• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

लेकुरे उदंड जाहली…

- सारिका कुलकर्णी (बे दुणे पाच)

Nitin Phanse by Nitin Phanse
May 25, 2023
in भाष्य
0

लोकसंख्येच्या बाबतीत आपला भारत देश चीन या देशाच्या पुढे गेला अशी बातमी नुकतीच वृत्तपत्रात वाचली आणि प्रत्येक भारतीयाचे मन अभिमानाने भरून आले. कुठल्या का क्षेत्रात होईना, पण आपला देश अखिल जगतात प्रथम क्रमांकावर पोचला ही अभिमान वाटण्यासारखीच गोष्ट नव्हे काय? शिवाय यात अभिमान वाटण्याचे अजून एक कारण आहे. आतापर्यंत भारताने ज्या कुठल्याही क्षेत्रात मानाचे स्थान पटकावले, त्यात प्रत्येक भारतीयाचा सहभाग नव्हता. म्हणजे कोणी खेळात सुवर्णपदक मिळवले, कोणी साहित्यात, कोणी विज्ञान क्षेत्रात आपलं नाव उज्वल केलं. अगदी स्वातंत्र्यलढा जरी म्हटलं तरी त्यात प्रत्येक भारतीय माणसाचा सहभाग होताच असे नव्हे. पण लोकसंख्येच्या लढ्यात जगात प्रथम स्थान पटकावण्यासाठी मात्र प्रत्येक भारतीय माणसाने घाम गाळला आहे असे म्हणावे लागेल. शिवाय या मानांकनात अजून एक विशेष बाब म्हणजे यात स्त्री-पुरुष असा दोघांचाही तितकाच सहभाग आहे. त्यामुळे या निमित्ताने आपला देश स्त्री पुरुष समानतेकडे वळला आणि यशस्वी झाला याचा आनंद वाटतो.
भारतीय माणूस उत्सवप्रिय आहे हे सर्वांना ठाऊक आहेच. त्यामुळे लोकसंख्येच्या बाबतीत भारत प्रथम क्रमांकावर आहे हे समजताच भारतीय माणसाने उत्सव साजरा करणे सुरु केले. कोणी घरी मिठाई आणली, नवीन कपडे घातले. कित्येक लोकांनी ‘लोकसंख्यावाढीत आपला सहभाग’ असे नाव देऊन घरातील मुलाबाळांसह आपले फोटो सोशल मीडियावर डकवले. ज्यांना अगदीच आपला सहभाग दाखवता येण्यासारखा नव्हता, त्यांनी ‘महान यश’ असे म्हणत आपलेच लहानपणीचे फोटो टाकले.
आतापर्यंत सरकारी नोकरीत असलेल्या लोकांना दोनपेक्षा जास्त मुले असतील तर काही फायदे नाकारले जात. पण देशाने प्रथम क्रमांकावर येण्याच्या यशात आपला सहभाग दाखवण्यासाठी ‘जे होईल ते होईल’ असे म्हणत आपल्या सर्व मुलांचे फोटो या कर्मचार्‍यांनी सरकार दरबारी दाखल केले असे माझ्या ऐकण्यात आहे. नुसते तेवढेच नव्हे, तर त्यांच्या या सहभाग आणि मेहनतीसाठी त्यांना विशेष सवलती लागू कराव्यात अशीही मागणी जोर धरते आहे.
आपल्या देशातील लोकांना प्रश्न विचारण्याची सवय आहे. त्यामुळे बर्‍याच लोकांनी ‘लोकसंख्या वाढली याला पुरावा काय’ असे विचारले. याउलट आपण याआधीच ‘लोकसंख्यावाढीत’ आपला सहभाग का नोंदवला नाही असे वाटून कित्येक जोडपी नव्याने कामाला लागलेली आहेत असेही समजले.
मला असा प्रश्न पडला की अचानक हा लोकसंख्येचा उद्रेक कसा झाला?
मग लक्षात आले की भारतीय माणसाला सतत कार्यमग्न राहायला आवडते. कोरोना काळात घरी बसण्याची वेळ आली तेव्हा फारसे काही कार्य त्याच्या हाती नसल्याने आपण कार्यमग्नच असायला हवे, या अंतःप्रेरणेने भारतीय माणूस घरातही काम करू लागला. आणि त्याचे फळ म्हणून देश लोकसंख्येत प्रथम क्रमांकावर पोचलेला आहे.
