आज सुबोध वेलणकर आणि त्यांची पत्नी मुलाच्या पासिंग आऊट परेडसाठी आले होते. अतिशय देखणी अशी ती परेड पाहताना त्यांच्या डोळ्यासमोर जुना काळ तरळत होता. मुलाच्या कौतुकाने पती-पत्नीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. आईची माया मुलाच्या कौतुकाने ओसंडून वाहत होती. आर्मीतून निवृत्त झालेल्या नवर्याची सारी करिअर जरी तिने पाहिली असली तरी त्याची सुरुवात आणि त्यामागचा खडतर प्रवास हा ऐकीवच होता. त्यातही एक गंमत असतेच. फारच क्वचित नवरा त्याच्या लहानपणच्या फसलेल्या, हुकलेल्या आठवणी बायकोला नीट समग्रपणे सांगतो. याउलट छोट्या छोट्या कौतुकाच्या आठवणी मात्र सजवून धजवून, एवढेच काय काल्पनिक खतपाणी घालून रंगवून सांगण्याची पद्धत सारेच नवरोबा करत असतात. हे सारे आपल्याला माहीतच नाही असेही नाटक बायको नेमकेपणाने रंगवत असते. ही अर्थात घरोघरची कथा.
सुबोधचा मुलगा इंजीनियर आशिष आज कमिशन्ड ऑफिसर म्हणून सैन्यदलात दाखल झाला होता. आणि निवृत्त कर्नल व्ही. सुबोध थेट चाळीस वर्षांपूर्वीच्या शाळकरी आठवणीत अडकला होता. त्याचे स्मरणरंजन करत होता. वेलणकर हे लांबलचक नाव उच्चारायला कठीण पडते हे कळले, तेव्हापासून सुबोधने नावाचे व्ही. सुबोध करून टाकले होते.
आठवणीत रममाण सुबोध
चार भावंडातला सगळ्यात लहान सुबोध. सगळ्यात मोठ्या दादाची नोकरी सुरू झाली तेव्हा सुबोधची शाळा संपली. धाकट्याचे सदोदित कौतुक घरातल्या सगळ्यांनाच. शिस्तीचा बडगा मोठ्यांना बसतो, धाकट्यांना मात्र बेसनाचा लाडूच मिळतो. शाळा संपली तरी काय करायचे याबद्दल सुबोधच्या मनात काहीच स्पष्टता नव्हती. अर्थात त्या काळात त्यात फारसे कोणाला वावगे वाटत नसे. मार्क बघायचे आणि मिळेल त्या शाखेला प्रवेश घ्यायचा. कॉलेज सुरू व्हायचे. बरे मार्क असतील तर सायन्स, नाहीतर कॉमर्स आणि कुठेच अॅडमिशन मिळत नसेल तर आर्ट्स ही पद्धत त्याही काळात रुजलेली होती.
चांगले मार्क होते म्हणून अर्थातच सुबोधला सायन्सला प्रवेश मिळाला. कॉलेजचा परिसर सोडून समोरच्या रस्त्यावरचा रमणीय परिसरच त्याला आवडत होता. अधूनमधून वर्गात बसणे आणि जास्त वेळ रस्त्यावर रमणे हा शिरस्ता आजही पुण्यातील नामवंत कॉलेजात चालू आहे. फर्ग्युसन रोडवरच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये तर वर्गात बसण्याऐवजी समोरच्या वैशालीत रमणे आणि रस्त्यावर फेरफटका मारून डोळ्यांना व मेंदूला शांतता मिळवणे हा उद्योग करणारे नवोदित असतातच. सुबोध त्याला अपवाद कसा असेल बरे?
पाहता पाहता कॉलेजचे पहिले वर्ष संपले. शाळेतले चांगले मार्क चांगलेच घसरले होते. तो काळ जरा वेगळाच होता. पैशाला पासरी इंजीनिअरिंग कॉलेजे निघण्याच्या आधीचा तो काळ असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जेमतेम सहासातशे मुलांना इंजीनिअरिंगला प्रवेश मिळत असे. आपल्याला काय करायचे आहे याची जाणीव जरी सुबोधला झालेली नसली, तरी एक गोष्ट आता त्याला पक्की कळली होती की इंजीनिअरिंग आपल्याला मिळत नाही.
