ग्रहस्थिती : बुध, हर्षल, राहू, गुरु मेष राशीत, रवि वृषभेत, मंगळ कर्क राशीत, शुक्र मिथुनेत, प्लूटो मकर राशीत, नेपच्यून मीनेत, शनि कुंभेत, केतू तूळ राशीत. विशेष दिवस : २८ मे रोजी दुर्गाष्टमी, ३१ मे रोजी निर्जला एकादशी, १ जून रोजी प्रदोष.
मेष : ग्रहांची साथ चांगली मिळाल्याने अडकून राहिलेली कामे हातावेगळी होतील. कोर्टातले दावे मार्गी लागतील. व्यवसाय-नोकरीत प्रगती घडेल. आर्थिक बाजू भक्कम होईल, पण मौजमस्तीला विराम द्या. अचानक खर्च निघतील. पैसे जपून खर्च करा. बंधू-भगिनींकडून शुभवार्ता कानी पडेल. मुलांकडे लक्ष द्या, चुकून एखादा प्रताप तुमच्या अंगाशी येऊ शकतो. इस्टेट एजंट, बांधकाम व्यावसायिक, कलाकार व संगीत क्षेत्रातील मंडळींसाठी चांगला भरभराटीचा काळ आहे.
वृषभ : तरुणांचा भाग्योदय होईल. घरातील किरकोळ वादांकडे फार लक्ष देऊ नका. नोकरीच्या ठिकाणी आपल्या बाजूने निर्णय होणार नाहीत. अकारण त्रास करून घेऊ नका. काहींना अचानक धनलाभ होईल, पैशाची उधळपट्टी होईल. महागडी वस्तू खरेदी कराल. संततीकडून चांगले काम झाल्याने तुमचे नाव मोठे होईल. जुन्या मित्रांच्या अचानक गाठीभेटी होतील. घरातल्या मंडळींसोबत देवदर्शनाला जाल. प्रेमप्रकरणात गैरसमज होईल. जपून बोला.
मिथुन : नोकरीत वरिष्ठ कामाचे कौतुक करतील. त्यातून एखादी नवीन जबाबदारी मिळेल, भविष्यात त्याचा फायदा होईल. अचानक विदेशवारी होऊ शकते, आर्थिक तरतूद ठेवा. किरकोळ कारणावरून घरातील ज्येष्ठांबरोबर वाद टाळा. विद्यार्थीवर्गाला शिक्षण, क्रीडा क्षेत्रात चांगले यश मिळेल. व्यावसायिकांना नवी संधी येऊ शकते. घाईत निर्णय घेऊ नका. आर्थिक फटका बसू शकतो. भागीदारीत वाद होतील. राजकारणी मंडळींसाठी चांगला काळ.
कर्क : व्यवसायात नव्या ऑर्डर्सचे प्रमाण वाढून चांगले पैसे मिळतील. त्यांचा विनियोग जपून करा. उधार उसनवारी देणे टाळा. नोकरीत कामाचा व्याप वाढल्याने चिडचिड होऊन मानसिक स्वास्थ्य बिघडेल. घरात शुभकार्याच्या निमित्ताने नातेवाईक, मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. वास्तूचे व्यवहार करण्याआधी कागदपत्रे पडताळून पाहा, तज्ज्ञांच्या सल्ल्याने निर्णय घ्या. आरोग्याच्या किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष नको. प्रेमप्रकरणात सांभाळून राहा.
सिंह : खर्चात अचानक वाढ होईल. नोकरीत कामाचे कौतुक होईल. पगारवाढ, प्रमोशन होऊ शकते. अडकलेली सरकारी कामे मार्गी लागतील. मनासारखी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नांना यश मिळेल. कुटुंबियांसोबत सहलीचे बेत आखाल. पती-पत्नीत वाद घडतील. व्यवसायातून आर्थिक लाभ मिळतील. गुंतवणूक भविष्यात फायदा देईल. संशोधकांना नवीन ठिकाणी कामाची संधी मिळेल.
कन्या : स्पष्टवक्तेपणा अंगाशी येऊ शकतो, सबुरीने घ्या. व्यवसायातील चिंतांचा फार त्रास होणार नाही. शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवा. बँकेची कामे, कर्ज प्रकरणे मार्गी लागतील, अनोळखी व्यक्तीवर विश्वास टाकू नका. सोशल मीडियावर काळजी घ्या. दहावेळा विचार करून निर्णय घ्या. सामाजिक कामात वेळ खर्च होईल. महिलांसाठी शुभ घटनांचा अनुभव देणारा कालखंड.
