उन्हाळी सुट्ट्या संपत आल्या आहेत. सर्व आनंद, शोध, मजा, खेळणे, फिरणे याला आता मुरड घालायला हवी. कारण शाळेचे निकाल जाहीर झाले आहेत! नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी, तुमची नवीन स्टेशनरी, नवीन नोटबुक, पाठ्यपुस्तके, कंपास बॉक्स, पेन आणि नवीन बॅकपॅक खरेदी करण्यासाठी चुळबूळ सुरू झाली असेल. सुट्टीतील या शेवटच्या टप्प्यात काही गोष्टी आपण हमखास करतो.
अरे हो, मी शाळेच्या गणवेशाचा उल्लेख करायला विसरलो! ‘माझ्यासारख्या’ मुलांसाठी तो खरेदी करणे आवश्यक आहे. मी शाळेत बास्केटबॉल आणि फुटबॉल खेळायचो. खेळताना माझे कपडे खूपच घाण व्हायचे आणि कधी कधी माझी पॅन्ट मध्येच फाटायची. शाळेच्या पँटचा रंग बिस्कीट कलर होता. माझी पँट नोटबुकच्या खराब पानांसारखी दिसायची! त्यावर शाई आणि रंगाचे अनेक डाग असायचे. खिशात पेन गळतात आणि माझे खोडकर मित्र मला रंग लावायचे. या कारणावरून मला फटकारलेही गेले आहे. घरी फटकेही खाल्ले आहेत…
असो, तुम्ही नवीन पुस्तके घेतलीत का? मी शाळेत असताना फक्त नोटबुक खरेदी करायचो आणि आमच्या वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांकडून पाठ्यपुस्तके घ्यायचो. अभ्यासक्रम आणि विषय सारखेच असल्याने ते आम्हाला पुस्तके देत असत. या युक्तीने बरेच पैसे वाचवलेत मी. कंपास बॉक्स जमवायची मात्र आवड होती.दुकानात अनेक प्रकारचे कंपास बॉक्स मिळायचे. साध्या पाऊचपासून दुहेरी कंपार्टमेंट बॉक्सपर्यंत. अॅनालॉगपासून डिजिटल कंपास बॉक्सपर्यंत! त्यात कॅल्क्युलेटर आणि थर्मामीटर असायचा. पण सर्वोत्तम म्हणजे जॉमेट्री बॉक्स. हार्ड पत्र्यापासून तयार केलेले हे बॉक्स दणकट टिकावू असतात. त्यात आपल्याला सर्व आवश्यक गोष्टी मिळतात. पेन्सील, स्केल, कंपास, प्रोट्रॅक्टर, खोडरबर, शार्पनर, त्रिकोण स्केल. हाच तर खरा कंपास बॉक्स, बाकी सगळे नुसतेच बॉक्स.
आता ही सर्व पुस्तके आणि नोटबुक घेऊन जाण्यासाठी एक छान बॅकपॅक घ्यावे लागेल. आता तर अनेक प्रकारच्या बॅग दुकानात मिळतात. फक्त एक पॉकेट असलेली आणि अनेक पॉकेट्स असलेली बॅग. प्लेन बॅकपॅक आणि त्यावर पॉवर रेंजर्स आणि डोरेमॉनचे प्रिंट असलेले एक. मी तुम्हाला एकापेक्षा जास्त पॉकेट्स असलेल्या बॅग घेण्यास सुचवेन, कारण त्यात सर्व पुस्तके व्यवस्थित भरणे सोपे आहे. माझी लाल रंगाची बॅग होती. त्यात २ वॉच पाकिटे देखील होती. मी त्यात चॉकलेट लपवायचो आणि वर्गात शांतपणे खायचो.
पुस्तके, दप्तर आणि गणवेश घरी आणल्यानंतर मुख्य काम म्हणजे नोटबुकला कव्हर घालणे. नाहीतर शिक्षक आम्हाला खडसावत आणि शिक्षा करत. मला कव्हर लावायचे जमायचे नाही. माझे वडील ते काम करायचे. आईकडून मात्र शिकून घे सगळं, असा दरडावणीयुक्त सल्ला मिळायचा. माझी आईदेखील एक शिक्षिका आहे. नंतर नंतर मी कव्हर घालायला शिकलो. पुस्तके खाकी कागदाने व्यवस्थित कव्हर केलेली असावीत. शाळेतील सर्व शिक्षक हे वाक्य ऐकवायचे. मग मी बॅकपॅकच्या झिपर्स तपासायचो. तुटलेली झिपर असलेली बॅग शाळेत कोण घेऊन जाणार. अशा बॅगेतून सगळी पुस्तके खाली पडतील ना.
आणि शेवटची गोष्ट. गणवेश नीट बसतो की नाही हे तपासण्यासाठी घरी आणल्या-आणल्या तो घालून बघायचा. जर ते सैल झाले तर आम्ही तो अल्टर करण्यासाठी टेलरकडे जायचो. माझा तर अल्टर करावाच लागायचा, कारण उंची जास्त, मात्र आम्ही काडीपैलवान. पँट कमरेत कमी करुन घेण्याशिवाय पर्यायच नसायचा. ही सर्व तयारी करून आम्ही आता शाळेत जायला तयार व्हायचो.
चला आता तुम्हीही लागा तयारीला…! तुम्हाला शाळेसाठी शुभेच्छा. खूप अभ्यास करा, चांगले खेळा आणि मजा करा. मलाही निघायला हवं आता… माझं कॉलेजही सुरू झालंय.
आता भेटू पुढच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत.
बाय…