आजपण अशी सारी मुले आपले सारे कसे छान छान चालले आहे असे दाखवत अभ्यासाचे सोंग घेतात. मात्र अधूनमधून आई-वडिलांच्या रागाला ‘योग्य तो’ मान देत दिनक्रम चालू ठेवतात. अर्थातच सुबोध आणि त्याच्या मित्रांचे हेच चालू होते.
कॉलेजचे दुसरे वर्ष पण संपले. निकाल लागला. आता इंजीनियरिंग मिळणार नाही हे नक्की कळलेले सगळेजण एकत्र बसून घमासान चर्चा करत होते. अचानकपणे ज्या हॉटेलवर त्यांचे चहापान चालू होते त्याच्यासमोरच नॅशनल डिफेन्स अकॅडेमीची शानदार गाडी थांबली. टाय लावलेली स्मार्ट अशी पंचवीस-तीसजण मुलं त्या गाडीतून उतरली. अचानक या सगळ्या ग्रूपच्या डोक्यात एक ट्यूब पेटली. पुण्यात एनडीए आहे, पण एनडीएत पुणे नाही. चला आपण प्रयत्न तर करूयात. इंजीनिरिंग नाही तर नाही पण आर्मीतली अशी शानदार करिअर तर आपल्यासाठीच आहे ना?
गंमत कशी असते पहा, समोर दिसेल ते हवेसे वाटण्याचे हे वय. पण त्यासाठीची तयारी कशी करायची असते याचा विचारसुद्धा कोणाच्या डोक्यात येत नाही. हे कायमच घडत आलेले. आजसुद्धा तेच घडते. त्याहीपेक्षा अजून एक वाईट गोष्ट सध्या सुरू झाली आहे. ती म्हणजे अप्राप्य आहे हे माहीत असूनसुद्धा त्याकरिता प्रचंड खर्च करणे, क्लास लावणे, जिद्दीने पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहणे सुरू झालंय. आयआयटीचा क्लास लावला असे सांगणारे हजारो भेटतात, पण तिथे गेलेला मात्र शोधावा लागतो. तसेच काहीसे पुण्याच्या एनडीएबाबतीत घडत असते. नववी, दहावीपासून तयारी करणारी मोजकी मुले प्रवेशपरीक्षेतून यश मिळवतात. पण इतर बहुतेकजण जागे होतात ते कॉलेजमध्ये गेल्यानंतरच. असे घडते त्याचे कारणसुद्धा अगदी बोलके आहे. या प्रवेश परीक्षेसाठी ३०० मार्कांचा गणिताचा एक वेगळा कठीण पेपर असतो. इंजीनिरिंग कॉलेजला प्रवेश न मिळणार्या मुलांना हा पेपर कधीच सोपा जात नाही. प्रवेशासाठी लागणार्या मार्कांमध्ये हा निर्णायक ठरतो. सुबोध आणि त्याच्या मित्रांच्या गँगचे असेच झाले. जेमतेम एकाला एनडीएच्या परीक्षेतून यश मिळवून तिथे पोचता आले. इतर सार्यांनी बीएससीला प्रवेश घेतला.
ओटीएची वाट सोपी
चाळीस वर्षांपूर्वीची परिस्थिती थोडी वेगळी होती. कॉलेजची दोन वर्षे पूर्ण केलेल्यांना शॉर्ट सर्विस कमिशनसाठी अर्ज करता येत असे. त्या वेळचे मद्रास शहर म्हणजे हल्लीचे चेन्नई येथे ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (ओटीए) आहे. शॉर्ट सर्व्हिस कमिशन म्हणजे सात वर्षांसाठीची आर्मीतली नोकरी. ती पूर्ण केल्यावर त्यातील २५ टक्के अधिकार्यांना परमनंट कमिशन दिले जाते. त्यासाठीची परीक्षा एनडीएच्या मानाने खूप सोपी. आजही त्या परीक्षेचे स्वरूप फारसे बदललेले नाही. पात्रता मात्र आता किमान पदवीधर अशी झाली आहे. एवढेच काय, तिथे महिलांनाही आता दाखल केले जाते.