तूळ : मनासारखी कामे पूर्ण झाल्याने आनंदाचे वातावरण राहील. अचानक धनलाभामुळे पत्नीसाठी मोठी खरेदी होईल. नवीन वाहन, घर घेण्याचा विचार मार्गी लागेल. नातेवाईकांना पैशाची गरज पडू शकते. त्यांना हवी असलेली आर्थिक मदत मनात नसेल तरीही करावी लागेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील. आयटी क्षेत्रात विदेशात जाण्याची संधी मिळू शकते. संततीच्या चुकांमुळे मन:स्तापाचे प्रसंग येऊ शकतात. समतोल साधून व्यवसाय करा, चांगला फायदा होईल. दानधर्म कराल.
वृश्चिक : नोकरी-व्यवसायात वाद टाळा. विवाहेच्छुकांसाठी चांगला काळ आहे. प्रत्येक पाऊल सावधपणे टाका. व्यवसायात कष्टांच्या मानाने फळ मिळणार नाही. पण त्यामुळे नाराज न होता मन शांत ठेवा. ध्यानधारणेसाठी वेळ द्या, आठवडा उत्तम जाईल. लेखक, प्रकाशक, मुद्रकांसाठी चांगला काळ. कलाकार, क्रीडापटू यांचे सन्मान होतील. त्यांना एखादे प्रोजेक्ट या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. वाहन बिघाडामुळे खर्च वाढेल.
धनू : आर्थिक बाजू भक्कम करण्यावर लक्ष द्या. सार्वजनिक ठिकाणी वाद घातल्यास पोलीस चौकीची पायरी चढावी लागेल. कायदेशीर कटकटी मागे लागतील. कलाकारांना मनासारखे काम मिळेल, खिसा देखील भरलेला राहील. शिक्षणक्षेत्रात लाभदायक काळ आहे. लेखकांना सन्मान मिळेल. आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. बाहेरचे खाणे-पिणे नको. पोटाचे आजार शस्त्रक्रियेपर्यंत जातील. नोकरीत उत्तम स्थिती राहील.
मकर : पती-पत्नीतील वादाकडे दुर्लक्ष करा. व्यवसायात प्रत्येक व्यवहार बारकाईने तपासा. अन्यथा भविष्यात त्रास होईल. बोलताना अति आत्मविश्वास नको. तरुणांचा उत्कर्ष होईल. ताप, सर्दी, असे आजार डोके वर काढतील. निराशा येऊ शकते. नातेवाईकांसाठी वेळ द्यावा लागेल. अनोळखी व्यक्तीबरोबर आर्थिक व्यवहार करू नका. शास्त्रज्ञ, शेतकरी, आरोग्य कर्मचार्यांना उत्तम काळ. देवदर्शनाच्या निमित्ताने बाहेरगावी जाल.
कुंभ : आपले काम भले आणि आपण भले, हे तत्व डोळ्यासमोर ठेवून चाललात, तर त्रास होणार नाही. व्यवसायात कर्तृत्वाच्या जोरावर मोठी संधी मिळवाल. नोव्ाâरीत चुका टाळा, अन्यथा मोठी गडबड होईल. काहांrना अचानक धनलाभ होईल. लॉटरी, शेअरमधून चांगला लाभ होईल. कुटुंबासाठी वेळ खर्च कराल. विदेशात व्यवसाय वाढवण्याचा निर्णय विचारपूर्वक घ्या.
मीन : कामाला चांगले यश मिळेल, त्यामुळे हुरूप वाढेल. मुलांसाठी उत्तम काळ. उच्च शिक्षणासाठी विदेशात जाण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. नोकरीच्या ठिकाणी कामापुरते बोला. मालमत्तेच्या प्रश्नावरून वाद घडू शकतात. प्रवासात पाकीट सांभाळा. आर्थिक बाजू भक्कम राहील, पण कसाही खर्च करू नका. आरोग्य क्षेत्रात काम चांगला काळ. तरुण मंडळींना अनपेक्षित संधी मिळू शकते.