शिवाय दुसरे कारण असे सापडले की इतिहासाचा आदर्श भारतीय लोक नेहमीच डोळ्यांसमोर ठेवत आलेले आहेत. त्यामुळे कार्यमग्न राहण्यात धृतराष्ट्राला आपला आदर्श मानत कित्येक लोकांनी जीवतोड कष्ट उपसले.
माझ्या एका पत्रकार मित्राने तर ‘लोकसंख्येच्या बाबतीत भारत प्रथम क्रमांकावर कसा पोचला’ या विषयावर शोधनिबंध लिहायला घेतलेला आहे. वात्स्यायन ऋषी या क्षेत्रातील आद्य पत्रकार होते असे त्याचे म्हणणे आहे. ‘लोकसंख्यावाढीच्या कष्टाच्या सांध्यावरच्या नोंदी’, ‘भारतीय लोकसंख्या- महाभारत ते आधुनिक भारत’ अशी या मित्राची दोन पुस्तकेदेखील येऊ घातलेली आहेत.
एकंदरच लोकसंख्या हा विषय वेळ खर्च करून अभ्यास करण्याचा विषय आहे, असे माझ्या लक्षात आलेले आहे. शिवाय हा एक विषय असा आहे ज्यात अभ्यासापेक्षाही प्रात्यक्षिकांवर भर दिला, तरच परिणाम लवकर मिळतो असेदेखील अभ्यासाअंती मी आता सांगू शकते.
भारताची विविध शहरे, खेडोपाडी लवकरच या विषयावर चर्चासत्रे भरू लागतील अशी मला खात्री आहे. कुठलेही यश मिळवणे सोपे असते, अवघड असते ते त्या स्थानावर टिकून राहणे. त्यामुळे या प्रथम क्रमांकावर कायम राहण्यासाठी काय करावे लागेल, यावर विशेष परिसंवाद आगामी अधिवेशनात घडून यावा असे आमच्या विभागातील नगरसेवकांचे प्रयत्न असतील आणि जर हा परिसंवाद घडून आला नाही, तर यापुढे लोकसंख्यावाढीत आपण सहभाग घेणार नाही, अशी धमकी देखील या महनीय व्यक्तीने दिली आहे, असे मला समजले. या क्षेत्रात भारत प्रथम क्रमांकावर राहण्यासाठीची ही तळमळ बघून मला फार बरे वाटले.
लोकसंख्यावाढीत जे जे सहभाग नोंदवतील त्यांच्यासाठी सरकार एक ‘विशेष सवलत योजना’ राबवणार आहे असेही मी ऐकले. काही आखाती देशांमध्ये अरब लोकसंख्या वाढवण्यासाठी ‘तुम्ही फक्त लोकसंख्यावाढीवर लक्ष केंद्रित करा, बाकी तुमची काळजी आम्ही घेतो’ असे म्हणत लग्न करणार्‍याला आणि कुटुंब वाढवणार्‍याला सरकार विशेष फायदे देते, त्याप्रमाणे आपल्याही देशात करावे असे मला वाटते. कुठल्याही क्षेत्रात काम करायचे झाल्यास हुरूप येणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे लोकसंख्यावाढीस जनआंदोलन बनवायचे असेल तर त्याकरिता सरकारी पातळीवरून मदत मिळणे आणि त्यातून लोकांना सकारात्मक ऊर्जा प्राप्त होणे गरजेचे ठरते.
ज्या काळात लोकसंख्यावाढीचा वेग सगळ्यांत जास्त होता, त्या दशकाचा विशेष अभ्यास व्हायला हवा असे राज्य विकास मंडळाचे म्हणणे आहे. लवकरात लवकर गावोगावी जाऊन हा अभ्यास पूर्ण करावा आणि आपला अहवाल सरकार दरबारी सादर व्हावा यासाठी एक शिष्टमंडळ स्थापन करण्यात येणार आहे अशीही बातमी कानावर आलेली आहे. फक्त आर्थिक एकल उत्पादनक्षमता लक्षात न घेता लोकसंख्येची एकल उत्पादनक्षमता यावरही सरकारने विशेष भर द्यावा असेही आता वाटते. राज्याच्या विकासाचा निधी हा थेट मागच्या