दोन हजाराच्या नोटबंदीबाबत माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या हा प्रामुख्याने भाजपा नेते शेलारमामा यांच्या प्रतिक्रिया घेऊन येणार याचा अंदाज मला होताच आणि तो खराही ठरला. मी ती प्रतिक्रिया ऐकली. आता तुम्हीही ऐका.
– नमस्कार शेलारमामा, एका थोर नेत्याने तुम्हाला गल्लीबोळातला नेता म्हणून हिणवल्यापासून तुम्ही खूपच नाराज दिसता. पण त्या दिवशी तुमच्या नड्डांनी तुम्हाला मुंबईत सर्व कार्यक्रमात आपल्या शेजारी बसवून तुम्ही कोण आहात हे दाखवून दिलं, तेव्हापासून तुमचा पडलेला चेहरा उजळल्यासारखा वाटतो. त्यानंतर दोन हजारी नोटबंदीबद्दल तुम्ही त्या नेत्याच्या प्रतिक्रियेला जी उत्तरक्रिया दिलीत त्यावरून तुमचा आत्मविश्वास परत आल्यासारखा वाटला.
– आभारी आहे. आमच्या आदरणीय वरिष्ठ नेत्यांनी केलेली कोणतीही गोष्ट जनतेला बुचकळ्यात टाकणारी वाटत असली तरी ती योग्यच असते. दोन हजार टक्के योग्य असते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कोणी विपरीत बोलले, तर त्यांचा मुलाहिजा राखला जाणार नाही.
– खरंय ते. शेवटी तुम्ही शेलारमामा आहात.
– तेच म्हणतोय मी. अहो, यांनी जेवढ्या दोन हजारी नोटा पाहिल्या आणि हाताळल्या नसतील, तेवढ्या नोटांच्या हजारो काय लाखो बंडलांचा आम्ही निवडणूककाळात त्यांचा किती सुयोग्य वापर मुंबईत केला, हे तुम्हाला माहीत आहे. मोदी किती ग्रेट आहेत हे फक्त आणि फक्त त्यांच्या भक्तांनाच माहीत आहे.
– जय मोदी, जय जय मोदी.
– असं नुसतं म्हणून चालत नाही, तर त्यांची कोणत्याही कृतीमागील दूरदृष्टी पाहावी लागते. बाकी त्यांचे काय आणि आमचे काय सर्व नेते र्हस्वदृष्टीचे आहेत.
– मग अमितजी शहाजी यांचं काय?
– ते दोघे अभिन्न असल्यामुळे मोदींची दृष्टी तीच त्यांची दृष्टी.
– पण पूर्वी केलेल्या एक हजारी आणि पाचशेच्या नोटबंदीने जनतेचे किती हाल झाले हे तुम्ही पाहिलेत ना तुमच्या डोळ्यांनी…
– आम्ही नेहमी त्यांच्या डोळ्यांनी पाहातो. शत्रूशी लढायचे असले की घाबरून चालत नाही. काळा पैसा हा आपला शत्रू. त्याच्याशी लढताना जखमा होणारच.
– तुम्हा भाजपवाल्यांना कुठे झाल्या जखमा? त्यावेळच्या निवडणुकीत कितीतरी भाजप नेत्यांच्या घरी-दारी दोन हजारी नोटांची बंडलेच्या बंडले लपवून ठेवलेली आढळली. सार्या देशभर प्रचारात त्यांचे व्यवस्थित वाटप होत होते. त्यासाठीच का केला होता तो अट्टहास? भाजपचा दिस गोड व्हावा म्हणून. आता निवडणुका जवळ आल्यावर पुन्हा म्हणतात, दोन हजारीचा काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटबंदी केलीय. आता दुसरीच कसली तरी नोट जारी करतील. पाच हजारांची सुद्धा काढतील. आता मतांचा रेटही वाढला असेल ना!
– तोंडाला येईल ते बोलू नका. हा अर्थशास्त्राचा विषय आहे. ज्या गोष्टी अर्थतज्ज्ञ माननीय निर्मला सीतारामन यांना सुद्धा समजावून द्याव्या लागतात, त्या तुमच्यासारख्यांना काय कळणार?
– खरं आहे.