इंग्रजी वाचन, लेखन, त्याचे आकलन व सामान्य गणित यावर आधारित ती परीक्षा असते. मात्र खरी कसोटी लागते ती मुलाखतीमध्ये. सलग पाच दिवस चालणार्या सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या (एसएसबी) मुलाखतीतून तावून सुलाखून बाहेर पडणारा उमेदवारच निवडला जातो, त्यानंतर त्याची वैद्यकीय चाचणी होते. निवड झालेल्या उमेदवारांना वर्षभराचे कठोर प्रशिक्षण देऊन आर्मीच्या विविध विभागांत गरजेनुसार पाठवले जाते.
एनडीएमध्ये प्रवेश न मिळाल्यामुळे आर्मीचा नाद कायमचा सोडून बाकीचे सर्व मित्र इमाने इतबारे बीएससीच्या अभ्यासाला लागले होते, तर सुबोधने मात्र या शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या परीक्षेवर लक्ष केंद्रित केले होते. बरोबरच्या मित्रांना त्याने एक आश्चर्याचा धक्काच दिला. मुलाखतीद्वारे ओटीएला निवड झाली तेव्हा एक झकास पार्टी सगळ्या मित्रांना दिली व ही बातमी सांगितली. सगळे मित्र पुण्यातच राहिले, पदवीसाठी शिकत राहिले आणि त्यांच्या हाती पदवी येण्याच्या आतच सुबोध लेफ्टनंटचा करकरीत ड्रेस घालून पुण्यात सुट्टीला आला होता. एनडीएमध्ये गेलेल्या एकुलत्या एक मित्राचे अजूनही प्रशिक्षण चालू असताना सुबोधनी हे यश मिळवलेले पाहून सारेच चकित झाले होते. यथावकाश सारे आपापल्या उद्योगाला लागले. पाहता पाहता सहा वर्षे संपली. सुबोध आता कॅप्टन झाला होता. वयाची पंचविशी संपल्यामुळे त्याला आर्मीतर्पेâ लग्नाची परवानगी मिळाली होती. घरातील एकमेव लाडक्या धाकट्याचे लग्न ठरवण्याचे घरातील सार्यांनी मनावर घेतले होते. लवकरच या सार्या प्रयत्नांना यशही मिळाले. दोन महिन्याची वार्षिक सुट्टी घेऊन सुबोध लग्नाकरता घरी हजर झाला.
यथावकाश मोठ्या धामधुमीने सुबोधचे लग्नही पार पडले. लग्नानंतर दुसर्या दिवशी गंमतच घडली. भाचे पुतण्यांचा सारा गोतावळा घेऊन सुबोध एका बागेत गेला होता. लहान पोरांच्या बरोबर त्यांच्यापेक्षा लहान होऊ पाहणारा सुबोध शिवाशिवी खेळताना अडखळला आणि पडला. हनिमूनला जाण्याआधीच त्याचा डावा हात प्लास्टरमध्ये गेलेला होता. घरातल्यांच्या आणि मित्रांच्या टिंगलीला तो एक छान विषय मिळाला. सुट्टी संपली, हनिमून झाला, प्लास्टर निघाले आणि नवीन वधूला इथेच सोडून त्याला अरुणाचल प्रदेशला रुजू व्हावे लागले.
शॉर्ट सर्व्हिस कमिशननंतर ईएमई या तांत्रिकी विभागांमध्ये त्याची नेमणूक झाली होती. आता कायमस्वरूपी कमिशन मिळण्याच्या मुलाखती सुरू झालेल्या होत्या. त्यात जिद्दीने अभ्यास करून सुबोधने यशही मिळवले. आता त्याची नोकरी वयाच्या पन्नाशीपर्यंत पक्की झाली होती. कहानी में ट्विस्ट असे म्हणता येईल असा आता सुरू होणार होता. लग्नानंतर आता पुण्याच्या सीएमईमध्ये म्हणजेच कॉलेज ऑफ मिलिटरी इंजीनियरिंग, दापोडी येथे त्याची रीतसर शिक्षणासाठी रवानगी झाली. ईएमई कोअरमध्ये फक्त इंजीनियरच अधिकार्यांचे काम करतात. त्यामुळे आता लग्नानंतर पुन्हा एकदा कॉलेजमध्ये जाऊन मन लावून शिकण्याची वेळ आली होती.
