्या छोट्याशा खोलीत राहणार्या आणि केवळ दीड रुपया कमी पडला म्हणून मॅट्रिकची परीक्षा देऊ न शकलेल्या प्रबोधनकारांसाठी ही रक्कम फारच मोठी होती. तरीही प्रबोधनकारांनी सरकारी नोकरी सोडली.
सरकारी नोकरी सोडण्यामागची एक महत्त्वाची प्रेरणा त्यांची आई जानकीबाई उर्फ ताई या होत्या. ताईंचा मूळ स्वभावच स्वाभिमानी आणि स्वातंत्र्यप्रिय असाच होता. त्यांनी प्रबोधनकारांना ठणकावून सांगितलं होतं की वेळ आली तर भीक माग, पण इंग्रज सरकारची नोकरी करू नकोस. पण पहिल्या महायुद्धाच्या काळात आलेल्या महामंदीमुळे प्रबोधनकारांना सरकारी नोकरी करावी लागली होती. अर्थातच त्यांच्या मनाला ते पटत नव्हतंच. ते लिहितात, `१० वर्षं सरकारी नोकरीत काढल्यावर विचित्र बर्यावाईट अनुभवांचे गाठोडे साचत गेले. एकीकडे नोकरी नि दुसरीकडे बहुजन समाज जागृतीचे कार्य, अशा परस्परविरुद्ध दोन टोकांवरच्या डगरीवरचा कसरती खेळ माझ्या स्वभावाला पटेनासा झाला. सद्सद्विवेकबुद्धी सारखी टोचण्या देऊ लागली. सभांतून सरकारी धोरणांवर टीका करायची आणि प्रबोधनात मानसिक दास्याविरुदध बंड या विषयावर स्पष्टोक्तीची लेखमाला लिहायची हे मला सहन होईना.’
आपल्या उक्तीत आणि कृतीत तफावत असावी, हे प्रबोधनकारांना सहन होत नव्हतं. उलट स्वतःचा वैचारिक प्रामाणिकपणा ही `प्रबोधन’ची सगळ्यात मोठी ताकद आहे, हे त्यांना माहीत होतं. पहिल्या वर्षाच्या शेवटच्या अंकात वर्षाचा आढावा घेताना त्यांनी हे परखड शब्दांत मांडलंय, `निःस्वार्थ बुद्धीने कार्य करीत असले म्हणजे कार्याचा वाली हरी कसा असतो, याची प्रचीती गेल्या वर्षात आम्ही प्रत्यक्ष घेतली आहे. ज्या दिवशी आमची ही वृत्ती नष्ट होईल, लोकमान्यतेच्या मोहाला बळी पडून सत्याचे उद्घाटन करताना प्रबोधनकाराची लेखणी ज्या वेळी मुरडूं लागेल, आणि त्याच्या वर्तनात खासगी आणि जाहीर असे दुटप्पी वर्तनाचे चोरकप्पे निर्माण होतील, किंवा वाणीप्रमाणे करणी करण्याची त्याची निश्चयी प्रवृत्ती व्याभिचारिणी बनेल, त्याच दिवशी प्रबोधनकार ठार मेला, अशे आमच्या वाचकांनी समजावे.’
सद्सद्विवेकाला साक्ष ठेवून जगणार्या माणसाला समाजात अव्यवहारी मानले जातील असे निर्णय घेणं भाग असतं. तसं प्रबोधनकारांनी केलं. त्यात त्यांच्या आईचा आग्रह प्रेरणादायक होता. त्या म्हणत, `इमाने इतबारे सेवा करायची तर एक सरकारची तरी कर, नाही तर तिला लाथ मारून बहुजन समाजाच्या सेवेला वाहून घे.’ सरकारी नोकरी सोड असं सांगणारी आई आता कुठे सापडणार आहे? तेव्हाही अशी आई दुसरी नव्हतीच.
प्रबोधनकारांनी नोकरी सोडली तेव्हा खरं तर महात्मा गांधींनी पुकारलेलं असहकार आंदोलन जोरात होतं. गांधीजींच्या आदेशानुसार लोक सरकारी नोकर्या सोडत होते. पण प्रबोधनकारांनी या आंदोलनाला विरोध केला होता. कारण यात विद्यार्थ्यांना सरकारी शाळा कॉलेज सोडण्याचं आवाहन केलं होतं. ते प्रबोधनकारांना पटलं नव्हतं. `प्रबोधन’मधल्या अनेक लेखांत या आंदोलनावर त्यांनी परखड टीका केली आहे. तरीही त्यांच्या नोकरी सोडण्याच्या निर्णयावर या वातावरणाचा प्रभाव पडला असल्याची दाट शक्यता आहे. शिवाय काही महिन्यांपूर्वीच त्यांना नोकरीतून सोडण्यास तयार नसलेल्या इंग्रज अधिकार्यांनीही या वातावरणामुळेच नोकरीचा राजीनामा स्वीकारला असावा.