– आता मुंबई महापालिकेच्या येत्या निवडणुकीत बघाच तुम्ही माझी पॉवर. नड्डांना माझी किंमत माहीत आहे, म्हणूनच ते मला मानतात. ‘मुंबई भाजप की मुठ्ठी में’ करने का मेरा इरादा है और वो मैं करके दिखाऊंगा। सब चकाचक करूंगा। ये करने की सुपारी ली है मैंने। आप देखते रहेंगे। मोदी सिर्फ लोकल रेलगाडी ही एअर कंडीशन्ड नहीं करेंगे, बसेस, मोटार, टॅक्सी, ट्रक, हाऊसेस, कंपनियां, हॉस्पिटल्स, पालिका, सबके सब प्रिमायसेस एअर कंडिशन्ड करेंगे. रास्ते पर ही कुलर की ठंडी ठंडी हवा देंगे। और ये सब दो हजारी नोटबंदी से बाहेर निकलनेवाले काले धन से करेंगे। है कि नहीं डोस्का?
– आप हिंदी में क्यों बोल रहे हैं? मराठी में बोलो ना…
– हिंदी राष्ट्रभाषाही आहे आणि माझी गुरूभाषाही आहे. म्हणूनच याच भाषेत गुरगुरल्यावर मला राष्ट्रीय नेता झाल्याचा फील येतो. मी खात्रीने सांगतो, ‘महापौर भाजपचाच होणार’.
– बाई होणार की बुवा होणार?
– आमच्यात भांडण लावू नका. कदाचित मीसुद्धा होईन. दोन ठिकाणांहून मी नगरसेवक पदासाठी उभा राहणार आहे.
– म्हणजे कुठेतरी पडण्याची भीती वाटतेय.
– तसं नाही हो. मी पाच मतदारसंघांतूनही उभा राहून निवडून येऊ शकतो आणि महापौर तर होणारच.
– त्यात काहीच कठीण नाही. दाढीवाले जर मुख्यमंत्री होऊ शकतात, तर गल्लीबोळातला माणूसही महापौर होऊ शकतो.
– अगदी बरोब्बर. फक्त ही मुंबई कधी एकदा ताब्यात येतेय असं झालंय. ती ताब्यात आली की बघाच तुम्ही माझी वट.
-पण तुम्हाला गल्लीबोळातला नेता म्हणून हिणवणारे थोर नेते तुम्हाला पक्षातील लोक कस्पटासमान लेखतात तेव्हा काय वाटतं?
– मला आत्मपरीक्षण करावंसं वाटतं. ज्या अर्थी मोदीजी आणि शहाजी यांनी माझ्यावर मुंबई महापालिका जिंकण्याची जबाबदारी दिलीय त्या अर्थी मी त्यांच्या दृष्टीने नक्कीच उपयुक्त नेता वा कार्यकर्ता असणार. त्यांना माझ्यात काहीतरी ‘स्पार्क’ दिसला असणारच ना!
– खरं आहे. या स्पार्कच्या लक्षावधी ठिणग्या उडून भाजपचा सारा आसमंत उजळून निघो, अशीच ज्येष्ठ नेत्यांची इच्छा असणार!
– मोदीजी मला म्हणाले आहेत की, दोन हजारी नोट रद्द झाली म्हणून तू अजिबात चिंता करू नकोस. निवडणुकीच्या तयारीसाठी पैशांची हवी तेवढी रसद पुरवू. दर दिवशी अगदी आपल्या कल्पनेपलीकडे असलेली रसद पाठवू. मुंबई ही सोन्याची अंडी देणारी मुर्गी आहे. काहीही करून ही मुर्गी मिळवायचीच ही आमची इच्छाच नव्हे, तर सर्वात मोठी आकांक्षा आहे. एकदा मुंबई हातात आली की तिच्यासकट गुजरातचा देदीप्यमान विकास कसा करतो ते तुम्ही बघाच. आणि त्याची स्मृती म्हणून मुंबई आणि गुजरातच्या एकेका चौकाला आम्ही शेलारमामा चौक असे नाव देणार आहोत, हेही तुम्हाला सांगतो. मोदीजींचे हे उद्गार ऐकून मला तर गहिवरून आलं. तेव्हाच विळीने नख कापून शपथ घेतली की आता शीर तुटो वा पारंबी, आता या लढाईत मागे हटणे नाही.
– शेलारमामा आगे बढो, हम तुम्हारे पीछे हैं।