ही भानगड वाचकांनी नीट समजून घेणे गरजेचे आहे. वय वर्षे २६. नुकतेच लग्न झालेले. कॉलेजचे शिक्षण व अभ्यास सुटून सहा-सात वर्षे लोटलेली. आणि आता वर्गात बसून करायचा तो इंजिनिअरिंगचा गहन अभ्यास. डोक्यात शिरले तर पाहिजे ना?
असा हा सारा गलबला सुबोधच्या डोक्यात चालू असताना कॉलेजही सुरू झाले. पण महिनाभरात सुदैवाने त्यातून तो सावरला. हळूहळू अभ्यास पण जमायला लागला. आवडू लागला. हातातून जे निसटले होते ते आता पक्के पकडून ठेवण्यासाठी त्याची वाटचाल सुरू झाली होती. पदवीधर झालेल्या त्याच्या नवीन पत्नीला या सगळ्यामागचे गांभीर्य लक्षात येणे जरा कठीणच. तिची भूमिका ती चांगल्या पद्धतीत निभावत होती. अशातच आशिषचा जन्म झाला. त्याचे बारसे महत्त्वाचे का सीएमईच्या दुसर्या वर्षाची परीक्षा या दोलायमान अवस्थेत सुबोध होता. अखेर शिक्षण संपले. बी.टेकची पदवी हाती आली. सुबोधचे नावामागे मेजर लागले. खर्या अर्थाने आता सुबोधचे आयुष्याला सुंदर वळण लागले होते. विविध ठिकाणी पोस्टिंग, पुढची प्रमोशन, त्यासाठी करावे लागणारे विविध कोर्सेस असा सारा प्रवास संपवून एके दिवशी कर्नल व्ही. सुबोध (निवृत्त) अशी पाटी दारावर लागली.
हा सारा खडतर प्रवास व हातातून सुटलेल्या व पुन्हा मिळवलेल्या गोष्टींच्या आठवणीमध्ये सुबोध अडकला होता. त्याचवेळी, ‘बाबा, मी तुमच्यासारखेच ईएमई कोअर निवडले आहे’ असे इंजिनीयर म्हणून दाखल झालेल्या आशिषने आईबाबांना सांगितले. सुबोधची मान अभिमानाने अधिकच ताठ झाली होती.
तात्पर्य : डिफेन्समध्ये जाण्यासाठी प्रवेशाचे अनेक टप्पे असतात. पहिला टप्पा एनडीएचा. तो अतिशय तीव्र स्पर्धेचा असतो. चार लाखातून ३६० जण फक्त निवडले जातात. दुसरा टप्पा शॉर्ट सर्व्हिस कमिशनचा. इथे दरसाल अकराशे निवडतात. तिसरा टप्पा पदवीधर कमिशन म्हणून इंडियन मिलिटरी अकॅडमीचा. तांत्रिकी सेवांमध्ये प्रवेशासाठीचा चौथा टप्पा. द्विपदवीधर झाल्यावर एज्युकेशन कोअरमध्ये जाता येते तो अजून एक. डॉक्टर, डेंटिस्ट, नर्सिंग याद्वारेसुद्धा आर्मीमध्ये अधिकारी बनण्याचे रस्ते सुरू होतात. यालाच समांतर रस्ते एअरफोर्स व नेव्हीसाठी आहेत. मुलगी असो किंवा मुलगा दोघांनाही दारे अशीच उघडतात. प्रत्येक टप्प्यासाठीची तयारी मात्र नीट समजून घ्यावी. अधिकारी म्हणून सैन्यामध्ये दाखल झाल्यावर पहिलाच पगार वार्षिक दहा लाखाचा असतो हेसुद्धा अनेकांना माहिती नसते.