सरकारी नोकरी सोडण्यासाठीची वैचारिक पार्श्वभूमी आधीच तयार झालेली असली त्यांनी राजीनामा दिला तो एका इंग्रज अधिकार्याशी झालेल्या वादामुळे, असा पुसटसा उल्लेख `शनिमाहात्म्य’मध्ये वाचता येतो. हा अधिकारी भारतीय कर्मचार्यांवर अन्याय करत असे. ते प्रबोधनकारांना सहन झालं नाही. त्यांचे सहकारी मात्र नोकरी टिकवण्यासाठी हा अन्याय सहन करत. प्रबोधनकारांनी ठाकरी शैलीत या अधिकार्याला तिखट उत्तर दिलं आणि राजीनामा दिला. प्रबोधनकारांनी नोकरी सोडताना विचार केला, `उदरभरणाचे काय, प्रबोधन आणि ग्रंथमाला ते पोटापुरते देतच आहे. मग हवी कशाला ही सदसद्विवेकाशी प्रतारणा आणि दरमहा अडीचशे रुपयांचा मोह.’ आपल्या तत्वनिष्ठेसाठी एक संपादक सरकारी नोकरीचा राजीनामा देतो आणि स्वतःला पुन्हा एकदा गरिबीत लोटून देतो, हा आदर्श प्रबोधनकारांनी उभा केला होता. आज असे संपादक असण्याची शक्यता दुरापास्तच. पण निदान प्रबोधनकार आणि त्यांच्या कुटुंबाने केलेल्या त्यागाची दखल तरी मराठी पत्रकारितेच्या इतिहासात घ्यायला हवी होती. तशी कुणी घेतल्याचं आढळत तरी नाही.
पण त्या काळातल्या प्रबोधनच्या वाचकांनी मात्र संपादकाच्या या त्यागाकडे दुर्लक्ष केलं नाही. वाचक प्रबोधनकारांच्या पाठीशी ठाम उभे राहिले. प्रबोधनकार याचं वर्णन `देता किती घेशील दो कराने?’ असं करतात. त्यांनी नोकरी सोडल्याची बातमी येताच अनपेक्षित व्यक्तींकडून त्यांच्याकडे देणग्यांचा ओघ वाहू लागला. पहिली तारेची मनिऑर्डर बडोद्याचे दिवाणबहादूर समर्थ यांनी केली. ६० रुपये पाठवताना त्यांनी लिहिलं, ‘डोण्ट लॉस हार्ट. वर्क ऑन हार्ट विदीन अबोव्ह.’ देवास छोटी पाती संस्थानचे प्रमुख मल्हारराव बाबासाहेब पवार, दादरचे व्यापारी मोतीरामशेट वैद्य, भगवंत सामंत, नागपूरचे कवी नारायणराव बेहेरे, परळचे व्यापारी गोविंदराव शिंदे, सदोबा काजरोळकर अशा अनेक मित्र आर्थिक मदतीसह त्यांच्यासोबत उभे राहिले. प्रबोधनकार लिहितात, `प्रबोधन मासिक, ग्रंथमाला आणि गावोगावची व्याख्याने या माझ्या कार्याला महाराष्ट्रात काही पाठिंबा आहे काय? या तोवरच्या माझ्या शंकेला आता भरपूर निरास झाला. ग्रंथांची विक्रीही सपाटून होऊ लागली.’ आपल्या पाठीशी लोक उभे आहेत, हा विश्वास प्रबोधनकारांना यामुळे आला.
नोकरी सुटल्यानंतर काय झालं, हे प्रबोधनकार `शनिमाहात्म्य’ या पुस्तकात सांगतात, ते असं, `सरकारसेवेचा राजीनामा देऊन जनसेवेचे प्रतिज्ञाकंकण मी हाती चढवून, दादर येथे स्वाध्यायाश्रम संस्था उघडली आणि प्रबोधन व हुंडा विध्वंसन या दोन कार्यात मी मग्न झालो. संसाराची काळजी श्रीहरीच्या चरणी वाहिली. आणि आश्चर्याची गोष्ट हीच की श्रीहरीने प्रबोधनाचे आणि माझे कोठे काहीही कमी पडू दिले नाही.
पडता जडभारी । दासी आठवावा हरी ।।
मग तो लागूं नेदे शिण । आड घाली सुदर्शन ।।
ही तुकोबांची स्वानुभवाची ग्वाही मी स्वाध्यायश्रमाच्या काळात पूर्ण अनुभवली.’
दर महिन्याला येणारं उत्पन्नच कमी झाल्यामुळे मुख्य अडचण संसाराची होणार होती. पण पत्नी आणि मुलींच्या सहकार्याने तिथेही समाधान होतं, `मागणे लई नाही, पोटापुरते देई, संसाराच्या विवंचनेचे वर्तुळ एवढ्याच बिंदूवर आणल्यामुळे आणि ते आणण्यात व तज्जन्य सर्व अडचणी मोठ्या उत्साहाने, धैर्याने आणि विशेषतः संतोषाने सहन करण्यात माझ्या संसारदेवतेने व लहान मुलींनी मला प्रेमाने सहाय्य केल्यामुळे एक वर्षांचा काळ सुखासंतोषात पार पडला.’
मोकळा वेळ मिळू लागल्यामुळे प्रबोधनकार लिखाण वाचनात अधिक मग्न झाले. ते लिहितात, `नोकरी सोडल्यापासून आमच्या दिनचर्येत बराच बदल झाला आहे. आता रेल्वेची धावपळ अज्जीबात सुटल्यामुळे १५-१५ दिवसांत मुंबईचे दर्शनही घडत नाही. गेल्या फेब्रुवारीपासून लेखनव्यवसाय मनस्वी वाढला आहे व `शंभर वर्षांपूर्वीचा महाराष्ट्र’ निर्व्यंग स्थितीत कसे बाहेर पडेल, याची धडपड सारखी सुरू आहे. अर्थात दिवसाचे २४ तास आम्ही आमच्या स्वाध्यायाश्रमात खर्डेघाशी करीत बसलेलो असतो. कोणी येऊन भेटला तर त्याची भेट घ्यायची. यापलीकडे सध्यांच्या दिनचर्येचा कसलाही कार्यक्रम नाही.’