एका वर्षात राज्याने लोकसंख्येत किती भर घातली याच्याशी निगडित ठेवावा असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मोठ्या कष्टाने भारताने हे स्थान प्राप्त केलेले आहे. त्यामुळे ज्यांनी हे स्थान पटकावण्यासाठी मोलाची भर घातली, त्यांचा उचित सन्मान व्हायला हवा असेही अभ्यास मंडळाचे म्हणणे आहे. त्यामुळे ज्या कोणाला भारतात सगळ्यात जास्त मुले-मुली असतील, त्याला दरवर्षी ‘धृतराष्ट्र विशेष’ सन्मानाने पुरस्कृत केले जाईल अशी शिफारसही या अभ्यास मंडळाने केलेली आहे. एवढेच नव्हे तर शहरी भाग या बाबतीत मागास राहायला नको म्हणून कार्यालयीन कामाच्या वेळात काही विशेष सवलती देण्यात येतील असेही काही खाजगी संस्थांनी ठरवले असावे असे वाटते. कुठल्याही प्रकारचा कामाचा अतिरिक्त ताण कर्मचार्‍यांना दिला जाणार नाही अशी अटच मुळी संस्थेची नोंदणी करताना घातली जाणार आहे. कार्यालयात जाण्यायेण्याचा वेळ कमी होऊन तो लोकसंख्यावाढीत खर्ची घालावा, म्हणून घराजवळील शाखेत नेमणूक व्हावी, असेही निर्णय लवकरच घेण्यात येण्याची शक्यता आहे. कामाचा बोनस हा मुले असण्याच्या प्रमाणाला सम असावा, असेही या संस्थाचालकांनी मान्य केलेले आहे.
जनआंदोलन करून त्यात जनतेचा सहभाग वाढवण्यासाठी महिन्यातून किमान एक दिवस ‘लोकसंख्या प्रेरणा दिवस’ म्हणून साजरा व्हावा असा काही मंडळांचा मानस आहे. लोकसंख्यावाढीसाठी या दिवशी सर्वच स्तरांवर विशेष प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही सरकारने दिलेली आहे असे समजले. भारतीय शिष्टमंडळ बाहेरच्या देशात अभ्यासाला गेले नाही तर त्या विषयाचा अभ्यास फाऊल ठरतो. पण, ही एकच बाब अशी आहे की जिथे भारतीय शिष्टमंडळे बाहेरच्या देशात मार्गदर्शनासाठी जातील. आता मार्गदर्शनासाठी जाणार्‍या शिष्टमंडळात कुठल्या मंत्र्यांचा समावेश करायचा यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन भरवण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे. अर्थातच या शिष्टमंडळात स्वतःला समाविष्ट करून घेण्यासाठी मंत्र्यांची चढाओढ चालू आहे. त्यासाठी काही विशेष पात्रता असणे आवश्यक आहे. ज्यांचा कार्यकाळ संपला आहे असे मंत्री यात जाऊ शकणार नाहीत, अविवाहित मंत्री यात समाविष्ट होऊ शकणार नाहीत. उरलेल्या लोकांत जास्तीत जास्त मुले असणार्‍यांचा समावेश होईल.
हे सगळे होईलच. मला वेगळाच प्रश्न पडला आहे, बाहेरच्या देशात जाऊन शिष्टमंडळ तिथे लेखी शिक्षण देणार की प्रात्यक्षिकांसह देणार? लोकसंख्येच्या निमित्ताने देशासमोर नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत, त्यामुळे प्रत्येक देशवासियाने या आंदोलनात आपलाही सहभाग नोंदवावा ही नम्र विनंती. हम दो, हमारे सौ…

[email protected]

Previous Post

हेही महाराज, तेही महाराज

Next Post

दगा

Next Post

दगा

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.